त्यांच्या प्रेमाची गोष्ट अंतिम भाग

दुर जाता जाता जवळ येऊन अखंड प्रेमात बुडालेल्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट
कॉलेज संपल्यावर शिवला कॉलेजकडून पुण्याच्या कंपनीत प्लेसमेंट मिळाली होती. ते अश्विनीला समजताच शिव जायच्या दिवशी त्याला बस स्टॅन्डवर जाऊन भेटली. त्याला सोडण्यासाठी फक्त त्याचे ते नेहमीचे दोन मित्र आलेले होते. बस निघायच्या वेळेस शिव बसमध्ये चढणार तोच अश्विनीने त्याच्या हाताला धरून मागे ओढलं आणि डायरेक्ट त्याची कॉलर पकडली.

हे सगळंच शिव अचंबित होऊन बघत राहिला. ती अगदीचं त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला रोखून बघत होती.

“तिकडे जाऊन एखाद्या मुलीसोबत चिटकून राहिलास तर गाठ माझ्याशी आहे.” अश्विनी त्याला धमकी देतच बोलली. ते ऐकून शिवच्या मनाला किती समाधान मिळालं हे फक्त तिला आणि त्यालाच जाणवलं होत. त्याचे मित्र तर हा क्षण सेलिब्रेट करायला उतावीळ होतेच पण ऑफिशिअल अनाऊन्समेंटची ते वाट बघत होते.

यात अजून सहा महिने गेले. कोणीही पुढाकार घेईना. शेवटी घरच्यांनीच मनावर घ्यायचं ठरवलं. एवढा सगळा गोंधळ त्यांच्या नजरेपासून वाचणं शक्य नव्हतं.

काही दिवसांनी शिवच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन आला. त्याने तो आनंदाने उचलला. पण पुढच्याच क्षणाला त्याचा आनंद हिरमुसला. कारण त्याच्या आईने आनंदाने अश्विनीसाठी स्थळ आल्याच सांगितल होतं. मगं त्याने घाईघाईतच फोन ठेवला.

दुसर्‍याच क्षणाला त्याने योगेशला फोन करून येणाऱ्या मुलाची सगळीचं माहिती विचारली. त्यानंतर लागलीच त्याच्या मित्र मंडळींना फोन करून त्या मुलाची चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्या चौकशीत तो मुलगा खोट बोलून लग्नाची मागणी घालायला येणार होता असं त्याला कळलं.

मगं कायं? दुसर्‍या दिवशी सकाळीचं तीन तासाचा रोड अडीच तासात पार करत शिव अश्विनीच्या घरी पोहोचला होता. तिथे आधीच पाहुणे आल्याचे शिवला दिसले. त्या मुलाला एवढं धडधडीत खोटं बोलताना बघून शिवच्या रागाचा पारा चढला.

आधी त्यांची भांडण नंतर त्यांचा तोरा. त्यानंतर जॉबच्या निमित्ताने सोडावं लागलेलं घर तिच्यापासून लांब नेणाऱ्या या सर्व गोष्टी कमीच होत्या की कायं त्यात हे खोट बोलून आलेलं स्थळ. मगं कायं? आजुबाजूला काहीच न बघता शिव त्या मुलावर धावून गेला होता.

अश्विनी हा सगळा गोंधळ फक्त बघत राहिली होती. तिला ही या गोष्टींची काहीच कल्पना दिली गेली नव्हती. तिला ही जेव्हा या स्थळाबद्दल समजलं तेव्हा तिने ही खूपच चिडचीड केली होती. तिच्या आईने कसंतरी तिला तयार केलं होतं. आईच्या शब्दापुढे अश्विनीला जाता येतं नव्हतं. त्यात शिव ही पुण्याला होता. म्हणून मगं फक्त बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ आणि नंतर शिवकडे बघू असं मनोमन तिने ठरवलं होत. आता ती निर्विकार चेहऱ्यानेच तिथे उपस्थित होती.

शिव येऊन असा गोंधळ घालणार याची बाकीच्यांना कल्पना होतीच त्यामुळे त्याला आवरायला योगेश, शिवचा मित्र तयारच होते. अगदी लागलं तर अश्विनीच्या वडिलांनी त्यांची तयारी ठेवली होती.

त्यांनी शिवला आवरेपर्यंत शिवने त्या मुलाला चार-पाच फटके मारले होते. तो धडपडून शिवच्या आईच्या मागे जाऊन लपला होता तेव्हा कुठे शिवला त्याची आई दिसली होती. मगं तो खूपच गोंधळात पडला.

“मगं अजून दुसरं स्थळ बघायला लावायचं की तू तयार आहेस?” शिवची आई हाताची घडी घालून त्याला विचारू लागली.

“मी तर तयारच आहे.” शिवचा मित्र उत्साहात बोलून गेला.

एव्हाना हे सगळंच नाटक होत हे त्याला समजायला वेळ लागला नव्हता. तेवढ्यातच अश्विनी मोठ्याने बोलली.

“काही गरज नाही बघायची.” अश्विनी शिवकडे बघून बोलली. “म.. मी तयार आहे.” तसे सगळेचं खुदकन हसले होते.

