Login

उध्वस्त कूस

Udhvast Kus
ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५

ग्रुप ४ – (संघ – कामिनी)

लघुकथा : शीर्षक – उध्वस्त कूस

“अँड नाऊ प्रेझेंटिंग द मोस्ट प्रेस्टीजिअस ऑनर ऑफ द इव्हनिंग, द आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑफ २०२४ अवॉर्ड,” पाहुण्यांनी खचाखच भरलेल्या त्या हॉलमध्ये पिनड्रॉप सायलेन्स होता. अनाउन्सर आता आजच्या सगळ्यात महत्वाच्या पुरस्काराची घोषणा करणार होती. आणि हॉलमध्ये उपस्थित प्रत्येकजण कानात प्राण आणून जाहीर केल्या जाणाऱ्या विजेत्याचं नाव ऐकायला उत्सुक होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना सुजित मात्र शांत होता. जणू त्याला आजच्या विजेत्याचं नाव माहीत असावं.

“ह्या देदीप्यमान यशाच्या मानकरी आहेत, नन अदर दॅन द मोस्ट स्टनिंग अँड टॅलेन्टेड लेडी इन धिस हॉल, मिसेस अनन्या गोखले,” आणि हॉल मध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अनन्या आपल्या जागेवरून उठली आणि पुरस्काराचा स्वीकार करायला व्यासपीठावर गेली. उपस्थितांपैकी कोणी तिच्याकडे कौतुकाने बघत होतं तर कोणी आसुयेने. पण अनन्याला कशाचीच फिकीर नव्हती. हा पुरस्कार जणू तिच्यासाठीच आहे आणि तो तिला मिळणारच होता असा बेपर्वा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. तिने मोजक्या शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ती मंचावरून ऐटीत खाली उतरली. हातातला पुस्स्कार सावरत अनन्या तिची खास मैत्रीण आणि असिस्टंट निशीच्या शेजारी येऊन बसली. पण निशीच्या कडेवर तिचं सहा महिन्यांचा लेक होता आणि म्हणून ती अनन्याशी हात मिळवून तिचं अभिनंदन नाही करू शकली; पण निशीच्या कौतुकभरल्या नजरेतून आणि आत्मीयतेने ओतप्रोत शब्दातून ते सहज व्यक्त होत होतं.

“अभिनंदन अनु, ह्या वर्षी माझी फारशी मदत नसतानासुद्धा तू हे आव्हान एकटीने पेललंस,” निशी म्हणाली आणि उत्तरादाखल अनु तेवढीच गोड हसली.

“काळजी करू नकोस निशी, तुला माझी मदत करायला जमलं नसलं, तरी बाकीच्या स्टाफबरोबर तुलाही प्रमोशन मिळेल, अनन्याने निशीला आश्वस्त केलं. “हा, पण तुझी मदत मिळाली असती तर मला त्याचा जास्त आनंद झाला असता. हे अवॉर्ड घेताना मी तुला तुझं क्रेडीटही नक्की दिलं असतं. अनन्याच्या ह्या बोलण्यावर निशीने आपल्या कुशीतल्या छोट्या रीयांशची पप्पी घेतली आणि अनन्याला म्हणाली, मला लाईफमधलं सगळ्यात मोठं प्रमोशन मिळालंय अनु, त्यापुढे बाकीच्या गोष्टी अगदी ओके ओके आहेत माझ्यासाठी.”

“हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे निशी. आता तुला जॉइन करायला हवं. रियांश सहा महिन्यांचा झालाय. आणि आजच्या सक्सेसनंतर आपल्याकडे क्लायंटसची रांग लागेल. अगं रात्रीचा दिवस केला तरी संपणार नाही इतकं काम मिळेल आपल्या कंपनीला. आणि म्हणून मी आणि सुजितने तुला ह्यावेळी जबरदस्त प्रमोशन द्यायचं आधीच ठरवलंय, आहेस कुठे?” अनन्याने निशीला अमिष दाखवलं.

