Login

अन् ती हसली..... भाग - ६

When Moter Stays With Married Daughter


राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - ६


वत्सलाबाई अजूनही त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या नव्हत्या. \"बाहेर आले तर वैभवीवरचा राग गळून पडेल\", अशी त्यांना शंका वाटत होती. वैभवीला मुलाबाळांच्या घरात, मागे राहणाऱ्या बाईंच्या कामाची जाणीव व्हायला हवी म्हणून तिने शक्यतो जमेल तेवढा अबोला आणि असहकार चालू ठेवायचं ठरवलं होतं.

वत्सलाबाईंनी, वैभवीने आणलेल्या जेवणाच्या ताटाला नमस्कार करून बाजूला सारले.

" आई सोड नं गं राग आता ? जेवणावर राग कधी काढू नये असे तूच सांगतेस नं?", वैभवी केविलवाणी चेहरा करत तिची मनधरणी करत होती. वैभवीला वाटले, तिच्यावरच्या रागामुळे आई जेवत नसावी.

" शनिवारी मला मांसाहार चालत नाही हे विसरलीस का तू ?", वत्सलाबाई नाईलाजाने बोलल्या.

" अरे देवा! सॉरी … सॉरी… लक्षातच नाही आले माझ्या. मी करते दुसरी भाजी तुझ्यासाठी? काय करू? सांडग्याची भाजी चालेल?", वैभवीने कपाळावर हात मारत विचारले.

" हं ", वत्सलाबाईंनी नुसताच होकार दिला.

वैभवी घाईतच जेवणाचे ताट घेऊन बाहेर आली. समीरचे त्याकडे लक्ष गेले, " सासूबाई जेवत नाही का? काय होतयं का त्यांना ? तसेच काही असेल तर डॉक्टरकडे घेऊन जा.", त्याने काळजीने वैभवीला सांगितले.

" काही नाही रे मीच विसरले, शनिवारी तिला नॉन व्हेज चालत नाही ते. सांडग्याची भाजी करून देते आता.", वैभवी मनातून स्वतःवरच चिडली होती. पण तरी ती प्रयत्नपूर्वक शांत राहिली होती.

" कमाल आहे! तुला शनिवारी सुट्टी असते हे माहीत असून सुद्धा तुझ्या लक्षात कसे आले नाही आज शनिवार आहे ते? त्या तर रोज घरी असूनसुद्धा, नुसता वारचं नाही तर कधी संकष्टी, कधी एकादशी, कधी अंगारकी वैगरे वैगरे सर्व अगदी बरोबर लक्षात ठेवत असतात. खरोखरचं ग्रेट आहेत सासूबाई.", समीरने शेवटी वैभवीच्या विसरभोळ्या स्वभावाचा उद्धार करण्याची संधी साधलीच.

" हो, तिला काय तेवढंच काम असते. उठली की आधी कॅलेंडर बघत असते. इथे मला ऑफिसला पळायची घाई असते.", वैभवी स्वतःची चूक मान्य न करता कांदा चिरता चिरता म्हणाली.

" अगं पण त्या रात्रीच्या जेवणात चपाती खात नाहीत नं? ताटात तर चपात्या दिसतायत.", त्यांच्या परत आणलेल्या ताटात चपात्या पाहून, समीरने वैभवीला आठवण करून दिली.

" अरे देवा! म्हणजे आता भाकरीही थापायला लागणार? आजचा दिवसचं मेला माझा चांगला नाही. ज्योतीच्या सुद्धा लक्षात कसे आले नाही ? लक्षात आले असले तरी, मुद्दामचं तिने मला विचारले नसेल. तेवढाच तिचा भाकरी करायचा त्रास वाचला नं.", म्हणतं तिने एका बाजूला पिठल्याचं आधण ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला वैतागतचं भाकरी थापायला घेतली.

वैभवी रात्री झोपेपर्यंत एकामागून एक कामं आवरत होती. सर्वाची जेवणं झाल्यानंतर, टेबल आवरणं, ओटा आवरणं, मुलांची घरभर पसरलेली खेळणी गोळा करून एका जागी ठेवणं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या भरून फ्रिज मध्ये ठेवणं ही कामे खरं तर तिची आई रोजच्या रोज न चुकता करत असे.

वैभवी फक्त जेवणाची ताटे वाढायची काम करत असे. कधीतरी पापड तळायचे नाहीतर कोशिंबीर बनवायचे काम, एवढेच काय ते ऑफिसमधून आल्यानंतर ती काम करत असे. जेवल्यानंतर, " एकदा हातावर पाणी पडले की कामाचा कंटाळा येतो, तूच आवर आई आता सगळं.", असं म्हणून खुशाल मोबाईल घेऊन बसत असे किंवा मुलांना तरी घेऊन टाईमपास करत असे.

वत्सलाबाई सुद्धा, " बरं बाई " म्हणतं सर्व आवरायला लागायच्या.

समीर केव्हातरी वैभवीला म्हणायचा, " अगं त्या सुद्धा दिवसभर मुलांच्या मागे धावून थकतात. तू आवर नं."

" मी ही दिवसभर काम करून थकते. दुपारी तिला झोपायला तरी मिळतं, तसे मला नाही मिळतं. अन् आईला सवय आहे कामाची. एवढंच वाटत असेल तर तू आवर." वैभवी बेफिकीरपणे उत्तर द्यायची.

वत्सलाबाई, "अरे तुम्ही दोघे वाद घालू नका. मी आवरते." म्हणून सगळं आवरून घ्यायचा. नाईलाजाने समीर कधी कधी तिला मदतही करायचा. पण बरेच वेळा समीर लवकर ऑफिसला जायचा आणि घरीही उशीरा यायचा. म्हणून वत्सलाबाईचं त्याला म्हणायच्या, " राहूद्या ओ, तुम्हीही एका सकाळी घराबाहेर पडता, आणि उशीरा घरी येता. थकत असाल. करते मी हळू हळू."

लव कुश नेहमीप्रमणेच रात्री झोपायला आजीकडे आले होते " आजी आजी, आज कोण्ती गोष्त सांगनाल तू ?", म्हणतं तिच्या मांडीवर येऊन बसले. पण आजीने, " अरे बाळांनो आज आजी नाही गोष्ट सांगणार, आज नं तुमची मम्माचं, तुम्हाला छान नवीन गोष्ट सांगणार आहे आणि तिच्या जवळच तुम्हाला झोपवणार आहे.", असे सांगून त्या दोघांना त्यांनी वैभवीकडे पिटाळले.

मुलांनी सुद्धा पडत्या फळाची आज्ञा मानून वैभवीकडे धूम ठोकली. वैभवी आधीच दुपारच्या आईच्या बडबडीने आणि दिवसभरच्या कामाने वैतागली होती. आज मोबाईल सुद्धा तिला हातात घ्यायला मिळाला नव्हता. आता ती मोबाईल न घेता ताणूनचं देणार होती. तेवढ्यात दोघे "आज मम्मा गोष्त सांगणाल, मम्मा गोष्त सांगणाल.", म्हणतं तिला झटू लागले.

" कोणी सांगितले तुम्हाला? ", वैभवीने थोडे चिडूनचं दोघांना विचारले.

" आजीने! आज तू चान चान नवी नवी गोष्त सांगणाल नं ", लव कुश

\"अरे देवा! (कपाळावर हात मारत) आज आई माझी चांगलीच परीक्षा घेतेय. मी दिवसभर काम करतेय तर, निदान मुलांना गोष्ट सांगून झोपावयाचे तरी होते पण तेही तिने माझ्यावरचं सोपवले. आई अचानक इतकी कशी निष्ठूरपणे वागायला लागली कोण जाणे? \" मनातल्या मनात तिने स्वतःलाच प्रश्न केला.

खरंतर तिला आईच्या या वागण्याचा खूप राग आला होता. पण तिने तो मुकाट्याने गिळला. आणि शक्य तितक्या शांतपणे ती मुलांना म्हणाली," अरे आजी विसरली. मम्मा नाही, आज पप्पा तुम्हाला गोष्ट सांगणार आहेत. ", झोपायची तयारी करत असलेल्या समीरकडे बघून वैभवी म्हणाली.

" नाही हं … अजिबातच नाही …. माझी उद्या मॅरथॉन आहे. सकाळी चार वाजता उठायचे आहे मला. तू बघ काय ते. मी झोपतो ….. मला उगीच डिस्टर्ब करू नकोस.", समीर तिला बोलून, अंगावर घेऊन लगेच झोपला सुद्धा.

वैभवीचा अगदीच नाईलाज झाला होता. झोपायची वेळ नसती तर, कदाचित तिने मोबाईलमधील यूट्यूबवरच्या गोष्टींचा व्हिडिओ लावून दिला असता. पण आता तिच्याकडे तोही पर्याय उरला नव्हता.

नाईलाजाने, तिने कंटाळत, जांभया देत, मध्येच डोळे चोळत, मिटत, त्यांच्या हट्टापायी एका पाठोपाठ एक एक करत दोन गोष्टी ऐकवल्या आणि दम देऊन जबरदस्तीने त्यांना झोपवले.

दुसऱ्या दिवशी रविवार,‌ सुट्टीचा दिवस असूनही, तिला सकाळी लवकर उठावे लागणार होते. वत्सलाबाईंनी तिला आधीच सांगितले होते की, \" त्या उद्या सकाळी, कोणासाठीही उठून दार उघडणार नाहीत.\" समीर सुद्धा सकाळी पाचलाच मॅरथॉनसाठी बाहेर पडणार होता.


क्रमशः

🎭 Series Post

View all