इकडे शिवला अजूनच राग आला होता. त्याला वाटलं की अश्विनी पण त्यांच्या नाटकात सामील होती. त्याने एक रागीट कटाक्ष अश्विनीवर टाकला तसं अश्विनीने तिच्या गळ्याच्या जरा खाली हात ठेवला आणि बोलली

“तुझी शप्पथ मला…” अश्विनी बोलेपर्यंत शिव रागारागात तिथून बाहेर पडला होता. अश्विनीही त्याच्या मागे गेली पण तोपर्यंत तो त्याची बाईक घेऊन निघाला होता. ते बघून अश्विनी तिची स्कुटी घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागली.

तिच्या घाई-घाईत स्कुटी चालवण्यामुळे एका चौकावर आजुबाजूला न बघता ती सरळ तिथून स्कुटी चालवू लागली आणि डाव्या बाजूने येणाऱ्या कारने तिला उडवले. खूप मोठा आवाज झाला होता. तिचं सुदैव इतकं होतं की त्या कारचा धक्का लागल्यावर ती कार आणि तिची स्कुटी दोन्ही पासून लांब फरफटत गेली होती आणि त्या वेळेस दुसऱ्या गाड्याही रस्तावर नव्हत्या.

अश्विनीच्या मागेच त्यांच्या घरातले होते. त्यामुळे लगेचचं तिला हॉस्पिटलला पोहोचवलं गेल होतं.

इकडे शिवला ही काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव होतं होती. पण त्याचा राग त्याच्यावर खूपचं भारी पडत होता. तोच तिच्यावर निघू नये म्हणून तो असा निघून आलेला. पण जसे त्याने मोबाईलवर येणारे खूप सारे कॉल्स पाहिले तसे त्याने लगेचचं रिटर्न कॉल केला. फोनवरचं बोलणं ऐकून त्याच्यातले त्राणच जसे निघून चालले होते. तो कसातरी बाईक चालवतं अश्विनीला ॲडमीट केलेल्या हॉस्पिटलला पोहोचला आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये गेला. तिचा रक्ताळलेला हात त्याच्या हातात घेतला. “सॉरी ना आशु. मी असं नको जायला हवं होतं. पण तुझ्यावर राग निघू नये म्हणून गेलो होतो. आता नाही गं तुला सोडून जाणार. प्लीज अशी मला सोडून जाऊ नकोस.” शिवच्या डोळ्यांना असंख्य अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.

डॉक्टरांनी कसंतरी त्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं होत. बाहेर येऊन सरळ त्याच्या आईला बिलगला होता तो. त्याला बघून बाकीच्यांना ही अश्रू आवरता आले नव्हते पण आता वाट बघण्याशिवाय पर्यायही नव्हता. यथावकाश ऑपरेशन पार पडलं. हाता पायाला फ्रॅक्चर झाल्याने ते सगळेचं प्लॅस्टरने झाकले गेलेले होते. डोक्याला ही पट्ट्या बांधलेल्या होत्या. शुध्द तर अजून आलेली नव्हती.

चार दिवसांनी तिला शुध्द आली होती. ते चार ही दिवस शिव तिच्यापाशी बसून होता. तिला शुध्द आलेली बघताच शिवला खूपच आनंद झाला होता.

डोळे उघडल्यानंतर तो दिसला होता. मगं अश्विनीच्या चेहऱ्यावरही स्मित झळकलं होत. तिला आत्ताच उठून शिवला घट्ट मिठीत घ्यायचं होतं. पण तिला तर हलता ही येत नव्हतं. मगं तिच्या डोळ्यात परत अश्रू उभे राहिले होते.

“एकदम शांत.” शिव तिचे डोळे पुसतं बोलला. “एकदा का बरी झाली की तुला नाही सोडणार मी.”

तसे अश्विनी हलकीच हसली. जवळजवळ वर्ष लागलं अश्विनीला पूर्ण बरं व्हायला. हाता पायाचे प्लास्टर तर सहा महिन्यांपूर्वी काढले पण बाकी शरीराची रिकव्हरी व्हायला पुढचे सहा महिने गेले होते. या सहा महिन्यात शिवने अश्विनीची खूपच काळजी घेतली होती.

पाच दिवस न सांगाता कामावर सुट्टी घेतल्यामुळे पुण्याच्या कंपनीतून त्याला कामावरून काढून टाकलं होतं. यावरुनही अश्विनीने त्याची माफी मागितली पण त्यानंतर लगेचच एका मेडिकलचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीत त्याला जॉब लागला होता. मगं ते ही टेन्शन लागलीच मिटलं होतं.

(वर्तमानकाळ)

आज अश्विनीचा बघण्याचा कार्यक्रम होता. पण शिवला यायला उशीर होणार होता म्हणून सान्वीने हा पराक्रम केला.

“आज पावभाजी तू बनवायची.” शिव सान्वीवर नजर टाकून अश्विनीसोबत बसला.

“का?” सान्वी बारीक तोंड करुन बोलली.

“खोटं बोलल्याची शिक्षा, तरचं तुझ्या बहिणीला बघायला येऊ.” शिव

आता सगळेच सान्वीवर हसायला लागले. तिला वाटलं होत तिच्या बोलण्याने शिव त्याचा राग विसरून जाईल. पण इथे गोष्ट तर त्याच्या प्रेमाची होती. तो तिला असं सोडणार नव्हता. मगं सान्वीने आनंदाने पावभाजी बनवली.

थोड्याचवेळात शिवच्या घरचे तिथे पोहोचले. अश्विनीच्या बघण्याचा कार्यक्रम तिच्या लग्नाची तारीख ठरवून संपला होता.

समाप्त.
©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all