त्यांच्या प्रेमाची गोष्ट भाग ४

दुर जाता जाता जवळ येऊन अखंड प्रेमात बुडालेल्या दोघांची गोष्ट
"तिला जे दिसलं त्यावर ती बोलली.” शिवची आई चिडून शिवला बोलत होती. “त्या मागचं कारण तिला माहिती आहे का? तिला ही काहीतरी अनुभव असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न केलास का?”
आता शिव शांत बसला होता.

दुसरीकडे अश्विनीची आई पण अश्विनीला खूपच भांडत होती. कारण अश्विनीची देखील सारखी चिडचिड होत होती. मगं तिनेही तिच्या आईजवळ तिच मन मोकळं केलं होत. मग कायं तिला ही ओरडा बसला.

“त्याची आई बोलली होती ना जसं दिसत तसं नसतं. मगं ते तू आधी ऐकून घेतलंस का? वरून त्यालाच भांडून आलीस?” अश्विनीची आई रागाने बोलली.

“मगं तो किती बोलला मला?” अश्विनी बारीक आवाजात बोलली.

“कोणी मला जर भांडलं आणि मी ही अशीच तोंड पाडून घरी आले तर?” अश्विनीची आई बोलली तशी अश्विनी पण शांत बसली.

“उद्याच्या उद्या सॉरी बोलायचं.” दोघांनाही त्यांच्या आईंनी कडक तंबी दिली होती.

दुसर्‍या दिवशी दोघेही एकमेकांसमोर उभं राहून एकमेकांना वरवर सॉरी बोलले पण मनातून किती भांडले असतील याचा काहीच अंदाज लावता येणार नव्हता.

काही दिवसांनी शिवसोबत दिसलेली मुलगी अश्विनीला दिसली. ती त्यांच्याच सोबतची पण वेगळ्या फॅकल्टीमध्ये शिकत होती. मग अश्विनी मुद्दामच तिच्याजवळ गेली.

“कायं गं आज एकटीचं?” अश्विनीने तिला विचारलं.

“हो, अजून कोण असेल सोबत?” जान्हवी

“त्या दिवशी तो शिव दिसला सोबत.” अश्विनी

तशी जान्हवी हलकीच हसली. “म्हणे माझ्या आईसारखी नाहीस तू आणि ब्रेकअप केलं.”

“व्हॉट?” अश्विनीला धक्काच बसला. “असं तुझ्यासोबत फिरुन मगं तुला सोडलं त्याने?”

“तेचं, फक्त सोबत फिरत होता. या पलिकडे त्याने कधीच मला स्पर्श केला नाही. कशी मुलगी त्याला पाहिजे गॉड नोज.” जान्हवी दीर्घ श्वास घेऊन बोलली.

आता अश्विनी विचार करायला लागली होती. तिच्या मनातल्या शिवच्या प्रतिमेला तडा गेला होता. त्याला अजून जाणून घ्यायची उत्सुकता तिला लागली होती. पण ती जशी त्याच्यासोबत वागली त्यामुळे तो तर तिला काही जवळ उभा करणारच नव्हता.

शिवने त्याच्या आईला काशीच्या यात्रेसाठी चार महिन्यापूर्वी तिकीटं काढून दिलेलं होतं. तो दिवस आता जवळ आला होता. पण त्याच्या आईला तर शिवची काळजी लागली होती. नंतर त्यांना तिची मैत्रीण आठवली तसे तिने लगेच फोन लावून शिवची काळजी मिटवली होती.

त्यांच्या घरात पंधरा दिवस रहायचं हे ऐकून शिवला धक्काच बसला होता. तो काही केल्या त्याच्या आईचं बोलण ऐकायला तयारचं नव्हता. शेवटी आईने तिच अश्रू नावाच अस्त्र बाहेर काढलं. मग कायं लागलीच शिव शांत झाला होता.

दुसरीकडे शिव रहायला येणार म्हणून अश्विनीचा शिवला जाणून घ्यायचा उत्साह भरून वाहत होता.

शिवची आई ज्या दिवशी गेली त्याच दिवशी शिव अश्विनीच्या घरात दाखल झाला. शिवने फक्त अश्विनीची आई, तिचा भाऊ आणि वडिलांना बघूनचं स्मित केलं अश्विनीकडे त्याने पाहिलं ही नव्हतं.

‘खडूस.’ अश्विनी मनातचं बोलून गेली.

त्या दिवशीच अश्विनी घरातल वागणं बघून शिवला जरा आश्चर्य वाटलं होत कारण बाहेर कचाकचा भांडणार्‍या अश्विनीला घरात मात्र खूपच काळजीने वागताना त्याने पाहिलं होतं.

जसजसे दिवस जात होते तसतसे अश्विनीची दुसरी बाजू ही शिवला दिसू लागली होती. एके दिवशी घरातल्या गच्चीवर योगेशसोबत गप्पा मारताना अश्विनीचं दुसर्‍या मुलांसोबत तिरसट वागण्याच कारण त्याला समजलं होतं. या प्रेम नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून तिच्या मैत्रीणीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली होती. तेव्हापासून तिचं मुलांविषयीच मत खराब झालं होतं. म्हणूनच तिने तेव्हा शिवला बोलणं तिच्या नजरेने योग्य होतं.

आता शिव रोजचं अश्विनीला बघू लागला होता. तिच सकाळीच उठणं, देवपुजा करून तिच्या आईला मदत करणं, तिच्या भावाला अभ्यासात मदत करणे, वडीलांच्या गोळ्यांची काळजी घेणं हे सगळंच बघून तो नकळतचं तिची तुलना आजवर भेटलेल्या मुलींसोबत करू लागला. हेच तर त्याला त्याच्या आयुष्यात हवं होतं. अगदीचं त्याच्या आईप्रमाणे काळजी घेणारं. पण तिची तब्येत बघून त्याने तिच्याकडे कधीच पाहिलं नव्हतं. हळूहळू तिचा स्वभाव त्याला आवडू लागला होता.

दुसरीकडे फक्त पाहुणा म्हणून त्याची घेतलेली काळजी कधी त्याच्यात तिच मन हरवून बसली हे तिलाच कळलं नव्हतं. तिला त्याचा स्वभाव आवडतो यावरचं ती ठाम राहिलेली होती. यापूढे दोघांच्या आड त्यांचा इगो यायला लागला होता.

दोघांना एकमेकांना बघितल्याशिवाय चैन तर पडत नव्हतं पण समोर आले की एकमेकांना इगो दाखवल्याशिवाय जात नव्हते. या गोंधळातच शिवचे पंधरा दिवस संपले होते. याची जाणीव ही शिवला त्याच्या आईचा परतण्याचा फोन आल्यावर झाली होती.

तिकडे तिला ही तिच्या घरातून शिवची आई परत येतं असल्याचं समजलं होत. मग कायं तिकडे तो उदास इकडे ही उदास. असचं घरातलं वातावरण झाल होतं.

दुसर्‍याचं दिवशी संध्याकाळी शिव त्याच्या घरी परतला होता. तेव्हा अश्विनी नेमकी बाजारात गेली होती. निघताना तिला बघता आलं नाही म्हणून त्याला अश्विनीचा राग आला.

“नाही तेव्हा तोरा दाखवून जाते. आज थांबली असती तर काय भाजी नसती भेटली का?” शिव तोंडातच पुटपुटला.

पंधरा दिवसांच्या सवयीप्रमाणे अश्विनी दुसर्‍या दिवशी सकाळीच गेस्ट रुमच्या बाहेरुन हळूहळू चालत होती. आज नाही तिथे कोणता आवाज होता आणि नाही कोणी असल्याची चाहूल लागत होती. मगं तिला आठवलं की शिव तर गेला त्याच्या घरी.

“खडूस जाताना भेटला पण नाही.” अश्विनी रागातच पाय आपटत बोलली आणि नाष्टा करायला हॉलमध्ये गेली.

तिला आठवलं की दोघांचही हे शेवटचं वर्ष होत. मगं तर तिला अजूनचं वाईट वाटायला लागलं होतं. ‘कॉलेजचे दिवस एवढ्या लवकरं का संपतात?’ ती मनातचं विचार करत होती. त्यात तिचा नाष्टा एका बाजूला पडलेला बघून तिच्या वडिलांनी तिला भानावर आणलं तेव्हा कुठे तिचा नाश्ता झाला. मग लगेचचं ती कॉलेजकडे पळाली.

कॉलेजमध्ये पोहोचल्यावर आज तिची नजर शिवलाच शोधत होती. बऱ्याच वेळानंतर तो तिला दिसला. तसा तिला आनंद झाला. जो क्षणभर टिकला होता. आजही तो एका मुलीसोबत उभा होता. जी त्याला खूपचं चिटकून उभी होती. ते बघून अश्विनीचा इगो जोरजोरात उड्या मारायला लागला. ती रागातच त्याच्याकडे नजर टाकून तिच्या वर्गाकडे निघून गेली.

शिवला फक्त त्याच्याकडे रागात बघणारी अश्विनीच दिसली होती. त्याआधी बाजूची मुलगी चिटकून उभी असताना तिने पाहिलं असल्याचं त्याला समजलचं नव्हतं. तो फक्त गोंधळूनच जाणाऱ्या अश्विनीकडे बघत राहिला होता.

आता हे वारंवार घडायला लागलं होत. दोघांच्या मित्रमंडळींना याची जाणीव झाली होती. त्यांनी शिव आणि अश्विनीसोबत यावर बोलून पाहिले होते पण दोघेही ऐकायलाचं तयार नव्हते.

आता शिव इतर मुलींना आपसूक टाळायला लागला होता ते बघून अश्विनीच्या मनाला खूपच आनंद झाला होता. तरीही तिचा तोरा दाखवणं कमी होत नव्हतं. तिची अपेक्षा होती की त्याने येऊन बोलावं. पण अश्विनीने दाखवलेला तोरा बघून तो ही बोलायला यायच्या भानगडीत पडत नव्हता.

दोघांमध्ये एवढा गोंधळ चालू असताना ही दोघे मात्र एकमेकांची काळजी बरोबर घेत होते. शिवची आई जर बाहेर गेली तर शिवजवळ जेवणं पोहोचवणे, अश्विनीला कुठल्या नोट्स मिळत नसतील तर शिव ते अरेंज करुन देत होता. कधी तिला जायला गाडी मिळत नसेल तेव्हा शिव तिच्या एखाद्या मैत्रीणीला अश्विनीला घरी सोडण्यासाठी पाठवतं होता.

जीव तर दोघांचाही जडला होता पण इगो आड येत असल्याने मान्य करायला दोघंही तयार नव्हते. एकमेकांशी बोलत ही होते पण गरजेचं सोडून फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं.

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all