उकलू दे गाठ ही भाग १

Tithlya sister ne sangitlya pramane aadhi pathology madhe jaun blood sample dile ani mag mammography sathi ti kirtisobat geli.

भाग - १

     
         सकाळ पासूनच कां कोण जाणे सवितेला फार अस्वस्थ वाटत होतं. आपली रोजची सकाळची कामं उरकून ती आंघोळीला गेली.तसाही आज रविवार असल्याने कामावर जायची घाई नव्हतीच तिला. ...! अंगाला साबण लावताना  हात अचानक स्तनांपाशी  थबकला. डाव्या स्तनात एखाद्या गाठीसारखे तिला जाणवले. तिने आलटून पालटून  दोन्ही स्तनांना चाचपडून पाहिले आणि डाव्या स्तनात असलेल्या गाठीची तिला खात्री वाटली. तिने त्या गाठीला चाचपडून पाहिले.अगदीच छोटी होती पण गाठ हाताला लागत  होती पण दुखत मात्र अजिबातच नव्हती. स्तनात गाठ असल्यामुळे खरं तर तिला टेन्शन आलं होतं पण तिथे काही त्रास नव्हता  म्हणून तिने थोडं दुर्लक्षच केलं. एकतर आज रविवार असल्याने तिचे डॉक्टर सुद्धा सुटीवर होते त्यामुळे आता उद्याच तपासायला जायचं असा विचार करूनच ती गप्प बसली. दुसरा दिवस गेला,तिसरा दिवस गेला अन् कामा कामात ती ते विसरून पण गेली.

" आई ग, उद्या पासून माझे प्रॅक्टिकल  सुरू होणार आहेत,लक्षात आहे ना तुझ्या? आई मला खूप टेन्शन येतं ग....., पूर्ण परीक्षाभर तू बाकीचं सगळं बाजूला ठेवून मला वेळ द्यायचा बास...!" लेक बोलता बोलता प्रेमळ ताकिदच देत होती की तिला. लेकीने असं सांगितलं असतं काय अन् नसतं काय , ती सुद्धा वेगळं काय करणार होती बरं...
तिची एकुलती एक लेकच तिचे विश्व होती. तीच्यापेक्षा अजून महत्वाचं असं काहीच नव्हतं तिच्या आयुष्यात.

आता तर ती जणू स्वतः ला विसरून च गेली होती.स्वतः चं काम सांभाळून मुलीच्या अभ्यासाच्या वेळा,तिचं खाणं  पिणं , तिला अजिबात मानसिक ताण येऊ नये यासाठी ती पूर्णपणे काळजी घेत होती.

लेकीचे प्रॅक्टिकल अन् काही पेपर सुद्धा आटोपले होते. पुन्हा एक दिवस निवांत आंघोळीच्या वेळी सविताचे लक्ष पुन्हा त्या गाठी कडे गेले. त्रास तर अजूनही नव्हताच पण मागच्या वेळेपेक्षा गाठीचा आकार वाढलेला तिला जाणवला. आता मात्र नाना शंका कुशंकांनी तिच्या मनाला घेरले. आणि डॉक्टर कडे जाऊन दाखवायलाच हवं हा पक्का निर्णय तिच्या मनाने घेतला.

अचानक दुपारी तिची मैत्रीण कीर्ती घरी आली, गोष्टींमध्येच  स्तनातल्या त्या गाठीचा विषय निघाला.
"अगं एवढी स्तनात गाठ आहे म्हणतेस आणि अजून डॉक्टरकडे नाही गेली तू?" किर्ती

"अगं पण त्या गाठीचा मला काहीच त्रास नाही ना, आणि त्यात ऋतूचे सुरू असलेले पेपर. तसे तुला तर माहित आहे की ऋतूचे अगदी माझ्याशिवाय पान पण हलत नाही. ऐन तिच्या बारावीच्या परीक्षेच्या वेळी मी आपलं दुखणं कुठे घेऊन बसू ग..! त्यातही गाठीचा मला काही त्रास पण नाही त्यामुळे मी एवढं काही लक्ष दिलं नाही." सविता

" अगं वेडी की काय तू? अगं ही अशी न दुखणारी , न खुपणारी गाठच फार हानिकारक असते बरं. चल तू लगेच चल बरं आपण लगेच डॉक्टरकडे जाऊन येऊयात." किर्ती

"अगं आता दोन तर पेपर राहिलेत ऋतूचे, ते झाले की तपासून घेईलच ना मी." सविता

"हे बघ सविता, तूच सांगत आहेस की ऋतुजाचे प्रॅक्टिकल सुरू व्हायच्या आधीपासून तुला ती गाठ लागते आहे. तेव्हा नाही पण निदान प्रॅक्टिकल झाल्यावर तरी तू तपासायला जाणे अपेक्षित होते पण तेव्हाही तू गेली नाहीस. या दरम्यान ती गाठ वाढत आहे हे पण तुला जाणवत आहे तरीसुद्धा तू अजूनही चाल ढकल करत आहेस. हे पेपर आटोपले की पुन्हा तू लेकीची नीट  (NEET) अन् सी ई टी (CET )व्हायची वाट पाहाशील,  हो ना! नाही ,यावेळी मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही." किर्ती

ऋतूचे पेपर सुरू असल्याने मध्येच कुठे हे काय ? असे सविताला वाटत होते. ती मैत्रिणी सोबत जाण्यासाठी आढेवेढे घेत होती पण मैत्रीण मात्र काही ऐकायलाच तयार नव्हती. ती शेवटी बळेच सविताला डॉक्टर कडे घेऊन गेली

डॉक्टरांनी तपासणी केली आणि संशय वाटल्याने त्यांनी पुढच्या तपासण्यांसाठी तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे रेफर केले.