“थँक्स यार, तू नेहमीच माझ्या मेहनतीची आणि हुशारीची योग्य ती कदर केलीएस. मैत्रीण म्हणून कधीही अनड्यू एडव्हान्टेज घेतला नाहीस. पण मी दोन-तीन वर्षं ब्रेक घ्यायचा विचार करतेय. रियांश मोठा होईपर्यंत फक्त हाच माझी प्रायोरिटी असेल,” निशीने आपलं म्हणणं मांडलं.

“सिरीयसली!” अनन्या तिच्या ह्या बोलण्याने अवाक झाली. “करियरच्या ह्या स्टेजला आल्यावर तू ब्रेक घ्यायचं म्हणतेस? आर यु आउट ऑफ़ युवर माइंड? आणि घरात बसून रियांशची काळजी घेणार म्हणजे काय करणार आहेस? आयुष्यभर ह्याचे डायपर्स बदलणार? ही तीच निशी आहे जिला माझ्या सोबत खूप उंच उडायचं होतं, करिअर करायचं होतं?”

“अनु, तुझ्या प्रभावाखाली राहून मीसुध्दा तुझ्यासारखी करियर ओरिएण्टेड झाले होते, मान्य आहे मला; पण ह्याच्या जन्मानंतर माझी मतं बदलली आहेत अगं. माझ्या बाळासाठी माझं करिअर थोडे दिवस बाजूला ठेवलं तर त्यात काय चुकीचं आहे? काम नंतर मिळेल, पण ह्याचं बालपण मी मिस केलं तर नंतर ते कितीही किंमत मोजूनसुद्धा परत मिळवता येणार नाही. आयुष्यात फक्त पैसा, यश आणि करिअरच सगळं काही नसतं अनु. मी तर म्हणेन, त आता तुम्हीसुद्धा चान्स घ्यायला हवा. करिअरसाठी मूल नको म्हणण्याच्या तुझ्या हट्टाचा तुला भविष्यात पस्तावा होईल; पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मी तुला चांगली ओळखते म्हणून सांगतेय. आई होण्याशिवाय बाईपणाला पूर्णत्व नाही गं,” निशीने मैत्रीच्या नात्याने सल्ला दिला आणि अनन्या खवळली.

“तुला भिकेचे डोहाळे लागलेत म्हणून आता मलाही भिकेला लावणार आहेस? आज मी जिथे आहे, तिथवर पोहोचायला प्रचंड मेहनत घेतलीय. फार थोड्यांना इतक्या लहान वयात एवढं सक्सेस मिळतं. आणि हे सगळं सोडून तुझ्यासारखी पोरं सांभाळत बसू? त्यासाठी इतकी वर्षं घासली मी? का आता तुला पुढे काही करायचं नाही म्हणून तू मलाही तुझ्या रांगेत बसवायला बघतेयस?” अनन्या रागाने थरथरत होती. तिचा चढलेला आवाज ऐकून आजूबाजूचे लोक दोघींकडे बघायला लागले. निशीच्या कडेवर झोपलेला रियांशसुद्धा दचकून रडायला लागला. तसा निशीने विषय आवरता घेतला.

“सॉरी, तुला हर्ट करण्याचा माझा उद्देश नव्हता. करिअर कि मूल हा ज्याचा त्याचा चॉइस असू शकतो हे मी विसरले होते. आय रिस्पेक्ट युवर डिसिजन. पण तसंच तूसुद्धा माझ्या मताचा आदर कर,” निशी तिला शांत करत होती.

“आदर? स्वत:च्या आयुष्याची माती करून घेतेयस तू, त्याचा आदर करू मी? माय फुट. आणि जॉब सोडायचाच आहे तर आज फंक्शनला तरी कशाला आलीस?” अनन्या शांत व्हायचं नाव घेत नव्हती. ती जितकी रागाने बोलत होती, निशी तेवढीच शांत होती.

“एक मैत्रीण आपल्या मैत्रीणीच्या कौतुकात सहभागी व्हायला आली होती. मला काय म्हणायचंय ते तुला नाही समजणार कदाचित; पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये एवढं नक्की. मी कंपनीच्या मेलवर माझा राजीनामा सकाळीच पाठवून दिलाय. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रियांश कंटाळलाय. मला निघायला हवं,” निशी आपल्या लेकाला सावरत जागेवरून उठली. यशाने धुंद झालेल्या अनन्याला हा तिचा अपमान वाटला नसता तरच नवल होतं.

“फाईन, तू जॉब सोडलास म्हणून माझ्या कंपनीला कुलूप लागणार नाहीये. बघितलंस ना, एकटीच्या जोरावर मी माझं यश खेचून आणलंय. पण इथून बाहेर पडल्यावर तू नक्की पस्तावशील, मार्क माय वर्डस”. आतापर्यंत आपली कंपनी म्हणणारी अनन्या आता ‘माझी कंपनी’ वर आली आणि फणकाऱ्याने तिकडून निघून गेली. त्यांची मैत्री माहीत असलेल्या एक दोन जणांनी काय झालं हे जाणून घेण्यासाठी निशीपाशी आल्या. पण निशीने हसून “काही विशेष नाही, मैत्रीत इतकं होतंच,” असं म्हणून त्यांना वाटेला लावलं आणि आपल्या घराची वाट धरली.

अनन्याचाही मूड ऑफ झाला होता. निशी गेल्यानंतर ती केवळ औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी थांबली होती. निशीचं बोलणं काही केल्या डोक्यातून जात नव्हतं. इतक्यात तिच्या कानावर सुजितचं बोलणं पडलं.

“डोन्ट स्पॉईल युवर मूड,” अनन्याने समोर बघितलं. सुजित तिच्या समोर तिच्या आवडत्या व्होडकाचा ग्लास धरून उभा होता.

“आजचा दिवस तुझा आहे अॅना,” सुजित लाडाने अनन्याला अॅना म्हणत असे. “निशी इज संपली जेलस ऑफ यू,” अनन्याच्या अपमानाने धगधगत्या मनात सुजितने तेल ओतायला सुरुवात केली.

“तुझ्या सक्सेसवर जळणारे असे खूप भेटतील तुला ह्यापुढे. इग्नोर देम. तुला अजून खूप पुढे जायचंय, राईट?“ त्याच्या चेहऱ्यावरचं किलर हसू पाहून अनन्या नेहमीसारखी पाघळली आणि तिने होकारार्थी मान हलवत सुजितच्या हातातला ग्लास ओठाला लावला. एक दोन घोटात तो रिचवलासुद्धा. हे पाहून सुजित स्वत:शी हसला. “ये हुई ना बात! आता मस्त पार्टी एन्जॉय कर. चल,” तिला हाताला धरून त्याने डान्स फ्लोअरकडे मोर्चा वळवला; पण सुजितने इतके प्रयत्न करूनसुद्धा अनन्याचा सेलिब्रेशन मोड ऑन झालाच नाही.

घरी परत आल्यानंतरसुद्धा अनन्या अस्वस्थ होती. तिला निशीचं बोलणं आठवत होतं. मूल नको हा तुझा हट्ट सोडून दे,नाहीतर पस्तावशील, हे शब्द तिला भूतकाळात घेऊन गेले.

निशीगंधा आणि अनन्याची अगदी शाळेपासूनची दोस्ती होती. पुढे दोघींनी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि मास मिडीयामधून डिग्री घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनन्याने एका प्रथितयश कंपनीत काही वर्षं काम केलं. पण तिकडे तिला तिच्या मनासारखं काम करण्याचा आनंद मिळत नव्हता. म्हणून मग तिच्याच कलीगसोबत म्हणजे सुजितसोबत तिने स्वत:ची अॅडवर्टायझिंग कंपनी सुरु केली. हातात जेमतेम मुठभर भांडवल होतं, सोबतीला तिच्यासारखाच ध्येयवेडा सुजित होता आणि नजरेत एक स्वप्न होतं. एक दिवस ह्या इंडस्ट्रीत नंबर वन बनण्याचं स्वप्न. बास एवढंच घेऊन तिने जाहिरातीच्या क्षेत्रात उडी घेतली होती. पुढे तिने निशीलासुद्धा आपल्या ‘सृजन मिडिया’ त जॉईन करून घेतलं. आणि गेल्या सात वर्षांत रात्रीचा दिवस करून आपल्या मेहनतीच्या जोरावर ती आज ह्या ठिकाणी पोहोचली होती.

स्क्रॅचपासून सुरु केलेली तिची कंपनी आज जाहिरात क्षेत्रातल्या पहिल्या दहा नामांकित कंपन्यांच्या यादीत जाऊन बसलीय. अनन्याला जे जे हवं होतं ते ते सगळं तिने मिळवलं. नाव, यश, पैसा, गाडी, बंगला आणि तिच्या मनासारखा वागणारा नवरासुद्धा.

तसं बघायला गेलं तर स्वत:ची कंपनी सुरु केल्यावर अनन्याने मानेवर जोखड ठेवून स्वत:ला कामात गुंतवून घेतलं होतं. रादर, सुजितने अत्यंत चालाखीने अनन्याला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन तर कधी नवीन आव्हानांचं आकाश दाखवून अनन्याला सतत कामात गुंतवून ठेवलं. तिला यशाच्या नशेची चटक लावली. नशा, मग ती मद्याची असो वा यशाची, एकदा चटक लागली कि सहसा सुटत नाही. अनन्याला तिच्या क्षेत्रात अढळपद मिळवायचं होतं. सुजित तिच्या ह्याच स्वप्नाला आपल्या स्वार्थासाठी खतपाणी घालत होता. त्याला फक्त तिच्या मेहनतीने मिळवलेल्या यशावर मजा करायची होती.

सुजितला पहिल्यापासूनच फारसे कष्ट न घेता श्रीमंत व्हायचं होतं. नावलौकिक मिळवायचा होता. त्यासाठी त्याला फक्त एवढंच करायचं होतं, अनन्याच्या स्वप्नाला अधून मधून डिवचायचं आणि तिच्या यशाला कुरवाळायचं. तेसुद्धा आपला कावा तिच्या लक्षात येणार नाही अशा खुबीने. म्हणूनच जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, सुजितने आधीच सावध पवित्रा घेतला.

“सृजन मिडीया’ भारतातली नंबर वन अॅड एजन्सी म्हणून ओळखली जाईल अॅना. फक्त त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल,” सुजितने लग्नाच्या आधीच अनन्याचा ब्रेन-वॉश करायला सुरुवात केली होती.

“त्याग? मी समजले नाही”.

“एकदा लग्न झालं कि आपल्या घरचे लगेच बाळासाठी मागे लागतील. जे आत्ता आपल्याला शक्य नाही,” त्याने हळूच सुचवलं.

“म्हणजे मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे; पण फॅमिली प्लान करायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त ओढाताण तुझीच होणार. डेडलाईन्स सांभाळायच्या कि तुझी तब्येत? क्लायंट मिटिंग कि डॉक्टरची अपॉइन्टमेंट? जिंगल्सचा विचार करताना तुला फक्त अंगाई सुचेल. बाळासाठी रात्र रात्र जागरण करण्यात तुझं दिवसाचं काम सफर होईल. आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या आजवरच्या मेहनतीवर पाणी फिरेल, येतंय का तुझ्या लक्षात?” त्याने मानभावीपणे विचारलं.

