उलुपिनंदन ! पार्ट 32

.
कुरुक्षेत्रावरच्या युद्धाचा प्रथम दिवस. इरावनने सूर्यदेवाकडे पाहिले.

" सूर्यदेव , आज तुम्ही यमदेवाचे पिता शोभत आहात. आज तुमचा पुत्र आपल्या सहस्त्र हातांनी सहस्त्र सैनिकांवर कालदंड फेकणार आहे. सूर्यास्त झाल्यावर कुणाच्या देहात प्राण असतील कुणाच्या नसतील काही सांगता येत नाही. " इरावन म्हणाला.

कौरव आणि पांडव पक्ष एकमेकांसमोर उभे होते. समोर पितामह भीष्म , गुरू द्रोण , गुरू कृप यांना पाहून अर्जुनाच्या मनात विचारांचे काहूर माजले. त्याच्या हातून गांडीव गळून पडले. तो गुडघ्यावर टेकला आणि हात जोडून श्रीकृष्णसमोर उभा राहिला.

" केशव , मी हे युद्ध लढू शकत नाही. समोर माझेच नातेवाईक उभे आहेत. ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो , ज्यांनी मला लहानाचे मोठे केले त्यांच्याविरोधात शस्त्रे कशी उचलू ? देवकीनंदन , या युद्धात जर पांडवांचा विजय जरी झाला तरी कुरुवंशाचा संहार होईल. संपूर्ण पिढी गारद होईल. कुरुवंशाच्या स्त्रिया वैधव्याला प्राप्त होतील. त्या व्यभिचाराला लागतील. त्यानंतर अनौरस संततींची निर्मिती होईल. संस्कार , संस्कृती , राष्ट्र याचे पतन होईल. नाही. मी हे युद्ध करू शकत नाही. "

अर्जुनाला असे भावनेच्या आहारी गेलेले पाहून श्रीकृष्ण यांनी त्याचे मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला " भगवद्गीतेचे " पवित्र ज्ञान दिले. त्यानंतर अर्जुन पुन्हा युद्धासाठी तयार झाला.

***

युद्ध काही क्षणात सुरू होणार होते. तेवढ्यात कुंतीनंदन युधिष्ठिर रथावरून उतरले. त्यांनी अंगावरचे सुवर्ण कवच उतरवले. ते कौरवांच्या दिशेने चालू लागले. कौरव पक्षामध्ये सर्वत्र कुजबुज सुरू झाली.

" असे वाटत आहे की भीष्म , द्रोण , कृप सारखे महारथी बघून सम्राट युधिष्ठिर घाबरले."

" बहुधा आता ते भीष्माकडे दयेची याचना करत आहेत. "

इकडे उरलेले चौघे पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र जमले.

" दादा का तिकडे जात आहेत ?" नकुल म्हणाला.

" ते शांती प्रस्ताव तर देत नाहीयेत ना ?" सहदेव म्हणाला.

" त्यांना आपल्या भावांच्या बाहूबलवर विश्वास नाही का ?" भीम म्हणाला.

" त्यांचे हे कृत्य आपल्या सैनिकांमध्ये अविश्वास निर्माण करत आहे. " अर्जुन म्हणाला.

श्रीकृष्ण तिथे आले. पांडवांचा हा संवाद ऐकून ते हसले.

" कुंतीनंदन नक्कीच युद्ध करण्यासाठी अनुमती मागायला तिकडे गेले असतील. शास्त्रांमध्ये वडीलधाऱ्या लोकांच्या अनुमतीशिवाय युद्ध लढू नये असे सांगितले आहे. "

युधिष्ठिर पितामह भीष्मजवळ पोहोचला. पितामह रथावरून उतरले. लगेचच युधिष्ठिरने त्यांचे चरणस्पर्श केले.

" पितामह , माझ्या जीवनातील हे सर्वात भयंकर आणि मोठे युद्ध आहे. मला हे युद्ध लढण्यासाठी अनुमती द्या. तसेच मला आशीर्वाद द्या. "

" कुंतीनंदन , तू माझे आशीर्वाद घेऊन फार उचित कार्य केलेस. जर तू असे केले नसते तर मी तुला पराजयाचा शाप दिला असता. विजयी भव पुत्र. तुला हवा तो वरदान माग. "

" पितामह , हे युद्ध जिंकण्यासाठी आपला पराभव आवश्यक आहे. मला आपल्या पराभवाचे कारण सांगा. "

" वत्स , स्वयं इंद्रदेखील आला तरी तो मला पराभूत करू शकत नाही. तेव्हा पुन्हा कधितरी हा प्रश्न घेऊन माझ्याकडे ये. मी तुझ्या शंकेचे निवारण करेल. "

नंतर युधिष्ठिर गुरू द्रोण यांच्याकडे गेला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

" कुंतीनंदन , तू माझे आशीर्वाद घेऊन फार उचित कार्य केलेस. जर तू असे केले नसते तर मी तुला पराजयाचा शाप दिला असता. विजयी भव पुत्र. तुला हवा तो वरदान माग."

" गुरू द्रोण , जोपर्यंत आपला पराभव होत नाही तोपर्यंत आम्ही पांडव हे युद्ध जिंकू शकत नाही. तेव्हा आपण आपल्या पराभवाचा मार्ग सांगावा."

" पुत्र , जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी पांडवांना हे युद्ध जिंकू देणार नाही. परंतु , जर एखाद्या विश्वसनीय व्यक्तीने माझ्या प्राणप्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा समाचार मला ऐकवला तर मी शस्त्र त्यागेल आणि त्या क्षणी माझा वध होऊ शकेल. कुंतीनंदन , माझ्या प्राणप्रिय शिष्य अर्जुनाला एक समाचार दे. त्याला सांग जर त्याने या युद्धात सत्यपराक्रम गाजवला नाही आणि त्याचे बाण मला सौम्य भासले तर मी माझी गुरुदक्षिणा परत मागेल. तसेच द्रोणशिष्य म्हणून त्याचा अस्वीकार करेल. "

त्यानंतर कुंतीनंदन युधिष्ठिर यांनी कुलगुरू कृपाचार्य यांचे आशीर्वाद घेतले आणि युद्धासाठी त्यांची अनुमती घेतली.

" कुंतीनंदन , तू माझे आशीर्वाद घेऊन फार उचित कार्य केलेस. जर तू असे केले नसते तर मी तुला पराजयाचा शाप दिला असता. विजयी भव पुत्र. मी महाराज शंतनूच्या काळापासून हस्तिनापूरनगरात आहे. मी कुरुवंशाचा वटवृक्ष बहरताना पाहिला. परंतु विधात्याचा क्रूरपणा पाहा की कुरुवंशाचा संहार पाहण्याचे दुर्भाग्यही माझ्याच नशिबात आले. परंतु युधिष्ठिर तू धर्मराज आहेस. या वृद्ध मनाला एक समाधान आहे की हस्तिनापूरचे भविष्य सुरक्षित हातात आहे. विजय पांडवांचाच होईल. कारण जिथे श्रीकृष्ण , तिथे धर्म , तिथे विजय !"

त्यानंतर युधिष्ठिर महारथी शल्यजवळ गेला. युधिष्ठिरने शल्यचे आशीर्वाद घेतले आणि युद्धासाठी अनुमती मागितली. शल्यनेही अनुमती दिली आणि " विजयी भव " असा आशीर्वाद दिला.

" मामा , तुम्हाला सुतपुत्र कर्णाचा तेजोभंग करायचा आहे. आपल्या तीक्ष्ण वाणीने राधानंदन कर्णाचे मन विचलित करा. "

" वत्स , मला माझे कार्य लक्षात आहे. इतिहास शल्यला याच कार्यसाठी लक्षात ठेवेल हे माझे वचन आहे. "

त्यानंतर युधिष्ठिर आपल्या पक्षात परतले. त्यांनी पुन्हा आपले सुवर्ण कवच धारण केले. कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांप्रति युधिष्ठिरचा असलेला आदर पाहून पांडवपक्षातील इतर नरेशांच्या मनात युधिष्ठिरविषयी आदर कैक पटीने वाढला.

" साधू साधू !" असे म्हणून सर्वांनी युधिष्ठिरचे कौतुक केले.

***

" संजय , या चारही महापुरुषांनी युधिष्ठिरला कोणता उपदेश दिला ?" धृतराष्ट्रने विचारले.

" पुरुष हा अर्थचा दास आहे पण अर्थ कुणाचाही दास नाही. अर्थचा दास असलेला पुरुष नपुंसकच असतो. तेव्हा कुंतीनंदन जीवनात कधी अर्थचा दास होऊ नकोस. असा उपदेश चौघांनी युधिष्ठिरला केला." संजय म्हणाला.

क्रमश...


🎭 Series Post

View all