आता मात्र सविता विचारात पडली. कारण तिच्या गावात या तपासण्या होत नव्हत्या. या दोन्ही तपासण्या करण्यासाठी तिला शहरात जाणे जरुरी होते.  असे अचानक पेपर सुरू असताना तपासण्यांसाठी जायचे म्हणजे पुन्हा लेकीला डिस्टर्ब करण्यासारखेच होते. सुदैवाने दोन-चार दिवसातच लेकीचे पेपर आटोपणार असल्याने तिने नंतर जायचा निर्णय घेतला. मैत्रीण किर्तीलाही सोबत येण्याची गळ घातली अन् ती सुद्धा मैत्रीखातर तयार झाली.

इकडे लेकीचे पेपर आटोपले होते तर खरे पण मनासारखे पेपर न गेल्याने ती थोडी डिस्टर्ब झाली होती. पुढे असलेल्या परीक्षांचे तिला आता पुन्हा टेन्शन यायला लागले होते. अशा परिस्थितीत लेकीला काही न सांगण्याचा निर्णय सविताने घेतला. इतर काहीतरी कारण सांगून अन् मैत्रीण किर्तीला घेऊन ती गेली.

     लवकर नंबर लागावा म्हणून दोघीही सकाळीच घरून निघालेल्या.सोबतीला डबा घेतलेला पण सविताची  एकंदर मानसिक अवस्थाच अशी झालेली की भूक ,तहान ती सगळं विसरून गेली होती.
कधी डॉक्टर येतील, कधी आपला नंबर लागेल अन् पुढे डॉक्टर काय सांगतील? असे नानाविध विचार  तिच्या मनाला सतत घेरत होते.

नोंदणी वगैरे करून दोघीही वेटींग हॉल मध्ये बसलेल्या.  लवकरच  डॉक्टर आले आणि  हळूहळू एकेका पेशंट चा नंबर लागू लागला. तिचा नंबर जसा जसा जवळ येऊ लागला अचानकच छातीत एक विचित्र हुरहूर सुरू झाली तिच्या.शेवटी तिचा नंबर लागला अन् धडधडत्या अंतकरणाने ती आत गेली.

तिची कंप्लेंट आणि हिस्टरी ऐकल्यानंतर डॉक्टरांचा पहिला प्रश्न होता "मॅडम गाठ तुम्हाला आढळल्या नंतरही तुम्ही एवढे दिवस काय केलं?"

त्यानंतर डॉक्टरांनी स्वतः गाठ  तपासून पाहिली आणि काही तपासण्या करायला सांगितल्या आणि सगळं आटोपलं की पुन्हा  सगळे रिपोर्ट्स घेऊन त्यांना भेटायचं होतं. सुदैवाने दवाखाना मोठा असल्याने सगळ्या तपासण्या एकाच छताखाली होणार होत्या त्यामुळें विनाकारणच फरफट मात्र वाचली होती त्यांची.

तिथल्या सिस्टर नी सांगितल्या प्रमाणे आधी पॅथाॅलॉजी मध्ये जाऊन ब्लड सँपल दिलं तिने आणि मग मॅमोग्राफी  साठी ती किर्ती सोबत गेली

या आधी कधी साध्या आजारासाठी सुद्धा तिला अशी डॉक्टरांकडे जायची वेळ आली नव्हती अन् आज ही अशी लक्षणं, एवढा प्रचंड दवाखाना अन् या नाना प्रकारच्या टेस्टस..! जीव अगदी दडपून गेला होता तिचा.  या सगळ्यांचे काय रिपोर्ट्स येणार आणि यातून पुढे काय निष्पन्न होणार...? हा सगळा विचार करायची कुवत सुद्धा आता तिच्यात उरली नव्हती. सोबतीला जीवा भावाची मैत्रीण असूनही  सविता आज अगदी गप्प गप्प च होती. किर्ती सुद्धा तिच्या मनावर आलेलं प्रचंड दडपण समजून घेत होती. किर्ती चं सोबत असणं अन् तिचा आश्वासक स्पर्श आज तिच्यासाठी खूप मोलाचा होता.

सगळ्या तपासण्या आटोपून आणि सांगितलेल्या वेळेत त्यांचे रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना दाखवणे आता तेवढे बाकी होते. मात्र ओपीडी ची वेळ सहा ची असल्याने त्याला अजून  वेळ होता त्यामुळे किर्तीने बळेच तिला कॅन्टीन मधे नेऊन नाश्ता खाऊ घातला आणि चहा प्यायला लावला.चहा घेतल्यानंतर तिला सुद्धा थोडे रिफ्रेश झाल्यासारखे वाटले. काहीवेळ दोघी  बाहेरचे लॉन आणि बागेत  फेरफटका मारून आल्या. थोडं बाहेर पडल्याने पाय आणि मन दोन्ही मोकळे झाल्यासारखे वाटले तिला. मनावर असलेली मरगळ थोडी निसर्गाच्या सानिध्याने कमी झाल्यासारखी वाटली पण जशी जशी ओपीडी ची वेळ जवळ  येऊ लागली तसं मन पुन्हा त्या निराशेच्या  गर्तेत जाऊ लागलं पण  वेळ होताच ओपीडी कडे मोर्चा वळवून त्या दोघीही तिथे वेटींग हॉल मध्ये येऊन बसल्या.
क्रमशः

पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.

धन्यवाद!

🎭 Series Post

View all