Login

टायपिंग ! पार्ट 1

.
टायपिंग ! पार्ट 1


सकाळचा प्रहर होता. सोसायटीच्या गार्डनमध्ये " यंग ओल्ड " ग्रुपचे सर्व सदस्य जमले होते. एकूण पाच जणांचा तो ग्रुप होता. अनिल , सुनील , प्रभाकर , रमाकांत आणि विजय अशी त्या पाच जणांची नावे होती.

" विजय , नेहमीप्रमाणे आजही उशिरा आलास. " सुनील तक्रारीच्या स्वरात म्हणाला.

" माफ करा. सकाळी लवकर जागच येत नाही. रवीने उठवले तेव्हा जाग आली. " विजय म्हणाला.

" सर्वांचे वडील आपल्या मुलांना लाथा मारून उठवतात. पण इथे उलटे आहे. मुलगाच वडिलांना उठवत आहे. " प्रभाकर म्हणाला.

सर्वजण हसले. विजय पवार हा मूळचा लातूर जिल्ह्यातील " कासार शिरसी " गावातला सर्वसामान्य शेतकरी. मुलाचा जन्म होताच त्याची पत्नी वारली. नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. पण आपल्या मुलाला सावत्र आईचा जाच होऊ नये असे विजयला वाटत. त्यामुळे त्याने दुसरे लग्न न करता एकटेच रवीला वाढवले. रवीला स्वतःच्या पायावर उभे केले. शहरात नोकरी लागल्यानंतर रवी शहरातच स्थायिक झाला. विजय फार सरळ स्वभावाचा व्यक्ती होता. गावात त्याला विशेष मान होता. रवीने शहरातल्याच एका मुलीसोबत विवाह केला. विजयनेही कसलीच तक्रार केली नाही. आपल्यासाठी आयुष्यभर झिजलेल्या वडिलांना शहरात आणावे , त्यांची सेवा करावी अशी रवीची इच्छा होती. विजयलाही आता मुलाचा सहवास हवा होता. त्यामुळे विजय शहरात आला आणि रवीसोबत राहू लागला. रवीने विजयला नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता. पण विजयला तो फार वापरता येत नव्हता. शहरात विजयला एकटे वाटत होते. सोसायटीत राहणाऱ्या काही वृद्ध गृहस्थांसोबत त्याची ओळख झाली आणि त्यांनीही विजयला मनापासून स्वीकारले. आपण ग्रामीण भागात राहणारे असूनही त्यांनी मित्र म्हणून आपल्याला स्वीकारले याचे विजयला फार कौतुक वाटत होते.

***

" विजय , आम्ही आज नवीन व्हाट्सएप ग्रुप बनवला आहे. तुझा नंबर दे. तुला ऍड करतो. " सुनील म्हणाला.

" अरे कशाला ? या वयात कुठे मोबाईल वापरत बसायचे ?" विजय म्हणाला.

" तू म्हातारा झाला असशील , आम्ही नाही. अरे आम्ही लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन करतोय. " अनिल म्हणाला.

" कशाला ? या वयात दगदग कशाला करवून घ्यायची ?" विजय म्हणाला.

" उरलेले आयुष्य मन भरून जगायचे आहे आम्हाला. जीवनभर इतरांसाठी खूप काही केले. आता मात्र स्वतःसाठी जगायचे आहे. " अनिल म्हणाला.

" तू जर लोणावळ्याला नाही आला तर आमची भुते तुझ्या मागे लागतील बर. " प्रभाकर हसत म्हणाला.

" विजय , तुला लिंक पाठवली आहे. ती ऍक्सेप्ट कर." सुनील म्हणाला.

" म्हणजे ?" विजयला काहीच कळत नव्हते.

" दे इकडं. " सुनील म्हणाला.

विजय " यंग ओल्ड " ग्रुपमध्ये ऍड झाला. सुनीलने सर्वांचे नंबरही विजयच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले.

***

सर्वांनी लोणावळ्याला जाण्याचे ठरवले. दिवस ठरला. गाडी बुक झाली. सर्वजण तयार होऊन सोसायटीच्या पार्किंगमध्ये जमले होते.

" अरे विजय कुठे राहिला ?" सुनीलने विचारले.

" कॉल कर त्याला. " प्रभाकर म्हणाला.

सुनीलने विजयला कॉल केला.

" हॅलो विजय. कुठे आहेस ? आम्ही वाट पाहतोय तुझी. " सुनील म्हणाला.

" मी रवी बोलतोय. बाबांना काल रात्रीपासून खूप ताप आहे. म्हणून ते येऊ शकत नाहीत. त्यांनी मला सांगितले होते तुम्हाला कळवायला पण मीच विसरलो. तुम्ही जाऊन या. " रवी म्हणाला.

" ठीक आहे. असेही त्याची इच्छा नव्हती यायची. असो. बाय. " सुनील म्हणाला.

सर्वजण लोणावळ्याला गेले.

***

संध्याकाळचा प्रहर होता. विजय बाल्कनीत आला आणि मावळत्या सूर्याकडे पाहू लागला. तेवढ्यात तिथे रवी आला.

" बाबा , तुम्ही आराम करा. तुमची तब्येत ठीक नाही."

" अरे माझी तब्येत बरी आहे. आराम करून करून कंटाळा आला म्हणून इथे आलो. "

" पण जास्त वेळ इथे उभे राहू नका. गार वाऱ्यामुळे सर्दी होईल. "

" किती काळजी घेतोस रे माझी ! आजकालची मुले आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून येतात पण तू श्रवणकुमारसारखा सेवा करतोस माझी. "

" बाबा , कर्तव्यच आहे माझे. "

" मग अजून एक सेवा कर माझी. मला नातवाचे सुख मिळू दे. "

रवी लाजला.

" अरे यात लाजायचे काय ?"

" बाबा , नमिताला आताच चान्स घ्यायचा नाही. "

" म्हणजे ?"

" ती मेंटली प्रिपेयर्ड नाही. "

" अरे आम्ही तरी कुठे तयार होतो ? पण या गोष्टी योग्य वेळेतच व्हायला हव्यात. "

" बाबा , आपण गावाकडची शेती आणि घर विकायचे का ?" रवीने बाळाचा विषय बदलण्यासाठी दुसरा विषय काढला.

" रवी , मी आधीही तुला सांगितले आहे की गावाकडची शेती आणि घर मी विकणार नाही. आम्ही ग्रामीण भागातले लोक शेतातल्या काळ्या मातीला " आई " मानतो आणि आईला कोणी विकते का ?"

" बाबा , नमिताचे मामा बिल्डर आहेत. त्यांनी आम्हाला काही रो-हाऊस दाखवले आहेत. आपण गावाकडची जमीन आणि घर विकून रक्कम उभी करू. ती रक्कम वापरून आपण रो-हाऊस विकत घेऊ. "

" नाही. तुझ्या आईने घाम गाळलाय त्या शेतात. तिच्या असंख्य आठवणी आहेत त्या घरात. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत तरी घर आणि शेत विकू नका."

" बाबा , मरणाच्या गोष्टी करू नका प्लिज. तुम्हाला अजून नातवंडे खेळवायची आहेत. "

तेवढ्यात रवीला एक फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने रवीला जी बातमी सांगितली होती ती बातमी ऐकून रवीच्या पायाखालची जमीनच सरकली होती.