उबदार घरटे
भाग २
भाग २
दुपारचा लाडू वळण्याचा सांग्रसंगीत कार्यक्रम पार पडला.
“आई जरा चव बघता का?” अश्विनीताई डोकावल्या तसे स्वरांगीने लाडू समोर केला.
“तसे बरे झालेत पण जर का मी केली असते तर अगदी जिभेवर विरघळले असते.” त्या म्हणाल्या त्यावर स्वरांगी गालात हसली.
"हो आई तुमची सर कोणालाच नाही." ती हसून म्हणाली. त्यांची सवय तिला अंगवळणी पडली होती.
________
“आईऽऽ” सायंकाळी चहाच्या वेळेला सारिकाचा आवाज आला आणि शालिनीताई कप बाजूला सारून उठून उभ्या झाल्या.
“माझं कोकरू गं. किती रोडवलंय.” तिला मिठीत घेत त्या म्हणाल्या.
“कुठे गं आई? उलट या महिन्यात तीन किलो वजन वाढलंय. ते कमी करायला म्हणून व्यायाम सुरु केलाय.” सारिका हसून म्हणाली.
“आज्जीऽऽ” म्हणत सानुने त्यांना मिठी मारली आणि जावईबापूनीही नमस्कार केला.
“या हो. बसा सगळे. प्रवास नीट झालाय ना? स्वरांगी अगं पाहुणे आलेत. जरा चहा नाश्याचे बघ गं. इतकी वर्ष झालीत लग्नाला; पण अजूनही सगळं मलाच सांगावं लागतं. स्वतःहून कधी करायला शिकेल कुणास ठाऊक?” लेकीला बघून शालिनीताईच्या तोंडाचा पट्टा आणखी सुरु झाला.
“आई, ती करते की गं. कशाला आल्या आल्या उगाच नावे ठेवतेस?” सारिका म्हणाली.
“उगाच नव्हे. मी आहे म्हणून हे घर घरासारखं दिसतेय नाहीतर पार उकिरडा झाला असता. बघितलेस ना? बाईसाहेब अजूनही बाहेर आल्या नाहीत. मला इथे चहा दिला आणि स्वतःचा कप घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यात. स्वरांगीऽऽ” त्यांनी परत सूनेच्या नावाचा शंख फुंकला.
“आलेऽऽ आलेऽऽ. सुमेधला गणितं सोडवायला अडचण येत होती तेच त्याला समजावून सांगत होते. सॉरी हं. मी पाणी घेऊन आलेच.” दिलगिरी व्यक्त करत स्वरांगी स्वयंपाक घरात गेली आणि सगळ्यांसाठी पाण्यासोबत लाडू चिवडा घेऊन आली.
“सानू, खास तुझ्यासाठी लाडू केलेत बरं का गं. तेही आईंनी सांगितलेत म्हणून. जमलेत का बघ तरी? चल आपण दादाच्या खोलीत जाऊन त्याला खाली घेऊन येऊ. मग तुम्ही दोघांनी मस्त मज्जा करा.” लाडुची प्लेट आणि तिला उचलून घेत स्वरांगी सुमेधच्या खोलीत गेली.
“आई वाहिनीने लाडू किती छान वळलेत गं? अगदी मलाही असे जमायचे नाहीत.” त्या दोघी गेल्यावर सारिका स्वरांगीची स्तुती करत म्हणाली.
“तिला कुठलं काय येतं? सगळं मी शिकवलं म्हणून ती थोडंफार करते.”
“सासूबाई मग सारिकालाही असलं काही शिकवा की.” जावईबापूनी मुद्दाम म्हटले आणि त्यावर सारिकाने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले.
“हे सगळं करायला माझी मुलगी घरी थोडीच असते? तिला तिची नोकरी सांभाळायची असते.” त्या पटकन म्हणाली.
“अगदी तसंच नव्हे आई. मुळात आवड असली की जमतं सगळं. मला असं काही करायला आवडत नाही पण वहिनीने तुझ्या तालमीत सगळं शिकून घेतलं याचा मात्र आनंद आहे हो.” हातातील लाडवाचा आस्वाद घेत ती म्हणाली.
“हम्म. तुसुद्धा वहिनीचेच कौतुक कर.” त्या तोंड फुगवून म्हणाल्या आणि सारिका गालात हसली.
रात्री स्वरांगीने जेवणाचा फक्कड बेत केला होता. अर्थात काय काय करायचं ते शलिनीताईंनी सांगितले होते. सारिका मदतीला होती पण तिची मदत नेहमीप्रमाणे वरवरची होती.
“जेवण अगदी मस्त झालंय हं. दहापैकी फुल्ल दहा मार्क्स!” सारिकाच्या नवऱ्याने कौतुक केले आणि त्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला.
“थँक यू. जे काही केलंय ते आईंनीच शिकवलंय. त्यामुळे याचे सारे श्रेय आईंनाच जातं हं.”
शालिनीताईंचा पडलेला चेहरा बघून स्वरांगीने तिचे श्रेय त्यांना देऊन टाकले तेव्हा कुठे त्यांच्या चेहऱ्यावर छोटीशी स्मितरेषा उमटली.
“अगं आई गंऽऽ”
दुसऱ्या दिवशी रविवार म्हणून सगळ्यांसाठी इडली सांबरचा बेत सुरु असताना अचानक बाथरूमच्या बाहेरून शालिनीताईचा ओडण्याचा आवाज आला आणि सगळी मोठी मंडळी तिकडे धावत गेली.
“आई अगं काय झालंय? अशी कशी पडलीस?” त्यांना उचलून उभे करत रक्षितने विचारले.
“अरे सानुला आंघोळ घालत होते. तर ती पळायला लागली म्हणून मीही मागे धावले आणि पाय घसरून पडले रे.” त्या विव्हळत म्हणाल्या.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा