Login

त्यांचा संसार त्यांना करू दे भाग ३ (अंतिम)

दोन पिढ्यातील अंतर कमी करता आले पाहिजे
त्यांचा संसार त्यांना करू दे भाग ३ अंतिम


गेल्या भागात आपण पाहिले की सुधा आणि सुधीरच्या लग्नाचा वाढदिवस असतो. राधा आणि राज दोघांना गिफ्ट आणतात. सुधीर तिला मुलाच्या आणि सुनेच्या संसारात लुडबुड न करण्याचे वचन मागतो. आता पाहू पुढे.

सुधा, पाहिलंस का? दोघांना आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात होता."


सुधा हळवी झाली.


"आई, साडी आवडली का? तुमच्याकडे हा रंग नव्हता ना? म्हणून मी ही विकत घेतली."


"राधा, सुरेख आहे साडी."
साडीवर अलगद हात फिरवत म्हणाली.

तिच्यासाठी खरंतर सरप्राईज होतं.

बाबा, तुम्हाला कपडे आवडले?" राजने सुधीरच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

"हो खूप छान आहे. तुझी चॉईस मला आवडणार नाही असं होईल का?" सुधीर म्हणाला.


"बाबा, ही राधाची चॉईस आहे."


"राज राहू दे ..." राधा.


"राधा, मला बोलू दे. आई, बाबा काल जे पार्सल आलं होतं ना? हेच होतं. आई मी म्हणालो होतो ना राधा अनावश्यक खर्च करत नाही. आई बाबा सॉरी मी तर विसरूनच गेलो होतो  तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. राधाने आठवण करून दिली तेव्हा लक्षात आलं. आम्हाला ऑफिसमुळे वेळ नव्हता, म्हणून राधानेच तुम्हा दोघांसाठी कपडे ऑर्डर केले."


"काय सासूबाई आवडलं का गिफ्ट?" सुधीर डोळे मिचकावत


"राधा, राज हे बघा बाबांनी गिफ्ट दिलं."  तिने हातातील बांगड्या दाखवल्या.

"वा! खूपच छान आहे बांगड्या." राधाने निरखून पाहिले.

"हो बाबा खूपच छान." राज.

दोघेही झोपायला निघून गेले.

सुधाला कळून चुकलं होतं की राधाने जे काही मागवलं होतं ते सुधा आणि सुधीरसाठी.

तिला काय बोलावं सुचेना.

सुधाला खात्री पटली राज आणि राधा सारं काही विचारपूर्वक करत आहेत. राजने देखील सुधीरच्या खांद्यावरची जबाबदारी स्वतःवर घेतली होती.

"तुम्ही अगदी बरोबर बोलत होता. मी पार्सल आलं म्हणून तिला बोलली."

"मी तेच तुला सांगत होतो. दोघेही शिकलेले आहेत,समजदार आहेत. कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षा त्यांना अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने जमतात. कौतुक  देखील वाटतं. खरं तर काल जेव्हा तू राधाला पार्सल बद्दल म्हणाली तेव्हा तिचा चेहरा उतरला होता. माझ्याही लक्षात आलं. तुम्हा बायकांचं कसं असतं काही केल्या संसार सुटत नाही. सुना  आल्या तरी. बरोबर ना?"


"इतके वर्ष संसार केल्यावर त्या गोष्टीची सवय होऊन जाते हो. सगळं काही जिथल्या तिथे व्यवस्थित झाल्याशिवाय मनाला शांती नाही असंच समजा; पण मला आता असं वाटतं काल राधाला उगाच बोलले. तिने आपल्यासाठी सगळं केलं आणि मी तिला असं बोलले."


"तुझा उद्देश चुकीचा नव्हता सुधा. आपल्याला सवय झाली आहे जपून पैसे वापरायची. तेव्हा तशी परिस्थिती होती. आता तसं नाहीये. बघ माझीही सेविंग आहे. त्यामुळेच तर तुला बांगड्या विकत घेऊ शकलो. सुधा, दिवाळी,दसरा आला की असं वाटायचं तुला काहीतरी छान सोन्याची वस्तू घ्यावी; पण पैसा हातात असेल तर ना. सुधा मी ठरवलं आहे आता मस्त आयुष्य जगायचं. आयुष्यभर काटकसर केली आता नाही, आता मनाला वाटेल तसं जगायचं. हो आणि तू मला जे वचन दिलं आहे ते पाळायचे आहे. "


"बरं, तुम्ही म्हणाल तसं. त्यांचा संसार त्यांना करू देत."

सुधाच्या हातातील बांगड्या  सुधीर प्रसन्न मुद्रेने पाहत होता.

कधी कधी दोन पिढ्याचे विचार,स्वभाव वेगळे असतात त्यामुळे नात्यात अंतर येते. ते अंतर कमी करता आले पाहिजे. बरोबर ना?


समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंट करायला विसरू नका.