भाग - ३
रात्री घरी परत यायला तिला उशीरच झाला होता. ती घरी आली तेव्हा तिची लेक ऋतुजा झोपली होती.संध्याकाळीच नाश्ता केला होता अन् आता भूक तर मरूनच गेली होती तिची. चला आजचे मरण उद्यावर टळले असा विचार करत ती सुद्धा झोपायला गेली.
काही केल्या झोप येत नव्हती तिला,कशी येणार ना? कॅन्सर सारख्या आजाराचा विळखा पडला की माणूस भूक तहान सगळं विसरून जातो हेच खरं. ऑपरेशन तर करायचं होतंच पण रिपोर्ट येईपर्यंत चा वेळ हातात असल्याने लेकीची व्यवस्था लावायला बरं पडणार होतं. परत मुख्य प्रश्न होता पैशांचा ,त्यासाठी नवऱ्यासोबात बोलणं तर आवश्यकच होतं.सगळ्या गोष्टींच्या विचारात रात्र तशीच गेली. विचार करकरून शेवटी डोकं शिणलं अन् पहाटे पहाटे डोळा लागला तिचा.
आज उठायला अंमळ उशीरच झाला तिला. तरी थोडी झोप झाल्याने रात्रीपेक्षा आता बरं वाटत होतं तिला. सवयीप्रमाणे ती आपल्या कामाला लागली. काम सुरू असतांना सुद्धा तिची एक नजर लेकिकडेच होती. खरं तर रोज तिच्यामागे आई आई करत फिरत बसणारी लेक एवढी शांत , गुमसुम बसलेली पाहून कसेसेच झाले तिला.
" कळलं असेल का ऋतुजा ला माझ्या आजाराविषयी म्हणून तर ती एवढी चूपचाप नसेल ना?" तिचं मन म्हणालं.
"पण मी तर कुणाजवळच नाही बोलली अजून याबद्दल. मग कसं शक्य आहे हे." परत दुसरं मन म्हणालं.
पण लेकीला असं उदास बसलेलं बघून तुटून आलं तिला आतून. तिने पटापट कामं आवरायला घेतले आणि लेकिशी बोलायचं ठरवलं.
" काय ग ऋतू ,काय झालं बेटा..! अशी उदास का बसली आहेस आणि आज जायचं नाही का तुला क्लासला?" लेकिजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत तिने विचारलं.
" आई , अगं माझं मनच नाही लागत आहे अभ्यासात. मला टेस्ट चे पेपर सोडवायला घेतले हातात की काहीच आठवत नाही आणि अलीकडे माझं डोकं दुखत असते नुसतं दिवस दिवसभर ,आई मला काही कळत नाही आहे मला काय झालं ते." असं म्हणत ती सविताच्या कुशीत शिरत रडायलाच लागली.
सवितासमोर पुन्हा एक नवं आव्हान उभं राहिलं होतं. आता स्वतः च्या आजाराकडे लक्ष द्यायचं की लेकीच्या समस्येचा विचार करायचा? पुन्हा दुविधेत पडली ती.
खर तर तिलाच खरी सध्या सगळ्यांच्या आधाराची, प्रेमाची, सांत्वनाची गरज होती पण ते तर होतच नव्हतं पण पुन्हा नवनवे प्रश्न सामोरे येत होते.
कां होत असेल असं ऋतूला? तब्येतीची काही प्रॉब्लेम असेल की परीक्षेला घाबरली असेल? तसेही शेवटचे दोन पेपर बिघडले तिचे तेव्हापासून बघते आहे आपल्या कोषातच असते ती. मानसिक ताण तर नसेल ना आला तिला या सगळ्याचा? पण लेकीला समजवणे आधी महत्वाचे होते.
" ऋतू , होते बेटा असं कधीकधी,अभ्यासाचा ताण येतो ना मनावर त्यामुळे असं होते बघ. तुला फारच त्रास होत असेल तर एक दोन दिवस अभ्यास बाजूला ठेवून थोडी फ्रेश हो ,नाहीतर असं करू आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ तुला बरं नाही वाटलं तर." लेकीची तिच्या परीने तिने समजूत घातली आणि ती आपल्या कामाच्या ठिकाणी गेली. आता जास्त सुट्ट्या घेऊन चालणार नव्हतं कारण पुढे अजून किती सुट्ट्या घ्याव्या लागणार होत्या देव जाणे.
ती तिच्या कामाला आली होती जरूर पण पण डोक्यात स्वतः चे आजारपण आणि पोरीचा प्रॉब्लेम घेऊनच. आता तर या आजारात आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या लाडक्या लेकीचं कसं होणार हा प्रश्न सुद्धा राहून राहून सतावत होता तिला. तिचे वडील होते ,तिचा खूप लाड पण करायचे पण लेक मात्र आपल्या बाबांसोबत कधी मोकळे पणाने बोलल्याचे तिला आठवत नव्हते. त्या दोघांमध्ये असलेल्या दुराव्याची सावली त्या दोघांच्या नात्यावर सुद्धा पडली होती. आता तिलाच पुढाकार घेऊन हे नातं सांधायचं होतं. कदाचित घरातल्या वातावरणाचा परिणाम म्हणून की काय ऋतुजा स्वभावाने बरीच अबोल होती. सविताला कुटुंबा बद्दल काही जिव्हाळा नसल्याने लेकित तो उतरणे शक्यच नव्हते तरी आजी तिला लहानपणी सांभाळायची त्यामुळे निदान दोघींनाही एकमेकींबद्दल ओढ होती ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट होती.
संध्याकाळी पुन्हा किर्ती येऊन गेली. तिच्या येण्याने सविताला तेवढंच बरं वाटलं. मनात साचलेले विचार निदान काही वेळा पुरते का होईना तिने बाजूला ठेवले. पुन्हा ऋतुजाचा प्रॉब्लेम ती तर कुणाला सांगू शकत नव्हती. एक तर ऋतू कडून तिच्या खूप अपेक्षा होत्या आणि लेकीला आलेल्या दडपणाने त्या अपेक्षांवर पाणीच फिरण्याची चिन्ह होती. त्यामुळे ऋतू बद्दल सुद्धा ती कीर्ती जवळ सहजच मन मोकळं करून गेली.
"अग होतं बेटा ऋतू बऱ्याच जणांना असं. परीक्षेचं, अभ्यासाचं, सगळ्यांच्या अपेक्षांचं अशी सगळीच ओझी असतात ना डोक्यावर त्यामुळे त्याचं इतकं दडपण येतं की त्या दडपणामुळे आपण आपलं शंभर टक्के देऊ की नाही असं च वाटत असते आणि त्या भयानेच ही अशी अवस्था येते. काळजी नाही करायची हां बेटा. अन् समजा तरीपण तुला तसंच वाटत राहिलं ना तर मग आपण त्यावर काही उपाय करू. चल, मला थोडं काम आहे बाहेर , चल बरं माझ्यासोबत म्हणून ती तिला सोबतही घेऊन गेली."
किर्ती गेली आणि थोड्याच वेळात श्रीधर घरी आला. त्याला असं लवकर घरी आलेलं बघून तिला थोडं आश्चर्यच वाटलं. "आताच सांगावं का यांना आजाराबद्दल की नंतर बोलू? पैशांची जमवाजमव करावी लागेल त्यामुळे जेवढं लवकर सांगेन तेवढं बरं." ती मनाच्या अशा दुविधेत असतानाच श्रीधर नी बोलायला सुरुवात केली.
"किर्ती वहिनी नी सांगितलं मला सगळं. काळजी नको करू तू, सगळं नीट होईल...पण सविता, एवढं सगळं झालं तरी तुला मला एका शब्दानेही सांगावं असं नाही वाटलं का ग? ठीक आहे की आपलं फारसं जमत नाही पण एकाच घरात,एकाच छताखाली एकत्र राहतो आपण. तुमच्या साठी सगळं व्यवस्थित करायचा नेहमीच प्रयत्न असतो माझा, तुम्ही दोघींशिवाय मला दुसरं आहे तरी कोण? प्लीज सविता निदान यानंतर तरी अशी परक्यासारखी नको वागू. यापुढच्या तपासणीला मी येईन तुझ्यासोबत. पैसा काय आपण जमवू ,उभा करू , तू नको काळजी करू." नकळतच त्याने हलकेच तिच्या डोक्यावर थोपटले.
आतापर्यंत आवरून ठेवलेला मनाचा बांध आता मात्र भरभरून वाहू लागला तिचा. आज पहिल्यांदा तिला नवऱ्याच्या तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती. आज पहिल्यांदाच आपण त्याला समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही याचा पाश्चात्ताप तिला राहून राहून होत होता.
श्रीधर च्या बोलण्याने बरीच हिम्मत वाढली होती तिची. तिच्या मागे कुणीतरी ठामपणे उभा आहे हे जाणवून च एक नवा आत्मविश्वास जागृत
झाला तिच्यात.
क्रमशः
पुढे काय झालं ? हे जाणून घ्यायला वाचा कथेचा पुढचा भाग.
धन्यवाद!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा