त्याला आवडलेली ती:- भाग अंतिम!
ऋचा ने "मला ऋग्वेद आवडतो" हे सगळ्यांसमक्ष व्यक्त केलं. ऋग्वेद काहीच न बोलता बाहेर पडला.
ऋचा खूप अस्वस्थ फील करत होती, पण घडलेल्या प्रकारामुळे निःशब्द झाली होती. वडिलांचा स्वर ऐकून घाबरली होती कारण एरवी कमी बोलणारे वडील आज चक्क संतापले होते. रडत रडत ती रूममध्ये गेली आणि उशीत डोकं खुपसून रडत राहिली.
तशीच केव्हातरी तिला झोप लागली.
सकाळी आईने दार जोरजोरात वाजवले तेव्हा तिला जाग आली.
" ऋचा किती उशीर हा उठायला! कॉलेजमध्ये जायचं नाहीय का?"
"नाही जाणार मी!"
"का?"
"माझी ईच्छा नाही आहे"
"तेच विचारते आहे, का?"
" मला नाही जायचे, बस!" म्हणत ती बाथरूममध्ये गेली.
"ऋचा" बाहेरून जोरात बाबांनी आवाज दिला.
लगबगीने ती खाली गेली.
"काय चाललाय? लगेच तयार हो, मी तुला आणि नैना ला नेऊन सोडतो आहे कॉलेजमध्ये!15 मिनिटे आहेत तुझ्याकडे!" तेवढ्यात नैना आलीच.
आता वाद घालण्यात अर्थ नाही हे जाणून तिने खरंच अगदी 15 मिनिटात आवरले.
दोघी कॉलेजमध्ये मध्ये गेल्या, ऋचा अगदी यांत्रिकपणे वावरत होती.
त्या दिवशी तो दिसला पण ती त्याच्याशी काहीच बोलली नाही.
त्यानंतर पुढील काही दिवस तो दिसायचा पण ही त्याला टाळत होती.
मुद्दाम तो दिसला की निघून जायची, दिशा बदलायची त्याने हाक दिली तर बोलायची नाही.
नैना मात्र त्याच्याशी बोलत असे.
नेहमी टवटवीत वाटणारी ऋचा अबोल झाली होती.
असेच 15 दिवस झाले असतील. या 15 दिवसांत तिने हजार वेळा त्याला कॉल करायला मोबाईल हातात घेतला पण कॉल केला नाही की त्याच्या कोणत्याही कॉल किंवा मेसेज ला रिप्लाय केला नाही.
दिवस भराभर जातहोते....आता जवळजवळ एक महिना होत आला या गोष्टीला आणि एक दिवस अचानक तिच्या वडिलांनी तिला आणि आईला हॉल मध्ये बोलावले.
" ऋचा तुझ्यासाठी मी एक स्थळ शोधले आहे, मला मुलगा पसंत आहे आणि खूप चांगल्या घरातील आहे."
तिच्या काळजात धस्स झाले!
आई सुद्धा आ वासून ऐकत राहिली "अहो पण........!"
"तुला सांगितले ना मी पसंत केले आहे! पण नाही आणि बिण नाही!
ऋचा तुला हवे तर तू जाऊन त्या मुलाला भेटून घे, मी तुला नाव आणि पत्ता देतो...!"
"नको बाबा! मी म्हणाले ना की तुम्ही कराल ते मला मान्य आहे, मला नाही गरज वाटत त्याला भेटायची!"
"तरी तुझं आयुष्य आहे, एकदा भेट आणि बोलून घे"आई म्हणाली.
"नको आई, त्याची आवश्यकता नाही! बाबा तुम्हाला योग्य वाटते ना! मग मला अडचण नाही" ती बोलत तर होती पण तिचे मन भरून आले होते आणि अश्रूंचा बांध थोपवला होता....
ती धावत रूम कडे आली दरवाजा लावला आणि रडून घेतले आणि नैना ला फोन करून सगळे सांगितले.
"अग जा भेट तर एकदा, कसा आहे ते कळले पाहिजे" नैना म्हणाली.
"नको! जे होईल ते...मला आता कसलीच ईच्छा नाही राहिली!"
"नंतर पश्चाताप होईल, ऋचा!"
"तो तर कायम होणारच आहे, कारण मी जर बुलेट हाती घेतली नसती तर हे संकट आलंच नसते".
तिच्या वडिलांनी नैना ला बोलावून घेतले आणि सांगितले की पुढील 2 दिवसात जुजबी काय हवे ते खरेदी करा! अगदी साध्या पद्धतीने पुढील 5 व्या दिवशी कोर्ट मॅरेज आहे...
नैना ने पुढाकार घेत अगदी थोडक्यात शॉपिंग केली आणि ठरल्या दिवशी ती, ऋचा आणि तिचे आई बाबा कोर्टात हजर झाले....
हृदयाची धडधड होत होती पण मनाला आवर घालत ती बेंच वर बसली होती. बाजूला आई होती पण तिने नैना चा हात घट्ट धरून ठेवला होता.
हलक्या पिच कलरची साडी, त्यावर मोत्याचा नाजूक कंठा, तसेच छोटेसे कानातले आणि हलकासा मेकअप तिला नैना ने करून दिला होता.
खरंतर दृष्ट लागावी अशी ती दिसत होती पण प्रचंड खळबळ तिच्या मनात सुरू होती.
त्याचवेळेस तिने समोर बघितले तर दादासाहेब त्यांच्या दिशेने चालत येत होते.
त्यांना पाहिल्यावर ऋचा च्या मनात प्रचंड धडधड सुरू झाली....
"आता हे कशाला आले इथे? लग्न तोडायला आले का साक्षीदार म्हणून? का बोलावले तू ह्यांना" तिच्या वडीलांनी ऋचा ला बघून विचारले..
"मी नाही बोलावले बाबा ह्यांना...मी ऋग्वेद शी बोलत सुद्धा नाही आहे..."
"न बोलायला काय झाले...मी काय बोलण्याची मनाई नव्हती केली..."
बाबांच्या या बोलण्यावर हसावे की रडावे की चिडावे हे तिलाच कळत नव्हते, हृदयाची स्पंदने प्रचंड प्रमाणात वाढली होती....
ते तिथेच येऊन थांबले...ऋचा काही वर पाहायला तयार नव्हती...
"तुमच्या मुलीचे लग्न करताय, आणि आम्हाला बोलावले सुद्धा नाही..." दादासाहेब ऋचा च्या बाबांना थोडे तीव्र स्वरात म्हणाले...
"दादासाहेब तुम्ही मोठी माणसे, आम्ही तुम्हाला काय आमंत्रण देणार?"
"असे कसे? तुम्ही नाही बोलावले तरी आम्ही येणार!"
तेवढ्यात ऋचा नजर वर करून म्हणाली,
"कशासाठी आलात दादासाहेब तुम्ही? तुमच्या इच्छे आणि अटी प्रमाणे शहर नाही सोडायचे तर लग्न करते आहे ना मी...आता तुम्हाला हा मान पान कश्यासाठी हवाय?"
"ऋचा.." तिचे बाबा तिला अडवत म्हणाले..
"बोलू दे मला बाबा! त्यांच्या अश्या निर्णयामुळे एका मुलीच्या घरी काय घडू शकते ह्याची त्यांना कल्पना नाही आहे"
"ऋचा थांब बाळा, ते मोठे आहेत..."
"बाबा, ते मोठे असले तर काय झाले आपल्याला पण भावना आहेत ना....किती त्रासातून गेले आहे मी गेल्या दीड महिन्यात"
"आता सगळे ठीक होतंय ना ऋचा, तू का त्रास करून घेतेस?"
"ठीक होतंय? काय ठीक होतंय बाबा...माझे मलाच माहिती की काय नक्की होतंय ते..."
तेवढयात ऑर्डरलीची बाहेर येऊन अनाऊसमेंट झाली....
"ऋचा गाडगीळ आणि ऋग्वेद वैशंपायन..आत या..."
त्या ऑर्डर ने एकदम ती चकित होऊन आजूबाजूला पाहायला लागली आणि तिला मोतिया रंगाचा सिल्क चा कुर्ता, खाली पांढरा कडक पायजमा अश्या कपड्यात ऋग्वेद चालत येताना दिसला....
या कपड्यात तर तो खूप उठून दिसत होता आणि तितक्याच रुबाबात चालत येत होता.
खूप खोडकर स्माईल त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि अगदी राजबिंडा दिसणारा तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला.
दादासाहेब पण अगदी आनंदात हसून तिच्याकडे बघत होते....
त्याचा तो अविर्भाव बघून ती म्हणाली " म्हणजे काय? याचा अर्थ काय?"
"म्हणजे, आज तुझे आणि ऋग्वेद चे लग्न आहे!" तिला खोडसाळपणाने नैना म्हणाली.
"ऋग्वेद?" ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"नाही का करायचे लग्न?" तो मिश्कीलपणे म्हणाला.
आता मात्र ती एकदम धपकीने खुर्चीत बसली.
"हा काय प्रकार आहे?"
" कसला प्रकार? मी म्हणालो होतो ना की मी तुझ्यासाठी मुलगा बघितला आहे. खूप चांगल्या घरातील आहे,तुला म्हणले की हवे असेल तर जा भेटून घे आणि बोल त्याच्याशी...तूच गेली नाहीस!" बाबा म्हणाले.
"अहो पण तो ऋग्वेद आहे हे थोडे ना तुम्ही सांगितले? आणि त्या दिवशी तुम्ही 2 ते 3 तास ह्याच्या घरी होतात ते काय?"
"हेच की तुम्हा मुलांच्या भविष्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो!" दादासाहेब आत्ता काही बोलले.
गोंधळल्यासारखी ती इकडे तिकडे बघत होती आणि सगळे तिला हसत होते.
नैना,शंतनु,आई,बाबा, ऋग्वेद आणि दादासाहेब सुद्धा!
"नैना तू पण!"
"मी पण काय? मला हे सगळे माहीत होते! हो ना रे शंतनु?"
आता मात्र ती एकदम चिडून फुरंगटूनन तिथून चालत जाणार तितक्यात ऋग्वेद ने तिला अडवले.
"मी आवडत नाही का?"
"मी कुठे असे म्हणाले? पण हा काय प्रकार आहे?"
"सगळे कळेल पण तू लग्नाला तयार आहेस का?"
ती लाजली! "पण हे सगळे काय आहे? मला कळलेच पाहिजे!"
"सगळं कळेल!" तिचे बाबा म्हणाले.
"आज इथे कोर्ट मॅरेज होईल, मग गावात मोठा लग्न सोहळा आणि मग इथे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जंगी रिसेप्शन!" दादासाहेब म्हणाले.
"अगं त्या दिवशी दादासाहेब आणि मी तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल आणि पूढील आयुष्याबद्दल बोलत होतो.
मी म्हणालो की तसे तुम्ही लहान आहेत पण दादासाहेबांच्या बोलण्याने मला विश्वास आला आणि हा निर्णय आम्ही घेतला. तुझ्या शिक्षणाला कुठलीही आडकाठी नसेल आणि ऋग्वेद आणि तू एकत्र व्यवसाय सुद्धा बघाल.शिवाय मला यांनी पार्टनर म्हणून पण त्यांच्या ग्रुप मध्ये ऑफर दिली आहे. तो यांचा मोठेपणा पण मी ती स्वीकारणार नाही...आणि यात माझा काहीच अहंकार नाही." बाबा बोलले.
तिला आता कळले की हे सगळे एकत्र येऊन हा सगळा प्लॅन तयार केला होता.
तिने रागाने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला तसा तो म्हणाला "मला बोलायचे आहेच पण आपण सरकारी वेळ वाया घालवू शकत नाही."
ठरल्याप्रमाणे सगळे छान व्यवस्थित आणि आनंदात पार पडले! दोघांनीही मॅजिस्ट्रेट समोर सही केली... शंतनु आणि नैना ने विटनेस म्हणून सही केली.
ऋचा ने ऋग्वेद ला एक जोरात चिमटा का
ढला आणि त्याला बाजुला चल असे म्हणाली....
दादासाहेब स्वतः म्हणाले"मुलांनो आम्ही सगळे पुढे घराकडे होतो तुम्ही या जरा निवांत" तसे पुन्हा एकदा सगळे हसायला लागले.
आणि हो ऋग्वेद आणि ऋचा तुमच्या दोघांसाठी खास तुमची बुलेट तयार आहे बाहेर....त्यावरूनच या...!
त्यांच्या या बोलण्यावर ऋग्वेद ने फक्त ऋचा कडे बघितले...
त्या दिवशी प्रमाणेच ऋग्वेद ने हेल्मेट घातले, गॉगल घातला आणि बुलेट ला किक मारली तशी ती त्याच्या मागे बसली....
पुन्हा त्याच रस्त्याने बुलेट भरघाव शहराबाहेर निघाली आणि त्याच तळ्याशी येऊन थांबली....
तिच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही बोलत होते....
"आता बोल..." ती ऋग्वेद ला म्हणाली..
"ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिले त्या दिवशी तुझा तो आकाशी रंगाचा टॉप आणि ती जीन्स! त्या मोठया गोल रिंगस तुझ्या कानात आणि वाऱ्यावर उडणाऱ्या तुझ्या त्या केसांच्या बटा! खूप वेडावून गेले तुझे ते प्रथम दर्शनीच रूप मला! पहिल्या नजरेत तू मला भावलीस आणि मी प्रेमात पडलो."
त्याचे बोलणे तोडत" पण तू तर माझ्याशी खूप वाईट वागत होतास!"
"मुद्दाम केले मी ते!"
"म्हणजे?"
"तू तुझ्या रूपाच्या गर्वात होतीस! एक जबरदस्त ऍट्टीट्युड! मला तुला काही गोष्टी नजरेत आणून द्यायच्या होत्या. ओढ काय असते! प्रेम कसे माणसाला बदलावते आणि भावना काय असतात याची तुला जाणीव व्हावी यासाठीच तर्हे सगळे केले" म्हणत हलकेच त्याने तिचे वाऱ्यावर उडणारे केस कानामागे केले आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकले....
तशी लगेच ती त्याला मागे ढकलत म्हणाली, पण म्हणजे...म्हणजे...तू मला त्रास दिलास...."
"कधी दिला ते तर आठव..."
कानी तिचे तिलाच नाही आठवले...
"आणि हे लग्नाचे काय? "
"दादासाहेब आणि तुझे बाबा भेटल्यावर लगेचच कोर्टात नाव नोंदवून ठेवलेले....कारण त्या दोघांनाही तुझी आणि माझी आवड कळली होती..आणि दादासाहेबांचा कोर्ट मध्ये लग्न रजिस्टर करण्याचा पहिला आग्रह...मग नंतर धुमधडाक्यात लग्न करायचे ते करा असे त्यांचे म्हणणे..."
"आणि दादासाहेबांच्या त्या अटी?"
"तट अटी मध्ये लग्न करणे ही अट नव्हती का?"
"पण ते शहर सोडून जायचे काय...?
"ते मुद्दामूनच! तू लग्न करायला नाही म्हणू नये म्हणून.."
"आणि तुला हॉस्पिटलमध्ये न भेटून देणे आणि घरी त्यांचे ते वागणे..."
"त्यात सगळ्या मध्ये मी आणि दादासाहेब सामील होतो...कारण पहिल्या दिवशीच मी त्यांना तुझ्या बद्दल सांगितले होते....म्ह्णून तर ते सारखे तुझ्या घरी यायचे म्हणून म्हणत होते..."
"आणि ते सगळे लोक...?"
"ती माझीच माणसे होती ना सगळे...माझ्या म्हणण्या प्रमाणेच वागणार ना!"
"किती दुष्ट आहेस ना तू ऋग्वेद... असे म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली...
पुढील काही क्षण तो स्पर्श अनुभवण्यात गेली आणि तो आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर विलसत होता.
थोडा वेळ हातात हात घेऊन ती दोघे तिथे बसली आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत बोलत होती.
तेवढ्यात तिचा फोन वाजला, त्यावर विडिओ कॉल होता.
नैना चा तो कॉल होता....
तिने कॉल उचलला तसे," काय ऋचा कसे वाटत आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का नाही अजून तुझ्या नवऱ्याकडून?" " नैना म्हणाली....
लाजत तिचे गाल आरक्त झाले होते, ऋग्वेद नेच रिप्लाय करत "देतोय, हा नवरा, ह्या बायकोच्या प्रश्नांची सगळी खरी खरी उत्तरे देतोय.... हो ना" असे म्हणत त्याने ऋचा कडे बघितले...
त्या दोघांच्या त्या नवपरिणीत रुपाकडे बघत हसत नैना म्हणाली "आम्ही सगळे वाट बघत आहोत एवढे फक्त ध्यानी असू देत" म्हणत हलकेच डोळा मारला....
तसं तिने डोळे मोठे करत आणि हसत कॉल कट केला आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि त्याने हलकेच आपले ओठ तिच्या ओठावर टेकले....!
आज 'त्याला आवडलेली ती' आणि 'तिला आवडलेला तो' दोघेही नव्या आयुष्याची सुरुवात एकमेकांच्या साथीने करत होते!
समाप्त!
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा