त्यांच्या प्रेमाची गोष्ट भाग १

दुर जाता जाता जवळ येऊन अखंड प्रेमात बुडालेल्या दोघांची गोष्ट
तिने पटकन तिचा मोबाईल घेतला आणि त्यावर बोलू लागली. तिचं ते बोलणं ऐकून बाकीच्यांना घामचं फुटला. ती जरा लांब उभी असल्याने तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ती सगळं काही बोलून गेली होती. पुढच्याच क्षणाला तिने धरलेल्या मोबाईलच्या स्पीकरवर एकच आवाज आला.

“स्पोर्ट्स मोड ॲक्टीवेटेड.” आणि सगळ्यांच्याचं काळजात धस्स झालं.

सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालू होता. ती मनातून खूप आनंदी होती. तिच्या या आनंदात तिचे घरचे ही सामील होते. तिची आई, तिचे बाबा, तिचा लहान भाऊ योगेश आणि त्याची होणारी बायको सान्वी असे सगळेच मिळून ते घर सजवण्याच्या मागे लागले होते.

दुखाःचे काळे ढग दूर सारून सुखाची किरणं आता तिचे दार ठोठावत होती. त्यामुळे आधीच्या दु:खाच्या आठवणी जागवणारी एकही गोष्ट घरात ठेवली नव्हती. अगदी घराचा रंग ही बदलण्यात आला होता.

ती सकाळी उठल्यापासून अगदी लहान मुलीसारखी घरात बागडतं होती. गाणं गुणगुणतं होती, मध्येच ताल धरून नाचतही होती.

“अगं हळू ना.” तिची आई काळजीने बोलली. “आत्ताच तर हॉस्पिटलमधून घरी आलीस ना.”

“हो गं.” ती आनंदाने डुलतं बोलली. “मी बरी झाली म्हणून तर पाठवलं ना घरी.”

“ही तिचं खडूस ताई आहे ना?” योगेशने हळूच त्याच्या वडिलांच्या कानात विचारलं. मागच्या आठवड्यातल्या तिला कोणी पाहिल असतं तर आत्ताची खरी का तेव्हाची खरी हे कोणालाही सांगता येणं शक्यच नव्हतं.

“हो रे बाबा. तिचं आहे ती पण उगाच तिला खवळू नको.” बाबांनी दाटवलं.

“माझी कुठली हिंमत ते ही तिला.." योगेश उगाच कानाला हात लावतं नाटकी आवाजात बोलला. तसं त्याच्या बाबांना हसू आलं होत. त्यांनी तिच्यावर नजर टाकली. तिला एवढं समाधानाने हसताना बघून त्यांच्या मनाला ही अपरिमित असं समाधान मिळालं.

“पण ज्यांच्यासाठी करत आहोत ते कधी येणार?” सान्वीचा मधेच सूर लागला.

“आज उशीर होणार आहे म्हणे.” योगेश मोबाईल बघत बोलला.

“का बरं? तुला काही बोलले का ते?” तिची आई लगेच काळजीने विचारू लागली.

“हो, त्यांचा फोन आला होता.” योगेश हळूच तिच्यावर नजर टाकत बोलला. ही गोष्ट तर त्याने तिच्यापासून लपवली होती.

योगेशचे बोलणे ऐकून पहिल्यांदा तर तिला राग आला पण पुढचं ऐकून तिचं मन लगेच खट्टू झालं ते सान्वीने बघितलं.

“माझ्याकडे एक आयडिया आहे.” सान्वी खूश होत बोलली.

तसं सगळ्यांच लक्ष तिच्याकडे गेलं. तिला काय‌ कल्पना सुचली ते विचार करू लागले होते पण तिने फोनवर धडधडीत खोट बोलल्यामुळे सगळेच तिच्यावर जरा चिडले.

“बावळटं आहेस का गं तू?” योगेश चिडून बोलला.

तशी काहीच माहिती नसलेली सान्वी त्याला बावरून बघू लागली.
“म…. मी… मी कायं केलं?” ती चाचरतचं बोलली.

“कायं गरज होती मोबाईलवर असं बोलायची?” योगेशचे वडील चिडूनच बोलले.

सान्वीचे लक्ष आता तिच्याकडे गेले होते. ती पण सान्वीला रोखूनच बघत होती.

“आता म्हटलं त्याला आश्चर्यचकितचं करून टाकू.” सान्वी ओठांचा चंबू करत बोलली.

“आता तो इथे येऊन आपल्याला किती आश्चर्यचकित करतो ना ते बघ.” योगेश आताही चिडूनच बोलला.

“त्याला यायला वेळ लागेल.” सान्वी तोऱ्यात बोलली. “तोपर्यंत त्याचा राग रस्त्यातल्या ट्रॅफिकमध्ये विरघळून जाईल.”

“लाव घड्याळ. अर्ध्या तासात तो इथे पोहोचेल.” योगेश

“बाबाऽऽऽऽ.” आता तिने भोकाडचं ताणलं होत.

“अयं गप्प.” तिचे बाबा जरा ओरडून बोलले. “एवढी मोठी झाली तरी लहान मुलीसारखी रडतेस.”

तसं तिने तिचं रडणं लगेच बाहेर काढलेल्या ओठांच्या आड लपवून घेतलं होत. तिचा तो क्युटसा चेहरा बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आले होते.

खूप कष्टाने ती दोघही एकत्र आली होती. तुटता तुटता एकमेकांपासून लांब जाता जाता ते एक झाले होते. त्यात त्याला खोट बोललेलं अजिबातचं आवडतं नव्हतं. आता ही सान्वी त्याच्याशी धडधडीत खोटं बोलून मोकळी झाली होती.

तिला असं रडताना बघून योगेश परत सान्वीवर चिडणार तोच तिच्या वडिलांनी योगेशला अडवलं होतं. “अरे तिला तरी काही माहिती आहे का? तिच्यावर नको चिडूस.”

“नक्की कायं झालं होतं?” सान्वीने हळूच विचारलं.

सान्वीने आजवर दोघांच्या प्रेमाचे किस्से त्यांच्या घरच्यांकडून, मित्रमंडळी कडून, शेजाऱ्यांकडून खूप ऐकले होते. तिला दोघांची प्रेमकथा ऐकायला खूपच उत्सुकता लागली होती.

ही सान्वी, तिची मामेबहीण. गेली पाच वर्ष शिकायला परदेशात होती. सान्वीचा तिच्या या बहिणीवर खूपच जीव होता. तिला जर काही समजलं असतं तर ती सगळं काही सोडून भारतात धावत आली असती. त्यामुळे तिच्या शिक्षणात कुठलीही अडचण व्हायला नको म्हणून इथे काय घडलं होत? हे तिला कोणीच सांगितलं नव्हतं. पण आता इतका वेळही नव्हता की सान्वीला सर्व सांगता येईल. म्हणून आता सगळेच तिच्याकडे बघू लागले होते, जी खूपच टेन्शनमध्ये आलेली होती.

ती अश्विनी. गोऱ्या रंगाची. सडपातळ बांध्याची. कायम पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी. मेकअपच्या नावाखाली फक्त पावडर आणि टिकली लावणारी पण चेहर्‍यावर भरपूर आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासामुळे तिचा गोरा रंग अजूनचं उजळून दिसत होता. पण आज सान्वीने बोललेल्या खोटेपणामुळे, तिचा तो आत्मविश्वास परत हलला होता. आता तो आला आणि खरं कळलं की तो कायं करेल? याचा भरोसा नव्हता.

“हे बघ सानु.” योगेश सान्वीजवळ जात बोलला. “आम्ही फक्त लग्न जमवण्याच नाटकं केलं तर त्याने त्या मुलाला खरोखरचं मारलं होतं. नंतर त्याने कायं झालं? म्हणून विचारलं होतं. आता तू बघं त्याला कसं सांभाळायचं ते.”

योगेशच्या या वाक्यावर सान्वी अजूनच टेन्शनमध्ये आली होती. पण ती एवढ्या सहज झुकणारी ही नव्हती. तिने मनातच तिची कल्पना तयार ही ठेवलेली होती.

“कशाला घाबरवतो रे तिला.” योगेशची आई योगेशला ओरडत बोलली. नंतर सान्वीकडे बघून बोलली. “तू नको टेन्शन घेऊस. मी आहे.”

तशी सान्वी अगदीच निरागस होऊन तिच्या होणाऱ्या सासूच्या कुशीत शिरली.

“बघं तर कोकरू किती घाबरलं.” आई सान्वीच्या केसावरून हात फिरवतं बोलली.

“कोकरू?” योगेश डोळे फिरवून बोलला. “तुझं हे कोकरू किती महान काम करतं ना ते अजून तू पाहिलं नाही म्हणून असं बोलत आहेस.”

तसं सान्वीने लगेच डोळ्यात पाणी आणलं आणि योगेशने डोक्यालाच हात लावला. तसा तो जरा चिडून बोलला.

“अगं ज्या कॉलेजमध्ये शिकायला होती ना, त्याच कॉलेजच्या प्रिन्सिपलचे फेसबूक अकाऊंट हॅक केले होते. क्लासरूममध्ये एक टीचर यांना विनाकारण त्रास देत होती म्हणून तिचा मोबाईल आणि घरातला पीसी हॅक करून एवढे वायरस टाकले त्यात बापरे! "

आपली भोळी भाबडी दिसणारी सान्वी एवढी आगावू आहे पाहिल्यावर योगेशचे आई बाबा सान्वीला बघतचं राहिले होते.

“मग ती मॅडम भारतीय मुलींना जरा जास्तच त्रास देत होती.” सान्वी चिडून बोलली. “तुम्हाला कायं येत रे कॉम्प्युटर मधलं? असं विचारून डिवचत होती. मग सांगितलं आम्हाला कायं येत ते.” सान्वी हाताची घडी घालून बोलली.

“मगं?” योगेशची आई

“मग कायं? त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने हस्तक्षेप केला म्हणून हीने ते व्हायरस काढले आणि त्या टिचरला शिक्षा म्हणून हिची कॉम्प्युटरची कुठली तरी फी त्या टिचरला भरायला सांगीतली.” योगेश

“अरे व्वा ! बाहेर पण आपल्या देशाचे झेंडे गाडलेस की.” योगशचे वडील सान्वीचं कौतुक करायला लागले होते.

योगेश पुढे बोलणार तोच दारातून एक काळजीयुक्त आवाज आला. “आशुऽऽऽऽ.”

तसं अश्विनीने पटकन स्वतःला चादरीच्या आत लपवून घेतलं.

सगळ्यांच लक्ष दाराकडे गेलं. तो आला होता. योगेशने सान्वीकडे बघून तिला घड्याळ बघायला लावलं.

क्रमशः
©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all