टायपिंग ! पार्ट 2
" अरे देवा ! माझ्या मित्रांनी कोणते पाप केले होते की त्यांना असा अकस्मात मृत्यू प्राप्त झाला. " विजय रडत होता.
लोणावळ्याला जाताना गाडीचा मोठा अपघात झाला आणि त्यात अनिल , सुनील , रमाकांत आणि प्रभाकर यांचा मृत्यू झाला होता. आपण एखादे वाईट स्वप्न पाहतोय असेच विजयला वाटत होते. मित्रांच्या अकस्मात मृत्यूमुळे विजयला फार मोठा मानसिक धक्का बसला होता.
" बाबा , मला माहिती आहे की ते चौघेजण तुमचे खूप जवळचे मित्र होते. पण विधात्यासमोर कुणाचे काय चालते. कदाचित त्यांच्या नशिबात असाच मृत्यू लिहिला होता. " रवी विजयला सांत्वन देत म्हणाला.
" हम्म. " विजय म्हणाला.
" मी काही दिवस हैदराबादला जातोय. ऑफिसचे काम आहे. घरी नमिता आणि मीनल आहेत. तुम्हाला काही लागलं तर त्यांना सांगा. " रवी म्हणाला.
" मीनल कोण ?" विजयने विचारले.
" नमिताने कामासाठी नवीन मेड नेमली आहे. " रवीने माहिती दिली.
" मी आल्यामुळे सूनबाईंच्या डोक्यावरचे कामाचे ओझे वाढले आहे. " विजय म्हणाला.
" तसे काही नाही बाबा. " रवी म्हणाला.
नंतर रवी बेडरूममध्ये गेला. त्याने नमिताला मागून मिठी मारली.
" रवी , कुणीतरी बघेल. " नमिता लाजत म्हणाली.
" बघू दे. "
" बाबांशी बोललास शेताबद्दल ?" नमिताने विचारले.
" बाबांना नाही विकायचे आहे शेत. तू विचार कर ना. उद्या आपला बेबी आला आणि त्याला कुणी विचारले की तुझे किती एकर शेती आहे तर काय उत्तर देईल तो ?"
नमिताने रवीला दूर केले.
" आधी रो-हाऊस मग बेबी. " नमिता ठामपणे म्हणाली.
" तुला माहिती आहे ना मित्रांचे अकस्मात निधन झाल्यामुळे बाबांना किती मोठा धक्का बसला आहे. जर आपला बेबी या घरात आला तर त्यांचेही मन रमेल. "
" तुझ्या बाबांचे मन रमावे म्हणून मी मूल जन्माला नाही घालणार. "
" अग पण. "
" प्लिज. "
" ओके. आज संध्याकाळी मी हैदराबादला जातोय. आठवडाभर काळजी घे बाबांची. "
" हो. तू टेन्शन नको घेऊस. "
रवीने नमिताच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला घट्ट मिठी मारली. संध्याकाळी रवी हैदराबादला निघून गेला.
***
रात्री जेवण झाल्यावर विजय बाल्कनीत आला. गार वारा सुटला होता. अमावस्या असल्यामुळे नभात चंद्र नव्हता. सर्व चांदण्या मिळून चंद्राची कमतरता पूर्ण करण्याचा यत्न करत होत्या पण व्यर्थ !
" मित्रांनो , तुम्ही असे निघून गेल्यामुळे माझ्या जीवनातला चंद्रच हरवला आहे. चांदण्याप्रमाणे इतर माणसे आहेत जीवनात पण चंद्राची सर नाही त्यांना. आयुष्याच्या सांजवेळी तुमची मैत्री लाभली. पण ती मैत्रीही विधात्याने हिरावून घेतली माझ्यापासून. " विजय स्वतःशीच म्हणाला.
विजयला जुने प्रसंग आठवले आणि त्याचे डोळे पाणावले. सहज त्याने मोबाईल उघडला. तो व्हाट्सएपवर आहे हे कळल्यावर वेगवेगळ्या नातेवाईकांनी त्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ऍड केले होते. सकाळी सकाळी " गुड मॉर्निंग " चे बरेच मेसेज त्याला येत होते. पण विजयला तो प्रकार आवडत नव्हता. गावात सकाळी सकाळी सर्वाना हात जोडून " राम राम " म्हणताना जो आपलेपणा जाणवायचा तो आपलेपणा मोबाईलवर जाणवत नव्हता. मोबाईलवर सगळे कृत्रिम जग. नुसता दिखावा , हेवेदावे , कृत्रिमपणा. असो. विजयला " यंग ओल्ड " ग्रुप दिसला. पुन्हा तो आठवणीच्या रम्य सागरात बुडाला. हा व्हाट्सएप ग्रुप म्हणजे मित्रांसोबतची त्याची शेवटची आठवण होती. विजयने तो ग्रुप उघडला. त्यावर कसलीच चॅट नव्हती. आज जर मित्र जिवंत असते तर कदाचित त्यांनी लोणावळ्याला काढलेल्या फोटोज ग्रुपवर टाकल्या असत्या असे राहून राहून विजयला वाटत होते. घरात वायफाय लावलेले होते. विजयच्या स्मार्टफोनलाही ते वायफाय कनेक्ट होते. अचानक विजयला " यंग ओल्ड " ग्रुपवर " प्रभाकर इज टायपिंग " असे दिसले. विजयला स्वतःच्या नेत्रांवर विश्वासच बसला नाही. कारण त्या ग्रुपवर विजय सोडून सर्वजण मृत्यूला प्राप्त झाले होते. विजयचे हात थरथरत होते. तरीही धीर एकवटून त्याने व्हाट्सएप ग्रुप उघडला.
" हॅलो. " प्रभाकरने मेसेज टाकला.
" प्रभाकरच्या नंबरवरून मेसेज कसकाय येऊ शकतो ? तो तर..आपण स्वतः त्याच्या अत्यंयात्रेला उपस्थित होतो. "
" हाय. " सुनीलचा मेसेज आला.
" लकी आहेस यार विजय तू. वाचलास. " रमाकांतचा मेसेज आला.
" आम्ही पोहोचलो नरकात. " अनिल म्हणाला.
" पण मित्र आहोत ना आपण. विजयला एकटे कसे सोडायचे ?" प्रभाकरचा मेसेज आला.
" हो. विजय , तुला काय वाटले की तू वाचलास? नाही. आम्ही तुलाही घेऊन जाणार. " रमाकांतचा मेसेज आला.
" सुनबाई.. सुनबाई.." विजय ओरडला.
नमिता आणि मीनल धावतच बाल्कनीत आल्या. विजयच्या हातातून स्मार्टफोन खाली पडला होता. विजयला घाम फुटला होता. तो थरथरत होता.
" काय झाले बाबा ?" नमिताने विचारले.
मीनल आणि नमिताने विजयला धरून हॉलमध्ये आणले. नमिताने लगेच पाणी आणले.
" बाबा , काय झाले ?" नमिताने काळजीच्या सुरात विचारले.
" ते..ते..त्या ग्रुपमध्ये म्हणताय मलाही घेऊन जाणार."
" कोणता ग्रुप ? कोण म्हणत आहे ? कुठे घेऊन जाणार ?" नमिताने प्रश्नांचे बाण सोडले.
विजयने सर्व वृत्तांत कथन केला.
" दाखवा तुमचा फोन. " नमिता म्हणाली.
विजयने बाल्कनीकडे बोट दाखवले. मीनलने लगेच बाल्कनीत जाऊन फोन आणला.
" बाबा , या ग्रुपवर तर कसलीच चॅट दिसत नाहीये." नमिता म्हणाली.
" दाखव. " विजयने स्मार्टफोन हिसकावून घेतला.
विजयने फोन हातात घेतला तर त्या ग्रुपवर खरच कसलीच चॅट नव्हती.
" मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती चॅट. " विजय म्हणाला.
" तुमचा भास झाला असेल. " मीनल म्हणाली.
" हो. मीनल बरोबर बोलत आहे. मित्रांचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला मानसिक धक्का बसला आहे. म्हणून तुम्हाला असे विचित्र भास होत आहेत." नमिता म्हणाली.
" सर , तुम्ही आराम करा. " मीनल म्हणाली.
विजय तसाच बेडरूममध्ये गेला. त्याला झोप लागत नव्हती. अचानक चॅट गायब कशी झाली , खरच आपले मृत मित्र आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतील का असे असंख्य प्रश्न विजयच्या मनात काहूर उठवत होते.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा