उबदार घरटे
भाग -१
भाग -१
“काय गं? अजून पोह्यांना फोडणी घातली नाहीस का? कांदे, बटाटे तेवढे चिरून ठेवले आहेस. बाकीचे कधी करणार आहेस?”
भिंतीवरच्या घड्याळाने सकाळी सातचा ठोका दिला आणि बरोबर पुढच्या मिनिटाला शालिनीताई स्वयंपाक घरात दाखल झाल्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी ओट्यावरून नजर फिरवली आणि ओट्यावरचा पसारा बघून त्यांच्या कपाळावर एक आठी पसरली.
“आई हे तुमचे लिंबाचा रस आणि मध घातलेले गरम पाणी.” त्यांच्या प्रश्नावर उत्तर न देता स्वरांगीने म्हणजे त्यांच्या सुनेने त्यांच्यापुढे ग्लास ठेवला.
“ते ठीक आहे पण हा काय पसारा करून ठेवलास? सात वाजून गेले तरी अजून नाश्ता तयार नाहीये. मी तर बाई अगदी सकाळी साडेसहाला सगळ्यांसाठी म्हणून नाश्ता तयार करायचे आणि ते देखील आंघोळ पांघोळ करून.” तिला प्रश्न विचारत त्यांनी त्याच वेळेत स्वतःचे गुणगान गायले.
"अहो आई, आज सुमेधचे शाळेत प्रोजेक्ट सबमिट करायचे आहे ना त्याचीच सगळी धांदल सूरू होती. त्यामुळे जरा उशीर झाला. पण आता करतेय की. पटकन पोहे धुवून पाणी निथळत ठेवलंय. कांदा मिरची, बटाटा चिरून झालेय. आता फक्त फोडणी तेवढी बाकी आहे.” गॅसवर पातेले ठेवत स्वरांगी म्हणाली.
“हम्म. तरी उरक नाहीये हो तुला. घर चालवणं म्हणजे काही सोपे काम नसते. तर ते एक वेळेचं यंत्र असतं. सगळं कसं वेळेतल्या वेळेत व्हायला हवे. तुला काय कळणार म्हणा? मी आहे म्हणून घर घरासारखं आहे. नाहीतर नुसता बट्याबोळ करून टाकला असतास.” पाणी पिऊन झाल्यावर ओटा पुसायला कापड हाती घेत त्या म्हणाल्या.
“आई तुम्ही बसा बघू.” स्वरांगीने बोलायला तोंड उघडायला आणि ओटा पुसून काढताना त्यावरील कांद्याची प्लेट खाली पडायला एकच गाठ पडली.
“हो आता मी तुला स्वयंपाक घरात नको आहे, उद्या काय घरातून बाहेर काढशील. निस्तर बाई तू तुझं. मलाच मेलीला मध्ये मध्ये तोंड खुपसायचे असते. हे असं पाहवत नाही ना मग काय करणार.” नाक वाकडे करत त्या हॉलमध्ये येऊन बसल्या.
त्यांच्या नेहमीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत स्वरांगीने वाढलेले काम आवरून घेतले आणि परत दुसरा कांदा चिरून एका बाजूने पोहे आणि दुसऱ्या बाजूने चहाचे आधण ठेवले. ते होईपर्यंत कणिक मळवली आणि सोबतीला भाजीची तयारी सुद्धा केली.
सुमेधची शाळेची तयारी, त्याचा टिफिन, सासूबाईंना चहा नाश्ता आणि मग नवऱ्याचा टिफिन यात साडे आठ वाजून गेले. रक्षित, तिचा नवरा घराबाहेर पडला आणि स्वरांगीने एक मोठा श्वास घेतला. थंड झालेले पोहे गरम करून चहा आणि पोह्यांची बशी घेऊन सोफ्यावर निवांत बसली.
“सानुला घेऊन सारिका आणि जावईबापू येणार आहेत. त्यांचे आवभगत तर मीच करते पण सानूला लाडू आवडतात तेवढे ते कर जरा.” ती जराशी निवांत दिसताच शालिनीताईंनी आदेश सोडला.
“हो आई.” ती मान डोलावून म्हणाली.
दुपारचा लाडू वळण्याचा सांग्रसंगीत कार्यक्रम पार पडला.
“आई जरा चव बघता का?” अश्विनीताई डोकावल्या तसे स्वरांगीने लाडू समोर केला.
“तसे बरे झालेत पण जर का मी केली असते तर अगदी जिभेवर विरघळले असते.” त्या म्हणाल्या त्यावर स्वरांगी गालात हसली.
"हो आई तुमची सर कोणालाच नाही." ती हसून म्हणाली. त्यांची सवय तिला अंगवळणी पडली होती.
शालिनीताईंच्या अश्या सवयीमुळे हे घर विस्कटेल का? वाचत रहा पुढील भाग.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा