त्यांच्या प्रेमाची गोष्ट भाग २

दुर जाता जाता जवळ येऊन अखंड प्रेमात बुडालेल्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट
सान्वीने घड्याळ पाहिलं आणि मोबाईलवर लावलेल्या जीपीएसची वेळ पाहिली. पाऊण तासाचा रोड होता पण तो पंधरा मिनिटांतच पोहोचलेला होता. सान्वीचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले होते. बाकीच्यांना तर माहिती होतं की तो लवकरच येईल. त्यामुळे बाकी सगळेच निर्विकार होते. पण त्याच्या चेहर्‍यावर मात्र प्रचंड टेन्शन होतं कारण फोनवर सान्वी बोललीच तशी होती.

“आशु पायऱ्या उतरताना घसरून पडली आणि तिला खूपच लागलं आहे.” सान्वीच हेचं वाक्य त्याच्या डोक्यात फिरत होतं.

त्याची महत्त्वाची मिटींग नुकतीच आटोपली होती. मेडीकल इक्विपमेंट्स कंपनीत तो डिव्हिजनल मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याला दिलेल्या भागात असलेले हॉस्पिटल, मेडीकल्स यांच्या मागणीनुसार ते साहित्य पुरवण्याचं काम तो करत होता.

छोटी मोठी ऑर्डर असेल तर त्याच्या हाताखाली टीम काम करत असे. पण खूपच मोठ्या आणि नामांकित हॉस्पिटलची मागणी आली तर तो स्वतः जात होता. आजही अशाच नामांकित हॉस्पिटलकडून ऑर्डर घेऊन तो त्याच्या कंपनीत चालला होता. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर सान्वीचा फोन आला होता. तिच्याशी आजवर फक्त मोबाईलवर जरी बोलणं झालेलं असलं तरी ती अश्विनीसाठी किती महत्वाची आहे हे त्याला चांगलचं माहिती होत. म्हणूनच तिच्या आलेला फोनला त्याने खूपच गांभीऱ्याने घेतलं होतं.

त्याच्याकडे असलेल्या फाईल्स आणि इतर सगळं साहित्य त्याने त्याच्या माणसांकडे दिले. तो पटकन त्याच्या गाडीत बसला आणि गाडीचा स्पोर्ट्स मोड ऑन केला होता. तो ऑन केल्याचा आवाज ही इतका मोठा होता की दुसर्‍याबाजूने असलेल्या सगळ्यांनाच तो ऐकू गेला होता. एखादी बाईक गर्दीतून पटापट काढावी तशी तो गाडी चालवत तिथे पोहोचलेला होता.

घरात आल्या आल्या तो फक्त आशुला बघायला लागला. इकडे तिकडे बघताना त्याला भर दुपारी दिवाणवर चादरीआड झोपलेली मनुष्यसदृश्य आकृती दिसली होती. त्याने चादरीच्या आत लपलेल्या त्याच्या आशुला लगेच ओळखलं होतं. तो पटकन तिच्याजवळ गेला आणि तिच्यावरची चादर ओढली. चादर ओढल्या ओढल्या तिने क्युटशी स्माईल त्याच्याकडे फेकली. तिला व्यवस्थित असलेलं बघून त्याने अश्विनीला घट्ट मिठीत घेतलं.

त्याच्या मिठीत गेल्या गेल्या तिच्या आसुसलेल्या जीवाला इतकी शांती मिळाली की बस तिला अजून दुसरं काहीचं नको होतं. यासाठीच तर ती तरसली होती. प्रेमाच्या झालेल्या जाणीवेनंतर त्याची ही पहिली हक्काची मिठी होती. तिचं मन इतकं भरलं गेलं की आपसूकच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते पण त्याची मान वर असल्याने त्याला काही ते दिसलं नव्हतं.

तिला अस मिठीत घेतलेलं बघून एका बाजूला तिला समाधान ही वाटलं होतं पण दुसर्‍या क्षणाला थोड ऑकवर्ड पण वाटायला लागलं होतं. कारण तिथे आई, बाबा, भाऊ असे सर्वच होते आणि सर्वांसमोर त्याने तिला मिठीत घेतलं होतं. ते बघून योगेशनेच बोलायला सुरूवात केली.

“अरे आम्ही पण आहोत इथे.” योगेश घसा खाकरतं बोलला. तसं त्याने एक रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला. ते बघून सगळेच शांत बसले.

“शिव.” अश्विनीने प्रेमाने त्याला हाक मारली तसा तो शांत झाला.

तो शिव. अश्विनीच्या आईच्या मैत्रीणीचा मुलगा. गोऱ्या रंगाचा, उंचपुरा, एखाद्या हिरोलाही लाजवेल अशी मजबूत शरीरयष्टी.

सान्वी ही थोडावेळासाठी तिची कल्पना विसरून त्यालाच बघत राहिली होती. घड्याळ बघून झाल्यावर तिची नजर परत त्याच्यावर गेली होती. आजवर अश्विनीकडून त्याचे फक्त फोटोच पाहिले होते. आज प्रत्यक्ष बघताना ती थोडावेळासाठी त्याच्यात हरवली होती.

“ओ मॅडम.” योगेश हळूच सान्वीजवळ गेला. “तू फक्त माझी आहेस.” योगेशला थोडी इर्षा वाटली होती.

“हो रे.” सान्वी अजूनही शिवलाच बघत होती. “विंडो शॉपिंग तर चालते ना.” ती तिच्याच धुंदीत बोलून गेली.

“हो का?” योगेश आता जरा चिडून बोलला. “मग त्याला आठवण करून देतो. तू जे काही फोनवर बोलली होती त्याची.” योगेशने सान्वीकडे आसुरी स्मित फेकली. तशी सान्वी भानावर आली. आता तिला त्याचा रागीट चेहरा दिसला होता. त्याचवेळेस त्याची ही नजर सान्वीवर गेली. त्याने अश्विनीला मिठीतून सोडलं आणि त्याचा मोर्चा सान्वीकडे वळवला.

“काय गं ए, चिचुंद्रे?” शिव चिडून बोलला.

“चिचुंद्री?” सान्वी कपाळावर आठ्या पाडत चिडून बोलली. “मी?”

“हो, तुझ्या बहिणीनेच…” शिव बोलता बोलता थांबला.

इकडे अश्विनी परत चादरीमध्ये घुसली होती. कारण तो चिडला की त्याच्या पोटात काहीच राहत नव्हतं. पण अश्विनीला बघून बाकीच्यांना हसायला येत होतं. सान्वी मात्र अश्विनीकडे चिडून बघायला लागली.

“खोटं का बोलली गं तिला लागलं आहे म्हणून? ” शिव चिडून बोलला.

“भाऊजी.” सान्वीने लगेच प्रेमाने हाक मारली. “एकुलती एक मेव्हणी आहे मी. एवढी गंमत तर चालतेचं?” तिने तिच्या कमरेवर हात ठेवत लटक्या रागात शिवकडे पाहिलं.

“भाऊजी.” या शब्दानेच शिवचा राग उतरून गेला होता. त्याची आशु आता काहीच दिवसांत त्याची हक्काची बायको होणार होती आणि भाऊजी या शब्दाने शिवला परत त्याची जाणीव करून दिली होती. मगं काय? रागात असलेला चेहरा लगेचचं आता गुलाबी होऊ बघत होता.

दुसरीकडे योगेश सान्वीचे हावभाव बघतच राहिला. एका क्षणाला चिडलेली असताना, त्याच्या दुसर्‍याच क्षणाला इतकं प्रेमानं कसं बोलली? हाच प्रश्न त्याला पडला होता.

सान्वीच बोलणचं इतकं मधाळ होतं की समोरचा हमखास त्याचा राग विसरून जायचा. इथेही तिने तेच केलं होतं आणि तिची कल्पना फळाला आली होती. आता सगळ्यांचेच चेहरे प्रसन्न झाले होते.

शिवला ही स्मित करताना बघून सान्वी त्याच्याजवळ गेली. आता ही परत काहीतरी गडबड करते का? म्हणून बाकीच्यांना टेन्शन आलं होतं. तिने हलकेच शिवचे हात तिच्या हातात घेतले.

“मला माहीत नाही की नक्की इथे कायं झालं? अगदी फोनवर बोलताना ही आनंदात असल्याची ॲक्टींग करत होती.” सान्वी हळवी झाली.
“पण तुमचं नाव जोडल्यापासून ती खरोखरच आनंदात दिसत आहे. यासाठी तुमचे खूप खूप आभार.”

नेहमी लहान मुलीसारखी चिवचिव करणाऱ्या सान्वीला आज असं हळवं होऊन समजुतीने बोलताना बघून योगेश, अश्विनी आणि त्याचे आई बाबा अगदीच भारावून गेले होते. तिचं अश्विनीवरचं प्रेम आजवर शिवने फक्त ऐकलं होत. आज ते बघून त्याला ही जरा भारावल्यासारखं वाटतं होतं.

“प्लीज तिची साथ सोडू नका.” सान्वीच्या डोळ्यात आला हलकीच आसवं दाटली. ती आता काही दिवसांनी सासरी जाणार या विचाराने तिला आतापासून भरून आलं. तिकडे चादरीच्या आड लपलेल्या अश्विनीनेही हलकेच तिचे अश्रू पुसून घेतले.

“नाही गं. आता तर ते शक्यच नाही.” शिवनेही तिला आश्वस्त केले.

ह्या वाक्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं पण शिवच मन मात्र भूतकाळात हरवलं.

(तीन वर्षांपूर्वी )

“आईऽऽऽ आईऽऽऽऽ” शिव त्याच्या रूममध्ये बसून ओरडत होता.

त्याचा आवाज ऐकून त्याची आई धावतचं त्याच्या जवळ आली.
“कायं रे कायं झालं एवढं बोंबलायला?” ती जरा वैतागूनच बोलत होती. स्वयंपाकाच्या आड कोणी आलं की आई कोणाचचं ऐकत नसते हे शास्त्रच असतं.

“तुला मी जे दाखवेल ना ते बघून तू पण अशीच ओरडशील.” शिव आनंदाने बोलला.

“जेवढा जास्त उशीर करशील तेवढा जास्त तुझ्या नाष्ट्याला उशीर होईल.” त्याच्या आईने त्याला रोखून बघितले.

आपल्या मुलांचा उत्साह असा धाडकन जमिनीवर आपटायला आईला कायं मजा येते, ते तिलाच माहित.

आईच्या वाक्यावर शिवनेही तोंड बारीक केलं. पण अजून ताणलं तर नाष्टाच भेटणार नाही हे देखील त्याला चांगलचं ठावूक होतं. त्याने लगेचचं त्याच्या कॉम्प्युटरकडे तिचं लक्ष वेधलं.

“हे बघ.” शिव उत्साहात बोलला. “कोणी ओळखीच वाटतं आहे का?”

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all