भाग - ४
आज रिपोर्ट्स भेटणार होते सविताचे त्यामुळे आज पुन्हा ती दवाखान्यात जाणार होती. रिपोर्ट भेटले की डॉक्टरांना दाखवायचे होते आणि रिपोर्ट्स बघून मगच ऑपरेशन ची दिशा ठरणार होती. आज नवरा श्रीधर सोबत असल्याने तशा अवस्थेत सुद्धा एक मानसिक आधार वाटत होता तिला.
दवाखान्यात गेल्यावर तिचे रिपोर्ट्स तिने घेतले आणि त्याच दवाखान्यातील कॅन्सर सर्जन ची वेळ घेऊन त्यांना ते रिपोर्ट्स दाखवायला ती गेली.
"रिपोर्ट्स आणि तपासणी केली त्यावरून कॅन्सर सध्या दुसऱ्या स्टेज ला वाटत आहे. जर आधीच लक्षात आलं असतं तर स्तनाचा फक्त बाधित भाग काढून टाकून सुद्धा जमलं असतं पण आता मात्र ऑपरेशनने पूर्ण स्तनच काढावे लागणार आहे." रिपोर्ट्स पाहिल्या नंतर डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिली.
"पण डॉक्टर पेशंटच्या जीवाला काही धोका नाही ना?"श्रीधरणे डॉक्टरांना काळजीने विचारलं
"हे बघा, सध्या तरी कॅन्सर आटोक्यातच वाटतो आहे, सध्या तरी लीम्फ पर्यंत त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही त्यामुळे ऑपरेशन त्याच्यानंतर किमो आणि गरजेनुसार रेडिएशन या सगळ्या थेरेपीज मधून तुम्हाला जायला लागेल. या उपचारांचा थोडाफार त्रास होईल पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतील."डॉक्टर
डॉक्टरांनी सोबतच प्रत्येक उपचाराची कार्यपद्धती, पेशंटची इच्छा शक्ती, त्यानंतर होणारा फॉलो अप या सगळ्यांबद्दल दोघांशी चर्चा केली. सोबतच ऑपरेशनची तारीख आणि एकंदरीत खर्चाचा आकडा याच्याबद्दलही त्यांनी दोघांना कल्पना दिली.
तीन दिवसांनी मिळालेली ऑपरेशनची तारीख घेऊन दोघेही घरी परतले. लेकीला यातलं काहीच बोलायचं नाही यावर दोघेही अगदी ठाम होते. काहीतरी कामाचं निमित्त सांगून दोघांनी बाहेर पडायचं त्यानंतर ऑपरेशन झालं की पुढची दिशा ठरवायची असं त्यांचं ठरलं.
दुसरा दिवस उजाडत नाही की पुन्हा लेकीची डोकेदुखी उमळून आलेली.
खरंतर हे शारीरिक नसून मानसिक आहे हे सगळ्यांनाच कळत होतं, सगळ्यांनी आपापल्या परीने तिला समजवायचा प्रयत्न ही केला होता पण तिचे मात्र मागचे पाढे पन्नास अशी अवस्था. पण पुन्हा लेकीची अशी अवस्था पाहिली की सविताला अजून टेन्शन यायचं. डॉक्टरांनी कितीही आश्वस्त केलं असलं तरी आजारात आपल्याला काही झालं तर आपल्या या मनस्वी लेकीचं कसं होईल ? याचा विचार करूनच तिच्या डोकं पार शिणून जायचं.श्रीधर लेकीला इतका जीव लावायचा पण त्याच्याशी तिचं फटकून वागणं आता तिला अखरायचं. शेवटी तिने दुपारी फोन लावून किर्तीला घरी बोलवलं.
"काय झालं ग सविता काय म्हणाले डॉक्टर? अग तू फोन करून बोलावलं नसतं ना तरी आज मी येणारच होते बघ."म्हणत किर्तीने संवादाला सुरुवात केली. आदल्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं तिने किर्तीला सांगितलं.
"अगं ते जाऊदे पण मी तुला नां या ऋतुच्या प्रॉब्लेम साठी बोलवलं, बघ ना इतकं समजवून सांगूनही हिची डोकेदुखी आणि टेन्शन घेणं काही कमी होत नाही. मला तर कळेनासं झाले गं, काय करावे ते..!" सविता
"अगं तू काळजी नको करू, माझ्या ओळखीच्या डॉक्टर मॅडम आहेत ना त्या अशा मुलांना खूप छान समजून सांगतात. मागे दहावीत माझ्या मुलीला पण असाच प्रॉब्लेम झालेला तेव्हा मला एका जणाने त्यांच्याकडे न्यायला सुचवलं होतं. मी पण तुझ्यासारखी अशीच त्रासून गेले होते पण त्या इतकं सुंदर समजून सांगतात ना मुलांना की मुलांना सुद्धा ते आपोआप पटते. अनेक जणांनी खूप छान रिव्ह्यू दिले आहेत त्यांच्या कौन्सिलिंग बद्दल. मी आता घरी गेले की बोलून घेते त्यांच्याशी आणि मग तशी संध्याकाळची वेळ घेते त्यांची आपल्यासाठी."
काही वेळ थांबून किर्ती निघून गेली. तिने संध्याकाळी त्या मॅडम ची ॲपॉइंटमेंट घेऊन ठेवली आणि तसा सविताला निरोप दिला.
संध्याकाळी डॉक्टर मॅडम कडे गेल्यानंतर सविताने त्यांना ऋतुजा चा प्रॉब्लेम सांगितला. मॅडमनी शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर त्यांनी ऋतुजाशी संवाद साधायला सुरुवात केली.
कारण त्यांनाही माहित होतं हे दुसरं तिसरं काहीही नसून फक्त परीक्षेचा फोबिया होता. परीक्षेची भीती , मुलांच्या भविष्याच्या कल्पना, पालकांच्या अपेक्षा या सगळ्या गोष्टींचे मुलांच्या मनावर इतकं दडपण येते की अशा काळात ते अगदी ब्लँक होऊन जातात. मला आता काहीच आठवत नाही. मी परीक्षा देऊ शकणार नाही, ऋतुजा सारखं डोकं दुखणं अशी विविध कारणे मुलं अशा काळात देतात हे त्यांना चांगलं माहीत होतं. अशा मुलांना औषधांची नाही तरी योग्य समुपदेशनाची गरज असते हे त्या चांगलंच जाणत होत्या. त्यासाठीच त्यांनी ऋतुजाशी संवाद साधणे सुरू केले होते. अगदी साध्या साध्या प्रश्नांपासून सुरू झालेला हा संवाद तिच्या मनात दडून बसलेल्या भितीला अलगद बाहेर काढत होता.
"तुला माहीत आहे का, मी पण बारावीला होते ना तेव्हा मला पण ना सेम असंच झालं होतं. मी पण खूप घाबरले होते. सगळ्यांनी मला समजून सांगितलं होतं असं काही होत नसते म्हणून, पण मी मानायलाच तयार नव्हते. पण जेव्हा मी पेपर सोडवायला बसले नां तेव्हा पेन हातात घेतल्याबरोबर सगळं भरभर आठवायला लागलं मला. आपला अभ्यास झाला असेल नां तर मग काही काळजीच करायची नसते. आठवते सगळं आपोआप आपण ना विनाकारण चिंता करत बसतो त्याची.
तसंच ना तुझ्या एकंदरीत बोलण्यावरून मला जाणवलं की तू फार अबोल आहेस. मनातलं कुणाजवळ फारसं बोलून दाखवत नाही तू. सगळ्यात आधी आपल्या आई-बाबांशी बोलायचं, नाहीतर आपल्या ताई दादा शी, आपल्या जवळच्या व्यक्तीशी किंवा आपल्या एखाद्या मैत्रिणी पाशी. आपण जेव्हा हे सगळं कोणाशी तरी शेअर करतो नां तेव्हा आपल्या मनातल्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टींचा निचरा होतो आणि या गोष्टी डोक्यातून एकदा निघून गेल्या की मग आपसूकच हलकं वाटायला लागते. आणि या तशाच साचून ठेवल्या की मग ह्याच गोष्टी भीती, डोकेदुखी म्हणून आपल्याच डोक्यात पिंगा घालायला लागतात." डॉक्टर
" मॅडम पण माझ्याजवळ
कुणीच नाही हो असं, की ज्याच्याजवळ मी सगळं मनातलं बोलू शकेल. आईला जमेल तेवढं सांगते मी, पण तिलाच तिचे खूप प्रॉब्लेम असतात. बाबांशी तर फारशी बोलतच नाही मी. मला बहिण भाऊ पण नाहीत. आणि चांगल्या जवळच्या अशा मैत्रिणी तर मला नाहीतच. कुणाशी मैत्री करायला गेली की आईचा आपला नेहमीच माझ्यावर वॉच असतो.
" समजा माझ्या मैत्रिणींनी मला तुझा ड्रेस छान आहे म्हणून म्हटलं आणि ते मी आईला सांगत गेली की आई म्हणते,"लक्ष नाही द्यायचं अशा मुलींकडे अशा मुली आपल्या चांगल्या राहण्याला जळतात."
जर एखाद्या मुलीने म्हटलं की तुझी ना स्माईल खूप सुंदर आहे, तुझे केस खूप छान आहेत." हे हे जर मी आईला सांगितलं तर आई म्हणते "पोरींनी केलेल्या खोट्या स्तुतीकडे तू लक्ष नाही द्यायचं तुझं अभ्यासातून लक्ष उडावं आणि तू अभ्यासात मागे पडली पाहिजे म्हणून तर तुला असं म्हणतात."
हे सगळं ऐकल्यानंतर डॉक्टरांना नेमकी मेख कुठे आहे ते कळलं होतं. सविताने ऋतुजा ला अगदी एका कोषात ठेवल्यासारखं ठेवलं होतं. बाहेरच्या विस्तृत जगाशी तिचा फार संपर्क आला नव्हता, त्यातच आई-वडिलांमध्ये असलेल्या कुरबुरीचा ऋतुजाच्या आयुष्यावर प्रभाव पडल्याचेही त्या मॅडमच्या निदर्शनास आले होते."
त्यांनी पुन्हा अनेक प्रश्नांद्वारे ऋतूचे बाबा तिच्याशी कसे वागतात हे जाणून घेतलं. तिला जशी वडिलांच्या मायेची गरज आहे तसे ते सुद्धा लेकीच्या प्रेमासाठी इच्छुक असतील याची सुद्धा जाणीव त्यांनी ऋतुजा ला करून दिली आणि हे सगळं व्यवस्थित निस्तरायचं असेल तर व्यक्त होणे आणि संवाद साधणे किती महत्वाचे आहे याची त्यांनी ऋतुजा ला व्यवस्थित जाणीव करून दिली.
तिच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सविताशी सुद्धा संवाद साधला. सविताने तिची नेमकी अडचण पण डॉक्टरांना सांगितली. पण मॅडमनी सुद्धा सविताने लेकीच्या मनात जी नकारात्मकता भरून ठेवली होती त्याबद्दल सविताला समज दिली. नकारात्मकता काढून टाकण्यासाठी तिला सुद्धा स्वतःहून प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी तिला समजावून सांगितले. सविताची सध्याची अवस्था आणि तिच्या लेकीची समस्या बघता मॅडमनी ऋतुजाला गरज भासल्यास एक विशिष्ट वेळ देऊन त्या वेळेत तिने येऊन भेटावे असं सुचवलं.
डॉक्टरांनी संवाद साधल्या पासून ऋतुजा बरीच मोकळी झाली होती. तिला एक नवा दृष्टिकोन त्या समुपदेशनातून लाभला होता. त्यांचं "मी सुद्धा यातून गेलीय" हे सांगणं तिला एक नवी हिम्मत देऊन गेलं होतं.
"आता बाबांशी तू स्वतः हुन बोलायचं." हे मॅडम चं सांगणं ऐकून त्याच दिवशीपासून ऋतुजा ने नव्याने ही नात्याची नाळ सांधण्याची सुरुवात केली.
लेकीमध्ये होत असलेला सकारात्मक बदल बघून सविता थोडी निश्चिंत झाली होती. पण अगदी एक दिवसावर आलेली ऑपरेशन ची वेळ मात्र तिच्या हृदयाची धडधड वाढवत होती.
क्रमशः
पुढे काय होणार हे जाणून घ्यायला वाचा कथेचा पुढचा भाग.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा