उंदीर

एक धमाल विनोदी कथा
घरात उंदरांचा जाम सुळसुळाट झाला होता. किती म्हणजे किती त्रास द्यावा त्यांनी.बिनधास्त पलंगामध्ये काहीतरी कुरतडत बसायचे. काय कुरतडायचे देव जाणे. थोडं काठीने ठाक ठोक केलं की तेवढ्या पुरता आवाज बंद व्हायचा. थोड्या वेळाने परत कुरतडण सुरु व्हायचं. त्यामुळे झोप पूर्ण व्हायची नाही. परत उंदर काय नुकसान करत असतील यांची काळजीच लागून राहिली होती.

एकदोन वेळा एक उंदीर बायकोला स्वयंपाक घरात झर्रकन पळतांना दिसला. गॅस सिलेंडर च्या मागे जाऊन लपला. बायकोने काठीने बरीच आपटा आपटी केली पण तो पठ्ठा घाबरला नव्हता. बायको बराच वेळ काठी आपटत होती.

तुला घाबरायला तो काही तुझा नवरा नाही, अर्थात या माझ्या गमतीशीर बोलण्यात एव्हढं भडकण्या सारखं काय होतं कुणास ठाऊक.

नुसत्या तोंडाच्या वाफा दवडण्या पेक्षा त्या उंदराला पकडा. मग काय ते बोला. स्वतः काही करायचं नाही. आणि दुसरं कोणी करतंय तर काहीतरी आचरटा सारखं बोलायचं. काय काय  नुकसान करून ठेवलं आहे त्या उंदराने ते पाहायच्या ऐवजी नुसतं तोंड वाजवायला सांगा. अहो, मी तुमच्याशी बोलते आहे, बायकोने माझ्या हातात काठी देत म्हटलं.

मी पण शूर पणे ती काठी हातात घेतली. सिलेंडर ताकदीने लोटून  भिंतीला पूर्ण टेकवून ठेवला. एका बाजूने उंदीर पूर्ण बंदिस्त झाला होता. आता दुसऱ्या बाजूने त्याला बाहेर काढायचा आणि बाहेर आल्याबरोबर दणका देऊन मारूनच टाकायचे. मी बायकोला हळू आवाजात प्लॅन समजावून सांगितला.

अहो, जोरात बोला ना दुपारी जेवलात ना दाबून. त्या उंदराला तुमचं बोलणं समजत नाही आणि समजलं असतं तरी इंटरेस्ट नसता. कळलं का.

हे बघ, उंदीर आतच आहे सिलेंडरच्या मागे. त्याला एका बाजूने मी पक्का अडकवला आहे. आता मी त्याला सिलेंडरला हलवून हलवून बाहेर काढतो. तू तो बाहेर आला की त्याच्या पाठीत काठी घाल. मी तिच्या हातात काठी देत म्हटलं.

काठी हातात धरून ती जय्यत तयारीत उभी राहिली. मी सिलेंडर हलवलं, सांडशीने त्याच्यावर टोले मारले. आणि सुळकन उंदीर बाहेर आला. त्या बरोबर बायकोने जोरात काठी हाणायला, त्याने निसटून जायला आणि मी, मेलो मेलो करून ओरडायला एकच वेळ झाली.

तिच्या काठीचा टोला उंदरा ऐवजी माझ्यावर पडला होता हे तुमच्या लक्षात आलेच असेल.उंदीर कुठे गायब झाला होता कळलंच नाही.

पक्के धांदरट आहात. साधा उंदीर पकडता येत नाही. बायकोने मला सर्टिफिकेट दिलं.

ऑफिस मध्ये मात्र मी छाती पुढे काढून,  गुंडांशी दोन हात केल्यामुळे टेंगुळ आल्याचं सांगितलं. अर्थात त्या वर कोणी विश्वास ठेवला नाही म्हणा.

दुपारी ऑफिस मध्ये परत बायकोचा फोन आला, की उंदरा बद्दल काहीतरी करा. तिला पुन्हा तो दिसला होता. तिचा फोन आल्याबरोबर माझा हात नकळत डोक्याच्या टेंगळा कडे गेला.

आमचा एक गणपत नावाचा शिपाई आहे. त्याला कान फुटेपर्यंत जरी जोरात बेल वाजवली तरी ऐकायला जातं नाही. पण असा एखाद्याचा खाजगी फोन आलेला असला की कितीही हळू आवाजात बोला त्याला लगेच सगळं स्पष्ट ऐकू येत. मी घामाघूम होऊन फोनवर बोलत म्हणजे ऐकत होतो तेंव्हा त्याचं पूर्ण लक्ष होतं माझ्याकडे.

काय साहेब, पकडला का उंदीर. त्याने खवचटपणे हसत विचारलं. माझं डोकंच फिरलं होतं. पण त्याच पुढंच बोलणं ऐकल्यावर त्याच्यावरचा राग नाहीसा होऊन गेला.

साहेब, उंदीर असा पकडायचा नसतो. एकदम सोप्प आहे. एक पिंजरा विकत घ्या. त्यात काहीतरी खायचं ठेवा. तो पिंजरा उंदराच्या येण्याजाण्याच्या मार्गांवर ठेवा, बघा पिंजऱ्यात उंदीर पकडला जातो की नाही.

त्याचा सल्ला ऐकल्यावर माझा त्याच्या बद्दलचा आदर प्रचंड वाढला. अरे पण, मला उंदराचा पिंजरा कुठं मिळतो ते माहित नाही.

तुम्ही कशाला जाता साहेब, मी आणून देईल ना. पैसे देऊन ठेवा. उद्या घेऊन येतो. त्याने एव्हढी खात्री दिल्यावर त्याला मी पैसे दिले.

आता फक्त एक दिवस त्रास काढा साहेब. तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी त्याला रिकाम्या हाताने पहिल्या वर मी त्याला विचारलं की पिंजरा कुठं आहे, तर तो म्हणाला दुकान बंद होते. आणि माझी तब्येतही ठीक नव्हती साहेब. असेलही कदाचित, कारण त्याला धड बोलता पण येत नव्हते आणि डोळे लालभडक झाले होते.

सलग चार दिवस होऊन गेले पण पिंजरा मिळत नव्हता. त्याचाही नाईलाज होतं होता. शेवटी मीच थोडी चौकशी केली तर आमच्या घराच्या जवळच एक जनरल स्टोअर होतं तिथंच पिंजरा मिळाला. गणपत कडे पिंजऱ्याचे पैसे मागणं शोभत पण नव्हतं.

मी शूर वीरा सारखा पिंजरा हातात धरून हलवत आणला. आमचं  टेन्शन आता संपणार होतं. आमचा शत्रू आता पकडला जाणार होता.

बायकोला म्हटलं काहीतरी चमचमीत करून पिंजऱ्यात ठेव. म्हणजे तो उंदीर पकडला जाईल. नेहमीच ठेवलं तर तो ढुंकून पण पाहणार नाही.

समजतात मला तुमची असली बोलणी. एव्हढं माझं जेवण खराब असतं तर बोलावून घ्या सासूबाईंना आणि मला द्या पोहोचवून माहेरी.

अग मी गंमत केली असं म्हणतं मी लगेच नांगी टाकून दिली. मस्त भजी कर कांद्याची. तुझ्या हातच्या कांद्याच्या भज्यांसाठी तर  सात जन्म तुझ्याबरोबर काढावा लागला तरी चालेल.

ही एकदम खूष झाली. मस्त कांद्याची भजी केली. खूप मस्त झाली होती.मला तर सगळीच खाऊन टाकावीशी वाटतं होती. पण उंदरांसाठी बाकी ठेवावी लागली.

रात्री आम्ही पिंजऱ्यात भजी ठेऊन झोपलो. सकाळी उठून पाहिलं तर खरोखरच एक भलामोठा मण्यांसारखे काळे डोळे असलेला उंदीर पिंजऱ्यात पकडला गेला होता.

आमचा आनंद गगनात मावेना. पण तो उंदीर पण खूप निर्ढावलेला दिसत होता. आपण पकडले गेलो आहोत याबद्दल त्याला कणभरही खंत वाटतं नव्हती. अगदी मजेत असल्या सारखा त्याचा चेहरा दिसत होता. खरं म्हणजे या आधी इतक्या जवळून मी पण कधी उंदीर पाहिलेला नव्हता. त्या मुळे त्याच्या हालचाली जवळून पाहणं खूप मजेच वाटतं होतं.

आमच्या घरी पिंजऱ्यात उंदीर पकडला गेला आहे हे कळल्या बरोबर सगळ्या चाळीत एक उत्साह पसरला. एक एक जणं पाहायला यायला लागले.

अहो, त्याला काही खायला वगैरे दिलं की नाही अजून. नाहीतर उपाशी मरायचा बिचारा. शेजारच्या काकू.

अहो, काकू त्याला पाळला नाहीये आम्ही. पकडला आहे.

म्हणून काय झालं, माणुसकी वगैरे काही असते की, आता एखादा कैदी पकडला किंवा चोर पकडला तर आपण का त्याला उपाशी ठेवतो की काय. असं करू नका, मुका प्राणी आहे तो. तुम्हाला झेपत नसेल तर मला सांगा. मी आणते काहीतरी त्याच्या साठी खायला.

काकू ऐपत काय काढता. असे छप्पन उंदीर पाळू शकतो आम्ही. माझी बायको पण चवताळली.

मला तर वाटते ही उंदरीण असावी. एक मध्यमवयीन महिला त्या उंदराचं बारकाईने निरीक्षण करत म्हणाली. मला तर वाटतं ही प्रेग्नन्ट असावी. अयायी ग, बिचारीच्या पोटात बाळं असतांना कसला वाईट प्रसंग आला आहे  बिचारीवर. कुठं फेडतील हो ही पाप. मध्यमवयीन शाप देत म्हणाली.

अहो, एव्हढा कळवळा आला आहे तुम्हाला तर घेऊन जा ना तुमच्या घरी बाळंतपणाला. जास्त शिकवू नका. समजलं ना. माझी बायको.

दरम्यान सात आठ मुलांची एक टोळी येवून त्या पिंजऱ्या भोवती येवून बसली. एक जणं त्याच्या साठी पाव बिस्कीट घेऊन आला होता. एक बदमाश मुलगा त्याला काडी टोचून बघत होता. मुलं अगदी मन लावून त्याच्या हालचाली पाहात बसली होती.

आमचा चहा नाश्ता सगळं राहिलं होतं. मुलांच्या समोर त्यांना न देता चहा पाणी घेणं योग्य वाटतं नव्हतं. म्हणून आम्ही सगळ्यांसाठी नाश्ता बनवला.

नऊ वाजेच्या सुमारास आमच्या गल्लीतले भजन मंडळात मृदूंग वाजवणारे काका आमच्या घरी आले. चहा पाणी झाल्यावर म्हणाले,

तुमच्या घरी उंदीर पकडला गेला आहे म्हणे. काकांनी विचारलं. हो ना काका, हा काय पिंजऱ्यात पकडला आहे. काका पिंजऱ्या जवळ गेले. उंदराला मनलावून पहिल्या नंतर, एकदम माझे हात हातात घेऊन हात जोडून म्हणाले, धन्य आहात जोशी बुवा.

एक उंदीर पिंजऱ्यात पकडला गेलाय, त्यात काय धन्य असण्यासारखं काय आहे.

अहो, आज काय तिथी आहे माहिती आहे का. आज संकष्टी चतुर्थी आहे. गणपतीचा दिवस. आणि नेमकं त्याच दिवशी त्याच वाहन तुमच्या घरी आलं यात तुम्हाला काहीच दैवी संकेत दिसत नाही.

काका, हा भयंकर बदमाश उंदीर आहे. याला ठार करावं लागणार आहे. माझे किती महत्वाचे कागद याने कुरतडले आहेत. तुम्हाला काय माहित.

अहो, पण तुमचे कागद कुरतडणारा उंदीर हाच आहे कशावरून. कशाला उगाच पापाचे धनी होता अजून.

हे पहा काका, हा तोच उंदीर आहे की नाही माहित नाही. पण याला तर मारावचं लागेल.

असं बर कराल. तुम्ही काहीही कराल आणि आम्ही ते भोगायचं का म्हणून. काका पण ऐकत नव्हते.

तुम्हाला कशाला भोगावं लागणार. काय संबंध तुमचा त्याच्याशी. मी पण चिडलो होतो.

अहो, महाराज, तुम्ही केलेलं पाप सगळ्या चाळीला भोगावे लागेल. जर तुम्ही त्याला मारणार असाल तर मी आमरण उपोषण करीन, समजलात काय. काकांनी धमकी दिली.

माझी ऑफिसला जायची वेळ होतं होती. पण उंदीर मारायला हवा की सोडायला हवा अशा दोन मताचे लोकं भरपूर जमा झाले आणि वादविवाद सुरु झाले. त्यात ऑफिस बोंबललं.

शेवटी असा सामोपचाराचा मार्ग निघाला की उंदराची गणपतीच वाहन म्हणून पूजा करायची. त्याची आरती वगैरे करून क्षमा मागायची आणि त्याला पाण्यात सोडून यायचे.

झालं, सगळ्यांनी एकदम गलका केला. चतुर्थी असल्याने सगळं वातावरण भक्तिमय झालेलं होतं. एकेक बाईने येवून त्याला हळदी कुंकू वाहिलं. त्याची नाक घासून क्षमा मागितली. मग टाळ मृदूंग वाले जमा झाले. जोरदार आरती सुरु झाली. हळदी कुंकू अंगावर पडल्याने तो उंदीर पण धार्मिक दिसायला लागला होता.

शेवटी नारळ फोडून, प्रसाद वाटला. आणि तो उंदीर पाण्यात सोडायला मी पिंजरा घेऊन निघालो तेंव्हा अनेक बायकांनी डोळ्याला पदर लावला, अनेकांनी हात जोडले. माझ्या सोबत छोटे छोटे पोरं आली होती. आमच्या घराजवळच नाल्याची भिंत होती. त्या पाण्यात मी त्याला सोडायचं ठरवलं.

भिंतीवर उभं राहून मी पिंजरा झटकला. पण तो उंदीर खाली पडेचना. जोरदार झटकला तर उलटा माझ्याच हातावर चढून आला. त्या बरोबर पिंजरा पाण्यात पडला आणि उंदीर नाल्या काठच्या भिंतीवरून सुसाट पळत गेला आणि माझ्या आधी घरात जाऊन पळाला.

हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. पण बायकोला अजिबात सांगितलं नाही, उंदीर निसटल्याचं आणि पिंजरा पाण्यात पडून वाहून गेल्याच.

दुसऱ्या दिवशी, मला सकाळीच बायकोच्या किंकाळीने जाग आली. अहो, उठा उठा. ती कोळश्याच पोतं हलवावं तसं हलवून मला उठवत होती.

काय झालं. मी विचारलं.

तिने दाखवलेल्या टेबलाच ड्रॉवर उघडून पाहिलं तर आत मध्ये सात आठ डोळे न उघडलेली उंदरांची छोटी छोटी पिल्लं ची ची करत होती.

मी अलगद सगळी पिल्लं कागदात गुंडाळली आणि इकडे तिकडे कोणीच पाहात नाही असं पाहून गुपचूप पाण्यात टाकून आलो.

(समाप्त)