Login

उदार हृदयाला फटका (भाग दोन)

अती उदार मनाने गरजू लोकांना दान, मदत करणारा सदाशिव शेवटी स्वतः च सगळे गमावून बसतो आणि परत निश्चयाने उभा रहातो.
उदार हृदयाला फटका
भाग दोन

जलदलेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२५)
एकदा गावातल्या नामदेवच्या मुलीचं लग्न होतं. लग्नासाठी त्याला पैशाची गरज होती. तो सदाशिवकडे आला. सदाशिवने स्वतःच्या नावावर सोसायटीचं कर्ज काढलं आणि एक लाख रुपये त्याला दिले.

गावकरी म्हणाले, “अरे सदाशिव, असं आपल्या नावावर कर्ज काढून कोणाला देतात का? उद्या तुलाच पैशाची गरज लागली तर काय करणार?”
सदाशिव आभाळाकडे पाहत म्हणाला,

“सगळं तोच करता करविता आहे; तोच माझ्याकडून हे कार्य करून घेत आहे.”
लोक त्याच्या उदार वृत्तीबद्दल उपहासाने बोलत.
एकदा गावातील महादेव त्याच्याकडे मदत मागायला आला. त्याच्या मुलाची कॉलेजची फी भरायची होती. सदाशिवने लगेच कपाटातील पंधरा हजार रुपये काढून दिले. महादेव आनंदाने गेला आणि सदाशिवला भरभरून आशीर्वाद दिले.

काळ पुढे सरकत होता. मुलं मोठी होत होती. त्यांची पुस्तके, शाळा, खर्च वाढत होता. तरी सदाशिवच्या स्वभावात फरक पडला नव्हता.
सतत कोसळणाऱ्या पावसाने त्याचं पीक हातातून गेलं. घरात हळूहळू धान्याचा तुटवडा जाणवू लागला. तरीही दारात आलेल्या याचकांना सुपभरून धान्य दिलं जायचं.


एका संध्याकाळी सुनीता रडत म्हणाली,
“आता स्वतःबद्दल काहीतरी विचार करा. कर्ज वाढतंय, लेकरांच्या शाळेचे पैसे बाकी आहेत.”
सदाशिव गप्प राहिला, चेहऱ्यावर शांतता होती, पण मनात खळबळ माजली होती.

“आपण गरजूंना उदार मनाने इतकं दिलं, पण आता मला कोण मदत करेल? .

असे विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते.
पावसाळा संपला. शेतीच्या कामांना वेग आला. सदाशिवने टोमॅटोचा प्लॉट केला. मेहनतीने त्याने खतपाणी घालून चांगली व्यवस्था केली.
लालबुंद टोमॅटोनी झाडं लगडली. करंडे भरून बाजारात पाठवले. त्यातून त्याला चांगलं उत्पन्न मिळालं, त्यामुळे परिस्थिती थोडी सावरली.
यानंतर त्याने झेंडू आणि शेवंतीची फुलशेती सुरू केली.

एक व्यापारी, बापू कवटे, गावात आला. सदाशिवचा स्वभाव पाहून तो म्हणाला,
“तुमचं शेत छान बहरलेल आहे. मीच तुमची सर्व फुले जागेवर खरेदी करतो म्हणजे तुमचा त्रास वाचेल.”

सदाशिवने विचार न करता होकार दिला. सुरुवातीला व्यापाऱ्याने पैसे दिले, पण नंतर चालढकल सुरू केली. हंगाम संपताच त्याने गावात येणं बंद केले. याचा सदाशिवला चांगलाच फटका बसला.

काळ जसजसा जात होता, सदाशिवच्या घरची परिस्थिती बिकट होत गेली. बँकेचं कर्ज फेडता आलं नाही. शेतावर तारण ठेवावं लागलं.

पुढे काय होते पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©®सौ. सुप्रिया जाधव
१२/११/२०२५