Login

त्याला आवडलेली ती भाग 1

Story of two souls who were studying in the college

त्याला आवडलेली ती:- भाग 1 

प्रथम दर्शनातच ती त्याला आवडली होती..वाऱ्यावर उडणारे तिचे सिल्की आणि सरळ लांब केस, व्हाईट कलरचा टॉप, ब्लु जीन्स, हलकेसे लिपस्टीक आणि हातात स्टायलीश ब्रेसलेट घातलेली ती कॉलेजमध्ये आली तेव्हा अनेकांचे चेहरे आ वासून तिला बघत होते...आणि का नसावे, कॉलेजमध्ये ती सगळ्यात जास्त सुंदर होती.
तिचा गव्हाळी रंग, उभा चेहरा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिची सणसणीत उंची.
5.11 सहज होती ती. आणि त्यामुळेच तिच्याशी बोलणे हे लिंबू टीम्बू चे काम नाही, हे त्याला माहिती होते.
त्याचा कॉन्फिडन्स हा म्हणूनच वाढला होता. कॉलेजमधला सगळ्यात उंच मुलगा होता तो!

सगळी मुलं तिच्या समोर शायनिंग मारायची आणि हा शांतपणे सगळ्यांच्या माकडचाळे पहात बसायचा!
ती कोणालाच म्हणजे कोणालाच भाव द्यायची नाही..!
अनेक जणांनी प्रयत्न करून बघितला पण तिचा काहीच रिस्पॉन्स नसायचा. 
शेवटी ती शिष्ठ, गर्विष्ठ, स्वतःला फार ग्रेट समजाणारी या कॅटेगरी मध्ये जाऊन बसली आणि तिथूनच याचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले. 

ती कायम त्याच बेंच वर आणि तिच्या एकमेव मैत्रिणी बरोबर लेक्चर्स ला बसायची. आणि त्या दिवशी नेमकी तिची मैत्रीण अबसेंट होती. ती एकटीच बेंच वर बसलेली असताना हा तिच्या शेजारी जाऊन बसला.
तिच्या सकट सगळे आश्चर्यकारक नजरेने पाहत असताना  त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष केले आणि नोटबुक काढून काही लिहीत बसला. 
आपल्या शेजारी कोणी येऊन बसलंय आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतोय हे पाहून ती जरा चकित झाली..इतर मुलांसारखा हा बोलण्याचा प्रयत्न करत नव्हता....
लेक्चर चालू असताना ती डोळ्यांचा कोपऱ्यातुन त्याला पाहत होती. हा शांतपणे लेक्चर अटेंड करत नोट्स काढत होत्या.
रिसेस मध्ये बॅग पाठीवर ठेऊन हा कॅन्टीन मध्ये गेला..
त्याच्या पाठोपाठ ती येणार ही खात्री त्याला होतीच...
त्याच्या शेजारच्या टेबलावर जाऊन ती बसली ...तरी त्याने लक्ष दिले नाही..
"2 सामोसे , बन मस्का आणि चहा" त्याने ऑर्डर दिली..
त्याचे आपल्याकडे लक्ष जाईल म्हणून तिने पण , "२ सामोसे, बन मस्का आणि चहा" अशी मोठ्या आवाजात ऑर्डर केली.
मागे बसलेला टपोरी घोळका जोरात चिडवायला लागला,  "क्या बात है भिडू , सेम टू सेम" ...
"काय ऐकत नाही"....
"एक्साक्टली सारखी ऑर्डर"....
त्याने त्यांच्याकडे पाहिले पण नाही तिला मात्र लाजल्या सारखे झाले..
डायरेक्ट उठून ती त्याच्या टेबलच्या खुर्चीवर येऊन बसली. 

"हाय, मी ऋचा!"
त्याने तिच्याकडे पाहिले आणि काहिच बोलला नाही...
"हॅलो...मी तुझ्याशी बोलत आहे" त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहत ती म्हणाली..
"बरं मग..."
"मग, तुझे नाव सांग ना.."
"का?"
"का, म्हणजे मी विचारत आहे म्हणून.."
"त्याने काय होईल..?"
"ओळख"
"कशासाठी?"
"अरे, आपण एकाच क्लास मध्ये आहोत..."
"मग..?"
"सारखे मग काय, नाव सांगण्यात इतका कसला खडूस पणा?"
"जीवन..."
"जीवन?....छान नाव आहे.."
"जीवन जगताना माणसाने स्थळ काळाचे भान ठेवावे.."
"म्हणजे...?"
"आपण जसे वागतो तसे आपल्या सोबत पण होऊ शकते.."
"मला नाही कळले.."
"तुझ्या बरोबर पण लोक ओळख करून घेण्यासाठी उत्सुक होते..तेव्हा तू कुठे कुणाशी बोललीस"
"ओह..तू बदला घेत आहेस का त्याचा, सगळ्यांचा रिप्रेसेंटेटीव्ह बनून.."
तो हसायला लागला...
त्याला हसताना पाहून ती थक्क होऊन त्याला पाहत राहिली. 
त्याचे मोत्यासारखे दात आणि गोरापान चेहरा!
निर्विवाद हँडसम होता तो!
आपल्याच क्लास मध्ये असूनही इतके दिवसात आपलेच लक्ष कसे नाही गेले याचे तिलाच आश्चर्य वाटले.
"का हसतो आहेस.."
"तुम्ही बायका ना...?"
"बाई?...तुला मी बाई वाटते?"
"का तू बाई नाही आहेस?"
"मुलगी आहे मी, बाई व्हायला अजून रग्गड वेळ आहे"
"अश्या attitude ने जास्त काळ वाटत नाही..."
त्याच्या या बोलण्यावर ती गाल फुगवून निघून गेली.
रिसेस मधून तो हातात एक पार्सल घेऊन आला आणि तिच्या हातात दिले...
"बाईसाहेब, तुमचे 'सेम टू सेम' कॅन्टीन मध्येच राहिले होते"
त्याच्या या बोलण्यावर तिला खरंतर हसू येत होते पण चिडल्याची acting पुढे पण सुरु ठेवायची होती.
तिने ते पार्सल घेतले आणि क्लास मध्येच खायला लागली.
तेवढ्यात सर आले आणि तिला सामोस्याचा घास काही संपवता येईना..जोराचा ठसका लागला तिला...
सगळ्यांच्या माना तिच्याकडे वळल्या.
"कुणीतरी पाणी द्या रे तिला..." सर म्हणाले..तसे 10 बाटल्यांची झाकणे खटाखट उघडली आणि तिच्या पर्यंत पोचली...
तेवढ्यात हा बाहेर उठून गेला...
क्लास चालू असताना आणि तिला ठसका लागला असताना असे बाहेर उठून जाणे म्हणजे तिच्यासाठी शॉक होता...
तिने पाणी प्यायले आणि सरांना विचारून बरे नाही  कारण देऊन ती बाहेर पडली. बाहेर पडल्यावरती तिची नजर त्याला शोधत होती. 

कॅन्टीन जवळ आल्यावर तिने कॅन्टीन च्या पोराला विचारले "अरे तू त्या जीवन ला पाहिलेस का?"
त्या पोराने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला"कोण जीवन? "
" तो नाही का जो आत्ता थोड्यावेळापूर्वी माझ्या बरोबर बसला होता"
मॅडम त्या साहेबांचे नाव जीवन नाही आहे. मी त्यांना साहेब म्हणूनच हाक मारतो."

तिची उत्सुकता अजून चाळवली गेली, त्याला शोधत शोधत ती पार्किंग मध्ये पोहचली तेव्हा तो एका बुलेटवर बसलेला दिसला. 
तिथे जाऊन ती त्याला म्हणाली, " तू तुझे नाव जीवन का सांगितले? तो पोरगा तर म्हणाला तुझे नाव जीवन नाही आहे."
"मी माझे नाव जीवन कधीच नाही सांगितले."
"अरे तूच तर सांगितले जेव्हा तुला तुझे नाव काय आहे  असे मी विचारले तेव्हा!"
"ते वाक्य होते त्याची सुरवात जीवन या शब्दाने झाली होती, नीट आठवायचा प्रयत्न कर!"
"मग तुझे नाव तरी काय?"
त्याने फक्त खांदे उचलले आणि त्याची बुलेट स्टार्ट केली. 
"ए हॅलो! मी बोलतेय तुझ्याशी?"
त्याने डोक्यावर हेल्मेट चढवले. 
त्याची ती निघायची गडबड पाहून तिने तिच्या खांद्यावरच्या बॅग सावरत ती  त्याच्या मागे बुलेटवर जाऊन बसली. 
त्याने काही न बोलता बुलेट कॉलेज मधून बाहेर काढली. अर्धी हेल्मेट ची काच वर असलेला,
डोळ्यावर रे बॅन चा गॉगल घातलेला, जीन्स आणि अर्धी बाही फोल्ड केलेला ब्लॅक शर्ट घातलेला तो आणि त्याच्या मागे वाऱ्यावरती उडणाऱ्या लांब केसांची,  ग्रीन टॉप आणि ब्लॅक जीन घातलेली ती!

बुलेटवर ची ही जोडी इतकी कमाल दिसत होती की रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाच्या नजरा त्यांच्याकडे वळून वळून पाहत होत्या.

क्रमशः

©®अमित मेढेकर

0

🎭 Series Post

View all