Login

उंबरठ्या बाहेरचे जग भाग १

उंबरठ्या बाहेरचे जग भाग १
उंबरठ्या बाहेरचे जग भाग १

" अहो, ऐकलंत का मी काय म्हणतेय ?  या पोरीचे पाय आता जमिनीवर उरत नाहीत ! म्हणे सिटी हाईट्समध्ये नवीन फ्लॅट बुक केलाय ?
संजू, तू काय दगड झाला आहेस का ? तुझी बायको या घराचे तुकडे करायला निघालीये आणि तू मान खाली घालून उभा आहेस ? "

सुलोचनाबाईंचा आवाज सोफ्यावर वर्तमानपत्र वाचत बसलेल्या गंगाधररावांच्या कानावर आला आणि संपूर्ण घरात एक भयाण शांतता पसरली.
गंगाधररावांनी चष्मा नाकावरून खाली सारला.

घरामध्ये गेल्या सात वर्षांपासून शिजत असलेलं हे शीत युद्ध आज उफाळून बाहेर आलं होतं. रचना हॉलमध्ये उभी होती, तिच्या बाजूला दोन मोठ्या बॅगा होत्या आणि मुलांचे हात तिने घट्ट धरले होते. तिचे डोळे रागाने लाल झाले होते, पण त्या लालभडक डोळ्यांत एक अढळ निश्चय होता.

" मम्मी, मी घर तोडत नाहीये, मी फक्त माझ्या मुलांचा आणि स्वतःचा श्वास वाचवतेय." रचना आवंढा गिळत पण ठामपणे म्हणाली.

"बाबा, तुम्हीच सांगा... या घरात माझं स्थान काय ? मुलाने कोणता क्लास लावावा इथ पासून ते मी ऑफिसला जाताना कोणती भाजी न्यावी, हे सगळं जर मम्मीनच्या परवानगीने होणार असेल, तर मी या मुलांची आई आणि संजूची बायको म्हणून मी काय कामाची ? संजूला स्वतःचा बोनस कुठे खर्च करायचा, हे सांगतानाही मम्मींना विचारून सांगावं लागतं. हे घर नाहीये बाबा, हा एक मिलिटरी कॅम्प झालाय ! "

संजू मध्येच बोलायला गेला,
" रचना, अगं आईचं वय झालंय, तिला काळजी वाटते म्हणून ती बोलते..."

" संजू, बस ! "

गंगाधरराव पहिल्यांदाच कडक आवाजात ओरडले. संजू जागीच खिळून गप्प झाला. गंगाधरराव सोफ्यावरून उठले आणि सुलोचनाबाईंच्या समोर जाऊन उभे राहिले.

" सुलोचना, रचना आज जे काही बोलतेय ते शंभर टक्के खर आहे. तू या घराला घर नाही, तर तुझं साम्राज्य समजून वागलीस. सुनेला तू कधी माणूस म्हणून सन्मान दिलाच नाहीस, उलट प्रत्येक गोष्टीत तिला कमी कसं लेखता येईल आणि तुझा शब्द कसा अंतिम राहील, हेच पाहिलं. मी तुला अनेकदा टोकलं, पण तू माझा मुलगा म्हणून संजूला आपल्या पदरा खाली असं दाबून ठेवलंस की त्याला बाप म्हणून स्वतःचे निर्णय घेता येईनासे झाले."

सुलोचनाबाई रडायला लागल्या, त्यांचे भावनिक अस्त्र बाहेर आले.

" तुम्ही पण तिच्याच बाजूने ? म्हणजे आता या वयात मी एकटी पडणार ? मी रक्ताचं पाणी करून संजूला वाढवलं, ते हा दिवस बघण्यासाठी ? "

" आई, तूम्ही संजूला वाढवलत , त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा श्वास घेण्याचं स्वातंत्र्यही हिरावून घ्यावं." रचना आता अधिक खंबीर झाली होती.

" गेल्या महिन्यात माझ्या आईची तब्येत बिघडली होती, संजूने त्यांना दवाखान्यात नेलं म्हणून तुम्ही तीन दिवस अन्नत्याग केला होता. का ? कारण संजूने तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाची काळजी केली ?
मम्मी, हे प्रेम नाही, हा ताबा आहे ! आणि मला माझ्या मुलांना अशा टॉक्सिक वातावरणात वाढवायचं नाहीये. जिथे आई सतत रडतेय आणि बाप सतत कोणाच्या तरी दबावाखाली वागतोय."
रचनाने संजूकडे पाहिले.

" संजू, टॅक्सी खाली उभी आहे. तुला यायचं असेल तर चल, अन्यथा मी मुलांन घेऊन चालले आहे. तुला तुझी आई आणि बायको यांच्यात निवड करायची नाहीये, तुला तुझ्या जबाबदारीची निवड करायची आहे."

संजूने एकदा आईकडे पाहिले, जी आक्रोशाचे नाटक करत होती, आणि मग बाबांकडे पाहिले, ज्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची स्वीकृती होती. गंगाधररावांनी संजूच्या खांद्यावर हात ठेवला.

" जा संजू. आज एक मुलगा म्हणून नाही, तर एक नवरा आणि बाप म्हणून स्वतःचं कर्तव्य पार पाड. आपल्या घराचा उंबरठा ओलांडला की तुला कळेल, स्वावलंबन काय असतं. तू इथे राहिला तर ही दोघीं मधली दरी कधीच भरणार नाही. लांब गेल्या शिवाय जवळची माणसं कळत नाहीत."

संजूने जड अंतःकरणाने आईच्या आणि बाबांना नमस्कार केला. सुलोचनाबाईंनी रागाने तोंड फिरवून घेतले, पण गंगाधररावांनी त्याला मिठी मारली. मुलं आणि रचना बाहेर पडले. संजूने आपली बॅग उचलली आणि तोही निघाला.
कॅब सुरू झाली तसे गंगाधरराव बाल्कनीत उभे राहिले. सुलोचनाबाई हॉलमध्ये कपाळाला हात लावून बसल्या होत्या. घरात आता फक्त त्या दोघं उरले होते. ज्या साम्राज्यासाठी सुलोचनाबाई भांडत होत्या, ते आता शांत आणि रिकामं झालं होतं.

" हे बघ सुलोचना, आज तू जिंकलीस. या घरात आता फक्त तुझाच शब्द चालणार आहे. पण ज्यांच्यावर शब्द गाजवायचा ती माणसं मात्र तू गमावली आहेस." गंगाधरराव शांतपणे पण खोल आवाजात पुटपुटले.

बाहेर पाऊस सुरू झाला होता, जणू रचनाच्या डोळ्यांतील अश्रूच आकाशातून वाहत होते. पण त्या टॅक्सीमध्ये बसलेल्या रचनाला आज पहिल्यांदाच वाटलं की, तिच्या शरीरातली हवा मोकळी झाली आहे. तिने नवीन घराची किल्ली हातात घट्ट धरली होती. ते केवळ नवीन घर नव्हतं, तर तिचं स्वतःचं जग होतं.