Login

उदार हृदयाला फटका (भाग तीन )

अती उदार मनाने गरजू लोकांना दान, मदत करणारा सदाशिव शेवटी स्वतः च सगळे गमावून बसतो आणि परत निश्चयाने उभा रहातो.
उदार हृदयाला फटका
(भाग तीन)
अंतिम
जलदलेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२५)

एक दिवस शाळेची फी भरता आली नाही म्हणून मुलाला शिक्षकांनी वर्गात उभं केलं.
त्या रात्री सदाशिवला झोप लागली नाही.
तो विचार करत होता,

“आपण लोकांना नेहमी उदार मनाने दिलं, पण आज आपल्या वर अशी वेळ आली तर कोणी मदतीला धावून येत नाही.

सकाळी उठल्यावर त्याने शेजाऱ्याला दारात बसलेलं पाहिल, तोच नामदेव, ज्याला त्याने एकेकाळी मदत केली होती.

“पाटील, माझी लेक बाळंतपणाला येतेय. मला थोडे पैसे हवेत,” नामदेव म्हणाला.

सदाशिवच्या डोळ्यात पाणी आलं.

“नाम्या, यावेळी माझ्याजवळ काहीच नाही रे. उलट मीच आता तुझ्याकडे हात पसरतो, मी तुला दिलेले एक लाख परत दे.”

नामदेव थोडा गप्प राहिला, मग शांतपणे म्हणाला, “माफ करा पाटील, मी सुद्धा अडचणीत आहे.” असे बोलून तो तिथून गुपचूप निघून गेला.

त्या रात्री सदाशिवला झोप लागली नाही. त्याच्या मनात विचार घोळत होते.

“उदारपणात काही चुकीचं नाही, पण जर त्या पायी स्वत:चं घर ढासळलं, तर दुसऱ्याला काय देणार?”

दुसऱ्या दिवशी तो शांतपणे शेतात गेला. मूठभर माती हातात घेत म्हणाला,
“हे काळी आई तू मला मदत कर ,मी कष्ट करेन. दान देणं थांबवणार नाही, पण आधी स्वतः उभा राहीन.”

त्या दिवसानंतर सदाशिवने ठरवलं देणं थांबवायचं नाही, पण विवेकाने द्यायचं.
त्याने गावातील तरुणांना एकत्र करून शेती सहकारी गट तयार केला.
“आपण एकमेकांना मदत करू, काम करू, घाम गाळू.” असं तरुणांना मार्गदर्शन केलं.

त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी मिळून शेती सुधारली. दोन वर्षांत गावाने खूप मोठी प्रगती केली.

सदाशिवने गावात ‘सहायता निधी’ स्थापन केला कोणी अडचणीत आलं तर सगळ्यांनी थोडं थोडं द्यायचं. सर्वांना ते पटलं आणि गट तयार झाला.
सदाशिवच्या कामाची दखल घेतली गेली. त्याला ‘आदर्श समाजसेवक’ म्हणून पुरस्कार मिळाला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात गावातील एका तरुणाने भरभरून बोलताना म्हटलं,

“सदाशिव पाटील काका, तुमचं आयुष्य म्हणजे ‘अती उदार तो सदा नादार’ या म्हणीचं खरं उदाहरण आहे. पण शेवटी तुम्ही ती म्हण उलटी करून दाखवली.”

सदाशिव हसला. आपल्या छोट्या भाषणात तो म्हणाला,

“अती उदारपणात दान करत राहणं मूर्खपणा असतो; पण जिथे आपण विचार न करता, विवेकाशिवाय देतो, तिथे शेवटी स्वतःच स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतो.

दान, मदत, उदारता हे सद्गुण आहेत; पण ते समजूतदारपणे वापरले, तरच समाज आणि व्यक्ती दोघेही समृद्ध होतात.”

उपस्थित गावकरी टाळ्या वाजवत होते. सुनिताच्या चेहऱ्यावर नवऱ्याबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता.

सदाशिवच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्याने अनुभवातून घेतलेलं शहाणपण आता इतरांना शिकवण देत होतं.

समाप्त

©®सौ. सुप्रिया जाधव
१२/११/२०२५

0

🎭 Series Post

View all