Login

त्यालाही संसार आहे की

किती दिवस करणार?
"सुनबाई, नरेशला मिळालेलं सोन्याचं नाणं कुठे आहे?"

"तिजोरीत ठेवलं आहे आई नीट? का??"

या प्रश्नाला मात्र सासूबाईंनी काहीही उत्तर दिलं नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे नाराजीचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते. काही काळ मौन राहिल्यावर त्या पुटपुटल्या,

"नरेशच्या बहिणीला कपाट घेऊन देऊ म्हटलं त्या नाण्यातून.. पण कसलं काय.."

नाही म्हटलं तरी सूनबाईला ते ऐकू गेलंच. तिला माहीतच होतं, नवऱ्याला एखादं गिफ्ट मिळालं की सरळ त्याची रवानगी त्यांच्या लेकीकडे होई.

संध्याकाळी नरेश घरी आल्यावर किर्तीने हा विषय नवऱ्याकडे काढलाच..

"काय हो, तुम्हाला जे गिफ्ट्स मिळतात ती सगळी ताईंकडे का जातात?"

"अगं आधीपासूनच तसं करतो आम्ही, नवीन नवीन नोकरीला लागलो तेव्हाही तेच केलेलं.."

"तेव्हाची गोष्ट वेगळी होती..आता आपलाही संसार आहे, आपल्याला आपले खर्च आहेत.. मायरा तिसऱ्या इयत्तेत आहे, तिच्या शाळेची फी, क्लासची फी..तिचे खर्च वाढताय..तुम्हाला मिळालेलं सोन्याचं नाणं देऊन मायराची फी भरून टाका बरं."

"अगं पण ताईला यावेळी कपाट घेऊन द्यायचं आहे..त्यासाठी ते मोडू म्हटलं.."

हे ऐकून कीर्ती अजूनच चिडली,

"आता मी जरा स्पष्टच बोलते. जोवर आपलं लग्न झालं नव्हतं तोवर ठीक होतं, पण आता तुम्हाला माझी आणि मायराची जबाबदारी असताना किती दिवस ताईंसाठी करणार? मान्य की तुम्ही भाऊ आहात, पण आत्ता गेल्यावर्षी त्यांना सोन्याची चेन करून दिलेली ना? बरं त्यांची परिस्थिती बेताची आहे असंही नाही, काहीही कमी नाही त्यांना..थोडा तरी विचार करा मी सांगतेय त्याचा.."

हे सगळं बोलणं सासूबाई बाहेरून ऐकत होत्या, त्यांना सहन झालं नाही आणि त्या आवाज चढवतच आत आल्या,

"तो भाऊ आहे तिचा..बहिणीसाठी केलं तर तुझ्या काय पोटात दुखतं गं?"

सासूबाईंचं असं अनपेक्षितपणे येणं आणि बोलणं किर्तीलाही आवडलं नाही, शब्दाने शब्द वाढला आणि घरात चांगलेच वाद झाले.

पुढचे बरेच दिवस तणावातच गेले. किर्तीलाही अधूनमधून वाटायचं की का एवढ्याश्या नाण्यासाठी वाद घालावा, पण दुसरीकडे प्रश्न तिच्या हक्काचाही होता.

एके दिवशी घरी तिचे चुलतसासरे आणि सासूबाई घरी आल्या. बऱ्याच वर्षानी आल्यामुळे त्यांचा चांगलाच पाहुणचार करण्यात आला. तिचे चुलतसासरे एका जमिनीच्या व्यवहारासाठी आले होते..ते कीर्तीच्या सासऱ्यांना म्हणाले,

"गावाकडे तुझ्या नावे अगदी तोकडी जमीन आहे, बऱ्याच वर्षांपासून पडून आहे..तिथे उत्पन्न घ्यावं असं म्हणतोय..."

हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात संताप दिसला, त्या हळूच म्हणाल्या,

"ही जमीन दुसऱ्यांना दिली तर आम्हाला भाडं तरी येईल.."

हे ऐकून चुलतसासरे आणि सासूबाईंना वाईट वाटलं..हाच क्षण साधत कीर्ती मध्ये पडली..

"अहो सासूबाई, बाबांची जमीन लोकांना देण्यापेक्षा स्वतःच्या भावाला देतील ना बाबा...अगदी त्यांच्या नावावरही करतील..शेवटी भाऊ आहेत ते त्यांचे.."

"का? भावाच्या नावावर का करतील? त्यांना आता स्वतःचा संसार नाही का? मुलं बाळं बायको काही वाऱ्यावर नाही सोडलेली त्यांनी.."

सासूबाई रागात बोलून गेल्या, कीर्ती हसली आणि म्हणाली..

"मग हाच विचार सोन्याच्या नाण्याबद्दल का करत नाही??"

सासूबाई थंड पडल्या, त्यांच्याकडे अजिबात उत्तर नव्हतं..त्यांची दातखीळ बसली..

किर्तीने मात्र यावेळी अजिबात सोडलं नाही..

"मग नरेश त्यांच्या बहिणीसाठी करू शकता मग बाबा त्यांच्या भावासाठी करतीलच ना?"

सासूबाई दातओठ खात आत गेल्या, इकडे चुलतसासऱ्यांनाही बरं वाटलं..कारण त्यांना सासूबाईंच्या या स्वभावाचा आधी चांगलाच अनुभव आलेला, शेरास सव्वाशेर मिळालेलं बघून त्यांना बरं वाटलं..ते बाबांना म्हणाले,

"जमीन नाही मागत मी, ती पडून राहण्यापेक्षा तिथे उत्पन्न घेऊ असं म्हणतोय, त्यातील तुझ्या वाटेचा हिस्सा तुला मिळणारच.. फुकट थोडीच वापरणार जमीन.."

त्यांच्यात शांततेत चर्चा झाली..पाहुणचार घेऊन ते परत गेले..

पण त्या दिवसापासून सासूबाईंनी नरेशच्या मागे कधीच तगादा लावला नाही एवढं मात्र साध्य झालं..

समाप्त

***********************

ईरावरील गाजलेली "प्रो" कथामालिका - "अनुबंध" - सायली जोशी

"आई, तू अनाथ आश्रमातली मुलगी सून म्हणून या घरात आणलीस. पण उद्या तिच शिरजोर होईल बघ तू. तिला आई - वडील नाहीत की कोणी नातेवाईक, मित्रमंडळी नाहीत. मागे - पुढे कोणीही नाही आणि उद्या तिचा कोणीतरी नातेवाईक मध्येच कुठून तरी उगवला तर मग बोलायलाच नको. काय करणार आहोत आपण?" उत्तरा तणतण करत म्हणाली.
"उगीच काहीतरी बोलू नको. तसं काहीही होणार नाही. सगळी माहिती काढून मगच लग्न केलं ना आपण? आणि प्रिया तशी मुलगी वाटत नाही. भलत्याच शंका मनात आणू नको अन् माझ्या मनात नसतं काहीतरी भरवू नको बाई." मीना काकू आपल्या लेकीला ओरडू लागल्या.
"मला बोलण्यापेक्षा जरा डोळे उघडे ठेवून मुलगी निवडली असती तर बरं झालं असतं. खरंतर ही मुलगी मला अजिबात आवडली नव्हती. पण आमच्या भावापुढे आमचं काही चालतं का? चार दिवस माहेरी पाठवावी म्हंटल तरी तिला जाता यायचं नाही. कोणत्याही कार्यक्रमाला तिचे पाहुणे बोलवावे तर बोलवणार कोणाला? आणि ही सगळी इस्टेट आयाती तिच्या हातात गेली म्हणायची. आणखी एखादं चांगलं स्थळ बघून दादाचं लग्न केलं असतं, तर फार बरं झालं असतं. निदान तिला माहेर असतं, जवळची माणसं असती."
"तू आता या घरात लुडबुड करू नकोस. आधी सासरच्या मंडळींना सांभाळ, त्यांना जीव लाव. काही गोष्टी त्यांच्या कलाने घेतल्यास तर फार बरं होईल उत्तरा. हेही लक्षात ठेव, तुझ्या सासरची इस्टेट तुलाही आयती मिळाली आहे. फार मोठे कष्ट घेतले नाहीस तू त्यासाठी.इथे आम्ही काय करायचं, काय नाही हे तर मुळीच सांगू नकोस. याचा अर्थ असा नाही की तुझं माहेर दुरावलं. निदान आता तरी सासरी सर्वांना धरून राहा. माझ्या मनाला घोर लावू नको." मीना काकू शेवटचं वाक्य शांतपणे बोलल्या.
नुकत्याच स्वयंपाक घरात येत असलेल्या प्रियाच्या कानावर हे माय- लेकींच बोलणं पडलं आणि तिला आपले अश्रू अनावर झाले. 'लग्नात नणंद म्हणून मिरवणाऱ्या याचं का ताई? किती उत्साहाने वहिनी म्हणून आपल्या मागे -पुढे करत होत्या! त्यांच्या मनात असं काही असेल असं वाटलंही नव्हतं.' प्रिया भिंतीला टेकून, डोळे मिटून काही क्षण तशीच उभी राहिली. बांगड्यांचा आवाज ऐकून तिची चाहूल लागताच मीना काकू स्वयंपाक घरातून बाहेर डोकावल्या. तोपर्यंत प्रिया आपल्या खोलीत निघून गेली होती.

