टायपिंग ! पार्ट 3 ( अंतिम भाग )

.
टायपिंग ! पार्ट 3 ( अंतिम भाग )

रात्रीचे सव्वा तीन वाजले होते. विजयला अचानक जाग आली. त्याला खोलीत कुणीतरी प्रवेश केल्याचे जाणवले. विजय उठून बसला. त्याला खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. विजय चटकन वळला तर समोर एक पांढरी सावली उभी होती. तो प्रभाकर होता. वृद्ध मुख आणि त्यावर असंख्य जखमा ! विजय दचकला.

" म्हणले होते ना. आमची भुतेही मागे लागतील तुझ्या. " प्रभाकर क्रूरपणे हसत म्हणाला.

" विजय.." एक भारदस्त आवाज विजयच्या कानावर आला. तो रमाकांत होता. डोके फुटल्यामुळे त्याचा रक्ताळलेला मेंदू स्पष्टपणे दिसत होता.

" चल आमच्यासोबत. " रमाकांत एक-एक पाऊल टाकत विजयच्या जवळ येत होता आणि विजयच्या हृदयाची धडधड वाढत होती. विजयने आजूबाजूला बघितले तर सुनील आणि अनिल तिथे उभे होते. त्या चौघांच्या पांढऱ्या सावल्या विजयच्या जवळ येऊ लागल्या आणि विजयला हालचालही करता येईना. विजय रडू लागला. तो कर्कश आवाजात ओरडला. मीनल आणि नमिता धावत आल्या. मीनलने लाईट लावली.

" बाबा , काय झाले ? वाईट स्वप्न पडले का ?" नमिताने विचारले.

मीनलने पाणी आणून दिले. विजयने पाणी पिले. काहीच न बोलता विजय झोपी गेला.

***

दुसऱ्या दिवशी विजय प्रभाकरचा मुलगा यश याच्या घरी गेला.

" काका , कसे येणे केले ?" यशने विचारले.

" प्रभाकरचा मोबाईल कुणाकडे आहे ?" विजयने सरळ मुद्द्याला हात घातला.

" चौघांचे मोबाईल तर तुटलेल्या अवस्थेत होते. पोलिसांना अपघातस्थळी जेव्हा ते मोबाईल सापडले तेव्हाच त्यांनी सर्व मोबाईल स्वतःकडे जमा केले. "

" हम्म. "

" काही प्रॉब्लेम होती का काका ?"

" नाही. काही नाही. काळजी घे. " विजय म्हणाला.

" हो. बाबा होते तोपर्यंत त्यांना वेळ देता आला नाही. आता बाबा कायमचे सोडून गेले तर पश्चाताप होत आहे. असे वाटते की बाबांनी एकदा परतावे आणि मी त्यांना घट्ट मिठी मारावी. " यश रडू लागला.

विजयने त्याचे सांत्वन केले. विजय आपल्या घरी परतला. एव्हाना नमिताने रवीला सर्व वृत्तांत कथन केला होता. रवीने लगेच फोन लावला.

" बाबा , मी लवकरच येतो. तुम्ही काळजी करू नका." रवी म्हणाला.

" अरे तू येऊ नकोस. मी ठीक आहे. " विजय म्हणाला.

" बाबा , तुम्ही त्या घटनेचा जास्त विचार करू नका. आपण दिवसभर जे विचार करतो तशीच स्वप्ने आपल्याला पडतात. " रवी म्हणाला.

" हो. तू माझा ताण घेऊ नकोस. " विजय म्हणाला.

***

पोलिसांना तो अपघात एखादे कारस्थान वाटत होते. कारण शहरात इन्शुरन्ससाठी पालकांना मारण्याच्या घटना घडल्या होत्या. म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी विजयला पोलीस ठाण्यावर बोलवले.
विजयला अपघातस्थळी काढलेल्या सर्व फोटोज दाखवल्या. बेचिराख झालेल्या कारमध्ये ड्रायव्हर सीटवर कुणीच नव्हते. इतर ठिकाणी विजयचे गतप्राण झालेले मित्र होते. त्यांचा रक्ताळलेला देह विजय पाहू शकला नाही. पण अचानक विजयला ड्रायव्हींग सीटवर एक पांढरी सावली क्रूरपणे हसताना दिसली. विजयने घाबरून फोटो खाली ठेवला.

" काय झाले ?" पोलिसांनी विचारले.

विजयने परत त्या फोटोकडे पाहिले त्या फोटोत आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन विजय घरी परतला.

***

संध्याकाळी विजय सोसायटीच्या मंदिरात गेला. तिथे सोसायटीचे सेक्रेटरी जोशीसाहेब एका स्त्रीशी भांडत होते.

" हे बघा. इथे असले पोस्टर लावू नका. "

" पण आमचे वीरभद्र बाबा खरच भूतबाधा दूर करतात. " ती स्त्री म्हणाली.

" आम्ही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. "

सेक्रेटरी साहेब निघून गेले. ती स्त्री निराश होऊन मंदिराच्या पायऱ्यांवर बसली. विजय त्या स्त्रीजवळ गेला.

" ताई , कोण तुम्ही ? मूळच्या कुठल्या ?"

" मी सारिका पाटील. माझे माहेर इनामवाडी. "

" लातूरच्या का तुम्ही ? माझे गाव कासार शिरसी. "

" अरे वाह ! माझ्या नणंदच्या मुलीला तिथेच दिले आहे. रघुनाथ जाधवांच्या घरात. "

" ते तर माझे मित्रच आहेत. असो. तुम्ही का भांडत होता ?"

" अहो , माझ्या नणंदच्या पुतणीच्या मिस्टरांना भूतबाधा झाली होती. वीरभद्र बाबांनी ती दूर केली. आता सेवा म्हणून मी सगळीकडे त्यांचे पोस्टर लावत आहे. तर हे खडूस सेक्रेटरी साहेब. " सारिका नाक मुरडत म्हणाली.

" कुठे मिळतील वीरभद्र बाबा ?"

सारिकाने पत्ता सांगितला. विजय त्या बाबाजवळ पोहोचला. तिथे त्याला वेगळीच ऊर्जा जाणवली. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या , भस्माचे पट्टे लावलेला , लांब जटा , होमहवन करण्यात व्यग्र असलेल्या वीरभद्र बाबांचे रूप पाहून विजय क्षणभर घाबरला. पण धीर एकवटून विजयने सर्व वृत्तांत कथन केला. बाबांनी त्याला एक लिंबू दिला आणि सांगितले ,

" मला कसलीच नकारात्मक ऊर्जा तुझ्यात जाणवत नाहीये. कधी कधी आपणच कल्पना करतो आणि त्या कल्पनेलाच सत्य मानतो. तरीही मी उपाय करत आहे. जर हा लिंबू एका रात्रीत लाल झाला तर तुझ्या मित्राचे मृतात्मा तुझ्या मागे लागले आहेत. "

विजय तो लिंबू घेऊन घरी आला. बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो लिंबू बेडखाली ठेवला. सकाळी तो लिंबू लाल भडक होता. आता मात्र विजयला विश्वास बसला की खरोखरच त्याचे मृत मित्र त्याच्या मागे लागले आहेत. " यंग ओल्ड " ग्रुपवर पुन्हा तेच मेसेज येत होते. धमक्या येत होत्या. इतरांना दाखवेपर्यंत ती चॅट गायब होऊन जात. वीरभद्र बाबा देखील काही दिवस शहराबाहेर होते. रवीची फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे त्याला यायलादेखील अवकाश होता. विजयचे दिवस जड जाऊ लागले. सतत भय वाटू लागले. वाईट स्वप्ने पडू लागली. अखेरीस त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्या देहातून प्राणपाखरू उडाला.

***

" मीनल , एवढ्या रात्री का बोलावले आहेस मला ?" नमिता हळू आवाजात म्हणाली.

" ताई , म्हाताऱ्याचे भूत आपल्या मागे तर लागणार नाही ना ? कारण आपणच हे सर्व केले आहे. " मीनल म्हणाली.

नमिता क्षणभर भूतकाळात गेली. गावातले शेत व घर विकून रक्कम उभी करावी आणि त्या पैश्यातून नवीन घर विकत घ्यावे अशी नमिताची मनोमन इच्छा होती. म्हणून तिने रवीच्या मनात बाबा एकटे पडले आहेत असे भरवले. रवीने विजयला गावाहून बोलावले. नमिताला वाटले की जर आपण बाबांची सेवा केली तर ते शेत विकायला राजी होतील. पण विजयने स्पष्टपणे नकार दिला. उलट विजयला नातवंडे हवी होती. या गोष्टीला नमिताचा विरोध होता. नमिताच्या दृष्टीने आता विजयची उपयुक्तता संपली होती. तिला विजयला परत गावी पाठवायचे होते. म्हणून तिने मीनलसोबत एक प्लॅन बनवला. मित्रांच्या अकस्मात निधनामुळे विजय आधीपासूनच मानसिकरित्या खचला होता. नमिताने चार नवीन सिमकार्ड घेतले. चार जुने सेकंड हॅन्ड स्मार्टफोन घेतले. विजय आंघोळीला गेला असताना जुने नंबर डिलीट करून नवीन नंबर मित्रांच्या नावाने विजयच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले. मग ती चॅटिंग करू लागली. बिचाऱ्या विजयने कधीच त्या नंबरवर कॉल केला नाही. नमिता सोडून कुणाकडे या गोष्टीची वाच्यता केली नाही. विजय जेव्हा घरी सर्व सांगत तेव्हा नमिता त्याला सोफ्यावर बसवून पाणी पाजवत आणि मीनल लपून सर्व चॅट डिलीट करून टाकत. कधी कधी तर दोघीही सर्व चॅट दिसत असूनही काही न दिसण्याचा आव आणत. रवी दिवसरात्र एक करून हैदराबादमधले काम संपवत होता. तो ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी विजय निर्वतला.

" हे बघ. बाबा घाबरावेत आणि गावी निघून जावेत म्हणून मी हा प्रॅन्क केला होता. मला काय माहित बाबा एवढं सिरीयस घेतील प्रकरण. " नमिता म्हणाली.

" त्या दिवशी मंदिराजवळ लपूनछपून मीच त्यांचे बोलणे ऐकले. त्या वीरभद्र बाबाबद्दल मला सर्व माहिती होते. मी खोलीत तो लिंबू पाहिला तेव्हा मला तो लिंबू कशासाठी आणला असेल मला कळून चूकले. मग आपणच रात्री तो लिंबू लाल रंगाने रंगवून ठेवला. त्या दिवसापासून तर त्यांची भीती अजूनच वाढू लागली."

" हे रवीला जर हे कळले तर माझा संसार उध्वस्त होईल. तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळून जाईल. यापुढे यावर कसलीच चर्चा नको. " नमिता म्हणाली.

होकारार्थी मान हलवत मीनल निघून गेली. नमिताला मात्र झोप येत नव्हती. वेळ घालवण्यासाठी तिने मोबाईल उघडला.

" बाबा इज टायपिंग.." हे वाक्य व्हॉटसएपच्या स्क्रीनवर झळकू लागले.

नमिता घाबरली. तिला घाम फुटला. तिचा देह थरथरू लागला.

" सुनबाई , ठरवलं तर क्षणात तुमचे प्राण घेऊ शकतो. पण माझ्या रवीला तुमची फार गरज आहे. लहानपणीपासून त्याला कधी आईचे प्रेम मिळाले नाही. आता वडिलांचेही अकस्मात निधन झाल्यामुळे तो फार खचला आहे. बाप आहे मी. लेकराला अजून कसे रडवू ? तुम्ही एकदा सांगितले असते तर लगेच गावाकडे निघालो असतो. असो. काळजी घ्या. माझ्या रवीचीही काळजी घ्या. तुमचा संसार सुखाचा होवो हेच आशीर्वाद. "

ही चॅट वाचून नमिताचे डोळे पाणावले. नंतर चॅट आपोआप गायब झाली. शेवटी बापाचं काळीज ते !