त्यांचेही थोडे ऐकूया.
भाग -चार.
"काही काय बोलतेस रखमा? असं काही नसतं." रक्षा रखमाला टोकत म्हणाली खरी पण तिचा स्वर डगमगल्यासारखा झाला होता. कुठेतरी तिलाही हे पटत होते.
"तुमचा विश्वास बसत नाहीये ना? माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत, त्यांना मी सकाळी घेऊन येते. ते काय सांगतात ते तरी बघूया." त्यांच्यावर निर्णय सोडून रखमा कामाला लागली.
"रखमा म्हणाली तसे आपण करून बघायचे का?" रात्री रक्षाने पुन्हा तो विषय काढला.
"घरी आल्यापासून पुन्हा असा प्रकार घडला नाहीये, तेव्हा थांबूया जरा आणि दोन दिवसांनी परत डॉक्टरांना भेटायला जाऊया." राकेश तिला समजावत म्हणाला.
*****
दुसऱ्या सकाळी रुही अगदी नॉर्मल होती. रखमाने रक्षाला कुठलासा अंगारा आणून दिला, तो तिने रुहीच्या कपाळाला लावले. आता डोक्याचे दुखणे कमी झाले होते. राकेश तर ऑफिसला निघून गेला पण रक्षा मात्र काळजीने सतत तिच्या अवतीभोवती होती.
रुहीला मम्माचे असे आसपास असणे आवडत होते. तिच्यासाठी सँडविच काय पराठे काय, ती म्हणेल ते आज पुढ्यात हजर होत होते. सतत रुहीला अभ्यासाची भुणभुण करणारी रक्षा आज ती टीव्ही बघत होती तरी काही बोलत नव्हती.
दुसरा दिवस देखील असाच गेला. रुही अगदी बरी झाल्यासारखी वाटत होती.
"मी ऑफिसमधून लवकर येईल, तुम्ही तयार रहा. डॉक्टरांकडे जायचे आहे." जाताना राकेश सांगून गेला.
रखमाच्या अंगाऱ्याने गुण आलाय असे रक्षाला वाटत होते, पण राकेश म्हणतोय तसे दवाखान्यात जाणे देखील आवश्यक होते.
*****
"कशी आहेस रुही?" डॉक्टरांनी तिला चेक करून विचारले. उत्तरादाखल ती गोड हसली.
"डॉक्टर, काय झाले होते हो रुहीला? ते रक्त किंवा कुंकू जे असेल ते कुठून आले होते?" राकेश.
"की कोणी काही काळी जादू केली असावी?" रक्षा रखमाच्या अंगाऱ्याबद्दल डॉक्टर सामंतांना सांगत म्हणाली.
"आय होप, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मला रुहीशी जरा बोलायचे आहे. तुम्ही थोडा वेळ नर्ससोबत बाहेर थांबता का?" डॉक्टरांनी नर्सला इशारा केला आणि त्या दोघांना बाहेर पाठवले.
नर्स त्यांना बाजूच्या खोलीत घेऊन गेली जिथे एक स्क्रीन होती आणि त्यावर डॉक्टरांच्या केबिनमधले दृश्य स्पष्टपणे दिसत होते.
"तर रुही बरी आहेस ना आता?" तिला चॉकलेट देत डॉक्टर विचारत होते.
"हो." चॉकलेट खात ती बिनधास्त बसली होती.
"मग हे डोक्यातील लाल रंगाचे काय प्रकरण आहे सांगशील?" त्यांनी सहजपणे प्रश्न केला.
त्या प्रश्नावर तिने डोळे किलकीले करून त्यांच्याकडे पाहिले आणि मग मंद हसली.
"ते एक सिक्रेट आहे." ती.
"मला सांगणार नाही का?" डॉक्टर.
"ॲक्च्युली सांगणार नव्हते, कारण तुम्ही मम्मा पप्पांना सांगाल. पण आता सांगून टाकते कारण रखमा काकुमुळे मम्माला वाटतेय की माझ्यावर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलेय. पण ते खोटे आहे." ती.
डॉक्टर उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. इकडे बाजूच्या खोलीत बसलेले रक्षा आणि राकेश सुद्धा ती काय सांगते हे जाणून घ्यायला आतूर झाले होते.
"डोक्यातील रक्त नसून तो रेड कलर होता." रुही.
"हो, ते माहितीये मला. तो डोक्यात कसा आला ते सांग की."
"मीच डोक्यात टाकला होता." निर्विकार चेहऱ्याने ती उत्तरली आणि इकडे चारशे व्होल्टचा शॉक लागल्याप्रमाणे रक्षा आणि राकेश एकमेकांकडे बघू लागले.
"का पण? तुला माहितीये तुझ्या या वागण्याचा तुझ्या पेरेंट्सना किती त्रास झालाय? सोबत त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला तो वेगळाच." डॉक्टर.
का केले असावे रुहीने असे? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*******
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा