भाग १
निर्णय (३० वर्षांपूर्वी)
"आज शेवटचा दिवस..."
सुमती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या मनातील ही पुटपुट आज तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा मंत्र बनणार होती.
बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती, पण सुमतीच्या घरात मात्र वादळाचे थैमान चालू होते. भिंतीवरच्या जुन्या घड्याळाने रात्रीचे बारा वाजल्याची वर्दी दिली.
साखळी तुटल्यासारखे ते घड्याळ लोंबकळत होते, अगदी सुमतीच्या संसारासारखेच. सुमती घराच्या उंबरठ्यावर दोन जीर्ण गोण्या आणि मुलांच्या दप्तराच्या पिशव्या घेऊन बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी नव्हते, तर एक गोठलेली शांतता होती. ही शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची असावी तशी भासत होती.
घराच्या आतून वस्तू फुटण्याचे आवाज येत होते. विठ्ठलने आज पुन्हा तांडव सुरू केले होते. दारूच्या वासाने घर भरून गेले होते. संशयाची काजळी धरलेल्या विठ्ठलच्या बुद्धीला आज सुमतीचे चारित्र्य, तिचे कष्ट आणि तिचे मातृत्व काहीच दिसत नव्हते. त्याला दिसत होता तो फक्त त्याचा अहंकार.
विठ्ठल झुलत झुलत बाहेर आला. डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याने समोर बसलेल्या सुमतीकडे आणि त्या पिशव्यांकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले.
" कुठे चाललीस ? या पोरांना घेऊन कुठे जाणार तू ? तुझी लायकी काय आहे माझ्याशिवाय ? या दोन पोरांना रस्त्यावर भीक मागायला लावशील का ? " विठ्ठलने कडाडून विचारले.
सुमती हळूच उभी राहिली. तिने सात वर्षांच्या आदित्यला आणि पाच वर्षांच्या स्नेहाला आपल्या पदराखाली घट्ट ओढले. ती मुले भीतीने थरथर कापत होती. आदित्यने आईचा हात इतका घट्ट धरला होता की त्याच्या छोट्या नखांच्या खुणा सुमतीच्या हातावर उमटल्या होत्या.
सुमती अत्यंत शांत पण पर्वता सारख्या ठाम आवाजात म्हणाली,
" जिथे यांना भीती वाटणार नाही अशा ठिकाणी. तुमच्या या वागण्याने माझ्या मुलांचं बालपण करपून चाललंय विठ्ठलराव. ज्या वयात त्यांनी खेळायला हवं, त्या वयात ते कोपऱ्यात बसून तुमच्या शिव्या आणि वस्तू फुटण्याचे आवाज ऐकतायत. त्यांना उद्याचा सूर्य स्वच्छ पाहायचा असेल, तर मला आज हे घर सोडावंच लागेल."
" जिथे यांना भीती वाटणार नाही अशा ठिकाणी. तुमच्या या वागण्याने माझ्या मुलांचं बालपण करपून चाललंय विठ्ठलराव. ज्या वयात त्यांनी खेळायला हवं, त्या वयात ते कोपऱ्यात बसून तुमच्या शिव्या आणि वस्तू फुटण्याचे आवाज ऐकतायत. त्यांना उद्याचा सूर्य स्वच्छ पाहायचा असेल, तर मला आज हे घर सोडावंच लागेल."
विठ्ठल खदाखदा हसला,
" स्वाभिमान ? साधी भाजी घ्यायला माझ्याकडून पैसे मागावे लागतात तुला, तू स्वाभिमानाची भाषा करतेयस ? घराबाहेर पाऊल टाकलं ना, तर समाज तुला जगू देणार नाही. लोकं थुंकतील तुझ्यावर. टाकून दिलेली बाई म्हणून शिक्का बसेल कपाळावर."
सुमतीच्या डोळ्यांत आता ठिणगी पडली होती. ती म्हणाली,
" लोकांच्या थुंकण्याची भीती मला वाटत नाही, मला भीती वाटतेय ती या मुलांच्या डोळ्यांतल्या दहशतीची. आज मी बाहेर पडले नाही, तर उद्या ही मुलं तुमची सावली बनतील.
मला माझा मुलगा तुमच्यासारखा व्यसनी आणि संशयी बनलेला पाहायचा नाहीये. मला माझी मुलगी घाबरलेली पाहायची नाहीये. मी कष्ट करीन, लोकांची धुणी-भांडी करीन, पण या नरकात त्यांना ठेवणार नाही."
मला माझा मुलगा तुमच्यासारखा व्यसनी आणि संशयी बनलेला पाहायचा नाहीये. मला माझी मुलगी घाबरलेली पाहायची नाहीये. मी कष्ट करीन, लोकांची धुणी-भांडी करीन, पण या नरकात त्यांना ठेवणार नाही."
विठ्ठलने रागाच्या भरात हात उगारला, पण सुमती डगमगली नाही. तिने सरळ त्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या नजरेतील त्या धारदार तेजासमोर विठ्ठलचा हात हवेतच थबकला. सुमतीने आदित्य आणि स्नेहाचा हात धरला आणि पाठीमागे वळून न पाहता काळोखात पाऊल टाकले.
बाहेर पावसाचा जोर वाढला होता. चिखलातून वाट काढताना सुमतीची पावले अडखळत होती, पण तिचे मन मात्र स्पष्ट होते. तिची मनस्थिती मोठी विचित्र होती. एका बाजूला लग्नानंतर पाहिलेल्या स्वप्नांची राख झाली होती, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या भविष्याची आशा होती. ३० वर्षांपूर्वीच्या त्या काळात एका स्त्रीने स्वतःहून घर सोडणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते.
' नवरा कितीही मारहाण करणारा असला तरी तेच तुझं नशीब ' असं सांगणारा तो काळ होता.
सुमतीने काही दिवसांतच कायदेशीर लढाई सुरू केली. जेव्हा ती कोर्टात घटस्फोटाचे कागद मिळवण्यासाठी उभी राहिली, तेव्हा वकील, नातेवाईक आणि अगदी शेजार पाजारचे लोकही तिच्याकडे तुच्छतेने पाहत होते.
" काय गं सुमे, थोडं सोसायचं असतं. संसारासाठी बाईने झुकलेलं चांगलं. एवढ्याशा कारणासाठी घर फोडतात का कोणी ? " अशी टोमणे तिला ऐकावे लागत होते.
तिला 'घर फोडणारी स्त्री' म्हटले गेले. तिला चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न झाला. पण त्या प्रत्येक शब्दाचा वार सुमतीने झेलला. तिच्या मनात फक्त एकच प्रतिमा होती.भीतीमुक्त वातावरणात शाळेचा अभ्यास करणारा आदित्य आणि हसणारी स्नेहा.
त्या रात्री जेव्हा ती एका लहानशा भाड्याच्या खोलीत मुलांसह पोहोचली, तेव्हा तिथे वीज नव्हती. पण खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात तिला मुलांचे चेहरे शांत दिसले.
कित्येक महिन्यांनंतर ती मुले भीतीशिवाय झोपली होती. सुमतीने आपल्या मुलांच्या कपाळावर हात फिरवला. तिच्या अंगावरच्या जखमा ठणकत होत्या, पण मनात मात्र एक वेगळेच समाधान होते. तिने फक्त घर सोडले नव्हते, तर तिने गुलामीची साखळी तोडली होती.
आज तिने काडीमोड घेताना स्वतःच्या सुखाचा विचार केला नव्हता, तर त्या दोन निष्पाप जीवांच्या 'उज्ज्वल भविष्यासाठी' तो कठोर निर्णय घेतला होता. संघर्षाची ही फक्त सुरुवात होती, पण सुमतीने आता मागे न वळण्याचा निश्चय केला होता. तिच्यासाठी हा घटस्फोट केवळ एक कागद नव्हता, तर ती तिने स्वतःसाठी आणि मुलांसाठी मिळवलेली एक 'स्वातंत्र्याची किल्ली' होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा