Login

उदार हृदयाला फटका (भाग एक)

अती उदार मनाने गरजू लोकांना दान, मदत करणारा सदाशिव शेवटी स्वतः च सगळे गमावून बसतो आणि परत निश्चयाने उभा रहातो.

उदार हृदयाला फटका
भाग: एक
(जलदलेखन स्पर्धा २०२५)

चांदोशी हे डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेलं सुंदर गाव. गावाची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास. छोट्याशा टुमदार गावाच्या पायथ्याशी असलेली कुंडल नदी बारमाही खळखळत वाहणारी, शेतीला मुबलक पाणी असल्यामुळे गावाला हिरवागार, सुजलाम-सुफलाम असा परिसर लाभलेला.

त्या गावात रहायचा सदाशिव पाटील, सर्वांचा आवडता. त्याच्या सर्वांना मदत करणाऱ्या स्वभावामुळे आणि उदार मनामुळे तो गावातील अनेकांना अडचणीत मदत करायचा. काही गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणे आणायला पैसे हवे असायचे, तर काहींना लग्नासाठी पैसे लागायचे. ते बिनधास्त सदाशिवकडे यायचे आणि सदाशिव त्यांना सढळ हस्ते मदत करत असे. असा हा ‘देणं म्हणजे धर्म’ मानणारा माणूस होता.

त्याची आई लक्ष्मीबाई त्याची ही उदार वृत्ती पाहून त्याला म्हणायची,

“एवढंही माणसाने उदार असू नये.”

त्यावर तो हसत म्हणायचा, “अगं आई, तूच तर मला दानधर्म करायला, इतरांना मदत करायला शिकवलंस; आणि तूच आता असं बोलतेस?”
आई म्हणायची, “हो, पण तू जरा अतीच करत आहेस. तू हात खूप ढिला सोडला आहेस, त्याला वेळीच आवर घाल.”

सदाशिव नुसता हसायचा.

त्याची बायको सुनिता त्याला “तुकाराम महाराज” म्हणायची.

“एक दिवस ही व्यक्ती कमरेचा लंगोटसुद्धा सोडून देईल लोकांना,” असं हसत म्हणायची.

तेव्हा सदाशिव विनोबा भावेंविषयी भरभरून बोलायचा.

सुनिता म्हणायची, “त्यांच्या विचारांचा चांगला प्रभाव तुमच्यावर आहे, पण आपल्याला संसार आहे, मुलंबाळं आहेत, त्यांचं शिक्षण आहे.”
सदाशिव एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे.

“आपल्याला देवाने भरपूर दिलं आहे, ते आपण सगळं कशाला ठेवायचं? उद्या सगळं इथेच राहणार आहे!” हे वाक्य त्याच्या तोंडी कायम असायचं.

त्याच्या शेतात चांगलं उत्पन्न निघत होतं. त्याच्याकडे दोन म्हशी, दोन बैल, एक ट्रॅक्टर होता. त्याची बायको सुनीता आणि दोन लेकरं, त्याची आई लक्ष्मीबाई असा त्याचा परिवार होता . सुनिता व्यवस्थित संसार सांभाळायची, पण नवऱ्याची अतिउदार वृत्ती तिला नेहमीच खटकत असायची.

ती नवरा सदाशिवला खूप समजवायची पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही.
“तुम्ही घरात असेल-नसेल ते सगळ्यांना देऊन टाकता, घरातील साऱ्या कणग्यांनी तळ गाठला आहे. मुलांच्या शाळेची फी भरायची आहे,” ती म्हणायची.

सदाशिव शांतपणे उत्तर द्यायचा, “ आपल्या पाठीशी देव आहे, काहीतरी मार्ग निघेल, आपल्याला देवाने भरभरून दिलं आहे. एका वर्षी भात-ज्वारी पिकते ते सहज तीन वर्षं पुरतं. त्यातील थोडं गरजू लोकांना देतो, त्यामुळे मनाला समाधान वाटतं.”

बायको बरंच काही बोलायची; पण त्याच्या स्वभावात फरक पडायचा नाही.

पाहूया पुढे काय होते दुसऱ्या भगात

क्रमशः
©®सौ. सुप्रिया जाधव
१२/११/२०२५
0

🎭 Series Post

View all