त्याला आवडलेली ती:- भाग 2
कॉलेज च्या गेट मधून बाहेर पडलेली त्याची बुलेट वेगाने शहराच्या बाहेरच्या दिशेने निघाली. एक शब्दही तो बोलत नव्हता,ती आपण कुठे जातोय याचा अंदाज मनाशी बांधत फक्त त्याच्यासोबत जात होती.
पण जशी शहराची वेस ओलांडली तशी ती म्हणाली " ए हॅलो, आपण इकडे कुठे निघालो आहे? कुठे नेतो आहेस मला?"
" पहिले म्हणजे मी तुला ये म्हणालो नाही आहे! तू स्वतःच माझ्या गाडीवर बसली आहेस. मला जिथे जायचे आहे तिथे तिथेच मी निघालो आहे! तू इथे उतरू शकतेस!"
त्याच्या या तुटक उत्तराने ती गप्पच झाली. थोड्या वेळाने त्याने बुलेट शहराच्या बाहेरून वळसा करून जाणाऱ्या नदीकाठी एका झाडाजवळ थांबवली.
आपले हेल्मेट टाकीवर ठेवले आणि तो पाण्याच्या दिशेने चालू लागला. ती सोबत आहे, येते आहे किंवा नाही हे त्याने खिजगणतीतही दाखवले नाही.
तो जसा चालायला लागला तशी ती त्याच्या मागोमाग निघाली. तो पुढे ती मागे असे ते निघाले.
जिथे सगळी मुले आपल्या मागेपुढे करतात आणि हा मात्र भाव सुद्धा देत नाही आणि तरीही आपण याच्या सोबत आहोत याचे तिला नवल वाटत होते पण तरीही चुंबकासारखी ती खेचली जात होती.
शेवटी तीच म्हणाली " मी कधी अशी कोणासोबत कुठे जात नाही आणि तुझ्यासोबत मात्र आले!
पण खरं सांगू, मला खूप सेफ वाटत आहे तुझ्यासोबत!मी अशी सिटी बाहेर एकांतात तुझ्यासोबत...
तुझे नाव सुद्धा मला माहीत नाही पण कसलीच भीती वाटत नाही."
असे बडबडत त्याच्या पाठोपाठ चालत होती.
तो पाण्याशी आला, त्याची जीन्स पॅन्ट फोल्ड केली आणि पाण्यात पाय टाकून एका दगडावर बसला.
ती सुद्धा त्याच्या मागे आली बॅग एक दगडावर ठेवून त्याच्या बाजूलाच बसली.
" मी तुझ्याशीच बोलत आहे...या पाण्याशी किंवा दगडाशी नाही! कसला इतका गर्व आहे रे तुला? का इतका अटीट्युड दाखवतो आहेस? अरे बोल जरा काही! तुझं नाव काय हे सुद्धा सांगायला तुला प्रॉब्लेम!" तणतणत ती बोलली.
"बोल म्हणजे नक्की काय ग? आणि नाही माहीत माझं नाव तर बिघडले कुठे!नाही सांगायचं मला काय जबरदस्ती आहे का?" तोही जरा तोऱ्यातच बोलला तशी ती गप्प झाली.
पुढे तोच म्हणाला, "आणि मला सांग बोल म्हणजे काय नक्की? उगीच मुलगी दिसली की स्माईल करायचे! तुझं नाव काय-माझं नाव हे करत जवळीक साधायची.
मग पुढे कॉफी प्यायला जाऊ! तू किती छान दिसतेस! गिफ्ट्स घ्या! चार दिवस सोबत फिरा- मग रुसवे फुगवे आणि मग वेगळे मार्ग हे असलेच ना!
हे असले फालतू मला जमत नाही.
मला आयुष्यात जे करायचे ते एकदाच पण पक्के!
मग ती मैत्री असो की त्यापुढील नाते असो!
जे असेल मग ते तसे पण कायम! उगीच मैत्री करायची मग त्यातून अपेक्षा निर्माण होणार मग त्या पूर्ण करायचे हे जणू बंधनच" तो बोलत होता आणि ती थक्क होऊन त्याच्याकडे फक्त बघत होती.
तो तिच्याकडे बघतही नव्हता जणू स्वतःशीच बोलत होता. पायाने पाण्यात खेळत होता मध्येच छोटासा दगड पाण्यात फेकत होता दूर आकाशात मध्येच बघत होता.
तिचे अस्तित्व जणू त्याला काहीच जाणीव देत नव्हते....
मधेच बोलला " तू नाही का हेच केलेस! तुझ्या जवळ येऊ पाहणाऱ्या, तुझ्याशी मैत्रिकरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना तू तुझ्या अट्टीट्युड ने परतवून लावलेस!
का?
तुला पण तर त्यांच्या पुढील अपेक्षा नको होत्या! तू नाही का फटकून वागलीस सगळ्यांशी!"
त्याच हे पुढचं बोलणं ऐकून तर ती निःशब्द झाली.
फक्त त्याच्याकडे काही वेळ बघत राहिली आणि मग खाली पाण्याकडे.
किती वेळ असाच शांत गेला हे कळले नाही..…..पण मग तो अचानक उठला आणि त्याच्या बुलेट च्या दिशेने जायला निघाला. ती ते पाहून लगबगीने उठायला गेली आणि तिचा पाय दगडावरून घसरला!
आता आपण पडणार या अंदाजाने तिने डोळे मिटले आणि जोरात ओरडली! पण आपण पाण्यात पडलो नाही हे तिला जाणवले तसे तिने डोळे उघडले समोर पहाते तर आश्चर्याने थक्क झाली!
ती पडू नाही म्हणून चक्क त्याने तिला स्वतःकडे ओढून घेतले होते आणि ती त्याला बिलगून होती. ती सावरली आहे हे जाणवताच त्याने तिचा हात सोडून दिला. थोडी लडखडत ती त्याच्या मागून चालत बुलेट पर्यंत आली....
त्याने पॅन्ट चे पाय सरळ केले आणि लगेच हेल्मेट डोक्यावर चढवले आणि किक मारली.
तशी ती पुन्हा हा सोडून जातो का काय या विचारात पटकन त्याच्या मागे बुलेटवर बसली.
जसा आला तसा तो त्याच गतीने पुन्हा रस्त्याने निघाला.
ती विचार करायला लागली की हा नक्की काय चीज आहे? मी पडू नये म्हणून सावरले दुसऱ्या क्षणी हात सोडून दिला! माझ्याशी बोलणे तर लांब पण लक्ष सुद्धा देत नाही.
तेवढ्यात कचकन ब्रेक दाबले आणि गाडी थांबली तशी धक्का बसून तिची विचारांची तंद्री भंगली. जवळच एक छोटासा चहा टपरी होती. त्या माणसाने हसत याला हात केला आणि ह्याने पण रिस्पॉन्स दिला यावरून ते एकमेकांना ओळखतात हे तिला जाणवले.
" मला चहा प्यायचा आहे तुला हवा असेल तर येऊ शकतेस" इतकेच बोलला यावरून आपण गाडीवरून उतरायचं हे तिला कळले. पुन्हा त्याच्या मागोमाग निघाली आणि चहा प्यायला गेली.
"दोन नेहमीचे" इतकेच त्याने सांगितले तसा एक मुलगा दोन चहाचे ग्लास घेऊन आला.
तिने चहा घेतला तसे तिच्या तोंडून निघाले " वाह! अप्रतिम! फारच मस्त आहे चहाची चव" आणि अपेक्षेने त्याच्याकडे पाहिले पण त्याने पूर्ण दुर्लक्ष केले.
निमूटपणे चहा पिऊन झाला तसे त्याने पैसे दिले आणि त्या माणसाला पुन्हा हात करत गाडीला किक मारली.
बुलेट सिटीच्या दिशेने धावत होती ... तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा त्याने झटकून दिला.
थोड्या वेळाने तिने कमरेशी पकडायला गेली तास झटका दिला आणि सरकला. तिला खूप नवल वाटले शेवटी जिद्दीने तिने त्याला मागून घट्ट पकडले तसे तो बोलला " नीट बस" तरी ती त्याला धरूनच बसली.
तिचे विचार त्याच्या दिशेने धावत होते. हा कोण असेल? का असा वागत असेल? एक तर खूप चांगला वाटतो आहे पण खूप गर्विष्ठ आहे! एकदम हँडसम आहे, हुशार आहे हे पण जाणवते मग काय आणि कुठे मेख आहे?
ती विचारातच होती तितक्यात बुलेट थांबली हे तिला जाणवले आणि कानावर शब्द आले " इथून माझा मार्ग वेगळा आहे तु उतर आणि जा तुझ्या मार्गाने!"
ती उतरली तसा हा लगेच पुढे निघाला सुद्धा!
ना बाय केले की तिच्याकडे पाहिले.
मनातल्या विचारांच्या वादळासाहित ती नकळत पणे पुढे चालायला लागली.
क्रमशः
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा