उलुपिनंदन ! पार्ट 33

.
रथावर आरुढ होताच युधिष्ठिर म्हणाला ,

" हे पवनदेव , कृपा करून माझा स्वर दूरवर पोहोचवा. या कुरुक्षेत्रावर उपस्थित सर्व नरेश , महारथी , अर्धरथी , रथी , सैनिक , योध्दा सर्वांसाठी मी एक घोषणा करत आहे. जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकतात. कौरव पक्षापैकी कुणाला पांडव पक्षाच्या वतीने युद्ध करायचे असेल तर त्यांनी निर्भयपणे पांडव पक्षात सामील व्हावे. आमच्या पक्षापैकी कुणाला कौरव पक्षात जायचे असेल तर ते जाऊ शकतात. "

क्षणभर सर्वत्र भयाण शांतता पसरली. तेव्हा कुठून तरी घोड्यांचा आवाज आला. कुणाच्या तरी रथाची चक्रे कौरवपक्षाकडून पांडव पक्षाच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. सर्वांनी त्या दिशेने पाहिले. तो योध्दा " युयुत्सु " होता. युयुत्सुने कौरव पक्ष सोडला आणि तो पांडवांना जाऊन मिळाला.

युधिष्ठिरने युयुत्सुला आलींगन दिले.

" पांडव पक्षात तुझे स्वागत आहे. "

" धन्यवाद दादा. "

प्रधान सेनापती दुष्टद्युमन यांनी संशयास्पद नजरेने युयुत्सुकडे पाहिले. युधिष्ठिरला समजायचे ते समजले.

" प्रिय युयुत्सु , तू पांडव पक्षात सामील होण्याचा जो निर्णय घेतला आहेस तो उचितच आहे. महाराज धृतराष्ट्र यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी तुझ्या रुपात किमान त्यांचा एक तरी पुत्र या भूतलावर असेल. मी तुला सरळ सेनेत सामील न करता वेगळे कार्य देत आहे. तू सेनेसाठी रसदीचा आणि शस्त्रांचा पुरवठा याची व्यवस्था पाहा. तू वैश्यवर्णाचा असल्यामुळे तू या कार्यात निष्णात आहेस. हे कार्य तू उत्तमप्रकारे पूर्णत्वास नेशील. "

" पृथ्वीपती , अजूनही माझे वर्ण विसरले नाही तुम्ही ? माझ्या मातेचे वर्ण काहीही असले तरीही मी एक महारथी आहे आणि वेळोवेळी मी पराक्रम गाजवला आहे. आपल्याला माझ्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर शंका आहे का?" युयुत्सु म्हणाला.

" तसे नाही. पण आमची व्यूहरचना आधीच ठरलेली आहे. तुझ्यासारख्या तेजस्वी महारथीला घाईघाईत एखादे स्थान देणे अनुचित असेल. तेव्हा आपले स्थान निश्चित करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दे. लहानपणी तू माझा प्रिय अनुज भीमसेन याचे प्राण वाचवले होते. मी तर तुझा ऋणी आहे. त्यामुळे तुझ्यावर अविश्वास करण्याचा प्रश्नच नाही. परंतु , पांचाल देशाचे राजकुमार दुष्टद्युमन यांना अविश्वास वाटू शकतो. तेच या सेनेचे प्रधान सेनापती आहेत. "
युधिष्ठिरने आपली व्यथा मांडली.

" दादा , मी आपली दुविधा समजू शकतो. आपण जे कार्य मला सोपवले ते मी सहर्ष स्वीकारतो. "

त्यानंतर युयुत्सुने युधिष्ठिरचे चरणस्पर्श केले आणि तो निघून गेला. इकडे श्रीकृष्ण यांनीही आपला एक दूत अंगराज कर्णाच्या शिबिरात पाठवला होता.

***

" अंगराज कर्णचा विजय असो. मी चित्रसेन. यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण यांचा दूत. "

" बोला. काय समाचार आहे ?"

" अंगराज , कुरुक्षेत्रावर संपूर्ण आर्यावर्तमधून सत्यपराक्रमी योद्धे जमले आहेत. गांधारीनंदन दुर्योधन यांचे सावत्र भाऊ युयुत्सु यांनी पक्ष बदलला आणि ते पांडवपक्षात सामील झाले आहेत. राधानंदन , पितामह भीष्म यांनी आपले नाव अर्धरथीच्या यादीत टाकले म्हणून आपण गंगानंदनच्या नेतृत्वाखाली युद्ध न करण्याचा निश्चय केला आहे असे कानावर पडले. श्रीकृष्ण यांची इच्छा आहे की पांडवांच्या वतीने युद्ध करून आपण गंगानंदन भीष्माचा वध करावा आणि त्यानंतर दुर्योधनच्या पक्षात सामील व्हावे. म्हणजे तुम्हाला तुमच्या अपमानाचा प्रतिशोधही घेता घेईल व संपूर्ण आर्यावर्तमध्ये तुम्हाला कीर्ती प्राप्त होईल. तुमच्यासारखा परमतेजस्वी योध्दा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू असताना एकटाच शिबिरात बसला आहे ही फार खेदाची गोष्ट आहे. "

अंगराज कर्ण हसले.

" मी देवकीनंदनचा फार आदर करतो. पण माझी निष्ठा गांधारीनंदनप्रति आहे. माझे शस्त्र कधीच कौरवांविरुद्ध उगारले जाणार नाहीत. मान्य शांतनूनंदनने माझा अपमान केला. पण जीवनभर मी अपमानाचे हलाहल विष गिळतच आलो आहे. पितामह भीष्म सेनापती नसताना मी जेव्हा कुंतीनंदन अर्जुनाचा वध करेल तेव्हाच या विश्वाला ज्ञात होईल की कर्णच सर्वश्रेष्ठ योध्दा आहे. तो क्षणच माझ्या सर्व अपमानाचा प्रतिशोध असेल. आता तुम्ही निघावे. "

तो दूत कर्णाला प्रणाम करून निघून गेला. थोड्या वेळाने तो रणभूमीवर पोहोचला. श्रीकृष्णांनी मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिले पण त्या दूताने नकारार्थी मान हलवली.

" कुंती आत्या , कदाचित तुमचा कुणी एक पुत्र दुसऱ्या पुत्राची हत्या करेल. हेच तुमचे प्रारब्ध असावे!" श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणाले.

***

युयुत्सु पांडवांना जाऊन मिळाल्यामुळे दुर्योधनाला फार क्रोध आला होता.

" पितामह , सावत्र तो सावत्रच. त्या वैश्यपुत्राने अखेरीस स्वतःचा खरा चेहरा दाखवला आणि उघडपणे पांडवांना मिळाला. त्या राजद्रोहीचा वध मीच करेल. " दुर्योधन म्हणाला.

" पुत्र , प्रत्येकाच्या धर्माची व्याख्या वेगवेगळी असते. कदाचित युयुत्सुला पांडव पक्षाच्या वतीने लढणे हेच धर्मोचित कार्य वाटले असेल म्हणून तो पांडवांना जाऊन मिळाला. " गंगानंदनने समजवले.

***

इकडे महाराणी गांधारीच्या दालनात एक दासी धावत आली.

" महाराणी , एक वाईट समाचार आहे. सुगधानंदन युयुत्सु पांडवांना जाऊन मिळाले. "

" यात वाईट काय ? युयुत्सु तर फक्त एका भावाचा पक्ष सोडून दुसऱ्या भावाच्या पक्षाला जाऊन मिळाला आहे. " गांधारी स्मितहास्य देत म्हणाली.