राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - ११
संघ : - मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - ११
आज तिला दरवाज्याची बेल जास्तचं वाजते असे वाटायला लागले होते. \"एवढ्या रात्रीचे कोण आले आता कलमडायला?\" रडकुंडीला येत तिने पुन्हा दिवे लावून, दाराच्या सर्व वरच्या, खालच्या लावलेल्या कड्या काढून दरवाजा उघडला. बाहेर तिला कोणीच दिसले नाही. तिला शंका वाटली, \"मला बेल वाजल्याचा भास तर नाही झाला नं? की खरेच कोणी मला त्रास देण्यासाठी बेल वाजवून गेले?\" म्हणून ती बाहेर येऊन जिन्याच्या दिशेने पाहू लागली. तिला कोणीच दिसले नाही. तिला जवळ जवळ रडू कोसळले होते.
डोळयात जमलेले अश्रू आवरत, ती परत फिरली तर दरवाज्याच्या बाहेरच्या कडीला हाराची पुडी दिसली. तिने कपाळावर हात मारत ती पुडी घेतली नि देव्हाऱ्याजवळ नेऊन ठेवली. पुन्हा दरवाज्याच्या सर्व कड्या लावून, दिवे मालवून ती बेडरूम मध्ये गेली.
समीर अजूनही पुस्तक वाचत बसला होता म्हणून त्यांच्या रूमचा दिवा जळतच होता. समीरने तिला रडताना पाहू नये असे वैभवीला वाटत होते. पण तिचा नाईलाज झाला होता. ती आज इतकी व्याकूळ झाली होती की तिचे उरले सुरले अवसान आता गळून पडले होते. तिच्या भावना इतक्या अनावर झाल्या होत्या की, ती बेडवर बसली नाही तोच, तिच्याही नकळत, दोन्ही गुडघ्यात तोंड लपवत, दोन्ही दुमडलेल्या पायांना मिठी मारून, ती मोठ-मोठ्याने हमसून हमसून रडू लागली होती.
वैभवीला असे रडताना पाहून समीर आवाक झाला. " अचानक काय झाले हिला रडायला? " असे म्हणत त्याने पुस्तक साईड टेबलवर ठेवले आणि उठून तिच्या बाजूला आला. त्याने तिला जवळ घेऊन विचारले," काय झाले वैभवी? का रडतेस तू? " पण ती काहीएक उत्तर न देता, त्याच्या कुशीत शिरून, अजूनच हमसून हमसून रडायला लागली.
समीरने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही ती रडतच राहिली. नाईलाजाने समीरने तिला मनसोक्त रडू दिले. थोड्या वेळाने ती स्वतःहून शांत झाली. त्याला सांगू लागली. पण जसजशी ती सांगत होती, बोलत होती, तसतसे तिचे रडणे प्रत्येक वाक्याला राहून राहून वाढतच होते.
तिने कालपासून घडलेला सगळा वृत्तांत सविस्तरपणे, रडत रडतच समीरला कथन केला. आज सकाळी उठल्यापासून ते आता झोपायला येईपर्यंत, कमीत कमी दहा ते बारा वेळा, दरवाजा उघडण्याचे काम तिने केले होते. सकाळपासून उभे राहून ती घरातली सगळी कामं आराम न करता, कशी करत होती, ते सांगितले. तिने केलेल्या आई आणि सासू बद्दलच्या, तिच्या चुका सुद्धा तिने कबूल केल्या. ती सर्वच बाबतीत चुकते आहे, हे तिने मान्य केले. तिच्याकडून तिच्या आईवर खूप अन्याय झाला होता. आईला तिने अगदीच गृहीत धरले होते आणि तिच्याकडून या वयात खूपच मेहनत करून घेतली होती. तिच्यामुळेच आईच्या तब्येतीची हेळसांड झाली. तिचे गुडघे जास्तच दुखायला लागले. या सर्वाचे तिला खूप वाईट वाटत होते." वैभवी सर्व सांगता सांगता रडत होती तर, मध्येच रडता रडता सांगत होती.
" सासू-सासर्यांना हवा असलेला मान ती देत नाही. त्यांना जवळ ठेवून घेत नाही. त्यांच्याशी ती चुकीची वागते. म्हणून तिची आई तिच्यावर रागावली आहे.", हेही तिने समीरला सांगितले. तिला तिच्या सगळ्या चुका मान्य असून, तिला तिची चूक सुधारण्याची संधी हवी आहे असे तिने रडत रडतच सांगितले. वैभवीला तिच्या वागण्याचे इतके वाईट होते की प्रयत्न करूनही तिला तिचे अश्रू थांबवता येत नव्हते.
तिने समीरला सिंगापूरची ट्रीप कॅन्सल करून त्याच्या आई-वडिलांना इथे रहायला आणण्यासाठी गळ घातली. त्याचे आई बाबा इथे राहायला आल्याशिवाय तिची आई तिला माफ करणार नाही असे तिला वाटत होते. तिने समीरला, मुलांना सांभाळण्यासाठी आणि वरचे काम करण्यासाठी एक बाई कामाला ठेवण्याचे सुद्धा कबूल केले.
यापुढे ती त्याच्या आई-वडिलांचा कधीच अपमान करणार नाही. याची तिने शपथ घेऊन, त्याला तिच्यावर विश्वास ठेवायला सांगितले. आईने तिची उशिरा का होईना, चांगलीच कान उघडणी केल्यामुळे, तिला तिच्या चुका कळल्या आणि यापुढे त्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची खात्री तिने त्याला बाळगायला सांगितली. तीही आता त्याच्यासारखे जबाबदारीने वागेल आणि जर ती कधी चुकली तर लगेचच तिचा कान पकडायलाही तिने सांगितले. सर्वात पहिले काम, ती उद्या आईसमोर कान पकडून माफी मागणार, सर्व चुका कबूल करणार. दुसरे काम म्हणजे उद्याच ती ऑफिसला सुट्टी घेऊन, ती आईला डॉक्टरकडे घेऊन जाणार असल्याचे तिने समीरला सांगितले.
कधीही स्वतःची चूक मान्य न करणारी वैभवी, आज स्वतःहून स्वतःच्या चुकांचा पाढा वाचत होती. नुसतीच चुका कबूल करत नव्हती तर त्या सुधारण्याची हमी सुद्धा देत होती. एकंदरच तिच्या मनात अपराधीपणाची भावना जागृत झाली होती.
वैभवी बोलत होती तेव्हा, समीर आवाक होऊन नुसता ऐकत होता. त्याला तिच्या अशा अनपेक्षित वागण्याची अजिबातच अपेक्षा किंवा सवय नव्हती. त्याच्यासाठी हा जबरदस्त सुखद धक्का होता. त्यामुळे तिला काय बोलावे, त्याला काहीच सुचत नव्हते.
शेवटी तिनेच त्याला गदागदा हलवून विचारले, " तू तयार आहेस नं तुझ्या आई-बाबांना येथे आणायला? माझी आई आणि तुझे आई बाबा यापुढे एकत्र आपल्या मुलांसोबत आनंदाने मजेत राहतील. आपण त्यांना घ्यायला केव्हा जायचे? प्लीज सांग नं! यापुढे तुझेही मी ऐकत जाईल … कधी कधी." रडता रडता ती खट्याळपणे हसली.
" हो उद्याच जाऊया आपण त्यांना आणायला. मीही ऑफिसमध्ये, उद्या फोन करून येत नसल्याचे कळवतो. मला अजूनही तू बोलते, त्यावर विश्वास बसत नाही. थँक्यू व्हेरी मच वैभवी. आय एम व्हेरी मच हॅप्पी अबाउट युवर डिसिजन. आय लव यू माय स्वीट हार्ट.", समीरने तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली.
ती पुन्हा त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाली, " समीर तुलाही माहित नसेल नं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत किती वेळा दरवाजा उघडावा लागतो ते?" तिने सकाळपासून कोणा कोणा साठी दरवाजा उघडला, त्याची यादीच त्याच्या समोर बोलून दाखवली.
" बापरे! इतक्या वेळा दरवाजा उघडलास तू? बरं झालं, आज ज्योती आली नाही. नाहीतर सकाळी आणि संध्याकाळी मिळून, अजून दोन वेळा तुला दरवाजा उघडावा लागला असता.", समीर तिची मस्करी करत बोलला
" दोन वेळा स्वयंपाक करावा लागला तो? त्याचा त्रास नाही का झाला मला? ", वैभवी लटक्या रागात चिडून म्हणाली.
" खरचं गं, मी विसरलोच ते. खूप दमलीस नं तू. ए मी तुझे पाय चेपून देतो.", समीर तिच्या पायाला हात लावून म्हणाला.
" नको. तू नको माझे पाय चेपू. मला अजूनच अपराधी वाटेल. आई एवढे रोज काम करते. तिचे पाय रोजचं दुखत असतात. स्वतःच बाम चोळत असते. मी कधीच तिला चोळून देत नाही. आज माझ्या मनात सुद्धा आले होते की, द्यावे तिचे पाय चोळून. पण मीच इतकी थकले होते की …. अन् मी एक दिवस काम केले तर लगेच तुझ्या कडून पाय चोळून घेऊ का? ", वैभवी पुन्हा त्याच्या कुशीत शिरत म्हणाली.
समीरनेही तिला जवळ घेतले. घराचा दरवाजा उघडता उघडता, वैभवीच्या मनाचा दरवाजा सुद्धा उघडला होता. याचा समीरला खूप आनंद झाला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा