त्याला आवडलेली ती:- भाग 12
शंतनू स्वतःच घाबरला होता, तो आपल्याला काही मदत करेल असे ऋचा ला वाटत नव्हते... तरीही तिने त्याला" तू वेळ घे आणि विचार कर! उद्या कॉलेजमध्ये ये मग बोलू" असे म्हणाली.
नैना शी थोडं बोलून तो निघून गेला.
"नैना तू प्लिज आज जाऊ नकोस ना! मला भीती वाटत आहे ग! हवं तर मी काकूंना फोन करून सांगते."
"ठीक आहे! मी बोलते आईशी, नो वरीज!" म्हणत ती फोन वर बोलत बाहेर पोर्च मध्ये गेली.
आज ऋचाच्या आईचे पण डोकं या प्रकारामुळे ठणकत होत त्या पण थोडं दणदण करतच काम करत होत्या.
त्या दोघी जेवण करून टीव्ही समोर बदल्या होत्या... ऋचा चे बाबा थोडे उशिराच घरी आले तेव्हा ते फोन वर बोलतच आत आले. कॉल संपला बॅग खाली ठेवली आणि लगेचंच ते म्हणाले" ऋचा तू वैशंपायन ला ओळखते का?"
जस त्यांनी वैशंपायन हे नाव ऐकताच ती घाबरली आणि दचकून तिने नैना कडे बघितले. नैना ने डोळ्यानेच तिला शांत रहा असे खुणावले.
"का हो बाबा काय झाले?" भीत भीतच तिने विचारले.
"मला आज त्यांच्या ऑफिस मधून फोन आला होता, त्यांनी मला उद्या त्यांच्या घरी भेटायला बोलावले आहे."
ती एकदम रडायला लागली काय झाले हे तिला बोलता येईना.
तिची आई म्हणाली"तुम्ही जेऊन घ्या मी सांगते काय ते!"
त्यांनी फारसे काही न विचारता स्वतःच आवरले आणि जेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेले तेव्हा तिच्या आईने घडलेले सगळे त्यांना सांगितले.
इकडे एका वेगळ्याच काळजीत या दोघी चर्चा करत रात्रभर जाग्याच होत्या, सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर सुद्धा शांतता!
"बाबा मला माफ करा! मी मुद्दाम काही केले नाही! मला तर माहीत पण नव्हते की ऋग्वेद हा वैशंपायन ग्रुपशी लिंक आहे."
"हे बघ सगळे घडून गेले आहे, ती लोक फार मोठी आहेत. बोलावले म्हणले की जावे हे लागणारच! बघू काय होतंय! मी ऑफिसमध्ये आज उशिरा येणार हे सांगून ठेवले आहे."
दोघींना घास सुद्धा घशाखाली उतरत नव्हता पण कसेबसे होते प्लेट मध्ये ते त्यांनी संपवले... ऋचा कॉलेजमध्ये गेलीच नाही आणि नैना थोड्या वेळाने तिच्या घरी निघून गेली.
तिचे बाबा पण लवकरच आवरून घराबाहेर पडले. हिने लगेच ऋग्वेद ला फोन केला तर त्याने उचलला नाही. तिने थोडया थोड्या अंतराने तब्बल 13 वेळा कॉल केला तरी त्याने कॉल उचलला नाही.तिला आता तर रडायलाच येत होते...आईशी बोलायची पण हिम्मत तिला होत नव्हती.
गाणी ऐक, इकडून तिकडे फेऱ्या मार असे काहीतरी ती वेळ घालवत होती.... शेवटी बाबांना फोन केला तर
त्यांचा स्विच ऑफ! न राहवून तिने ऑफिसमध्ये कॉल केला तर ते आज आलेच नाहीत हा मेसेज मिळाला!
प्रचंड टेन्शन मध्ये असताना तिचा मोबाईल वाजला... बघते तर ऋग्वेद चा कॉल! अध्याशासरखा तिने फोन वर झडप घातली, "अरे कुठे होतास तू? किती फोन केले? काय झालं माझे बाबा आले होते ना!" तिने भडिमार सुरू केला.
आधी तो शांत होता...मग काही क्षणाने " तुझे प्रश्न संपले की बोलू?"
"हां बोल!"
" तुझे बाबा आले होते, जवळपास 2 ते 3 तास दोघांची काही चर्चा सुरू होती आणि मला तिथे जायला बंदी होती त्यामुळे मला काहीच माहीत नाही की काय बोलणे झाले."
"अरे पण अस कसं? मला कळायला हवं काय ते!"
"मग एक काम कर...मी तुला दादासाहेबांचा नंबर देतो त्यांच्याशी बोलून घे!"
"अरे ए बाबा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी त्यांच्याशी बोलेल तुला शक्य वाटते का?"
"मग माझं डोकं का खातेस! मला पण काहिच माहित नाही सांगितले ना!"
"ऐक ना! हवे तर मी त्यांची पाया पडून माफी मागते पण माझ्या बाबांना काही म्हणू नका! मी तुला भेटणार पण नाही हवे तर" ती रडत रडत बोलत होती.
तेवढ्यात त्याला कोणीतरी आवाज देत आहे हे तिने पण ऐकले आणि त्याने कॉल कट केला.
नंतर ऋग्वेद ने सुद्धा पुन्हा कॉल केला नाही.
संध्याकाळी उशिरा बाबा घरी आले तोवर हिचे रडून रडून डोळे सुजले होते. त्यांना शूज सुद्धा न काढू देता तिने विचारले, "बाबा काय झालं तिथे? तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा गेला नाहीत!"
"जरा पाणी देतेस का?"
तसं धावत जाऊन तिने त्यांना पाणी आणले.
"ऋचा ती खूप मोठी लोक आहेत आपण त्यांच्या कुठेही बरोबरीस नाहीत. ते म्हणेल तेच करावे लागेल! एकतर आपल्याला हे शहर सोडावे लागेल किंवा तुझं लग्न मला पुढच्या काही दिवसांतच पार पडावे लागेल!"
हे ऐकून ती एकदम सुन्न झाली आणि तिची आई तर हात पाय गळल्यासारखी एकदम सोफ्यावर बसलीच.
ती धावत रडत रडत तिच्या खोलीत निघून गेली आणि बाबांनी तिच्या आईला सांत्वन करत शांत हो म्हणाले.
ऋचा ने नैना ला फोन करून सगळे सांगितले. नैना म्हणाली थांब मी बघते काय ते!
तासाभराने नैना चा फोन आला की शंतनु ने खूप प्रयत्न केला पण त्याला ऋग्वेद च्या घरात सोडलेच नाही आणि त्याला ऋग्वेद ला पण भेटता आले नाही आहे.
ऋग्वेद ला कॉल केला तर तो उचलत नव्हता! काय करावे अशा विचारात तिला डोळा लागला.
उठून बघते तर बरीच रात्र झाली होती आणि आईच्या रूम चा दिवा सुरू होता पण तिथे जायची हिम्मत मात्र तिची होईना.
कशीबशी रात्र सरली! सकाळीच ती उठली आपले कसे बसे तिने आवरले आणि बाहेर जायला निघाले तर बाबा हॉल मध्येच बसले होते. बहुतेक ते आज पण ऑफिस ला जाणार नव्हते....त्यांनी तिला थोडे खडसावून विचारले... "कुठे निघालीस?"
"मी, मी ना ऋग्वेद च्या घरी जाते आहे!त्यांची माफी मागेल त्यांना सांगते, की मी या पुढे तुला भेटणार नाही."
"याची काही गरज नाही आहे! मी बघतो काय करायचे ते! तू बोल तू माझं ऐकणार आहेस की नाही?" जरा हुकमी स्वरात ते बोलले.
"तुम्ही म्हणाल तेच मी ऐकेल बाबा! मनापासून सांगते. अचानक असे काही आयुष्यात घडेल हे कधीच वाटले नाही आणि यापुढे काय होईल ते मी सामोरे जाईल."
"ठीक आहे! मला हेच अपेक्षित होते." म्हणून उठून ते त्यांच्या रूम कडे निघून गेले.
तयार झालेली ती तशीच उलट्या पाऊली आपल्या रूम मध्ये गेली. तेवढ्यात तिच्या मोबाईल वर ऋग्वेद चा कॉल आला.
हो-नाही करत कॉल कट झाला पुन्हा कॉल आला तेव्हा तिने " मी थोडी बिझी आहे नंतर फोन करते" म्हणत कॉल कट केला... त्याला बोलू सुद्धा दिले नाही.
त्यानंतर त्याचे बरेच कॉल येत होते पण तिने एकही कॉल उचलला नाही.
थोड्या वेळाने तिच्या घराची बेल वाजली..
तिच्या बाबांनी दार उघडले...दारात ऋग्वेद होता...
"आत येऊ का?"
बाबांनी काही न बोलता त्याच्याकडे पाहिले...
"मी तुम्हालाच भेटायला आलो आहे"
"का?"
"तुम्ही काही गैरसमज करून घेतला आहे असे मला वाटले म्हणून मी भेटायला आलो आहे"
"याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही"
"आहे, नक्कीच आहे! कृपया तुम्ही ऋचा ला बोलावता का?"
ऋचा हे सगळे ऐकत तिच्या आईबरोबर उभी होती...
ती पुढे आली...
"तुला आमच्या घराचा पत्ता कसा मिळाला?"
"काल, आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडायला आला होता ना, त्यानेच मला इथेच आणले"
"ड्रायव्हर ला बरोबर पाठवून घर पाहून घ्यायचे.....आणि तुमच्याकडे कोणी आले तर त्याला मात्र घराबाहेर ठेवायचे, पद्धत चांगली आहे तुमची"
तो काहीच बोलला नाही..
"आला आहेस तर ये आता आतमध्ये.." तीच त्याला म्हणाली...
बाबा शांतपणे पाहत होते...आई गप्प होती.
तो बसला...तिचे बाबा त्याच्या समोर बसले...
"काका, तुमचे काल दादासाहेबांशी बोलणे झाले आहेच, पण तुम्ही ऋचा ला उगीचच काही
बोलाल, दोषी ठरवाल म्हणून तुम्हाला खास भेटायला आलो..."
"माझ्या मुलीला मी काय बोलायचे किंवा नाही हे पण आता मला इतरांकडून शिकावे लागेल का?"
"नाही काका, ऋचा कदाचित तिची बाजू समजावून सांगू शकणार नाही म्हणून मला वाटले की मी काही सांगावे"
"इतका ओळखायला लागला का तू ऋचा ला?"
त्याने ऋचा कडे बघितले तर तीने नजर चोरली...
"तुमच्या दादासाहेबांनी मला बोलावले मी गेलो, ते जे म्हणले ते ऐकून घेतले, तेवढे कमी की काय म्हणून आता त्यांचा मुलगा सुद्धा आम्हां लोकांना आता सांगायला आला आहे"
" काका तुम्ही गैरसमज प्लिज करुन घेऊ नका,पण त्यांच्या मुलाच्या बाबतीत असं पहिल्यांदाच झालं आहे"
"पाहिल्यांदाच झाले म्हणजे माझी मुलगी काय दररोज मुलांना गाडीवरून पाडते काय? तिच्या कडून पण हे पहिल्यांदाच झालं आहे ना."
"हो मान्य आहे काका..."
"पुरे आता! ह्या विषयावर चर्चाच नको.दादासाहेबांनी दोन अटी घातल्या आहेत... एक तर मुलीचे लग्न लावून द्यायचा किंवा हे शहर सोडून जायचे...
माझी नोकरी इथली, घर इथलं. शहर सोडून जाणे काय सोपी गोष्ट आहे?
आमच्या पुढे हिचे लग्न लावून देण्या शिवाय काय पर्याय उरतो. तुमच्या पुढे आम्ही साधी माणसे."
"काका, दादासाहेबांच्या स्वभाव थोडा वेगळा आहे. तुम्ही त्यांच्या बोलणाच्या त्रास करून घेऊ नका. मी काय करू शकतो ते मला सांगा"
"काय करू? आज सुट्टी घेतली आहे मी, मुलीच्या लग्नासाठी काय काय करावे लागते याची यादी करायची आहे मला, मदत करतो का?"
तो काहीच बोलला नाही...ऋचा मात्र हमसाहमशी रडायला लागली...
"रडायला काय झाले तुला?"बाबांनी जोरात विचारले...
ती काही नाही बोलता परत रडायला लागली...
"बोलतेस का नाही आता?" त्यांनी परत विचारले....
तिचा रडायचा आवाज काही कमी होईना..
"ऋचा मी काय विचारत आहे तुला, रडायला काय झाले तुला?" बाबांनी जरबेने विचारले..
" बाबा, मला हा ऋग्वेद आवडतो..." कसेबसे तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले..
"आवडतो? आवडतो म्हणजे काय?
तुला मी आत्ता दादासाहेबांच्या अटी सांगितल्या आणि तरी तू तोंड वर करून म्हणतेस, की हा आवडतो?
जर बापाची काळजी असेल थोडीफार तर आता मी सांगतो तेच तुला केले पाहिजे... कळले का?"
तिचे रडणे अजून वाढले..ऋग्वेद शांतपणे तिच्याकडे बघत होता...शेवटी तिचे रडणे न पाहवून तो म्हणाला,
"जातो मी...परत येईन...काळजी घे ऋचा" असे म्हणून ऋग्वेद तिच्या घराबाहेर पडला.
तो गेल्यावर ऋचा ची आई त्यांना म्हणाली, "अहो तुम्ही त्या मुलाला, असे उपहासात्मक बोलायला नको होते...तो काळजी ने आला होता"
"हे बघ, जावे त्याच्या वंशा! ज्याचे जाते ना त्यालाच कळते....एकुलती एक मुलगी आहे माझी.."
"माझी नाही का...?"
"कळते ना कि आहे...मग आता मी जे करतो आहेना त्यात आडकाठी आणू नको...आणि ऋचा ला समजावून सांग की यापुढे बाबा जे म्हणतील तेच झाले पाहिजे..."
"ठीक आहे..."
"आणि मला ऋचा ची पत्रिका आणून दे...."
तिची आई मान डोलावून आत निघून गेली....!
तिच्या बाबांनी त्यांच्या पंडित गुरुजींना फोन लावला...
"गुरुजी, तुम्ही मागे ऋचा ची पत्रिका केली होती...त्या संदर्भात थोडे बोलायचे आहे...कधी भेटू शकाल?"
"आज 4 नंतर कधीही या...मी आहेच"
तसे त्यांच्याशी भेटायचे नक्की करून त्यांनी फटाफट काही फोन लावायला सुरुवात केली...
दिवसभर बाबांचे फोन सुरू होते आणि तिच्या आईला दर अर्ध्या तासाने त्यांना चहाचा एक कप द्यायचा याची कसरत करावी लागत होती...
ऋचा ने तिचा फोन बंद करून ठेवला होता.
नैना चा लँडलाईन वर आलेला फोन सुद्धा तिने घेतला नव्हता...
आता तिला फोन, कॉलेज, मित्र, मैत्रिणी कशामध्ये ही रस राहिला नव्हता...तिने फक्त तिच्या बाबांना जे ते करतील यात सपोर्ट करायचा एवढेच लक्ष्य ठेवले होते...!
यापुढे तिच्यामुळे तिच्या बाबांना कधीही काहीही ऐकून घ्यावे लागणार नाही याची तिने मनाला खात्री दिली होती...
क्रमशः
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा