उकलू दे गाठ ही भाग 5

Savitecha sakaratmak nirnay baghun Rutuja ani Kirti doghihi farach khush zalya ani doghi eksurat mhanalya " Kharech ukalu de gath hi...!"

भाग - ५


पहाटेच सविता आणि श्रीधर  ऑपरेशन साठी  घरून निघाले होते. काही न बोलताही श्रीधरची जी आश्वासक साथ तिला मिळत होती त्याने तिला खूप बरं वाटत होतं. ऑपरेशन च्या टेन्शन मधे निदान तोच एक दिलासा होता तिच्या जीवाला.

दोन दिवसात नवऱ्याने ऑपरेशन साठी लागणारा पैसा उभा केला होता. एका महत्वाच्या कामासाठी दोघांना काही दिवस बाहेर जावं लागेल असं सांगून ते दोघेही बाहेर पडले होते. जायच्या आधी आपल्या आईवर ऋतुजा ची जबाबदारी त्याने सोपवली होती. 

सविताच्या ऑपरेशन च्या वेळी तिच्या आईला आणि बहिणीला त्याने सोबतीला बोलावून घेतले होते. तसेही त्या दोघींच्या येण्याने सविताचा मानसिक ताण थोडा  कमी होईल हे सुद्धा त्याला अपेक्षित होते. ऑपरेशन ला जायच्या आधी त्याने नजरेनेच तिला आश्वस्त केले आणि तो कायम तिच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. मनाच्या त्याही अवस्थेत तिला आजवर आपण नवऱ्याच्या प्रेमाला समजूच  शकलो नाही याची बोच मात्र राहिली. आता जर देवाने यातून वाचवलं तर या नात्याला नक्की न्याय द्यायचाच हा ठाम विचार करूनच ती  ओ. टी. मधे ऑपरेशन साठी गेली.

ऑपरेशन अगदी  व्यवस्थितरीत्या पार पडले. पुढच्या तपासणी साठी सॅम्पल पाठवले गेले. सविता ओ . टी मधून सुखरूप बाहेर आली  सगळ्यांना हायसे वाटले.

ऑपरेशन नंतरही किमो आणि रेडिएशन साठी वारंवार जावं लागणार होतं . त्यामुळे  काही दिवस शहरातच सविताची राहायची व्यवस्था करायची आणि सोबतीला तिच्या आईला ठेवायचं असा विचार त्याने केला होता आणि थेरेपी च्यां दिवशी तो स्वतः जाणार होता. अशाने सविताचा वेळ आणि श्रम सुद्धा वाचेल  याची  त्याला कल्पना होती.


सविता तर आता दवाखान्यात उपचार घेत होती श्रीधर  यायचा तेव्हाच तिला सगळा घरचा अहवाल कळायचा. तिच्या एकुलत्या एक ,प्राणप्रिय,लाडक्या लेकीसाठी तिचा जीव तुटायचा पण परिस्थिती पुढे हतबल होती ती. त्यातल्या त्यात किमो मुळे डोक्यावरच्या केसांना बरीच गळती लागली होती .स्वतः चं हे असलं रूप अगदी बघवत नव्हतं तिला. त्यामुळे अलीकडे आरसा बघणेच सोडून  दिले होते तिने.

हा आता उपचारांचा शेवटचा आठवडा होता. हे आटोपल्यानंतर डॉक्टरांनी जसं बोलावलं तसं फॉलो अप ला यायचं आणि स्वतः ची काळजी घ्यायची होती तिला. पाहता पाहता आठवडा संपला आणि उपचार संपवून घरी जायचा दिवस उजाडला. श्रीधर तिला घ्यायला आला होता. कधी एकदा घरी जाते आणि आपल्या लाडक्या लेकीला बघते असं तिला झालं होतं. आजवर फक्त जी तिच्या जगण्याचा आधार होती त्या लाडक्या लेकीला तिच्या गरजेच्या काळात अस एकटं टाकून आली होती ती. खूप वाईट वाटायचं तिला पण प्रत्येकच गोष्ट आपल्या हातात नसते हेच खरं असं वाटून ती गप्प बसायची.

जवळपास महिनाभराने ती घरी परत आली होती. डोक्यावर केस नसलेली आपली आई बघून लेक भांबावलीच होती. एक दोन दिवसांआधी तिचा पेपर आटोपला होता. त्यानंतर तिच्या आजीने  तिला तिच्या आईच्या आजाराची आणि ऑपरेशन ची कल्पना दिली होती. आज आई येणार  म्हणून खुश असलेली तिची लेक तिचं हे असं रूप बघून भांबावलीच होती. पण एवढ्या मोठ्या आजारातून आई सुखरूप परत आली याची जाणीव ठेवून तिने आईला कडकडून मिठी मारली. दोघीही मायलेकी  भावनेच्या आवेगात अश्रू गाळत राहिल्या.  त्यांना कसं आवरावं  हे कुणालाच कळत नव्हतं. तेवढ्यात किर्ती आली आणि तिच्या येण्याने तो भावनेचा आवेग ओसरला.

लेकीची परीक्षा आटोपली होती. पेपर सुद्धा मनासारखे गेले होते. लेकीला खुश बघून सविताला समाधान वाटत होतं. खरंतर तिच्या शिवाय तिची लेक कधी राहिली नव्हती त्यामुळे ती कशी असेल याची चिंताच तिला वाटत होती .  या महिन्याभरात आपली लेक आपल्या आठवणीत अगदीच सुकली असेल आणि  इवलसं तोंड करून बसली असेल असं तिला वाटत होतं पण त्यामानाने लेकीने  हे सगळं चांगलं अंगवळणी पाडून घेतल्याचं तिला दिसत होतं.

हळू हळू सविताला घराचं बदललेलं  चित्र दिसत होतं. बाप लेकीत मोकळा सुसंवाद होत होता.दोघेही एकमेकांना जपत होते. आजवर कधीही तिच्या संसारात लुडबुड न केलेल्या सासूबाई तिला त्रास होऊ नये म्हणून लेक आणि नातीच्या मदतीने घरची आघाडी सांभाळत होत्या. तिला हवं नको ते बघत होत्या. हे सगळं सविताच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. आजपर्यंत  आपण कोणतं सुख गमावलं याची आता तिला नव्याने जाणीव झाली होती. तिची सतत तिच्याभोवती घुटमळत राहणारी अबोल लेक आता मोकळेपणी सगळ्यांशी बोलू लागली होती. शेजारी राहणारा दिराचा मुलगा आणि तिच्यातील सख्य वाढीस लागले होते. तो ताई ताई करत तिच्याभोवती पिंगा घालत राहायचा आणि ती ताईच्या मोठेपणाने त्याला जपायची. नणंदेकडले सगळे अधेमधे येऊन तिची विचारपूस करायचे हे सगळं सगळं अगदी स्वप्नवतं होतं तिच्यासाठी.

एक दिवस तिने स्वतः हूनच  लेकीला विचारले," ऋतू  तुझं डोकं दुखणं आता बंद झालं का ग? अन् तू कधीपासून सगळ्यांशी अशी बोलायला लागली?"

" आई , माझं  डोकं दुखणं तर कधीचंच बंद झालं . त्या डॉक्टर मॅडम म्हणाल्या नव्हत्या का ,की मी सगळं मनातल्या मनात दाबून ठेवते कुठे व्यक्त होत नाही आणि त्याचाच त्रास मला होतो. मला पण हे कुठेतरी पटलं होतं. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी स्वतः हुन बाबांशी बोलायला सुरुवात केली आणि मला बाबा उलगडत गेले. तू ऑपरेशन साठी गेल्यानंतर आजी माझ्या सोबतीला आली . मी तिच्यासोबत पण मोकळेपणाने बोलायला लागले आणि आजीचे प्रेम पण मला समजायला लागले. त्यातच तू आणि बाबा  बाहेर असतांना आजीचे भाऊ वारले. मला तर तेव्हा कळतच नव्हते की आता मी कसं करणार पण काका आणि काकूनी आजीला सांगितलं की " तू बिनधास्त जा , ऋतू आमच्याकडे राहील आम्ही घेऊ तिची काळजी." आणि मी ते चार पाच दिवस काकांकडे राहिले. खरंच काका काकूंनी माझी खूप काळजी घेतली आणि  बघ ना हा छोटा भाऊ पण मिळाला मला. परत माझ्या पेपर च्या दिवशी बाबांना बाहेर जायचं होतं तेव्हा मला परीक्षेला कोण घेऊन जाणार? हा प्रश्नच होता .तेव्हा आत्याकडल्या दादांनी स्वत:च ही जबाबदारी घेतली. अगदी दिवसभर ते दादा माझ्यासाठी सेंटर वर होते. खरंच आई सगळे खूप छान वागले माझ्याशी ,खूप काळजी घेतली माझी. तुझी खूपच आठवण यायची पण या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं"

हे सगळं ऐकून सविताला खूप भरून आलं होतं. तिची मैत्रीण किर्ती तेवढ्यातच घरी आली होती. 

" किर्ती, मी ऑपरेशन ला गेल्यावर मला खर तर विचारच आला होता ग ऋतू चं कसं होणार? पण चित्र मात्र माझ्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळं आहे."

"सविता ,सगळे पेपर झाल्यानंतर ऋतुजा ला जेव्हा कळलं ना की तुला कॅन्सर झाला आहे तेव्हा तिनी फोन करून पुन्हा  डॉक्टर मॅडम कडे जायची इच्छा व्यक्त केली. मीच घेऊन गेली मग तिला. त्यांनी तिला तिच्या डोकेदुखी बद्दल आणि पेपर कसे गेले त्याबद्दल विचारलं. त्यांना तुझ्या आजाराची कल्पना होतीच, त्यांनीच ऋतूला सांगितलं की....

"जसं तुझ्या आईला जेव्हा गाठ लक्षात आली तेव्हाच तिनी त्याची उपाय योजना केली असती तर कदाचित थोडक्यात निभावू पण शकलं असतं . तसेच प्रत्येक असलेली गाठ ही कॅन्सर चीच असेल असे नाही कधी कधी ती साधी पण असू शकते पण वेळीच तिची दखल घेऊन तिची उकल केली नाही तर एकतर ती वाढून घातक होते नाहीतर ही गाठ कॅन्सर ची तर नसेल ना? ही चिंताच विनाकारण आपल्याला पोखरत असते . " 
 
"आता सुद्धा जसं  तू नाही म्हटलं तरी लवकर लक्ष दिलं तर फक्त तू एक स्तन गमावलास पण जिवावरचा धोका टळला ना..! जर याहीवेळी तू दुर्लक्ष केलं असतं तर ती गाठ , तो कॅन्सर लिम्फ  पर्यंत पोचला असता, नंतर दुसऱ्या अवयवातही त्याने शिरकाव केला असता  आणि सगळंच कठीण होऊन बसलं असतं."

"जसं आपल्या शरीराचं आहे ना तसेच आपल्या मनाचे असते. आपण विनाकारणच एखाद्या बद्दल मनात एक पूर्वग्रहदूषित अढी धरून बसतो. हीच अढी त्या नात्यात निर्माण झालेली एक गाठ असते. गैरसमज बाजूला सारून ,वेळीच योग्य प्रकारे तिची उकल केली तर नाते सुंदर आणि स्वस्थ राहते आणि यासाठी महत्वाचा असतो तो संवाद. जर ती गाठ तशीच ठेवली तर तिची निरगाठ बनून ती नात्यातला , संबंधातला कॅन्सर बनून ते नाते दूषित करते म्हणून गाठ कोणतीही असो शरीराची किंवा मनाची तिची वेळीच उकल करणे हे नेहमीच गरजेचे आहे."

"किती बरोबर सांगितलं गं किर्ती त्या मॅडमनी. यातून तावून सुलाखून निघाल्याने मला अगदी मनोमन पटलं हे. आता शरीरातल्या गाठीची उकल तर झालीच आहे पण  मी आता स्वतः पुढाकार घेऊन नात्यांमध्ये असलेल्या ह्या गैरसमजाच्या गाठीची नक्की उकल करेन आणि सगळी नाती पुन्हा नव्याने जोडेन."
 
सवितेचा सकारात्मक निर्णय बघून ऋतुजा आणि किर्ती दोघीही फारच खुश झाल्या आणि दोघी एकसुरात म्हणाल्या...
" खरंच उकलू दे गाठ ही...!"

समाप्त.

एका सत्यकथेला सकारात्मक वळण देत लिहिलेली ही कथा. पटल्यास,आवडल्यास नक्की सांगा तुमच्या लाईक्स आणि कॉमेंट्स द्वारे.
धन्यवाद!

🎭 Series Post

View all