Login

अन् ती हसली ..... भाग -५

When Mother Stays With Her Married Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
  संघ  :-  मुंबई
विषय  : -  .... कौंटुबिक
शीर्षक : -  अन् ती हसली ..... भाग - ५


वत्सलाबाई, मनात नसतानाही आज सगळं बोलून दाखवत होत्या.  इतके दिवस मुलीच्या सुखासाठी आई म्हणून त्या निस्वार्थीपणे झटत होत्या.  पण त्यांच्या त्या अविरत झटण्यामुळेच मुलगी त्यांचा फायदा घेते आणि तिच्या सासू सासऱ्याला दूर लोटते.  हे त्यांच्या पापभिरू स्वभावाला अजिबातचं पटले नव्हते.

त्यांना कळले होते की, सासू सासरे असले की वैभवी मुद्दाम ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबून, घरी उशीरा येत असे.  कधी स्वतःचं आजारी असल्याचे नाटक करत असते.  कधी उगाचच नवऱ्याचा राग राग,  तर कधी घरात नुसती आदळ आपट करून सर्वांना नकोसं करून सोडत असे.

नातवांच्या ओढीने आलेले बिचारे सासू सासरे, शेवटी त्यांच्यामुळे मुलगा आणि सूनेमध्ये भांडणं नकोत म्हणून, नाईलाजाने, निमूटपणे स्वतःहून निघून जातात. 

वत्सलाबाईंना मुलीच्या घरी थांबायची अजिबात इच्छा उरली नव्हती.  पण तरीही वैभवीला तिची चूक दाखवून, ती सुधारण्याची बुध्दी तिला होईपर्यंत त्यांच्या मनाने थांबायची तयारी दर्शवली होती.

वैभवीच्या मनात, सासू-सासऱ्यांबद्दल आदर निर्माण व्हायला हवा होता.  त्यांची जाणिव तिने करायला हवी होती.  काळजी घ्यायला हवी होती आणि तीही प्रेमाने.  हे होईपर्यत वत्सलाबाई तिथून हलणार नव्हत्या.  तिची आई म्हणून, त्यांना त्यांचे हे कर्तव्य पार पाडायचे होते.

दरवाज्याची बेल वाजली, तशी वैभवी उठली.  आईच्या तावडीतून सुटण्यासाठी तिला आयतेच कारण मिळाले होते.  संध्याकाळचे सहा वाजून गेले होते.  समीर आणि लवकुश स्विमिंगला गेलेले परत आले होते.  आई बोलत होती, तेव्हा हे तिघे घरात नव्हते, म्हणून मनातल्या मनात तिने देवाचे आभार मानले होते.

आईचे नॉनस्टॉप बोलणे ऐकून आणि रडून रडून तिचे डोके दुखायला लागले होते. आई खूप दुखावली गेली आहे. याचे तिला मनातून खूप वाईट वाटले होते.  या सर्वाला तिचा आळशीपणाचं कारणीभूत होता, हेही तिला जाणवले होते.

\" आज रात्री झोपेपर्यंत आणि उद्या संपूर्ण दिवस, सुट्टी आहे तर, कितीही काम करण्याचा कंटाळा आला तरी आईला अजिबातच सांगायचे नाही.\" असे तिच्या मनाने ठाम ठरवले.  \"तसेही विशेष काय काम असणार आहे? स्वयंपाक आणि लादी भांडी तर त्या दोघी करतीलच.\" अशी स्वतःच्याच मनाची समजूत काढून, ती स्वतःच्या बेडवर जाऊन आडवी झाली.

" मम्मा भूक लागली …. चोकलेट.. दूध … बिस्कीट देना .. ",आजीला झोपलेले पाहून, लव कुश वैभवीच्या जवळ जाऊन गलका करू लागले

" अरे किती आरडाओरडा करत आहात.  जा आजीला सांगा, आजी देईल ..  माझं डोकं दुखतंय." तिने तिच्या अंगावर पडलेल्या दोघांना बाजूला सारत कुस बदलली.

" आजी धोपलीय.", लव  " मम्मा देना .... बुक लागली.", कुश.  दोघे तिला त्यांच्या नाजूक हाताने गदागदा हलवून उठवायचा प्रयत्न करू लागले.

" सासूबाई झोपल्या आहेत. .. बरं नाही का त्यांना? …  अजून उठल्या नाहीत … नाहीतर एव्हाना माझ्यासाठी चहा तयार असतो.", समीर स्विमिंगच्या कपड्यांची सॅग बेडच्या बाजूला टाकत बोलला.

वैभवीने मिटलेले डोळे खाडकन उघडले. लवकुशला " हो .. हो .. देते .. देते … मला उठू तरी द्या.", म्हणतं ती बेडवरून ताडकन उठली.

" हुं ....  थकली आहे जरा, मीच म्हंटले आराम कर …. मी करते तुझ्यासाठी चहा", असे समीरला बोलून ती किचनकडे वळली.

तिला असे ताडकन जाताना पाहून समीर तिच्याकडे आ वासून बघतच राहीला.  " आज सूर्य नक्की कुठे उगवला होता, पहायला पाहिजे होतं.", असे त्याच्या ओठावर आले होते, पण उगीच वाद होईल म्हणून त्याने आतल्या आत गिळून टाकले.

\" शी …. एवढं ठरवलं होते, आईला काहीचं काम सांगायचे नाही, तरी कशी काय मी लगेच विसरले?  नशीब लव कुशने आजीला उठवले नाही?\"  मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत तिने गॅसवर चहा ठेवला.  दोन कपामध्ये दूध ओतून ओव्हन मध्ये गरम करायला ठेवले.

लव कुशला चॉकलेट मिल्क देऊन तिने समीरला चहासाठी आवाज दिला.  स्वतःच्या चहाचा कप टेबलावर ठेवून, आईसाठी पुन्हा चहाचा कप घेऊन आत गेली.

" आई उठ आता.  फ्रेश हो नी चहा घे.  बोलून बोलून तुझेही डोके दुखत असेल.  खूप बोललीस आज.  मला माहित आहे मी जरा चुकतेय.  पण म्हणून सर्व एकाच दिवशी ? ….  जाऊंदे पुन्हा विषय नको.  आज आणि उद्या मी घरीच आहे, तोपर्यंत तरी तू कोणत्या कामाला हात लावू नकोस.  आणि मी जरी तुला चुकून सांगितले तरी तू स्पष्ट नकार दे.", असे बोलून आईच्या प्रतिक्रियेची वाट न बघता ती बाहेर निघून आली.

वत्सलाबाई उठल्या, फ्रेश झाल्या.  \" एवढीही वाईट नाही मनाने माझी लेक.  माया आहे तिला सुद्धा.  समजावले तर नीट वागेल.\" , चहा घेता घेता त्यांच्या मनात विचार आला तसे नकळत त्यांचे डोळे पाणावले.  ओठावर हलकेसे हसू उमटले.  बोलून आलेला थकवा अचानक कमी झाल्याचे जाणवले.

" अगं वैभवी, खिडक्या नाही लावल्यास का?  मच्छर यायला लागलेत.  मी या रुमची लावून घेतो.  बाकीच्या तू लावं. ", समीर हॉलमध्ये येता येता म्हणाला.

वैभवीने दोन्ही बेडरूम आणि हॉलच्या खिडक्या लावून घेतल्या.   खिडक्या लावण्यापूर्वी, तिने दोरीवर वाळत घातलेले कपडे काढून घेतले.  त्यांच्या घड्या घालून, कपाटात ज्याच्या त्याच्या जागेवर नेऊन ठेवले.

वैभवीने नाईलाजाने का होईना तिचा आळस झटकून टाकला होता.  ठरवल्याप्रमाणे पडेल ते काम ती उरकत गेली.  कुशचा धक्का लागून लवचा चॉकलेट मिल्क कप लवंडला होता.   दोघांच्या अंगावर दुधाचे तुषार उडून त्यांचे कपडे खराब झाले होते.  तिने समीरला त्यासाठी आवाज दिला.  पण समीरने तिचे काहीएक ऐकले नाही.  त्यांना घेऊन तो स्विमिंगला गेला होता.  चांगले दोन तास त्यांच्यासोबत घालवले होते.  त्यामुळे तो आता कोणतेच काम करणार नव्हता. 

वैतागतचं तिने त्यांचे कपडे काढून त्यांना दुसरे कपडे घातले.  सांडलेले दूध पुसून काढले.  पुन्हा दूध गरम करून त्याला चॉकलेट मिल्क दिले.  मध्येच " मम्मा पॉटी …. मम्मा  पॉटी " लवने आवाज दिला.  त्याला घेऊन ती बाथरूममध्ये जाते न जाते तोच दरवाजाची बेल वाजली.   तिने समीरकडे रागात बघून दरवाजा उघडला.

ज्योती आली होती.  किचनमध्ये शिरताचं, " आज काही बनवायचं नाही का? ओट्यावर भाजी काढून ठेवलेली दिसत नाही. आजी घरात नाहीत का ?", साडीचा पदर कंबरेला खोचता खोचता तिने विचारले.

\"आईने हिला नुसतं लाडावून ठेवलंय.  फ्रिज मध्ये कुठली असेल ती भाजी करायला सांगायचे सोडून, स्वतः तिला काढून देत बसते.\" वैभवी मनातल्या मनात चरफडत होती.

सर्वांचे चहा दुधाचे कप उचलून बेसिनमध्ये टाकता टाकता, "बघ गं फ्रिज मध्ये ज्या असतील त्यातली एखादी कर.", वैभवीने सांगितले.

" भेंडी आणि वांगी आहेत .. कोणती करू?", ज्योतीने विचारले.

" भेंडी कर …" वैभवी

ज्योती ती धुवून चिरायला घेणार, तेवढ्यात वैभवी म्हणाली, "नको ..  नको .. भेंडी .. भरलेली वांगीच कर तू .."

" बरं वांगी तर वांगी … , पण याला शेंगदाण्याचा कूट नाही …  सकाळी आजींना म्हंटले होते शेंगदाणे संपलेत.  तुम्हाला सांगितले नाही का आजीने? ", ज्योतीने आश्चर्य व्यक्त केले.

" हं, ती बोलली.   काही वाण सामान भरायचेच आहे उद्या.  म्हणून म्हंटले त्याच्या सोबतच मागवेन.", वैभवी खरं तर शेंगदाणे आणायला विसरली होती.

" मग सांगा आता लवकर काय बनवू ते? ...  फुकट वेळ जातो माझा .... आजी बऱ्या ….. आधीच भाजी काढून ठेवतात ओट्यावर .....   आल्या आल्या भाजी फोडणीला टाकली की ती शिजता शिजता चपात्या लाटता येतात.   वेळ फुकट जात नाही नी पुढच्या कामालाही वेळेवर जाता येतं.", थोड्या नाराजीनेच ज्योती बोलली.

कोणती भाजी बनवायला सांगायची, ह्याचा विचार करूनच वैभवीचे डोके भनभिनायला लागले होते. एकाला एक आवडते तर दुसऱ्याला दुसरी.  शेवटी वैतागून तिने अंड्याची बूर्जी, मुलांसाठी डाळ भात बनवायला सांगितले. 

टेबलवर तिचा भरलेला चहाचा कप बघून, तिला  वाईट वाटलं.  तिने तसाच थंडगार चहा घशाखाली सारला.

ज्योतीने चपाती भाजी डाळ भात बनवून झाल्यानंतर, जाताना \"उद्या येत नसल्याची\" वैभवीला आठवण करून दिली.  तिची आई आजारी आहे म्हणून ती तिला भेटायला जाणार होती.  हे सकाळीच तिने वैभवीला सांगितले होते.

रात्री जेवताना वैभवीने मुलांसाठी आयत्या वेळी लागणारे पापड, तर इतरासाठी कोशिंबीर तयार करून, सर्वांना जेवणाची ताटे केली.

वत्सलाबाई अजूनही त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या नव्हत्या. \"बाहेर आले तर वैभवीवरचा राग गळून पडेल\", अशी त्यांना शंका वाटत होती.  वैभवीला मुलाबाळांच्या घरात, मागे राहणाऱ्या बाईंच्या कामाची जाणीव व्हायला हवी म्हणून तिने शक्यतो जमेल तेवढा अबोला आणि असहकार चालू ठेवायचं ठरवलं होतं.

वत्सलाबाईंनी, वैभवीने आणलेल्या जेवणाच्या ताटाला नमस्कार करून ते बाजूला सारले.