Login

त्यांचा संसार त्यांना करू दे भाग १

कथा दोन पिढ्याची
"पैसा जपून वापरावा. वेळ प्रसंगी तोच कामाला येतो." राधाचं आज दुसरं पार्सल आलं होतं. ते पाहूनच तिची सासू सुधा तिला म्हणाली.

राज देखील तिथेच बसला होता.
राधाचा चेहरा उतरलेला बघून तो समजून गेला ती दुखावली. राजला माहीत होतं तिने काय मागवलं आहे. राधा आणि राज दोघांमध्ये पारदर्शकता होती. प्रत्येक गोष्ट ती त्याला सांगायची.


राधा रूममध्ये गेली. पार्सल ठेवलं.
राज देखील रुममध्ये गेला.

सुधाचा नवरा सुधीर तिच्या बाजूला बसला होता. त्यांच्याही लक्षात आलं की राधा नाराज झाली आहे. सुधीरला सुधाचं बोलणं आवडलं नाही.

"हल्लीची मुलं खूपच पैसा खर्च करतात. आपण किती जपून पैसा वापरायचो. कसं होणार ह्या पोरांचं काही समजत नाही." सुधा पुन्हा बोलू लागली.


"सुधा, असेल काही गरजेची वस्तू. ठीक आहे ना. त्यांचा संसार आहे त्यांना करू दे. आता आपण जास्त डोकं न लावलेलं बरं."


"असं कसं बोलता? त्यांच्या भल्याचा विचार करतेय. असंच सारखं खरेदी करत राहणं चांगलं नाही. हल्ली ऑनलाइन शॉपिंगमुळे तर किती पैसा खर्च होतो हे कळत नाही. ते एक व्यसनच झाले आहे. आपल्या वेळेस हे सगळं होतं का? हल्ली काय काय अँप निघाले आहेत. जग जवळ आलं आहे. जाहिराती बघून तर सर्रास खर्च होतो.. महागाई किती वाढली आहे. कळायला हवं ना? पैसे वाचवणं महत्वाचे आहे."


"सुधा, ते दोघं काय  लहान आहेत का?  बरोबर विचारपूर्वक वागतात. तू जास्त विचार करू नको." सुधीर.


सुधा आणि सुधीर दोघांनी काटकसरीने संसार केला. तो एकटाच कमावणारा होता. सुधा गृहिणी होती. सुधाला आधीपासून बचत करायची सवय होती. विनाकारण कुठे खर्च केलेला आवडत नसे. सुधीर घर खर्चाला जे पैसे द्यायचा त्यातूनही ती थोडेफार वाचवत. वेळेला दोन पैसे जपून ठेवत. राजचं शिक्षण झालं, तो चांगल्या ठिकाणी कामाला लागला.
तिथेच त्याची ओळख राधाशी झाली. दोघेही एकमेकांना आवडू लागले. घरी लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा राजने आणि राधाने स्वतःच्या घरच्यांना प्रेमाबाबत सांगितले.


राधा सुशिक्षित होती. राधा एकत्र कुटूंबात वाढली होती. माणसामध्ये ती रमत होती. खूपच हौशी होती,मनमिळावू अशीच. शेवटी दोन पिढ्यांच्या विचारामध्ये भरपूर तफावत होती.  सुधाला जे पटायचे नाही ते ती पटकन बोलायची.


आताही तेच झालं होतं.
---------------------------

"राज, उद्या दोघांना ऑफिसला जावं लागणार. आजही  आपल्याला वेळ मिळाला नाही. तुला माहीत आहे ना.." राधा


ती पुढे काही बोलणार तोच तो म्हणाला,

"राधा, तुला काही एक्सप्लॅन करायची गरज नाही. मला सगळं माहीत आहे. लहान मोठे निर्णय आपण दोघेही मिळूनच घेतो. सो प्लिज." त्याने तिचा अलगद हात हातात घेतला.

त्याला माहीत होतं राधाने काय मागवलं आहे तरी त्याने काही सांगितले नाही. काय कारण असणार?
पुढील भाग जरूर वाचा.