संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - ३
आई, तिला सासू-सासऱ्यांवरून, असे काही बोलेल याची वैभवीला यत्किचिंतही शंका आली नव्हती. अचानक बदलेल्या आईच्या पवित्र्याने, तिला काही उत्तर द्यायला सुद्धा सुचत नव्हते.
तिचं डोकं सुन्न होेत चाललं होतं.
" आता का शांत बसलीस? बोलत का नाहीस? सासू सासरे इथे राहीले तर तुला अडचण होते. ते घरात, तुला हवे तसे काम करत नाही. ते आजारी पडले तर, त्यांचेचं तुला करावे लागेलं, म्हणून ते तुला जवळ नको असतात, होय ना? ", कंबरेवर दोन्ही हात ठेवून वत्सलाबाई आज वैभवीचा चांगलाच समाचार घेत होत्या.
" आई कोणी सांगितले तुला? तू म्हणतेस तसे काहीच नाही. त्यांनाच इथे रहायला आवडत नाही आणि कामाचा काय गं एवढा बाऊ करतेस? माझ्या घरात कामं करायला, एक सोडून दोन दोन बायका आहेत.", स्वतःचा बचाव करण्यासाठी वैभवी, जे सुचले ते बोलून गेली.
" कसे आवडेल? त्यांना आवडेल अशी, तू कधी नीट त्यांच्याशी वागलीस का? त्यांच्याचं लेकाच्या घरात, त्यांना परकेपणाची भावना, त्यांच्या मनात निर्माण व्हायला तू कारणीभूत आहेस. काम करायला दोन बायका असल्या तरी, मुलाबाळांच्या घरात, बाईला काही कमी काम नसतं. काम करणाऱ्यालाचं ते कळतं. विशेषता वय आणि आजाराने त्रस्त झालेल्या बाईला तर जास्तचं ते जाणवतं.", वत्सलाबाईं वैभवीला दोष देत म्हणाल्या.
" म्हणजे काय गं आई? मी नक्की काय करते म्हणायचे आहे तुला? माझी सासू, इथे राहिल्यानंतर, कोणता एवढा कामाचा डोंगर उपसत असते? मी तुझ्याविषयी चांगला विचार करत होते. तुझं आयुष्य तू आता मोकळेपणाने जग, असे सांगायला आले होते. खूप केलेस तू सर्वांसाठी, माझ्यासाठी, दादासाठी. बाबांच्या आजारपणामुळे तुला कसली हौसमौज सुद्धा करता आली नाही. म्हणूनच तुला माझ्या मुलांच्या जबाबदारीतून मुक्त करत होते. पण तू मात्र माझ्या सासू सासऱ्यांवरून मलाचं झापतेस.", वैभवीचा आता संयम सुटायला लागला होता.
" चला, माझ्याविषयी तुला चांगला विचार करता येतो यातचं आनंद आहे. आता तुमची गरज संपली. मुलांची पाळणाघरात सोय झाली. तेव्हा तुला माझ्या आयुष्याची आठवण झाली. मला मोकळीपणाने जगं म्हणायला, आता तू मोकळी झालीस. अतिशय स्वार्थी मुलगी आहेस तू. आई, तू इथेच राहून आराम कर. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. तुला हवे नको ते मी बघेन, असे म्हणायला मात्र तुझी जीभ धजवली नाही. म्हणजे फक्त तुझ्या गरजेला मी इथे रहावी, असेच म्हणायचे आहे नं तुला?", वत्सलाबाईंनी मनात सलत असलेला, वैभवीचा स्वार्थीपणा अखेर शब्दांतून व्यक्त केला.
त्याला कारणही तसेच होते. दोन दिवसांपूर्वी, वैभवी आणि समीरमध्ये झालेले भांडणं, चुकून त्यांच्या कानावर पडले होते. भांडणाचा मुख्य विषय त्या आणि त्यांच्या विहीन बाई होत्या, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी दरवाजामागे उभे राहून, त्या दोघांचे संपूर्ण भांडणं चोरून ऐकले होते.
त्यांना इथे ठेवण्यामागे, वैभवीचा स्वार्थी हेतू लक्षात आला होता. तिची आई घरात काम करण्यासाठी उपयोगी पडते आणि तिच्या सासूचा इथे राहून फारसा उपयोग होत नाही. असे ती तिच्या नवऱ्याला पटवून देत होती. सासू इथे रहायला आल्यावर, ती मुद्दाम काही न काही कारणं काढून भांडण उकरत होती.
तिच्या मुलीने, स्वतःच्या स्वार्थासाठी सासू सासऱ्यांना, जाणूनबुजून त्यांच्या एकुलत्या एक मुलापासून आणि नातवांपासून दूर ठेवले होते. जावयाचा शेवटी नाईलाज झाला होता म्हणून त्याने,\"जर माझे आईवडील तुला घरात नको असतील तर, तुझी आईही मला माझ्या घरात रहायला नको.\" म्हणून वैभवीला निक्षून सांगितले होते. निर्णय घेण्यासाठी तिला पंधरा दिवसांची मुदत दिली होती.
तो त्याच्या ठिकाणी बरोबरचं होता. आई वडील, त्याच्या सोबत राहीले तर, त्यांची काळजी घेणं त्याला सोपे पडत होते. पण वैभवीच्या आडमुठ्या वागणुकीमुळे ते सुख त्याला मिळायचे नाही. त्याची तर त्याच्या आई वडीलांसह, तिच्या आईलाही त्यांच्या सोबत राहण्याची हरकत नव्हती. पण वैभवीला तेही मान्य नव्हते.
स्वतःच्याचं मुलीचे दुटप्पी वागणे तिला अजिबात आवडले नव्हते. आतापर्यंत तिच्या बऱ्याच न आवडणाऱ्या गोष्टीकडे, मुलीच्या संसारात लुडबुड नको, म्हणून वत्सलाबाईंनी कानाडोळा केला होता. परंतू आता पाणी डोक्यावरून चालले असल्याचे त्यांना कळून चुकले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या स्वभावाविरुद्ध जाऊन मुलीला बोलण्याचे धाडस केले होते.
वैभवी मात्र आईच्या बदलत्या रुपाकडे पाहून हैराण झाली होती. तिला कळतच नव्हते आई अशी अचानक कशी काय बदलली. तिला स्वतःच्या वागण्याचे, काय समर्थन द्यावे हेही सुचत नव्हते.
मुलीच्या सासूच्या भल्याचा विचार करणारी आई असू शकते, हे तिच्या कल्पनेच्याही बाहेर होते. त्यातही तिची आई, जी समोरचा माणूस कसाही वागला तरी, निमूटपणे सहन करणारी, तोंडातून कधीही ब्र न काढणारी, आज तिच्यावर चांगलेच तोंडसुख घेत होती.
विचार करून ती म्हणाली, " आई तू फक्त मुलांना सांभाळतेस. तेही तू त्यांच्यात चांगली रमली आहेस, हे पाहून त्यांना सांभाळण्यासाठी, नवीन बाई ठेवण्याचे मी टाळले. बाकीचे सगळे काम तर रखमा आणि ज्योती करतात. कधीतरी सांगितले असेलही मी, तुला कपाट आवरायला किंवा फ्रिज साफ करायाला किंवा ज्योतीच्या गैरहजरीत, तुझ्या हातच्या आवडत्या काही डिश बनवायला. मला वाटले होते, तुला आवडते हे सगळं करायला. एवढाच त्रास होत होता तर सांगायचे होते मला." वैभवीचा आवाज हळुहळू वाढायला लागला होता.
" आई आहे नं गं तुझी मी. लेकीच्या सुखासाठी कितीही कष्ट करायची तयारी असते मनाची. पण मलाही कधी काही त्रास होत असेल, दुखतं असेल, खुपतं असेल, याची पोटच्या पोरीला जाणीव होत नाही, याचं दुःख होतंय मला. कारणाशिवाय दोन शब्द सुद्धा, माझ्याजवळ बसून, बोलायला वेळ नसतो गं तुला. मनाला खूप वाईट वाटतं. आईलाही प्रेमाची, मायेची, आपलेपणाची भूक असते.", वत्सलाबाई बोलता बोलता गहिवरून गेल्या होत्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा