Login

अन् ती हसली..... (भाग -४)

When Mother Stays With Her Married Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  :-  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - ४


" आई आहे नं गं तुझी मी.  लेकीच्या सुखासाठी कितीही कष्ट करायची तयारी असते मनाची.  पण मलाही कधी काही त्रास होत असेल, दुखतं असेल, खुपतं असेल, याची पोटच्या पोरीला जाणीव होत नाही, याचं दुःख होतयं मला. कारणाशिवाय दोन शब्द सुद्धा, माझ्याजवळ बसून, बोलायला वेळ नसतो गं तुला.  मनाला खूप वाईट वाटतं. आईलाही प्रेमाची, मायेची, आपलेपणाची भूक असते.", वत्सलाबाई बोलता बोलता गहिवरून गेल्या होत्या.

वत्सलाबाईंच्या आवाजातला कंप ऐकून वैभवीच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळत होते. आज त्यांचे बोलणे थांबता थांबत नव्हते.  इतक्या आवेशात, इतकं बोलण्याची सवय नसल्यामुळे त्यांना मध्येच दम लागत होता.  

आताही बोलता बोलता दम लागला म्हणून त्या शांत बसून राहिल्या होत्या.  पण अगदी काही क्षणच. लगेच त्यांच्या मनाने उचल खाल्ली. \"नाही, आज शांत बसून चालणार नाही. परत केव्हा बोलण्याची संधी मिळेल - नाही मिळेल माहीत नाही.  बोलायला जमेल - नाही जमेल सांगता येत नाही.  आजचं आणि आताचं बोलायला हवं.  तिची चूक तिला दाखवायला हवी.  हयगय करून चालणार नाही.\" असा विचार मनात येताचं, त्यांनी पुन्हा बोलायला सुरवात केली. 

" वैभू बाळा, मी माझ्या घरी अगदी सुखात होते.  काही दुखले खुपले तर न सांगताही माझ्या सुनेला कळायचे.  तू पोटची मुलगी असूनही तुला कळू नये याचेच आश्चर्य वाटते आणि वाईटही वाटते.  जी मुलगी सख्ख्या आईच्या, हया भावना जाणून घेऊ शकत नाही, तिची जाणिव करू शकत नाही, ती सासू सासऱ्यांची देखभाल कशी करणार म्हणा? "  बोलताना हळव्या झालेल्या वत्सलाबाई मध्येच तिच्याकडे बघून छदमीपणे हसल्या.

" आई,‌ अगं बस नं आता. ...  किती बोलतेस. तुझा काहीतरी गैरसमज होतोय म्हणून तू …", वैभवीचा आवाज बोलताना खोल गेला होता.

" माझ्यावर बोलायची वेळ तू आणलीस म्हणून बोलते.  गुढघ्याला माझा मीच बाम चोळत असलेली मला बघूनही, न बघितल्यासारखे करतेस.  \"तुझे गुडघे दुखतात तर, आई डॉक्टरकडे जाऊया आपणं\"  असे कधीतरी वरकरणी बोलून दाखवतेस, पण आजपर्यंत कधी डॉक्टरकडे घेऊन गेली नाहीस की चुकून सुद्धा गुडघे चोळून दिले नाहीस कधी.  तुला, माझी काळजी आहे हे फक्त वरवर दाखवतेस. कामवाल्या बायांना सुध्दा सुट्टी असते गं.  तुलाही आठवड्याला शनिवार रविवारी सुट्टी असते. पण माझे काय?  मला कधी सुट्टी, कोणत्या कामासाठी मिळालेली, मला तरी आठवत नाही.  उलट तुम्हाला सुट्टी असली की माझ्या कामाची यादी अजून वाढते.  हे तुझ्या कधी लक्षातही येत नाही याचे वाईट वाटते.  आई न सांगता, बोभाटा न करता, दुःखले खुपले तरी काम करतेय तर, करुंदे तिला काम … कशाला तिला थांबवायचे.  हया तुझ्या बेफिकीर वृत्तीचा त्रास होतो गं माझ्या मनाला.". बोलताना त्यांचा गळा दाटून आला होता.

" आई, अगं दिवसभर ऑफीसमध्ये काम करून मी थकते.  त्यामुळे ..", वैभवी बोलायचा प्रयत्न करत होती.

परंतु, वत्सलाबाईंनी हातानेच \"थांब, माझे बोलणे अजून संपले नाही.\" असे इशाऱ्यानेच खुणावले आणि त्या पुढे बोलू लागल्या, " तू ऑफिसला जाते म्हणजे तू दिवसभर काम करतेस आणि मी दिवसभर घरी असते म्हणजे मी रिकामटेकडी असते, असा तू तुझा समज करून घेतला आहेस.  मागे घरात राहणाऱ्या बाईला किती कामं असतात, याची यादी देत बसले तर मारुतीच्या शेपटी सारखी लाबंत जाईल.  प्रत्यक्षात जरी सर्व काम करत नसले तरी घरात कामाला येणाऱ्या बाईंच्या वेळेत मला जागरूक रहायला लागते.  त्या येतात तेव्हा कितीही कंटाळा आला, गुडघा दुखत असला तरी, हातातले काम टाकून, उठून  त्यांच्यासाठी दार उघडावं लागतं.  त्यांना उशीर होत असेल तर, त्या येईपर्यंत ताटकळत बसायला लागतं आणि आल्याचं नाही तर सगळं स्वतःलाचं उरकावं लागतं.  एकवेळ स्वतः साठी चहा करण्याचा कंटाळा केला तर चालतो गं, पण घरात धुणीभांडी करणाऱ्या बाईला तरी न चुकता चहा करून द्यावा लागतो." 

बोलता बोलता वत्सलाबाईंंचे, तिने घातलेल्या  हाफ पँट कडे लक्ष गेले आणि रोज सकाळी, डोक्याला तिडीक बसणारी गोष्ट त्यांना आठवली.  त्या पुढे बोलू लागल्या.," सकाळी उठल्यावर, तुझा तू नास्ता, नट्टापट्टा आवरून निघून जातेस.  तुमचे बदलेले कपडे सुद्धा रुममध्ये तसेच इथे तिथे पडलेले असतात.  ओले टॉवेल बेडवरून लोबंत असतात.  (तिने घातलेल्या हाफ पँटकडे निर्देशन करून) ही ….तू …. जी हाफ चड्डी घातलेली असते नं … तिचं तू उतरवल्यानतंरचं वेटोळंही तसेच जमिनीवर लोळत पडलेले असते.  बरेच वेळा तू तुझे असली का नकली दागिने, टेबलवर काढून ठेवलेले असतात, ते नीट पुन्हा कपाटात आत सारायचे असतात.  हे सगळं बाई झाडू हातात घ्यायच्या आत उरकावं लागतं.  कारण बाईला थांबायला वेळ नसतो.  ही असली कितीतरी चिल्लर कामचं, जीव दमछाक करून सोडतात.  त्याचंही एवढं वाईट वाटत नाही गं पण … " वत्सलाबाई बोलता बोलता मध्येच थांबल्या.

" पण काय? … आता एवढं बोलतेयस तर .  बोल अजून काय बोलायचे ते .. . कळू दे मला तुझ्या मनात काय काय आहे ते.  मी ऐकतेय.", वैभवी खाली मान घालून बोलली.

" माझ्यासमोर बोलतेस की मला काय काम असते?  आणि नवऱ्यासमोर मात्र तुझी आई किती कामाची आहे हे पटवून देतेस.  का तर तुझ्या सासूला इथे, त्याने आणू नये म्हणून?",  वत्सलाबाई शेवटी कानावर पडलेलं बोलून गेल्या.

मुलीकडे राहायला आल्यापासून, कधीही कोणत्याही गोष्टीत फारसे न बोलणाऱ्या वत्सलाबाई, आज जीव तोडून बोलत होत्या.  बोलून बोलून त्यांना पुन्हा दम लागला होता.  घसा कोरडा पडला होता.

तर वैभवीला, अचानक झालेल्या त्यांच्या शाब्दिक माऱ्यापुढे तोंड कसे द्यावे प्रश्न पडला होता.  ती शांत बसून मुकाट्याने नुसतं ऐकत होती.  मध्येच डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू पुसत होती.  बोलायचा प्रयत्न करत होती. मनातून तिला, तिच्यामुळे आईला झालेल्या त्रासाचं वाईट वाटत होते.  तिला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही आईला किती त्रास देतात, हे लक्षात यायला लागले होते.‌  ती आईला किती गृहीत धरते, हे जाणवायला लागले होते.

वत्सलाबाई, मनात नसतानाही आज सगळं बोलून दाखवत होत्या.  इतके दिवस मुलीच्या सुखासाठी आई म्हणून त्या निस्वार्थीपणे झटत होत्या.  पण त्यांच्या त्या अविरत झटण्यामुळेच मुलगी त्यांचा फायदा घेते.  तिच्या सासू सासऱ्याला दूर लोटते.  हे त्यांच्या पापभिरू स्वभावाला अजिबातच पटले नव्हते.