सोनिया, आपल्या आई वडिलांची एकुलती लाडकी लेक. सोनियाच नुकतंच इंजिनिअरिंग पूर्ण झालं असून तिला पुढे मास्टर्स शिकून फॉरेनला जाऊन नोकरी करण्याची तिथे स्थलांतर होण्याची प्रचंड इच्छा. लहानपणापासून सोनियाला परदेशात जाऊन रहाण्याचे स्वप्नं. पदेशात मिळणारा प्रचंड पैसा, तिथल्या सुख सोयी, तिकडची आधुनिक जीवनशैली या सगळ्यांचे तिला खूप आकर्षण होते.
तिच्या आई वडिलांना, सोनिया त्यांच्या लग्नानंतर उशिराने झाल्यामुळे, त्यांचं दोघांचं वर्तमान वय साधारण साठीच्या आसपास होते. सोनियाच्या इच्छे खातर त्यांनी तिचं इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षणाचा खर्च जेमतेम पेलला पण यापुढे तिला आणखीन शिकवून फॉरेनला पाठवणे त्यांच्या अवाक्याबाहेर होते. "सोनिया तू नोकरी कर, पैसे साठव आणि मग जा परदेशी शिकायला" बाबांनी तिची समजूत काढली. पण आई म्हणाली,"आता शिक्षण पुरे, लग्नाचं वय आहे पोरीच, चांगलं स्थळ पाहून लग्नं लाऊन देऊ. मग नवऱ्या सोबत जा बाई तू फॉरेनला" आईचं मन ते लेकीच्या लग्नाचे वेध लागले होते. आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिला फारसं म्हणणं पटलं नाही. सोनियानी नोकरी करण्याचे ठरवले.
नामवंत आय टी कंपनी मध्ये तिला नोकरी लागली. सोनियाने आपल्या मेहनतीने आणि हुशारीने थोड्याच अवधीत चांगली प्रगती केली. ऑफिसतर्फे तिला परदेशी जाण्याचा योग चालून आला पण नेमकी कुठेतरी माशी शिंकली आणि तिचं जाणं रद्द झालं. मनाने हिरमुसली पण पुन्हा ती जिद्दीने प्रयत्न करू लागली. बघता बघता नोकरीमध्ये तिला दोन वर्ष पूर्ण झाली. दरम्यान ऑफिसमधला सहकारी विशाल आणि सोनिया यांची चांगलीच मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, दोघांच्या घरून आनंदाने लग्नाची संमती मिळाली आणि सोनिया - विशाल लग्नं बंधनात सात जन्मंसाठी अडकले.
लग्नानंतर दोन महिन्यांनी विशालला कंपनीतर्फे परदेशी दोन वर्षांसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जाण्याचा योग आला. सोनिया एकटी कशी राहील? दोन वर्ष एकमेकांपासून दूर कसे रहाणार? नुकतच लग्न झालेलं जोडपं त्यांना लगेच हा विरह कसा सहन होईल? दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने विशालने त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आणि सोनियाची सुद्धा बदली परदेशी करण्याची विनंती ऑफिस मॅनेजमेंटकडे केली. नशिबाची साथ असल्याने दोघांना परदेशी जाण्याची परवानगी मिळाली आणि प्रेमी युगुल आपल्या नव्या संसाराची सुरुवात करायला स्वप्नांची पंख पसरून, नव्या देशात स्थलांतर झाले.
इंग्लंडची राजधानी लंडन, मध्ये आपलं नवं सहजीवन सुरुवात करताना विशाल आणि सोनिया खूप उत्सुक होते. सोनियाला लहानपणापासून परदेशाचे अप्रूप होतं. आज तिचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, ती परदेशात विशालबरोबर आपलं घरट सजवू लागली. ऑफिस, घर दोन्ही बाजू सांभाळताना तिची तारेवरची कसरत होत असे." मी एक इंजिनिअर आहे, नोकरी करून मी पैसे कमविन आणि घर कामाला मदतनीस ठेवीन, मी काही घरकाम, स्वयंपाक वगैरे करणार नाही" असं आईला सांगणारी सोनिया आज लंडनमध्ये मात्र सगळी कामं करू लागली. इथे घरकामाला मदतनीस मिळणं महाकठीण आणि मिळालीच तर त्यांचे प्रती तासाचे दर खूप महाग असल्याने आपली काम आपणच करावी लागतात.
काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं, पण नव्याचे नऊ दिवस संपताच सोनियला घरातली काम डोईजड होऊ लागली. तिची छोट्या छोट्या गोष्टींवरून चीड चीड होऊ लागली. विशाल त्याच्या परीने मदत करत असे घर आवरणे, कपडे माशीनला लावणे, भाजी फळं समान आणणे. किचनशी विशालचा संबंध म्हणजे भांडी घासण्या पुरताच. हल्लीच तो चहा /कॉफी /मॅगी करायला शिकला होता. संपूर्ण जेवण बनवण्याची जबाबदारी एकटीला सोनियाला झेपत नव्हती. घरकाम तिला वाटेल तेव्हा करू लागली. घरात पसारा, कपडे, खरकटी भांडी सगळं तसचं पडून असे. जेवणाची पण एकंदर बोंबच होती. घरी जेवण न करता ती वारंवार बाहेरून जेवण मागवू लागली. आज बर्गर, उद्या पिझ्झा, परवा सँडविच हे असं फास्ट फूड खाऊन दोघांचे वजन वाढू लागले आणि विशालच्या पोटाला त्रास हाऊ लागला. बाहेरचे पदार्थ खाऊन त्याला पचनाचा खूप त्रास होऊ लागला.
एवढं होऊन देखील सोनियाने बाहेरून जेवण मागवणं थांबवलं नाही. बाहेरचं नको म्हणून विशाल वरण भात, दही भात असं स्वतः करून, जेऊ लागला. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली. विशालने सोनियाला अनेक विनवण्या केल्या, घरी जेवण बनव पण सोनियाने स्पष्टपणे विशालला सांगितले ," मला घर काम, स्वयंपाक, धुणी भांडी जमणार नाही! मी हे असलं सगळं करायला जन्माला आले नाही!" तिचं हे उध्दट वर्तन पाहून विशाल प्रचंड रागावला पण त्याहून जास्त त्याला वाईट वाटलं की बायको म्हणून सोनिया आपल्याला अजिबात समजून घेत नाही आणि तिला आपल्या तब्येतीची जरा देखील काळजी नाही.
बघता बघता लंडनमध्ये येऊन दोघांना वर्ष होऊन गेले. दोघे ऑफिसच्या कामात व्यस्त राहू लागले. एकमेकांसाठी वेळ देणं, एकत्र गप्पा मरण, एकत्र फिरायला जाणं हे सगळं सुरुवातीला नियमित होत असे. पण काही महिन्यांनी दोघे आपल्याच विश्वात रमू लागले. सोनियाच्या वागण्यात तर तसूभर देखील फरक पडला नाही. अजुनही तिचं तेच, घरातली कामं तशीच पडलेली, बाहेरून जेवण मागवणे, पैसा हवा तसा उधळणे, तिच्या हवं तसं मनमर्जी वागण्याला विशाल लगाम घालू शकला नाही. तिचं हे उद्धट वागणं-बोलणं आता विशालच्या सहनशक्ती पलिकडे गेले होते. त्यादिवशी विशालने समजुतीच्या सुरात सोनियशी संवाद घालण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आपल्याच गुर्मीत असलेल्या सोनियाला आपल्या नोकरी, करिअर, पैसा आणि परदेशी रहाण्याच्या महत्त्वाकांक्षेपुढे कसलच भान उरले नव्हते.
दररोज भांडण, वाद, अबोला पुढील तीन चार महिने सुरूच राहिला. अखेर विशालने विभक्त होण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले. त्याने आपला निर्णय सोनियापुढे मांडला.
सोनिया : " ओ. के. मला मान्य आहे. आपण विभक्त होऊ. मला पण या लग्नात अजिबात रस नाही. किंबहुना मला तुझ्याशी लग्न करण्यात कधीच रस नव्हता! मला फॉरेनला येऊन नोकरी करण्यात आणि कायमचं स्थाईक होण्यासाठी तुझी गरज होती. माझी एकदा ऑफिसकडून निवड झाली पण होती परदेशी जाण्यासाठी, पण दुदैर्व माझ आणि राहिलंच ते. मग माझ्या कानावर आलं की तुझी निवड झाली आहे लंडनला जाण्यासाठी पुढील प्रोजेक्ट करता. तुझ्याशी लग्न करून इथे यायचं का पुढील संधीची वाट पाहायची हे दोन पर्याय होते. तुझ्याशी लग्न हा पर्याय मी निवडला कारण त्यामुळे मला फॉरेनला जाण्याची संधी आणि नवरा दोन्ही मिळालं! आई वडील लग्नं कर लग्नं कर म्हणून मागे लागलेच होते! एका दगडात दोन पक्षी...."
"आपली मैत्री होतीच, त्यामुळे लग्नं केलं मी, माझ काही प्रेम वगैरे कधी नव्हतं तुझ्यावर. आणि हो, तू जाऊ शकतोस इंडियाला परत. मी इथेच रहाणार आहे. मला इथे नवीन जॉब मिळाला आहे आणि माझ्या नवीन ऑफिसने माझा लंडनचा वर्क व्हिसा मान्य केला आहे. पुढील आठवड्यात मी तिथे जॉईन करीन. मला आता तुझी गरज नाही! "
तिचं बोलणं ऐकून विशाल जमिनीवर कोसळला.....
सोनियाच बोलणं ऐकून विशालला प्रचंड मानसिक धक्का बसला. भारतात एकट्याने परतल्यावर त्याने मानसोपचार तज्ज्ञाकडे वैद्यकीय मदत घेतली. लग्नं या गोष्टीचा त्याने धसकाच घेतला. नवर बायको या नात्यावरून त्याचा विश्वास उडाला तो कायमचा.....
समाप्त
© तजेल मनिष ताम्हणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा