Login

उंधियो रेसिपीज इन मराठी

गुजरातची फेमस भाजी उंधियो


उंधियो


गुजरातची सगळ्यात फेमस आणि सगळ्यांची आवडती डिश कोणती असेल तर ती उंदियो आहे. यात सगळ्या भाज्या असतात त्यामुळे खुप पौष्टिक आणि चवदार भाजी तयार होते. महत्त्वाचे म्हणजे थंडीतच ह्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि त्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे.

साहित्य : ओले हिरवे ताजे वाटाणे, घेवडा (वालाच्या शेंगा) वांगी, एक मोठा बटाटा, तुरीचे दाणे ह्या सर्व भाज्या १०० ग्रॅम किंवा अर्धा पाव घ्याव्या. एक वाटी सुके खोबरे, साखर चार ते पाच चमचे, मीठ चवीनुसार, गरम मसाला दोन चमचे, ओवा अर्धा चमचा, कोथिंबिर एक वाटी, मेथीची भाजी एक मोठी वाटी, बेसन पिठ दोन वाटी, जीरे एक चमचा, मोहोरी एक चमचा, तीळ एक चमचा, आलं लसूण पेस्ट दोन चमचे, टोमॅटो तीन ते चार बारीक चिरून घेतलेले आणि फोडणीसाठी तेल.

कृती : वाटाणे, वालाच्या शेंगा, बटाटा, तुरीचे दाणे ह्या सगळ्या भाज्या सोलून स्वच्छ धूवून कुकरच्या एका भांड्यात घ्याव्या.

खोबरे किसून त्यात साखर एक चमचा, मीठ , गरम मसाला, लाल मिरची, ओवा, कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून मसाला तयार करणे आणि छोटी छोटी वांगी मधून दोन चिरा पाडून त्यात हा तयार मसाला भरून घेणे.

आता चिरलेल्या भाज्या कुकरच्या खालच्या भांड्यात घालाव्यात आणि वरती जाळी ठेवून त्यावर वांगी ठेवावी म्हणजे वांगी कोरडी राहतील आणि त्याचा लगदा होणार नाही म्हणून वेगळी वाफवून घ्यावी. कुकरच्या दोन शिट्ट्या करुन घ्याव्या म्हणजे भाज्या शिजतील.

मेथीची पाने बारीक चिरून त्यात बेसन पिठ, एक चमचा साखर, मीठ, ओवा घालून एकत्र करुन घट्ट मळून घेणे आणि छोटे छोटे लांबट मुठीये तयार करून तेलात तळून घेणे.

फोडणी : मोठ्या कढईत चार ते पाच पळी तेल घेऊन त्यात मोहरी जीरे ओवा तीळ घालून तडतडू देणे. नंतर आलं लसूण पेस्ट टाकून परतवणे. आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून चांगले परतवणे. त्यात साखर दोन ते तीन चमचे, गरम मसाला दोन चमचे, तिखट दोन तीन चमचे, हळद अर्धा चमचा घालुन सर्व मसाले एकजीव करून त्यात वाफवलेल्या भाज्या घालून एकत्र करून थोडा वेळ परतवून घेणे. आता त्यात मुठिये घालणे आणि शेवटी मसाला वांगी घालणे म्हणजे त्यांचा लगदा होणार नाही आख्खेच राहतील. सर्व भाज्या एकत्र करुन घेणे आणि थोडा वेळ परतवणे. जास्त कोरडे वाटत असेल तर हवे असल्यास पाणी घालणे आणि परतवणे. नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उंदियो भाजी तयार आहे.

उंदियो वर बारीक शेव घालून त्यासोबत पुरी खातात. ही भाजी थोडी गोडसर असते. तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता.

किचन तुमचे आणि रेसिपी माझी.

खात रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा तसेच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all