तिला सुजितचं म्हणणं पटत होतं. “आत्ता ‘सृजन मिडीया’ हेच आपलं बेबी आहे. दोघांनी मेहनत घेतली तर सृजनला पिकवर नेऊन ठेवू शकतो आपण. ‘और कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है,’ पटतंय ना तुला?” जिभेवर साखर घोळवत सुजितने आपलं मत तिच्या मन आणि मेंदूत व्यवस्थित रुजवलं. त्यानंतर आजतागायत बाळाचा विचार अनन्याच्या मनाला चुकुनही कधी शिवला नाही. कसा शिवणार? ती तिच्या यशाच्या नशेत चूर होती.

पण आजच्या निशीच्या बोलण्याने अनन्या अंतर्मुख झाली. तिला रियांशचं निरागस हसू आठवू लागलं. त्याला कुशीत घेतलेल्या निशीच्या चेहऱ्यावर झळकणारं पूर्णत्वाचं समाधान दिसत होतं. रियांशच्या वेळी दिवस असताना निशीला होणारा त्रास अनन्या बघत होती. त्याबद्दल आपली काळजी व्यक्त करत होती. त्यावर निशीचं फक्त हसायची.

“अनु, हा त्रास किती हवाहवासा वाटतो, हे तू स्वत: ह्यातून गेल्याशिवाय नाही समजणार.” अगदी डिलिवरीच्या वेळीसुद्धा प्रसव वेदनांनी क्लांत निशी हातातल्या त्या इवल्याशा जीवाकडे बघून हळवी झाली होती. “अनु, माझ्या हाडामासाचा अंश कुशीत आला, आणि मी नऊ महिन्यांच्या सगळ्या वेदना एका क्षणात विसरून गेले बघ. हा खरा सृजनाचा आनंद आहे.”

अनन्याला निशीचा शब्द न शब्द आठवला आणि हे सुख आपण आपल्या हातांनी दूर लोटतोय का? ह्या जाणीवेने काळजात बारीकशी कळ उठल्यासारखं वाटलं.

“अजून झोपली नाहीस?” चेंज करून आलेल्या सुजितने बेडवर बसत विचारलं.

“सुजित, आय थिंक, निशी वॉज राईट. आपण आता बेबी प्लान करायला हरकत नाही,” ती हळव्या स्वरात बोलली.

“व्हॉट! तू... तू बरी आहेस ना? ती निशी एक मूर्ख आहे. पण तू तुझी अक्कल लगेच तिच्याकडे गहाण टाकलीस?”

“तू असा का रिअॅक्ट होतोयस?”

“आपण सगळा विचार करून बाळ नको असं ठरवलं होतं. आणि आता अशी कशी पलटी मारतेस तू?”

“अरे पण ‘सृजन मिडिया’ चं बस्तान बसेपर्यंत बाळाचा विचार नको करू या, असं ठरवलेलं आपण,” तिने समजुतीने आपला मुद्दा पटवायचा प्रयत्न केला.

“तेच तर. आपलं अजून बस्तान बसलेलं नाहीए अॅना. ही तर फक्त सुरुवात आहे. यशाचा अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय आपल्याला,” तोही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता.

“यश हे मृगजळासारखं असतं सुजित, आपण त्याच्या जितकं जवळ जाऊ, ते आपल्यापासून लांब जातं. आणि मला वाटतं आपण अपेक्षेपेक्षा जास्त अचिव्ह केलंय. शिवाय इतका पैसा, गाडी, बंगला, बँकबॅलेंस हे सगळं कोणासाठी मिळवायचं? उद्या आपल्या नंतर कोण ह्याचा उपभोग घेणार?”

“हे तू बोलत नाहीयेस, तुझ्या तोडून ती युसलेस निशी बोलतेय. माझी अॅना चूल आणि मुल असा टिपिकल बाईसारखा विचार कधीपासून करायला लागली?”

“इतके दिवस नाही केला तसा विचार. मे बी कामाच्या गडबडीत लक्षात आलं नसेल. किंवा आपण ठरवलं होतं म्हणून कामावर फोकस केला; पण आज निशीकडे बघितलं आणि मला काहीतरी मिसिंग वाटतंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. निशी म्हणाली तसं नंतर पस्तावा होण्यापेक्षा आपण आत्ताच शहाणे होऊ या. बिफोर इट्स टू लेट, लेट्स प्लान अ बेबी,” अनन्याने त्याच्या कुशीत शिरत म्हटलं.

“आज एक अवॉर्ड काय मिळालं, तू स्वत:ला ग्रेट समजायला लागलीस? मला कुठल्याही परिस्थितीत मूल नकोय” सुजितने वैतागून तिला दूर ढकलून दिलं. अनन्या त्याचा हा अवतार पहिल्यांदाच बघत होती. आणि तो बघून ती पुरती हादरून गेली.

सुजितने अनन्याला जोरात ढकलून दिलं. ती तोल जाऊन बेडवरून खाली पडली. नशेत चूर असलेला सुजित तावातावाने बोलत होता.

“चार चौघींसारखं आयुष्य जगायचं होतं तर कशाला मोठमोठ्या वल्गना केल्यास? न झेपणारी स्वप्नं बघितलीस आणि मलाही दाखवलीस? पोरं काढण्यात धन्यता वाटते तुला तर कुठलंही ध्येय नसलेल्या, नाईन टू फाईव्ह जॉबची मेंटेलिटी असलेल्या मुलाशी लग्न करायचं होतंस. माझं लाईफ का बरबाद केलंस?”

“मी तुझं लाईफ बरबाद केलं? गेल्या सात वर्षांत मी फक्त आणि फक्त ‘सृजन’ चा विचार केला. त्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. आता मला आई व्हावसं वाटतंय तर ते चुकीचं आहे का? ”

“तुला एकदा सांगून समजत नाही?” सुजितने अनन्याचा गळा आवळला, “मला पोरांचं झंझट नकोय. आणि हा विषय इथेच संपला, गॉट इट?” एवढं बोलून तो तरातरा बाहेर निघून गेला. अनन्या अजूनही ट्रॉमात होती. रात्रभर तशीच बसून होती. सुजितचा मुलं असण्याला इतका विरोध का आहे? त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? कि तो दुसरीकडे कुठे गुंतलाय?” अनन्याच्या डोक्यात शंका कुशंकांचं वादळ घोंघावू लागलं. त्यातूनही तिने स्वत:ला सावरलं. “कदाचित ह्या अवॉर्डचं प्रेशर होतं इतके दिवस, त्याचाही परिणाम असेल. उद्या शांतपणे बोलू या सुजितबरोबर,” स्वत:चीच समजूत घातली. आणि रोजच्या प्रमाणे झोपेची गोळी घेऊन सुजितची वाट बघण्यात तिचा डोळा केव्हा लागला, तिचं तिलाच समजलं नाही.

त्या रात्री सुजित बेडरूम मध्ये झोपायला आलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी अनन्या फ्रेश होऊन ब्रेकफास्ट टेबलवर आली. सुजित आधीच नाश्ता करायला बसलेला होता. त्याने हसून अनन्याला गुड मॉर्निंग केलं. कालच्या प्रकाराचं त्याच्या चेहऱ्यावर अजिबात गिल्ट दिसत नव्हतं. औपचारिकता म्हणून सुद्धा त्याने अनन्याला सॉरी म्हटलं नाही, ही बाब तिला खटकली. रात्री सुजितने मुलाचा विषय पुन्हा नको म्हटलं असलं, तरी आज अनन्या बाळाचा विषय छेडणारच होती. तो शुद्धीत असताना.

सुजित नजरेच्या कोपऱ्यातून तिचा चेहरा वाचत होता. “अॅना, आपल्या कालच्या सक्सेससाठी दोस्तमंडळी पार्टी मागतायत. कधी प्लान करू या? आणि हो, काल पार्टीत एक दोन इन्व्हेस्टर्सनी आपल्या सृजनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबद्दल विचारणा केली होती. त्यांच्याशी एक दोन दिवसांत मिटिंग शेड्युल करतो मी. तू आपल्या बेस्ट प्रोजेक्टसची एक पीपीटी तयार करून ठेव.”

