त्यांच्या प्रेमाची गोष्ट भाग ३

दुर जाता जाता जवळ येऊन अखंड प्रेमात बुडालेल्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट
त्याची आई कॉम्प्युटरकडे निरखून बघायला लागली आणि पुढच्याचं क्षणाला तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

“कुठे भेटली रे तुला? पत्ता शोध ना तिचा. आत्ता तिला भेटायला जाऊ.” शिवची आई अगदी भारावून बोलली.

“आता तुझ्या मैत्रीणीचा पत्ता हवा असेल तर तिच्या खडूस मुलीशी मला बोलावं लागेल.” शिव वाकडं तोंड करत बोलला.

“म्हणजे रे?” शिवची आई गोंधळून विचारू लागली.

“आमच्याच कॉलेजला आहे तिची मुलगी. माझ्या मित्राच्या फ्रेंड लिस्टमध्ये ही दिसली. तिचा प्रोफाईल फोटो पाहिला तर त्यात तुझ्या मैत्रीणीसारखी दिसली. मगं तिची प्रोफाईल उघडली आणि तुझ्या मैत्रीणीचा स्पष्ट असा फोटो दिसला.”

“हो का? पण तिला खडूस का बोललास तू?”  तिला परत प्रश्न पडला.

“अगं काही विचारायला गेलं की खूप भाव खाते.” शिव थोडा वैतागून बोलला.

“तू तिला काय विचारायला गेला होतास?” शिवची आई कमरेवर हात ठेवून त्याला विचारू लागली.

“काही नाही ते असचं.” शिव नजर चोरत बोलला.

“तुला आवडली का?” शिवची आई उत्साहात बोलून गेली.

“व्हॉट?” शिव अचानक ओरडलाच. “ती बांबूची काठी आणि मला आवडेल?” तसं त्याची आई त्याला आठ्या पाडून बघू लागली. ते बघून शिव परत वरमला होता.

“ते जाऊदे.” शिवची आई विषय बदलतं बोलली. “तिचा नंबर घे. मीच बोलते तिच्याशी.” मगं शिवही नाईलाजाने हो बोलला होता.

त्याच दिवशी कॉलेजमध्ये कॅन्टीच्या भर आवारात कानाखाली बसल्याचा आवाज घुमला होता.

“आधीची भेट विसरलास का?” अश्विनी चिडून बोलत होती. तर शिव त्याचा गाल पकडून गोंधळून तिला बघत होता.

“डायरेक्ट मोबाईल नंबर विचारण्याची हिंमतच कशी झाली तुझी?” अश्विनी चिडून बोलत होती. तर तिची मैत्रीण तिला आवरायला बघत होती. "तुझ्यासारख्या मुलांना चांगलचं ओळखते मी.”

शिव अश्विनीला शोधत कॅन्टीनमध्ये आला होता. तिथे ती दिसली तसा तो तिच्या जवळ गेला आणि नेहमीप्रमाणेच फ्लर्टी टोनमध्ये तिच्याकडून तिचा नंबर मागितला.

पूर्ण कॉलेजमधल्या मुली त्याच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि अश्विनीने डायरेक्ट त्याच्या कानाखाली वाजवली होती.

अश्विनीच्या अशा वागण्याने शिवला खूपच राग आला होता . रागाच्या भरात त्याने बाजूच्या भिंतीवर लागलेल्या मेनूबोर्डवर जोरात ठोसा मारला. तशी त्यावरची काच खळकन तुटली. त्याचा तो अवतार बघून अश्विनी जरा घाबरलीच होती.

“आधी विचारण्याचा कॉमन सेन्स नाहीये का तुझ्यात की कशासाठी पाहिजे होता नंबर?” शिव रागातच बोलला.

“तुझ्या लागलेल्या सूरावरून तर नक्कीचं विचारण्याची तसदी वाटली नाही मला.” अश्विनी ही रागातच बोलली.

मग शिवला चुकीच्या पध्दतीने विचारल्याची जाणीव झाली.

“ते तुझी आई आणि माझी आई जुन्या मैत्रीणी आहेत. सकाळीच फेसबुकवर फ्रेंड सजेशन्समध्ये तुझ्या प्रोफाईलवर फोटो पाहिला म्हणून आईने तुझा आईचा नंबर मागितला आहे. ” आता शिव एकदम शांतपणे बोलला होता.

“हे जर आधीच नीट सांगितलं असतं ना तर एवढा तमाशा झालाचं नसता.” अश्विनी अजूनही तोऱ्यातचं बोलत होती.

“सॉरी.” शिव

त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला टक्कर देणारं असं कोणीतरी भेटलं होत. त्याला सॉरी बोलताना बघून त्याची मित्र मंडळी शॉकमध्ये गेली होती.

“मला तुझ्या आईचा नंबर दे.” अश्विनी अजूनही साशंकच होती.
“मी माझ्या आईला फोन करायला सांगते.”

मग शिवने त्याच्या आईचा नंबर तिला दिला आणि आपल्या वर्गाकडे निघून गेला.

दोनच दिवसांनी अश्विनीची आई शिवच्या आईला भेटायला गेली होती. अश्विनीच्या आईने अश्विनीलाही सोबत यायला सांगितलं होतं पण ती काही आली नव्हती.

इकडे दोन मैत्रिणींना इतक्या वर्षांनी परत भेटून इतका आनंद झाला होता की त्यांचे अश्रू ही त्या दोघींच्या मिठीत मिसळत चालले होते. आपल्या आईच्या चेहर्‍यावरचा तो आनंद बघून शिवच्या चेहर्‍यावर ही समधानाचं हसू आलेलं होतं. त्यांना डिस्टर्ब न करता तो त्याच्या कॉलेजला निघून गेला.

कॉलेजमधून बाहेर पडताना किंवा एखाद्या पार्कमध्ये फिरताना, मुव्ही बघायला जाताना अश्विनीने शिवला वेगवेगळ्या मुलीसोबत फिरताना बघितलेलं होतं. त्यामुळे तिच्या नजरेत शिवची फक्त मुली फिरवणारा एवढीच प्रतिमा तयार झालेली होती.

जेव्हा कधी शिव आणि अश्विनीची नजरानजर व्हायची, तेव्हा अश्विनी त्याला वाकडं तोंड करूनचं बघायची. त्याला त्याच्या आईबद्दल असलेली काळजी बघून सुरूवातीला तो चांगला मुलगा असेल असं तिला वाटलं होतं. पण नंतर ‘मुलं शेवटी मुलचं असतात.’ या विचारावर ती ठाम झाली होती.

एक दिवस शिवची आई अश्विनीच्या घरी आली होती. त्या दिवशी नेमकी अश्विनी ही घरीच होती. आपल्या मैत्रीणीचा सुखाचा चाललेला संसार बघून शिवच्या आईला खूप समाधान वाटलं होतं.

मगं अश्विनीच्या आईने तिच्याबद्दल विचारलं होत. त्या दिवशी शिवच्या आईने फक्त अश्विनीच्या आईबद्दल सगळेच जाणून घेतलं होतं. पण आज अश्विनीच्या आईने सगळचं काही ऐकून घ्यायचा चंग बांधला होता. कारण शिवची आई अचानक दूर गेली होती. जशी काही गायबचं झाली होती. तिचा कुठलाही पत्ता कोणालाच कळला नव्हता.

मगं शिवच्या आईने बोलायला सुरूवात केली होती. श्रीमंत मुलगा बघून त्यांचे हात लवकरच पिवळे करण्यात आले होते. आता मुलगी सुखात नांदेल म्हणून त्यांचे आई वडील निवांत झाले होते. पण श्रीमंतीचा दिखावा जास्त दिवस टिकू शकला नव्हता. मुलगा व्यसनी निघाला होता. मगं काहीचं दिवसात भांडणं, मारहाण सुरू झाली होती. दोन वर्षांनी शिव नावाचं रत्न जन्माला आलं पण बाकी परिस्थिती होती तशीच राहिली होती. दारूमुळे जवळची संपत्ती संपल्यात जमा होती. पुढे काही दिवसांनी तिचा नवरा कॅन्सरने निधन पावला. सासू सासर्‍यांनी पांढऱ्या पायाची म्हणून तिला घरी ठेवली नव्हती. माहेरची गरिबी तर तिला माहितीचं होती. मगं तिने शहराचा रस्ता धरला. मिळेल ते काम पकडून शिव आणि स्वतःचे पालनपोषण केलं.

शिव ही परिस्थितीची जाणीव ठेवत चांगला शिकला सवरला होता. आईच्या शब्दापुढे तो कधीच जात नव्हता. कॉलेज करता करता पार्ट टाईम जॉब पण करत होता. अजून बरचं काही कौतुक शिवचं शिवच्या आईने केलेलं होत.

‘ह्याच्यात हे गुण आहेत.’ अश्विनीला आश्चर्य वाटलं. “मुली फिरवतो ते गुण माहीत नाही वाटतं.” अश्विनी नकळतं बोलून गेली.

तशा दोन्ही आई अश्विनीकडे रोखून बघायला लागल्या. तसं अश्विनीने लगेच तिची जीभ चावली होती. आता तिला चांगलाच ओरडा पडणार हे तिला समजून चुकलं होतं. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.

“कसं असतं ना आशू.” शिवच्या आईचा आवाज आला तसे अश्विनीने चमकून त्यांच्याकडे पाहिलं होतं. अशा शांत आवाजाची अपेक्षाच नव्हती. “जसं दिसत ना तसं नसतं.”

“म्हणजे?” अश्विनी

शिवच्या आईने काहीच उत्तर न देता तिथून प्रस्थान केले. इकडे अश्विनीच्या आईने अश्विनीकडे रागात बघितलं होत. मगं अश्विनी ही बारीक तोंड करून बसली.

दुसर्‍याचं दिवशी शिव अश्विनीवर चांगलाच बरसला होता. तिच्यामुळे त्याच्या आईच्या डोळ्यात आलेले अश्रू बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. नाही त्याने जागा बघितली आणि नाही आजूबाजूची परिस्थिती. तो फक्त तिला बोलत सुटला होता.

शिव गरजेपेक्षा जास्तच बोलायला लागल्यामूळे आता अश्विनीही चिडून बोलायला लागली होती. ते एवढे भांडत होते की फक्त एकमेकांच्या अंगावर जायचे बाकी होते. त्यांच्या मित्रमंडळींनी दोघांना कसेतरी आवरलं होतं मगं दोघेही धुसमूसतचं एकमेकांना खुन्नसने बघत विरूध्द दिशेला गेले होते.

घरातही त्यांचा राग काही शांत होत नव्हता. शिवच्या आईने शिवला विचारल्यावर त्याने सगळं काही तिला सांगितलं तशी त्याची आई शिवलाच बोलायला लागली होती. त्याला कळतं नव्हतं की ती त्यालाच का भांडत होती?

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all