Login

उधारीची वेळ.....

Udhari Chi Vel
" जावई बापू जरा १००० रुपये पाठवता का ?
न्हाई म्हंजे या टायमाला जरा अडचण होती.
पुढल्या महिन्यात लगीच हिशोब करू.
धीर गोळा करून माधवराव म्हणाले.

" हो ss हो ss पाठवतील ना तुमचे जावई . १००० कशाला चांगले १०,००० एकदमच घ्या म्हणजे पुढचे दिवस तुम्हाला आम्हाला टेन्शनचं नको.

राधाबाईंनी परस्पर मुलाचा फोन उचलला आणि सुनेच्या वडीलांना ऐकवलं.

माधवराव - तसं न्हाई ताई.
तुम्हास्नी तर समद ठाव हाय. आमची रस्त्याशेजारील शेतजमीन रस्ता रुंदीकरण प्रकल्पात सरकारकडे गेली अन् आम्ही बिनाशेतीचं उघड्यावर आलो.
कदी येकदा हिशोब व्हईल काय कळना झालंय.

तुम्हाला काय लाज आहे की नाही ? तोवर काय खुशाल जावयाला मागणार का ? तुमच्या लेकीसकट आता तुम्हाला पण पोसायचं का आम्ही?
ठेवा फोन आणि परत जर फोन केलात तर पैश्याऐवजी तुमच्या लेकीला कायमचं पाठवून देईल .
पैसा नाही तर मरा तिकडे.
एवढं बोलून राधाबाईंनी धाडकन फोन आपटला.

तसं माधवराव आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या मंदाताईंच्या डोळ्यातून अश्रू आले इथून पुढे लेकीला आणि जावयाला कधीच पैशासाठी फोन करायचा नाही असं त्यांनी ठरवलं.

इकडे स्वयंपाक घरात पोळ्या लाटत असणाऱ्या नेहाने आपल्या सासूबाईंच आणि बापाचं बोलणं ऐकलं.
तिच्याही डोळ्यात पाणी आले.

नेहा एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगी होती. ७ वर्षापूर्वी महेशसोबत तिचं लग्न झालं. त्यांना २ मुलं होती.

याउलट लग्नानंतर सासरची परिस्थिती पालटली. सुरुवातीला महेश एका खाजगी कंपनीत कारकून म्हणून काम करायचा . हळूहळू त्याने प्रगती केली आणि आता तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहात होता.

जेमतेम शिक्षण असल्यामुळे नेहा सुरुवातीपासूनच गृहिणी होती.

तिच्या वडिलांची ३ एकर शेती होती. पण ती शेतजमीन सरकारने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तिथल्या जमीन मालकांशी सौदा करून ताब्यात घेतली. २ वर्ष झालं या गोष्टीला पण अजून त्यांना हिशोब दिला नव्हता.
काहीना काही कागदपत्राची कामं बाकी आहेत असं सांगून सौदा पुढे ढकलला जायचा.
म्हणून तिच्या आई वडीलांना पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीकाम करायला तसेच गायी - गुरे राखायला जावं लागायचं.
त्यातून थोडेफार पैसे मिळायचे पण त्याने काही भागायचं नाही.

महेशला या परिस्थितीची जाणीव होती म्हणून कधी कधी तो जमेल तसं मदत करायचा.

एकदोन वेळा राधाबाईंनी याकडे दुर्लक्ष केलं पण आता मात्र त्या राग राग करू लागल्या.
बसल्या जागी त्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना ह्या गोष्टी सांगून त्यांच्या परिस्थितीची मजा घेत होत्या.
नेहा हतबल होती. महेश अधे मधे तिच्या वडीलांना मदत करायचा. ती केवळ नवऱ्याच्या चांगुलपणावर समाधानी होती.

शेवटी नेहाच्या वडिलांनी आणि इतर जमीन मालकांनी एक वकील नेमला आणि त्याच्यामार्फत कोर्टात अर्ज केला.
४ महिन्यांनी त्यांना जमिनीचे आणि इतके वर्ष काम रखडवल्याचे बऱ्यापैकी पैसे मिळाले.
२ - ४ अनुभवी लोकांच्या सल्ल्याने नेहाच्या वडिलांनी काही पैसे गुंतवले आणि काही पैशात तालुक्याच्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय सुरू केला.

त्यांनंतर माधवराव नेहमीच आपल्या लेक - जावयासाठी, नातवांसाठी भेटवस्तू ,खाऊ, भाजीपाला वैगेरे पाठवू लागले. त्यांनी पाठवलेल्या वस्तू पाहून
राधाबाई नाक मुरडत रहायच्या.

१ वर्षांनंतर.....

एके दिवशी मध्यरात्री अचानक महेश घामाघूम झाला. भर थंडीत त्याला घाम सुटला आणि जीव घुसमटू लागला. शेजारी झोपलेल्या नेहाला त्याने कसंबसं जाग केलं आणि बेशुद्ध झाला.
नेहाने आणि सासूबाईंनी रडत रडत शेजाऱ्यांना जाग केलं आणि त्यांच्या मदतीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

डॉक्टर -
हे पहा त्यांचे रिपोर्ट्स.
त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे त्यामुळे त्यांना सौम्य हार्ट अटॅक आला होता.
मी medicine दिले आहेत पण आपल्याला CABG सर्जरी करावी लागेल नाहीतर पुन्हा हार्ट वर प्रेशर येऊ शकतं.
तुम्ही हा फॉर्म भरा आणि ३ लाख जमा करून घ्या. आपण उद्याच हे ऑपरेशन करू.

डॉक्टर समजावून निघून गेले आणि नेहा हातातल्या फॉर्म कडे पाहत राहिली.

१५-२० मिनिटं तशीच गेली.
नुसती फॉर्म काय बघत बसली आहेस भर तो फॉर्म आणि कर पैसे जमा .
राधाबाई घाई करत म्हणाल्या.

३ लाख सांगितले आहेत सासूबाई ३००० नाही . कुठून आणू मी एवढे पैसे ? आपल्याकडे ६०-७० हजारांच्यावर जास्त पैसे नाहीत.

सासूबाई नरमाईने म्हणाल्या....या वयात मी तरी कुठून सोय करणार? बघं बाई तुझ्या ओळखीत माग कोणाकडून तरी . अप्रत्यक्षपणे सासूबाई नेहाला वडिलांकडून माग असे सुचवत होत्या.

हिच योग्य वेळ आहे उत्तर द्यायची नेहाने मनाशी
ओळखले -
मगं मलातरी कोण एवढे पैसे देणार सासूबाई ? जाऊद्या माझ्या नवऱ्याच नशीब. जेवढं आयुष्य आहे जगेल बिचारा.
पण तुम्ही काळजी नका करू. त्यांना काही झालं तर मी तुमच्यावर भार नाही बनणार . माझ्या मुलांसकट माझ्या माहेरी निघून जाईल.

राधाबाई जोरात ओरडत म्हणाल्या...मूर्ख ss कुठली माग की तुझ्या वडिलांना . खुशाल नवऱ्याच्या मरणाची भाषा करतेय.

कुठल्या तोंडाने मागू? त्यांना गरज होती तेव्हा काय उत्तर दिलं तुम्ही आठवा जरा .
पैसा नाही तर खुशाल मरा ना तिकडे .
बरोबर ना?
मग आता तुमच्याकडे पैसा नाही तर मरु दे खुशाल तुमच्या मुलाला.
ज्या लोकांना माझ्या वडिलांची परिस्थिती सांगत होता त्यांच्याकडून घेऊन या मग . बघा देतात का ?

आता मात्र राधाबाई धाय मोकलून रडू लागल्या.
नेहा मला माफ कर. मी तुझ्या वडिलांची माफी मागते पण प्लीज माझ्या मुलाच्या तुझ्या नवऱ्याच्या उपचाराची सोय कर.

नेहा सासूबाईंचा हात हातात घेत म्हणाली , काळजी करू नका निदान माझ्या नवऱ्याला तरी माणुसकीची आणि दुसऱ्याच्या परिस्थितीची जाणीव आहे.
मी मगाशीच वडीलांना कळवलं आहे ते येतील आणि करतील मदत.

राधाबाई नेहाच्या वडिलांची माफी मागण्यासाठी वाट पाहू लागल्या.

शेवटी ज्यांना उधारी द्यायला जीवावर येतं होतं , त्यांच्याकडूनच मुलाचा जीव वाचवायला मोठी उधारी मागायची वेळ आली.
0