उनाड मनाची दिवाळी
(गमतीशीर किस्से)
(गमतीशीर किस्से)
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा, दिव्यांचा आणि फराळाचा सण. परंतु, इतकेच मर्यादित नसून दिवाळी हा आठवणींचा देखील सण असतो. दिवाळीचे वेध लागताच जणू काही जादूची पेटी उघडावी आणि त्यातून एक-एक आठवण सुखाच्या सरींसोबत बाहेर पडावी असेच काहीसे वाटायला लागते.
दिवाळीचे नुसते नाव जरी काढले, तरी प्रत्येकाला काही ना काही किस्से हमखास आठवतात. माझ्याकडे तर अशा गोष्टींचा खजिनाच आहे. त्यावेळची दिवाळी आणि बालपण जोडले तर माझ्या डोळ्यांसमोर केवळ निरागस व मनाला निखळ आनंद देणारा उत्सव असेच चित्र उभे राहते. भलेही, त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते, पण तो आनंद लाखमोलाचा होता.
माझ्या दिवाळीतल्या आठवणींच्या पेटार्यामध्ये बरेच किस्से दडून बसले आहे. आता आठवले तर खुदकन हसू येते. त्यावेळी मी दहा-बारा वर्षांची असेल. आमच्या गल्लीत मुलांची संख्या जास्त होती. मुली तर अगदी नगण्यच. ज्या होत्या त्याही बंधनात असायच्या. त्यामुळे, आपसूकच मुलांशी माझी मैत्री होत गेली. त्यांच्यासोबत राहताना माझ्या वागण्याबोलण्यातून सुद्धा त्यांची झलक दिसायची. खोडकरपणा, दादागिरी, अरेरावी अशा गोष्टी करण्यात आमची 'गल्ली गॅंग' पुढे असायची. त्यांच्यात मी एकटी मुलगी असल्याने धाडसी उद्योग करण्यात मला त्यांचा भरपूर पाठिंबा मिळायचा.
आमची सर्वांची आर्थिक परिस्थिती तेव्हा बेताचीच होती. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला महागडे कपडे, निरनिराळ्या पदार्थांची रेलचेल आणि रंगीबेरंगी फटाक्यांची आतिशबाजी हे आमच्या खिजगणतीत देखील नव्हते. आमच्या लेखी दिवाळी म्हणजे अभ्यासाला सुट्टी आणि मनसोक्त खेळणे.
दिवाळीच्या दिवसात गल्लीतली काही मुले अंगणात खाटा टाकून प्रखर उन्हात ते फटाके वाळवत असत. जेणेकरून, रात्री ते फटाके व्यवस्थित फुटावेत. सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, रॉकेट, भुईचक्र, नागगोळी आणि लवंगी फटाके असे कित्येक प्रकार असायचे. त्यातही दरवर्षी नवीन फटाक्यांची भर पडायची. त्यामुळे आम्हा मुलांमध्ये फटाक्यांचे फार आकर्षण असायचे.
इतरांच्या अंगणातील फटाके पाहून माझी देखील आईमागे भुणभुण सुरू होऊन जायची. आई कंटाळून पाच-पन्नास रुपये हातावर टेकवायची. मी मुलगी असल्याने मला नागगोळी, सुरसुरी आणि लवंगी फटाके घेण्याचीच मुभा होती.
काळा धूर सोडणाऱ्या त्या नागगोळ्या, सुरसुर करणारी सुरसुरी आणि इवल्या-इवल्या लवंगी फटाक्यांनी माझे मन थोडीच भरणार होते. मी मोठे फटाके फोडू शकते, असे छातीठोकपणे सांगता तर यायला हवे ना? पण घरची परिस्थिती आणि आमचे छोटुसे वय पाहता आम्हाला मोठ्या फटाक्यांना कुणी हात सुद्धा लावू दिला नसता.
यावर धुसमुसत मी आमची 'गल्ली गॅंग' गोळा केली. आमच्यात दीर्घकालीन चर्चासत्र रंगल्यानंतर, त्यावर तोडगा निघाला. आमच्या 'गल्ली गॅंग' मधील 'मूर्ती लहान पण किर्ती महान' अशा अनुभवी सदस्यांनी मस्त जुगाड शोधून काढला. त्यावर आम्ही सर्वांनी मिळून अंमल करायचे ठरवले.
गल्लीतल्या मोकळ्या जागेत मोठी मुले फटाके फोडायची. त्यांचे झाल्यावर आम्ही तिथे फटाके शोधायला जाऊ लागलो. त्यात बरेच फुसके फटाके आम्हाला सापडायचे. ते सर्व गोळा करून आम्ही आपापसात वाटून घेत असे. त्यातले काही फुटायचे तर काही नुसते आशेला लावायचे. तरीही दिवाळी संपेपर्यंत आम्ही हा उद्योग सुरू ठेवला होता.
त्या शोधमोहिमेत न फुटलेले भुईचक्र, पाऊस, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बसारखे फटाके सापडले, की त्या आनंदाला परिसीमा नसायची. आम्हाला असे करताना कुणी पाहिलेच, तर आम्ही सर्वांना पटेल असे कारण शोधून ठेवले होते. जसे की, 'आमचे पेन, पेन्सिल किंवा रबर हरवले आहे, ते आम्ही शोधत आहोत.' त्यामुळे समोरच्याला आमचे कौतुकच वाटणार होते.
एकदा आम्हाला सुतळी बॉम्ब सापडला आणि मला तो रात्री फोडायची लहर आली. मी तो सुतळी बॉम्ब फोडणार म्हटल्यावर सगळ्यांनी पटापट जाऊन मोक्याची जागा पकडली. दोन-चार मुलांनी तर मला हातात फोडू नको म्हणून बजावले. एकाने मला कागद पेटवून त्यावर बॉम्ब ठेवायची सूचना दिली. तर दुसऱ्याने अगरबत्तीच्या मदतीने फोड म्हणून सांगितले. पण मी कुणाचं ऐकेल तर ना...
मी योग्य जागा शोधून तो सुतळी बॉम्ब ठेवला. तोपर्यंत सर्वांनी जितक्या लांब जाता येईल तितक्या लांब जाऊन आपापल्या कानांवर हात झाकून ठेवले होते. मी सुरसुरी घेऊन पळत जाऊन सुतळी बॉम्ब पेटवला. त्यानंतर थेट घराकडे पळत सुटली. धडामदिशी आवाज झाला. क्षणार्धात संपूर्ण गल्लीतले दिवे मालवले. सगळीकडे अंधार आणि बॉम्ब कुणी फोडला म्हणून नुसता गदारोळ सुरू झाला. त्या अंधाराचा फायदा घेत आम्ही सर्वांनी तिथून धूम ठोकली आणि स्वतःच्या घरात साळसुदासारखे जाऊन बसलो. बाहेर मुलांच्या नावे मनसोक्त खडी फोडली जात होती. काहींनी त्यावर 'दिवाळीत मुले फटाके फोडणारच.' असे बोलून प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. नंतर मोठ्यांनी आपसातच तो गोंधळ मिटवला. दुसऱ्या दिवशी मात्र त्या पराक्रमाची चर्चा करताना आम्ही हसून हसून ठार वेडे झालो होतो.
त्यानंतर आमच्यातल्या एकाला रॉकेट सापडले. एक जण रिकामी बाटली घेऊन आला. माती उकरून थोडासा खड्डा खणायचा. त्यात ती बाटली सरळ ठेवायची. त्यानंतर ते रॉकेट बाटलीत उभे करायचे. अशा पद्धतीने रॉकेटला जळती अगरबत्ती लावली की मग तो थेट आकाशात उडायचा. इतक्या साध्या गोष्टीत नवीन पराक्रम घडण्यासारखे काही नव्हते. म्हणून सर्वांनी हे साहसी काम करण्यासाठी माझी निवड केली. ठरल्याप्रमाणे सर्व तयारी झाली. त्या रॉकेटला अगरबत्ती तेवढी लावायची बाकी होती. मी मोठ्या अभिमानाने हातात अगरबत्ती घेऊन रॉकेट पेटवायला निघाली. जणू काही, मी अवकाशात अगदी खरेखुरे रॉकेट सोडणार आहे, असा माझा आविर्भाव होता. रॉकेट थेट आकाशात उडणार म्हणून सर्व मुले माझ्या आजूबाजूला उभी होती. सर्वांनी टाळ्या पिटत मला प्रोत्साहन दिले. मी हातातली अगरबत्ती त्या रॉकेटला लावली. फुस्सफुस्स करत त्या रॉकेटने पेट घेतला आणि काय झाले कुणास ठाऊक? ती बाटली आडवी पडली. आम्ही जागच्या जागी टुणटूण उड्या मारू लागलो. ते रॉकेट आपोआप दिशा बदलून समोरच्या पडक्या घराकडे झेपावले. आम्हाला वाटले की आता ते पडके घर पेट घेऊन जमीनदोस्त होणार. आम्ही सर्व पाणी आणण्यासाठी घराकडे पळालो. हातात भरलेल्या बादल्या घेऊन आल्यावर पाहतो तर काय? त्या घराच्या पडक्या भिंतीत ते रॉकेट रुतून बसले होते. घर शाबूत आहे म्हटल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. पण हातात भरलेल्या बादल्या आणि अंतराळात झेप घेऊ पाहणाऱ्या आमच्या रॉकेटची अवस्था पाहून आम्ही खोखो हसत सुटलो.
माझे घरात मुळीच पाऊल टिकायचे नाही. एके दिवशी आईने थेट फर्मान सोडले, की आज घरातच थांबायचे आणि चुपचाप फराळ बनवायला मदत करायची. घरातल्या कामांमध्ये मला काडीचा रस नव्हता. मी आढेवेढे घ्यायला सुरुवात केली. एवढ्याशा कारणाने आईने माझी शाळा घेतली. 'मी मुलगी असून मला घरातली कामे करता यायला हवी. सासरी गेल्यावर माझा निभाव कसा लागणार?' अशा ठोस मुद्द्यांसहित माझ्यावर अनेक आक्रमणे झाली. सरतेशेवटी मीच सपशेल माघार घेऊन मदतीला होकार दिला. तेव्हा कुठे आईने भरवलेल्या शाळेला अखेरीस पूर्णविराम मिळाला.
आईच्या योजनेप्रमाणे फराळ बनवायच्या यादीत चिवड्याला सर्वप्रथम स्थान मिळाले. चिवडा बनवत असताना माझ्या हस्ते पडलेल्या कुरमुऱ्यांना जमिनीवर लोळावे लागत होते. त्यांच्यात फरसाण आणि शेंगदाणे अधूनमधून लुडबुड करत असल्यामुळे त्यांच्या केविलवाण्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. भरीस भर, म्हणून आई देखील कधी त्यांच्याकडे तर कधी माझ्याकडे बघायची. माझ्या मते, मी मन लावून आईची मदत करत होती. माझ्या आईच्या मते, मी मात्र तिचे काम वाढवत होती.
बरीच उलाढाल केल्यानंतर चिवडा बनवून झाला. मग आम्ही शंकरपाळे बनवायला घेतले. आईने मला मैद्यात पिठीसाखर एकत्र करायला सांगितली. पूर्वतयारी म्हणून आईने पिठीसाखर आधीच तयार करून एका डब्यात भरून ठेवली होती. मी डबा काढला व आईने सांगितल्याप्रमाणे मैद्याच्या पिठात पिठीसाखर घालायला सुरुवात केली. पुरेशा प्रमाणात टाकून झाल्यानंतर 'अजून किती टाकू?' म्हणून मी आईला विचारले. तर आईने खाऊ की गिळू अशा नजरेने माझ्याकडे बघत डोक्याला हात मारून घेतला. मी मात्र आईकडे 'आता मी काय केले?' अशा अविर्भावात बघत होती. आई रागाने बोलली की, "तू चुकून मुलीचा जन्म घेतला? पिठीसाखर आणि मीठ यातला फरक देखील तुला कळत नाही का?"
झालं. संपलं. माझ्या पराक्रमाची झळ न बनवलेल्या शंकरपाळ्यांना लागली होती. आईच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वाग्बाणांनी माझी यथेच्छ धुलाई झाली. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पुढे होऊ घातलेल्या एकतर्फी युद्धातून पलायन करणे हाच अंतिम मार्ग उरला होता. मी तो तात्काळ अमलात आणला. परंतु, खरं सांगायचं तर आईला माझं कौतुकच नाही. त्यादिवशी माझ्या हातून नकळतपणे एका नवीन पदार्थाचा शोध लागला होता. आज तो पदार्थ 'खारे शंकरपाळे' म्हणून सर्वांना परिचित आहे.
त्यावेळी आमच्या घरी फराळाला येणाऱ्या प्रत्येकाला खुसखुशीत शंकरपाळ्यांसहित तो खमंग किस्सा आईकडून रसभरीत वर्णन करून ऐकवला जायचा. आईने तर त्याचे नामकरण 'चिनूमुळे चुकलेले शंकरपाळे' असे करून टाकले होते. नंतर मात्र आईने चुकूनही अशा कामांसाठी माझी मदत घेतली नाही. मी स्वतःहून देऊ केली तरी, 'तू बाहेरच बरी'. असे गौरवद्गार ऐकायला मिळायचे.
एकदा माझ्या पराक्रमाची झळ मलाच बसली. एका अर्थाने माझी कायमची खोड मोडली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. झाले असे की, एके दुपारी आम्हाला नागगोळी पेटवायची हुक्की आली. दुपारच्या शांततेला तडा जाऊ नये, म्हणून घरातले आम्हाला दिवा पेटवू देईना. एकाने घरून गुपचूप जाडजूड अशी अगरबत्ती पेटवून आणली. नागगोळी जमिनीवर ठेऊन पेटवण्याच्या नादात मी अगरबत्तीला फुंकर मारू लागली. तितक्यात माझ्यामागे उभे असलेल्या कुणाचा तरी तोल जाऊन मला धक्का लागला. मी कळवळली पण वेगळ्या कारणाने. त्या अगरबत्तीचा चटका माझ्या वरच्या ओठाला लागला होता. माझा वरचा ओठ खूप भाजला. माझ्या आई-वडिलांनी ताबडतोब मला दवाखान्यात नेले. काही दिवसांनी ती जखम काळी पडली. पण, ते फार विचित्र दिसायचे. नंतर कित्येक दिवस मला तोंड झाकून फिरावे लागत होते. त्यावेळी सर्वांसाठी तो विनोदाचा विषय होऊन गेला होता. 'मिशीवाली मुलगी' बघायला मिळणे जरा दुर्मिळच असते, नाही का?
त्या घटनेनंतर आगीपासून चार हात लांबच राहायचे, अशी मी जणू काही भीष्म प्रतिज्ञाच करून टाकली. अजूनही तिचे इतके तंतोतंत पालन होते की, आजगायत मी घरातला सिलेंडर देखील लावलेला नाहीये.
असो, असे बरेच किस्से आहेत पण तूर्तास थांबूया. तेव्हाच काळ आणि आताचा काळ यात जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वीच्या फटाक्यांपेक्षा आताचे फटाके जास्त तीव्र आहेत. त्यामुळे मी केलेले नकोसे धाडस चुकनही करायला जाऊ नका. थोरा-मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांचा आनंद घ्या. स्वतःची व आपल्या सोबत इतरांची काळजी घेऊन सणांचा आनंद साजरा करा. खरा सण सर्व कुटुंबाने एकत्र जमून आनंदाने साजरा करण्यात आहे. त्यामुळे सर्वांच्या सोबतीने दिवाळीचा आनंद एकत्रितपणे मनसोक्त लुटा.
जाता जाता अजुन एक सांगायचे राहीले. आमची 'गल्ली गँग' दिवाळीत ओळखीच्या लोकांच्या घरी न बोलवता फराळाला जायची. आता फराळाला बोलवायची पद्धत आहे म्हणे. मग बोला, कधी बोलवताय मला फराळाला?
दिवाळीत छान छान पदार्थ बनवा. अनावधानाने चुकलेल्या पदार्थांचे खरपूस किस्से तयार ठेवा. भविष्यात अशा गोष्टी एकांतात खुदकन हसायला भाग पाडतात.
माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
लेखन - अपर्णा राजेश परदेशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा