Login

त्यांचेही थोडे ऐकूया. भाग -१

मुलांना रेसचा घोडा बनवण्याऐवजी थोडे त्यांचेही ऐकले तर?

त्यांचेही थोडे ऐकूया.

भाग -एक.


"बापरे! रक्तऽऽ." घाबरून छोट्या रुहीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.


नुकतीच ती तिच्या मैत्रिणीकडून घरी परतत होती. त्यांच्या सोसायटीच्या गेटजवळ येताच तिला डोक्यात ओलसरपणा जाणवला, तसे तिने तिथे हात लावून बघितले. हात बाजूला करून पाहिले तर तो रक्ताने माखला होता.

"बापरे! रक्तऽऽ" लाल हात बघून ती किंचाळलीच.


हातातील सायकल तिने सोडून दिली. पाय आपोआपच लटपटायला लागले होते. सोसायटीच्या वॉचमनने तिची किंकाळी ऐकली आणि तो धावतच तिथे आला.


"रुही बाळा, काय झालेय?" त्याने काळजीच्या सुरात विचारले.


"अंकल डोक्यातून रक्त येतंय." तिने आपले हात त्याच्यापुढे धरले. बोलताना तिला हुंदका येत होता.


"अगोबाई, बेबीच्या डोक्यातून रक्त येतेय. बघा हो कोणीतरी." रुहीचे किंचाळणे ऐकून त्यांच्याकडे घरकाम करायला येणारी चाळीशीची रखमा जोरात ओरडली. ती नुकतीच तिथे आली होती. वॉचमन आणि तिचा संवाद आणि रुहीचे लाल झालेले केस तिच्या दृष्टिक्षेपास पडले.


तिच्या आवाजाने रस्त्यावर उभे राहून सकाळच्या गप्पा मारत बसलेले सोसायटीतील तीन चार जण काय झालेय ते बघायला तिथे धावत आले.


'रुहीच्या डोक्यातून रक्त येत आहे' ही बातमी पाहता पाहता बाहेर पसरायला लागली. जो तो 'हे काय नवीन?' म्हणून कुतूहलाने तर कोणी काळजीने रुहीकडे धाव घेत होते.


बघता बघता गेटजवळ वीस पंचवीस जणांची गर्दी झाली. लहानगी रुही घाबरून रडू लागली होती. डोक्यातून निघणारे रक्त थांबण्याचे नाव घेत नव्हते आणि ती कोणाला हातही लावू देत नव्हती. तिचे डोके अचानक खूप दुखू लागले होते.


"अगं रखमाताई अशी उभी काय आहेस? मॅडमना सांग की लवकर." वॉचमन रखमाला म्हणाला.


रक्षाला म्हणजे रुहीच्या मम्माला तो कॉल करत होता मात्र ती ते उचलत नव्हती. रुहीला धरून आत घेऊन जावे असे त्याच्या मनात आले होते पण पोरीला हात लावलेले तिच्या मम्माला आवडणार नाही, म्हणून रुहीला हात लावायला तो धजावत नव्हता.


रखमा लिफ्टने लगेच त्यांच्या फ्लॅटवर पोहचली.

"मॅडम, बेबीच्या डोक्यातून रक्त येत आहे." कानात हेडफोन घालून कॉफी विथ मोबाईलमध्ये मग्न असलेल्या रक्षाच्या कानातील हेडफोन ओढत रखमा मोठयाने म्हणाली.


अचानक बंद झालेले म्युझिक आणि त्यात रखमाचा आवाज रक्षाने ऐकला. हातातील कॉफीचा मग बाजूला ठेवत ती तिच्यासोबत खाली आली.


"रुही काय झालं बेटा? तू का रडते आहेस?" घाबरलेल्या रुहीला कुशीत घेत रक्षा तिला विचारत होती.


तिला बघून रुहीचा हुंदका आणखी वाढला. एव्हाना तिचे डोके लाल झाले होते. दोन्ही हात देखील तसेच रक्ताने माखलेले. हे बघून रक्षा पार भांबावून गेली. साडीचा पदर लेकीच्या डोक्यावर ठेवला, तो पदर देखील ओला झाला होता. ती रुहीला पकडून घरी घेऊन आली.


"रडू नकोस बाळा. मी आहे ना?" तिला सोफ्यावर बसवत रक्षा म्हणाली. तिच्या मनाची नुसती घालमेल सुरू झाली होती. रक्ताने मखलेले लेकीचे हात आणि डोके बघून तीसुद्धा घाबरून गेली.


"हॅलो राकेश, प्लीज, लवकर घरी ये." तिने रडतच नवऱ्याला फोन केला. तो नुकताच बिझनेस मिटिंगसाठी ऑफिसला गेला होता. त्याला फोन करण्यापूर्वी तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना कॉल केला होता, पण ते दोन दिवस आऊट ऑफ स्टेशन असल्यामुळे येऊ शकत नव्हते.


"रक्षाताई, हा काहीतरी डोक्याचा आजार दिसतो. रुहीला एखाद्या तज्ञ डॉक्टरांनाच दाखवले तर बरं राहील." बाजूच्या फ्लॅटमधील मिस्टर मेहता तिच्या मागोमाग आत येत म्हणाले.


"राकेशला यायला वेळ लागेल. मेहता साहेब, तुम्ही याल का हो हॉस्पिटलला?" रक्षा मेहताला विचारत होती. खरं तर तो नसता आला तरी चालले असते. तिला फक्त त्याची कार हवी होती.


"खरंच मी आलो असतो पण सॉरी, मला ऑफिसला निघावे लागेल. अर्जंट मिटिंग आहे." तिच्या बोलण्याचा रोख लक्षात घेत मेहताने तिथून काढता पाय घेतला.


राकेशला फोन केल्यानंतर गुगल सर्च करून रक्षाने क्रिटीकल केअर हॉस्पिटलला फोन केला आणि तेथूनच ॲम्ब्युलन्स देखील मागवली. राकेशला लागणारा वेळ, आणि मदतीचा हात पुढे न करणारे शेजारी यामुळे तिला रडू येत होते.


"रुही, तू ठीक आहेस ना? काळजी करू नकोस. आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये जाऊ." डोळ्यात पाणी घेऊन रक्षा रुहीच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली.


"मम्मा, डोकं फार दुखत आहे." रुहीचे रडणे पुन्हा सुरू झाले.


काय झाले असेल रुहीला? वाचा पुढील भागात.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all