Login

उंच माझा झोका भाग -3 अंतिम

एक्का अपमानित स्त्रीचीे भरारी
उंच माझा झोका
भाग-3 अंतिम

इकडे तिच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे हलचल मचली.
तिने पुण्यात पोचल्याबरोबर माहेरी फोन करून आपबीती कथन केली आणि सांगितले आता मी स्वयंपूर्ण होणार, माझं कर्तृत्व सिद्ध करणार. परत तिथे जाणे नाही.

रसिका जात्याच हुशार होती त्यात त्याला जिद्दीची जोड मिळाली. ती सहा महिन्यातच दुसऱ्या मोठ्या कंपनीचा इंटरव्यू पास करून तिथे जॉईन झाली.
मेहनतीने काम करत ती बॉसची आवडती झाली. बॉस मॅडमने तिच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली.
एका फॉरेन बँकेचे काम होते. ती दहा जणांच्या टीमची टीम लीडर होती. सहा महिन्याचे काम तिने तडफदारीने पाच महिन्यात पूर्ण करून तिच्या बॉसची, कंपनीची तर वाहवा मिळवलीच सोबत त्या फॉरेन बँकेचे सर्टिफिकेट मिळाले.

आणि तोच तिच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला.

नंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.
तिच्या ठिकाणी असलेल्या बुद्धिमत्तेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या वृत्तीने तिची घोडदौड सुरू झाली. भाग्यनेही साथ दिली.

जेमतेम पाचसहा वर्षाच्या कालावधीत ती एका प्रतिथयश अशा आयटी कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर पोहोचली.
गेल्या वर्षभरात कंपनीने जी प्रगती केली आणि नफा कमवला त्यात तिचा मोलाचा वाटा होता.
कदाचित तिच्या योगदानानेच ते घडू शकले होते.
...............

इकडे राजीव, बाई बाटलीच्या पाशात पुरता अडकून गेला.कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कंपनीने त्याला कामावरून कमी केले.

रसिकाच्या निघून जाण्याने त्याचे आई-वडील खचले होते. त्यांनी परोपरिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला.
रसिका निघून गेल्यानंतर तर तो पुरता वाहवला.
कधी कधी दोन दोन दिवस आई-वडिलांना त्याचा चेहराही दिसत नव्हता. ते हतबल झाले होते.
नोकरी सुटल्यामुळे ज्या मुलीला त्याने आपली म्हटले तिनेही त्याला वाऱ्यावर सोडून दिले.

त्यामुळे तो जास्त सैरभैर झाला हातातले पैसे संपले होते आता शोकपाणी कशाच्या भरोशावर करणार?

मग त्याची गाडी ताळ्यावर आली.
त्याची अवस्था बघून त्याच्या एका मित्राने त्याला आपल्या कंपनीत जॉब दिला.
पण त्याचे डिमोशन झाले होते. पंचवीस लाखाच्या पॅकेज वरून तो सरळ अडीच लाखाच्या पॅकेजवर आला होता. काय करणार...? अडला हरी गाढवाचे पाय धरी.

वर्ष दीड वर्ष काम केल्यानंतर तो रसिका ज्या कंपनीत होती त्या कंपनीत इंटरव्यू द्यायला आला होता.

आता त्याचे भविष्य रसिकाच्या हातात होते. रसिकाने त्याला तीन लाखाचे पॅकेज देत ठेवून घेतले.

आता राजीवची अवस्था नाकापेक्षा मोती जड अशी झाली होती.
जिचे उदाहरण पूर्वी तो रसिकाला द्यायचा तिने राजीवला रस्त्यावर आणले होते.
आणि राजीवने जिला नालायक ठरवले होते ती रसिका आज त्याच्यावर बॉस म्हणून अधिराज्य गाजवत होती.
रसिकाने त्याचा भ्रमाचा भोपळा फोडला होता.
तिने आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले होते,

' उंच माझा झोका '

राजीवच्या हाती अपॉइंटमेंट लेटर देत रसिका आपली पर्स खांद्याला लटकवत, उगाच चष्म्याशी खेळत, जिंकल्याचा भाव चेहऱ्यावर दाखवत, राजीव कडे एक कुत्सित कटाक्ष टाकत एक शब्दही न बोलता तोऱ्यात निघून गेली.

राजीवचा नक्षा उतरला होता.
त्याला वाटत होते धरणीने दुभंगावे आणि आपल्याला पोटात घ्यावे. त्याच्या डोक्यात आत्महत्येचाही विचार स्पर्शून गेला.

रसिका जरी निघून गेली होती तरी त्याच्या डोळ्यासमोरून रसिका जातच नव्हती.

खरे तर तिनेच तेव्हा आत्महत्या केली असेल असे त्याला वाटले होते.पण झाले उलटेच.

हा जमिनीवर आला होता तर तिचा झोका उंच उंच गेला होता.

समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all