Login

उबदार घरटेभाग -३

वाचा सासू सूनेच्या नात्याची कथा
उबदार घरटे
भाग -३

“आई अगं काय झालंय? अशी कशी पडलीस?” त्यांना उचलून उभे करत रक्षितने विचारले.

“अरे सानुला आंघोळ घालत होते. तर ती पळायला लागली म्हणून मीही मागे धावले आणि पाय घसरून पडले रे.” त्या विव्हळत म्हणाल्या.

“काय गं आई? सुमेधच्या मागे मागे करताना तुला मी कधीच पाहिले नाही आणि आज एकदम सानुची आंघोळ घालायला निघालीस.”

“अहो हे बोलायची ही वेळ आहे का? आधी त्यांचा पाय नीट आहे का ते तर बघा ना.” स्वरांगी म्हणाली तसे त्याने पायाकडे बघितले. एवढ्या वेळात पाय चांगलाच सुजला होता.

“दादा, मला वाटतं आईला लवकर दवाखान्यात न्यायला हवे. तिच्याने धड उभेही राहता येत नाहीये.” सारिका काळजीने म्हणाली.

________

“..पायाला फ्रॅक्चर आहे. तेव्हा एक सर्जरी करावी लागेल.” डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेत म्हटले. ऑपरेशनमुळे त्यांचा दवाखान्यातील मुक्काम वाढला आणि त्या घराच्या काळजीने कासावीस झाल्या.

“सारिका, मी इथे असल्यावर घराचं कसं होईल गं? तू माहेरपणाला आलीस ते कसे निभावून नेईल?” दुखणे बाजूला सारून त्यांना या विचारानेच रडायला आले.

“आई आधी तुझी तब्येत बरी होणे महत्त्वाचे आहे तेव्हा तू कुठलाच विचार करू नकोस बरं.” सारिका म्हणाली.

म्हणता म्हणता पाच दिवस दवाखान्यात गेले. शालिनीताईंना सारखे त्यांचे घर आठवत होते. त्या दवाखान्यात असताना स्वरांगी त्यांच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक व्यवस्थित पाळत होती. तरीही त्यांची कुरकुर होतीच.

सुट्टी झाल्यानंतर वॉकरच्या साहाय्याने जेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा मात्र त्या मनातून हरखून गेल्या, चेहरा मात्रअजूनही उतरला होता. घर अगदी व्यवस्थित. सगळ्या वस्तू जागच्या जागेवर. त्यांची खोली नीट आवरून ठेवली होती. त्यांनी कुठली मागणी करण्यापूर्वीच त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आयत्या मिळत होत्या तरीही डॉक्टरांनी आणखी आठ दिवस संपूर्ण बेडरेस्ट सांगितल्यामूळे त्यांची चिडचिड होत होती.

“आई हे सूप घ्या बघू.”

“चांगलं झालंय पण जरा मीठ जास्त पडलंय.”

“आई आज अप्पे केलेत.”

“अगं पण मला थालीपीठ खायचे होते.” तिच्या विरोधी त्यांचा सूर बदलला नव्हता आणि स्वरांगीही त्यांना काहीच न बोलता उलट हवं ते करून देत होती.

“वहिनी अगं तू इतकं कसं सहन करतेस? माझी आई आहे तरी मला तिचा वागणं सध्या असह्य होत चाललेय. तुला म्हणून सांगते आई पूर्वी अशी नव्हती ग मग आता ती अशी का वागते आहे? शालिनीताईंच्या खोलीबाहेर पडताना एक दिवस सारिकाने स्वरांगीला प्रश्न केला.

“सारिका मलाही माहिती आहे की आईचं स्वभाव असा नाहीये म्हणून तर मी सगळं ऐकून घेते.”

“म्हणजे?”

“जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा तू इथे होतीस त्यामुळे नाही म्हटलं तरी आईंना एका आधार होता. मात्र तुझं लग्न झाल्यानंतर त्यांना स्वतःलाच एकटं पडल्यासारखं वाटलं. संसाराच्या अर्ध्यावर बाबांनी त्यांची साथ सोडली तेव्हापासून त्या एकटीने सगळं काही सांभाळत होत्या. हे घर घरातील प्रत्येक वस्तू त्यांनी मायेने जपली; पण आता सुनेचे राज्य आल्याने आपलं काही चालेल की नाही अशी कुशंका त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळेच हल्ली त्यांचा प्रत्येक गोष्टीत ‘मी’ ‘माझं’ हे सुरू असतं.

“नाही म्हटलं तरी त्यांच्यासोबत मी पाच वर्षे काढले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील हा बदल मला समजणार नाही का? म्हणून मग मी त्यांच्या वागण्याचा बाऊ न करता त्यांच्या कलाने घेते त्यामुळे मनातून त्याही खुश असतात. त्यांचं महत्त्व अबाधित आहे हे त्यांना पटते एवढंच.”

“वहिनी कमाल आहे हं तुझी. माझ्यासोबत जर असं कुणी वागलं असतं तर मला ते कधीच सहन झालं नसतं.”

“सारिका, अगं हे घरटं त्यांनी एकेक काडी जोडून तयार केलेय. मग त्या घरट्यातील ऊब टिकवून ठेवण्याचे कार्य सून म्हणून मलाच करावे लागेल ना? आणि त्या कुणी परक्या थोडीच आहेत की त्यांचा वागणं मी मनाला लावून घेऊ? त्यांच्या मनाची अवस्था कळतेय मला.”

“वहिनी तू ग्रेट आहेस गं. बरं चल आता स्वयंपाकाला काय करु ते सांग. आज मी तुला मनापासून मदत करणार आहे.” तिच्यासोबत जात सारिका म्हणाली.

दाराबाहेरा संवाद घडत असला तरी त्यातील शब्दन् शब्द शालिनीताईंच्या कानावर पडत होता. स्वरांगी जे बोलली ते ऐकून त्या मनातच खजिल झाल्या.
:
क्रमश:
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)
________


0

🎭 Series Post

View all