"उत्तरा, काय गरज होती हे सगळं बोलायची? तिने ऐकलंय सारं." काकू उत्तरावर पुन्हा ओरडल्या."माझंच चुकलं म्हणायचं, तुझ्यावर संस्कार करायला कमी पडले मी. कुठं काय बोलावं, वागावं हे अजिबात कळत नाही तुला." काकूंच्या डोळ्यांत पाणी आलं.
हे बघून उत्तरा तिथून निघून गेली आणि मीना काकू आपल्या लेकाच्या खोलीकडे वळल्या. पण दरवाजा आतून बंद झाला होता. कडी वाजवून प्रियाला हाक मारणं त्यांना योग्य वाटेना. अवघडून त्या तशाच उभ्या राहिल्या.'पोर दुखावली असेल. लग्न होऊन दोन दिवस झाले नाहीत. तोवर घरची माणसं असं बोलायला लागली, तर उद्या बाहेरची लोकं बोलायला कमी करणार नाहीत म्हणून आपल्यालाच खंबीर व्हावं लागेल.' विचार करत काकू आपल्या खोलीत आल्या.
इकडे प्रियाने खोलीत येत घाईघाईने दरवाजा लावून घेतला. डोळे पुसून ती बेडवर येऊन बसली. खोलीत बऱ्यापैकी अंधार होता. बेडच्या कोपऱ्यात सुरू असणारा पिवळ्या प्रकाशाचा दिवा वातावरण खुलवत होता. गादीवर गुलाबाच्या पाकळ्या टाकून ती छान सजवली होती. त्यावर लाल, गुलाबी रंगाच्या उशा पसरून ठेवल्या होत्या. छतावरून मोगऱ्याच्या फुलांच्या सोडलेल्या माळा त्या उशांवर लटकत होत्या. त्यांचा मंद सुगंध पसरून वातावरण अगदी छान झालं होतं. टेबलावर, टी-पॉयवर, ड्रेसिंग टेबल तसेच खिडकीत गुलाबाचे गुच्छ ठेवले होते.
प्रियाला हे सगळं नकोसं वाटलं. डोळे घट्ट मिटून घेत ती उशीला टेकून बसून राहिली. वेदांत गॅलरीत उभा असल्याने त्याला प्रियाच्या अवस्थेची जराही जाणीव झालेली नव्हती. आपल्याच विश्वात, विचारांत तो बराच वेळ तिथे उभा होता.
आश्रमातल्या ताईंच्या सांगण्यावरून एक संकेतस्थळावर लग्नासाठी नाव नोंदवलं. नाहीतर लग्नाचं स्वप्न हे कधीच सत्यात उतरलं नसतं. अगदी त्याचं दिवशी तिची माहिती वाचून अन् फोटो पाहून प्रिया वेदांतच्या मनात भरली. तशी त्याने आधी सात - आठ स्थळं पाहिली होती. पण बघताच क्षणी आपण प्रियाशी लग्न करावं, असा त्याच्या मनाने कौल दिला म्हणे.

अर्थात तिच्या संमतीशिवाय हे शक्य नव्हतं! दोघे एका रेस्टॉरंटमध्ये भेटले, बोलले. प्रियाने आपला सगळा भूतकाळ त्याच्यासमोर मांडला. "हे बघ, तुझा भूतकाळ आपल्या नात्याआड येणार नाही." वेदांतने प्रियाला वचन दिलं. ती घरी येऊन मीना काकूंना भेटली. त्यांनीही पहिल्याच भेटीत तिचं मन जिंकलं, तिला स्वीकारलं अन् मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं सुद्धा. सगळं कसं झटपट उरकलं.
"प्रिया." वेदांतच्या हाक मारण्याने ती भानावर आली.
"काय झालं? डिस्टर्ब वाटतेस!"
तो जवळ येऊन बसताच आणखी थोडी मागे सरकली."जा. कपडे बदलून ये. सकाळपासून याच साडीत वावरते आहेस. अवघडल्यासारखं झालं असेल ना?"
केसांचा गच्च बांधलेला अंबाडा, त्यावर माळलेला गजरा आता सुकून गेला होता. कानात साजेसे लहानसर झुमके, गळ्यात मोठं आणि एक लहान असं मंगळसूत्र, गळ्याभोवती खुलून दिसणारा नाजूक नेकलेस, सासुबाईंनी हौसेने घालायला दिलेला साज, अन् अंगावर जांभळ्या रंगाची सोनेरी काठांची साडी अन् हातभर मेहेंदी अन् बांगड्या..वेदांत तिला न्याहाळत असल्याने प्रिया आणखी बावरून बसली.

'कदाचित ही सगळी सजावट बघून हिला टेन्शन आलं असेल.' वेद मनात म्हणाला.
"तू या सगळ्याच टेन्शन नको घेऊ. तुझ्या संमतीशिवाय मी..मी तुला हात देखील लावणार नाही. जा, फ्रेश होऊन ये. बरं वाटेल." वेद कसाबसा म्हणाला. उठून तो पुन्हा गॅलरीत गेला.
हलकेच डोळे पुसत प्रिया चेजिंग रूममध्ये गेली. अंगावरचे दागिने, जड साडी उतरवताच तिला खूप बरं वाटलं. गरम पाण्याच्या शॉवर अंगावर घेताना तिला आपल्या मनातले सगळे विचार अस्पष्ट झाल्यासारखे वाटले. बराच वेळ ती गरम पाणी अंगावर घेत राहिली.
प्रिया आवरून बाहेर आली तेव्हा वेदांतला झोप लागली होती. इतक्यात दार वाजलं. मीना काकूंच्या आवाजाने गडबडीने पुन्हा ती आत निघून गेली."काय रे वेद? झोपला होता की काय? मगाशी द्यायचं विसरलं, दूध आणलंय. ते दोघांनी पिऊन घ्या." काकू दरवाज्यात उभ्या राहून प्रियाचा अंदाज घेत निघून गेल्या. तशी प्रिया पुन्हा बाहेर आली.
"मला दूध नको. खूप त्रास होतो त्याने." प्रियाच्या बोलण्याने वेदांतने ग्लासभर दूध संपवून टाकलं आणि तो बेडवर तसाच पडून राहिला.

'खरंच, वेदांत स्वभावाने किती साधे आहेत! अगदी पहिल्या भेटीपासून त्यांचा स्वभाव मनाला प्रसन्न करून गेला आणि आजही ते तसेच आहेत. वागण्या -बोलण्यात जराही अहंभाव नाही की राग, मत्सर नाही. सरळ -साधा स्वभाव. जे मनात तेच ओठावर. त्यांच्या हा स्वभाव जाणून टिकवून ठेवणं आपल्याला जमायला हवं.' प्रिया थोडं अंतर ठेऊन बेडवर आडवी पडली आणि बघता, बघता तिला झोप लागली.
वेदांत मात्र आपल्या बायकोला न्याहाळत राहिला. गोऱ्या रंगाकडे झुकणारा चेहरा, बोलके डोळे, चाफेकळी नाक, नाजूक जिवणी! 'कोण असतील हिचे आई -वडील? आणि त्यांनी हिला अनाथ आश्रमात का ठेवलं असावं? आज ते या जगात असतील का? आणि नसतील तर काय घडलं असेल त्यांच्या बाबतीत? याआधी बरीच स्थळं पाहिली मी. पण नेमकी हिच मुलगी का पसंत पडावी?म्हणतात ना, माणसाच्या प्रत्येक नात्यामागे पूर्व जन्मीचे ऋणानुबंध जुळलेले असतात. तसंच काहीतरी असावं.' विचारांच्या तंद्रीत वेदांतही झोपी गेला.
रात्री उशीरा कधीतरी प्रियाला जाग आली. बाजूला पाहिलं तर वेद अवघडून झोपला होता. त्याच्या अंगावर पांघरूण घालून ती पाणी आणायला स्वयंपाक घरात गेली. मीना काकूंच्या खोलीतला दिवा अजूनही सुरू होता.'इतक्या रात्री सासुबाई काय करत असतील?' प्रिया सहज त्यांच्या खोलीत डोकावली. काकू उत्तराशी हळू आवाजात काहीतरी बोलत होत्या आणि ती मान खाली घालून ऐकत होती.
'खरंच, आई आणि मुलीचं नातं किती निराळं असतं नाही? लेक कशीही वागली, बोलली तरी आई तिच्यावर चिडते, ओरडते. पण अखेर प्रेमाने समजावल्याशिवाय राहत नाही. आपण मगाशी जे ऐकलं ते इथेच विसरून जाऊ आणि उद्याच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न, स्वच्छ मनाने करू.' या विचाराने प्रियाला बरं वाटलं. खोलीत येऊन ती पलंगावर आडवी पडली मात्र बराच वेळ तिला झोप लागली नाही.
क्रमशः

पुढील सर्व भाग app वर आहेत, app ची लिंक खाली दिलेली आहे.