“कालचं सगळं प्रकार सोयीस्करपणे विसरून हा अशा थाटात बोलतोय जणू हा बॉस आहे आणि मी ह्याची असिस्टंट,” अनन्याच्या मनात विचार आला. तरीही ती शांत राह्यली.

“बघू. आज आधी आपण दोघं डॉक्टरकडे जाणार आहोत. आपलं चेक अप करायला,” तिने शांतपणे उत्तर दिलं. त्यावर सुजितने प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

“आय नो, दारुच्या नशेत तू काल बोलून गेलास कि तुला बाळ नकोय. पण इट्स अ हाय टाईम सुजित. मी तिशी पार केलीय. आता आणखी उशीर केला तर काहीही कॉम्प्लीकेशन्स येऊ शकतात.” अनन्या अजूनही समजुतीने गोष्टी सुधारण्याच्या प्रयत्नात होती.

“तुला एकदा सांगितलेलं समजत नाही? दिवसाची सुरुवात फालतू वादाने करू नकोस यार,” सुजितने चिडचिड सुरु केली.

“तुझा बाळ होण्याला इतका विरोध का आहे?”

“बाळ... बाळ... बाळ... एकच घोशा लावलायस कालपासून. आधी तू प्रेग्नंट राहणार. मग तुझी डिलिवरी. नंतर बाळ लहान असणार”.

“हो, ठीक आहे ना. रुटीन प्रोसेस आहे ही”.

“आणि मग कामाचं काय?”

“आपण आज ठरवलं आणि मी लगेच उद्या प्रेग्नन्ट राह्यले असं नाही ना. प्रेग्नन्सीच्या दरम्यानसुद्धा मला झेपेल तेवढं काम मी करीन.”

“आणि झेपेनासं झाल्यावर?”

“मग तू सांभाळ. बाळ आपल्या दोघांचं असणार आहे, तशी कंपनी पण आपल्या दोघांची आहे. मी बाळाला बघेन थोडे दिवस, तू कंपनी बघ; पण आता आपण सिरीयसली बाळाचा विचार करायचा म्हणजे करायचाच,” अनन्याने आपला निर्णय ऐकवला.

“तरीही मी नाहीच म्हटलं तर?” सुजितच्या प्रश्नावर अनन्याने चमकून बघितलं.

“काही प्रॉब्लेम आहे का? आय मीन,” मध्ये काही सेकंदांचा पॉज घेत तिने धीर करून विचारलंच, “तुझ्यात काही प्रॉब्लेम आहे?”

“माझ्यात नाही, प्रॉब्लेम तुझ्यात आहे अनन्या,” त्याने तिच्याकडे बघत विकृत स्माईल दिलं.

“तुझ्यातली हुशारी, खुप उंच झेप घ्यायची तुझी जिद्द आणि त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करायची तुझी धडपड हे सगळं पाहून मी तुझ्याशी लग्न केलं.”

“म्हणजे? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये?”

“मी फक्त आणि फक्त पैशावर प्रेम करतो अनन्या. जो तू माझ्यासाठी कमवत आलीस आजवर. तुला कामात गुंतवून मी मस्त तू कमावलेल्या पैशांवर चैन करत होतो. त्यासाठी तर तुझ्यासोबत कंपनीत आणि लाईफमध्ये पार्टनरशिप केलीय मी. तू पोरं सांभाळत घरात बसलीस तर माझ्या ऐशोआरामाचं काय? म्हणून तू कधीच आई होणार नाहीस ह्याची खूप आधीपासून काळजी घेतलीय,” सुजितच्या नजरेतली विकृती गडद होत चालली.

“मी मी समजले नाही, मी कधीच आई होणार नाही? असं कोणी सांगितलं तुला?”

“मीच तशी काळजी घेतलीय, अगदी आपण ठरवल्यापासून,” त्याने दात विचकले आणि अनन्याच्या अंगावर सर्रकन काटा आला.

“काय बोलतोयस तू?”

“मी तुला हे कधीच सांगणार नव्हतो; वेल आज हे सगळं बोलायची वेळ तूच आणलीएस. तर ऐक, सृजनला मोठं करण्याच्या नादात तू स्वत:ला इतकं झोकून देत होतीस, कि तुला त्याचा स्ट्रेस यायचा. तू रात्र रात्र झोपायची नाहीस. माहितीए ना?”

अनन्याला अजूनही काही क्लू लागत नव्हता. “त्याचा काय संबंध इथे?”

“त्यावेळी डॉक्टरनी तुला झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या; पण त्या रोज घेऊ देऊ नका असं मला खास बजावलं होतं त्यांनी. कारण त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.”

“कसले साईड इफेक्ट्स?”

“ह्या मेडिकेशनमुळे हार्मोनल बदल होतात आणि बायकांमध्ये इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात, असं डॉक्टरांनी मला आधीच स्पष्ट केलं होतं. जे माझ्या पथ्यावर पडलं. मी तुला तुझ्या नकळत त्या गोळ्या नियमित देतोय इतकी वर्षं.”

कोणीतरी आपल्या कानात तप्त शिशाचा रस ओततंय असं अनन्याला वाटलं.

“तू स्वत:च्या स्वार्थासाठी माझ्याशी इतकं घाणेरडं वागलास? एकवेळ तुझ्यात काही दोष असता आणि तू बाळ नको म्हणाला असतास तर मी समजून घेतलं असतं; पण स्वत:च्या स्वार्थासाठी तू माझ्या आई होण्याच्या अधिकारावर घाला घातलास? मी तुला कधीही माफ करणार नाही सुजित.”

“काय करशील तू? मला सोडून जाशील? दुसरा यार बघशील? तसं केल्याने तू आई होशील असं वाटतंय? तर मग आधी स्वत:चं चेक अप करून घे.” त्याचा कुत्सित स्वर तिच्या काळजात घरं करून गेला.

“जे आहे ते स्वीकारण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये बायको. सो, सगळं विसर आणि पटकन ऑफिसला ये, मी फायनान्सर्सबरोबर आजच मिटिंग फायनल करतोय. पुन्हा कामात गुंतलीस कि तुझ्या डोक्यात फालतू विचार येणार नाहीत.” सुजित माजात ऑफिसला निघून गेला.

सुजितने आपल्यावर इतका मोठा अन्याय केलाय ह्याची जाणीव होऊन अनन्या चवताळली. पण आता इमोशनल होऊन नाही तर त्याच्यासारखंच कुटील वागून गोष्टी हाताळायला हव्यात हेही तिला जाणवलं. वकिलांना भेटून तिने सुजितला डिवोर्सची नोटीस पाठवायचं ठरवलं. सृजन मिडीयामधूनही बाहेर पडायचा निर्णय तिने घेतला. कारण तिच्याशिवाय सुजित काहीही करू शकणार नाही हे त्याच्याच बोलण्यातून तिच्या लक्षात आलं होतं. तिची कूस उध्वस्त करून त्याने तिची पद्धतशीरपणे फसवणुक केली होती. आणि त्याची किंमत अनन्या त्याला रस्त्यावर आणून वसूल करणार होती. त्या दृष्टीने तिने पद्धतशीर पावलं टाकायला सुरुवात सुद्धा केली. “हॅलो, अॅडव्होकेट साने, मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय. यस लगेच; पण प्लीज त्याबद्दल आत्ता सुजितला काही बोलू नका. आपण भेटल्यावर तुम्हाला सविस्तर सांगते.” फोन खाली ठेवल्यावर अनन्याने सगळ्यात आधी काय केलं असेल तर एका नीच प्रवृत्तीच्या माणसाच्या नावाने बांधलेलं मंगळसूत्र गळ्यातून उतरवलं. त्या डायमंडच्या मंगळसूत्राची तिच्या लेखी शून्य किंमत होती आता.