Login

उबदार घरटेभाग -४ (अंतिम भाग)

वाचा सासू सूनेच्या नात्याची कथा
उबदार घरटे
भाग -४ (अंतिम भाग)


“वहिनी तू ग्रेट आहेस गं. बरं चल आता स्वयंपाकाला काय करु ते सांग. आज मी तुला मनापासून मदत करणार आहे.” तिच्यासोबत जात सारिका म्हणाली.

दाराबाहेरा संवाद घडत असला तरी त्यातील शब्दन् शब्द शालिनीताईंच्या कानावर पडत होता. स्वरांगी जे बोलली ते ऐकून त्या मनातच खजिल झाल्या.

मनात एक संकल्प करून पुढचे पाच दिवस त्यांनी स्वरांगीला कुठलीही सूचना दिला नाही की कुठली चूक देखील काढली नाही आणि तरीसुद्धा घरातील प्रत्येक काम अगदी व्यवस्थित आणि त्यांना अपेक्षित तसेच होत होते.


“आई चहा आणलाय.” सहाव्या दिवशी सायंकाळी स्वरांगी चहा घेऊन आली.

“नाही मला नकोय.” त्या कोरडेपणाने म्हणाल्या.

“माझं काही चुकलंय का?” स्वरांगीने हळवे होत विचारले. त्यांच्यातील असा आकस्मिक बदल बघून तिला काही कळेनासे झाले होते.

“हम्म. चुकलंय तर खरं.” त्या तिच्याकडे एक टोचरा कटाक्ष टाकत म्हणाल्या.

“मग सांगा तरी.”

“इथे नको. बाहेर सगळ्यांसमोर सांगायचे आहे. चल.” वॉकरच्या साहाय्याने पाऊल टाकत त्या म्हणाल्या.


“आई काय चाललंय गं तुझं? वहिनी तुझं किती मनापासून करते आणि तरीही तू तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते आहेस?” बाहेर आलेल्या त्या आता सगळ्यांसमोर स्वरांगीला काही बोलणार हे बघून सारिका मध्येच बोलली.

“आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करतेय पण स्वरांगीला नव्हे तर स्वतःला.” त्या अगदी मवाळ शब्दात म्हणाल्या आणि सर्वांनी त्यांच्याकडे धक्का बसल्यागत पाहिले.

“खरंच सांगतेय. मला वाटलं होतं ही पोरगी मला कधी समजून घेणार नाही पण तीच मला समजून घेतेय. माझे टक्के टोणपे उलट न बोलता समजून घेते. डोळ्यात आलेले पाणी त्यांनी लगेच टिपून घेतले.

“तुझ्या दादाच्या लग्नानंतर दोन वर्ष तू इथेच होतीस त्यामुळे मला काही वाटत नव्हते पण तू गेलीस आणि मग गरज नसतानाही मला माझा एकटेपणा जाणवायला लागला. तशी एकटी नव्हते मी. सुमेधच्या बाळलीला, रक्षित आणि स्वरांगीची साथ होतीच की तरी मी आपला एकटेपणा शोधू लागले.

माझं घरातील महत्त्व आता कमी होतेय असे वाटू लागले. चिडचिड वाढली. रक्षित माझ्यापासून दुरावतोय असं वाटू लागलं आणि त्या सगळ्याचा वचपा म्हणून मग मी स्वरांगीवर अन्याय करू लागले. आधी न केलेल्या सासुरवासाला सुरुवात केली. स्वतः कामातून अंग काढून घेतले आणि तिच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करू लागले. स्वतःचे महत्व अधोरेखित करण्यासाठी माझ्यामुळे हे घर सुरळीत आहे हे भासवू लागले.

खरं तर तिथेच मी चुकत होते. काडी काडी जोडून विणलेले हे घरटे स्वरांगीच्या अश्या प्रेमळ आणि मला समजून घेण्यामुळे अजूनही उबदार आहे हे मला कळलेच नाही. जर ती मला उलट बोलली असती तर घरात कलह निर्माण होऊन माझे घरटे पार विखरून गेले असते.

“स्वरांगी, मी तुझी गुन्हेगार आहे. मला माफ कर अगं.” सर्वांसमोर त्यांनी तिची माफी मागितली आणि स्वरांगीला भरून आले.

“आई, हे माफी वगैरे काय हो? तुमचा मूळ स्वभाव असा नाहीये हे मला माहिती होते म्हणून तर मी सगळं निमूटपणे ऐकत होते आणि त्यामुळे मला फायदाच झाला की. माझ्यातील कार्यक्षमता अधिक परिपक्व झाली.” ती त्यांचे हात हातात घेत म्हणाली.

“इथेही मलाच श्रेय दे हं.” डोळ्यातील पाणी पुसत त्या हसल्या.

“ते सगळं ठीक आहे पण हे ‘घरटं’ वगैरे शब्द मला ओळखीचे वाटायला लागलेत. ही काय गोम आहे गं?” सारिकाने मिश्किलपणे शालिनीताईकडे पाहिले.

“त्या दिवशी तुम्ही दोघी माझ्या खोलीबाहेर बोलत होतात ते सगळं मी ऐकलं. स्वरांगीच्या मनातील माझ्या बद्दलच्या भावना ऐकल्या म्हणून तर मला माझी चूक कळली. मला वाटायचं की हे घरटं मी तयार केलंय; पण आता जाणवतं की यातील ऊब केवळ स्वरांगीमुळे टिकून आहे. मी फक्त तिला बोलत होते."

"आई, हे सगळं करणं एकट्याचं काम नाही. कळत नकळत आपण दोघी मिळून ते करत आलोय." स्वरांगी म्हणाली.

“चला, म्हणजे आता तू माझ्या बायकोच्या चुका काढत बसणार नाहीस, ही ना?” रक्षित हसून म्हणाला.

“नाही आता मी केवळ मुक दर्शक होऊन सगळं बघेल. आता माझी सून परफेक्ट झाली आहे. तेव्हा आपलं हे छोटुसं घरटं मी मनापासून तिच्या हाती स्वाधीन करतेय.” त्या स्वरांगीचा हात हाती घेत म्हणाल्या आणि
सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

थोड्या वेळाने सुमेध आणि सानू खेळून आल्यावर ते दोघेही शालिनीताईंना बिलगले.

“चला, आता मी आपल्या सर्वांसाठी परत चहा टाकते. आई आणि वहिनीचा चहा राहिला होता ना तर आता माझ्याकडून तुम्हाला मेजवानी.” डोळ्यातील पाणी पुसत सारिका स्वयंपाक घरात जायला निघाली.

‘हे गोकुळ असंच हसत खेळत राहू दे!’ स्वयंपाक घरातून दिसणारा हॉलमध्ये सुरु असलेला हास्यकल्लोळ बघून तिने मनातच बाळकृष्णाला हात जोडले.

-समाप्त-
©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..)

ही कथा सदर लेखिकेच्या कॉपीराईट अंतर्गत असल्यामुळे कथेचा कुठलाही भाग ऑडिओ, व्हिडीओ, अभिवाचन या स्वरूपात किंवा आणखी कुठल्याही स्वरूपात सादर करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!