Login

उतावळा नवरा - भाग २

उतावळा नवरा भाग २
उतावळा नवरा -


काहीही कामधंदा न करता फक्त आरामात बसुंनखणारा दामू स्वतः चे लग्न आईने म्हणजे यशोदाने करून द्यावे म्हणून आईजवळ हट्ट करत असे. आता पाहूया यशोदा काय करेल?

भाग २

यशोदाने दामूला बोलणे आणि दामूने ते ऐकून घेणे हा आता त्यांचा नित्यक्रम झालेला. दामू अंगातील आळस झटकून काम करायचे कधी नावही घेत नव्हता. आयते खायला कसे मिळेल याच्या अनेक युक्त्या शोधण्यात तो पटाईत होता. आईला बोलण्यात गुंडाळून गोड बोलून तो सगळी कामं आईकडूनच करून घेत असे.

दामू तिशी गाठत आला होता पण त्याच्या आईतखाऊ स्वभावामुळे त्याचे लग्न जमत नव्हते. आयाते खाऊन खाऊन दामूचे पोट अगदी गोल गोल टुमदार दिसायचे. त्याला धड चालताही येत नसे. गावातील लहान मुले त्याला पाहिले की त्याची टर उडवायचीत. पण दामू आपल्याच तंद्रीत राहत असे. कष्ट करणे हे त्याच्या स्वभावात बसत नसे. गावातील इतर पोरांची लग्न झाली मग आपलंही झालं पाहिजे हे खुळ मात्र पक्कं त्याच्या डोक्यात घुमत होतं.

लहान मुलासारखा आईकडे हट्ट करत दामू म्हणायचा. “ये आये आगं कवा करतीस माझं लगीन. तू करून देणार हायेस की न्हाई ते सांग?”

गळ घालून दामू आईचं डोकं खात होता. यशोदालाही आपल्या मुलाचे लग्न व्हावे, त्याने चांगला संसार थाटावा असे वाटायचे पण हा काही सुधारत नव्हता म्हणून यशोदा वैतागून म्हणाली, “हे बग दाम्या; म्या तुझ्यासाठी पोरगी बगीन पर म्या जे सांगती तसं तुला वागाया लागंल.”

“आगं काय करु ती तर सांग; म्या करीन बरं तू सांगशील तसं.” दामू आपल्या आईच्या समाधानासाठी वरकरणी बोलत होता.

यशोदा त्याला म्हणाली, “हे बग बाळा, तू जर कामधंदा केलास, पैसा कमवलास तरच तुजं लगीन लवकर व्हईल, नायतर तसंच बसावं लागंल.. तेबी एकटं.”

नाईलाजाने का होईना पण आईचं ऐकावं लागणार आहे. असे वाटून दामू म्हणाला, “बरं बाईऽऽऽ.. ऐकतो मी तुझं.. मग तर झालं!”

दुसऱ्या दिवसापासून दामू यशोदाला कामात थोडीफार मदत करू लागला. ‘सांग काम्या अन् ओ नाम्या’ अशी गत झाली होती दामूची. आईच्या शब्दासाठी म्हणा किंवा तिला दाखवण्यासाठी म्हणा पण दामू काम करू लागला.

एक दिवस दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करण्यासाठी यशोदासोबत दामू गेलेला. त्या दिवशी कुणीतरी सहज बोलता बोलता लग्नाचा विषय काढल्यामुळे दामूला डिवचल्यासारखे वाटले. माग पुढे काय.. यशोदाच्यामागे पुन्हा रडगाणे चालू झाले. दामू आईला म्हणाला, “आई माझं लगीन लावून देतो म्हणालीस मग काय झालं? तू माजे लगीन लावून दे बग. नायतर…..
—-------------
यशोदालाही आपल्या मुलाचे चांगले व्हावे असे वाटत असते म्हणून ती त्यांना कामधंदा करण्याचा सल्ला देते आईच्या शब्दाला मान देऊन तो तिचे ऐकण्याचे मान्य करतो. आता तो खरच ते ऐकेल का? की अजून काय करेल? ते पाहूया पुढील भागात.


क्रमशः
©® सौ. वनिता गणेश शिंदे