*माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग*
गोष्ट छोटी डोंगराएवढी
संध्याकाळी काम संपल्यावर \"सुहाना\" समोर पतीदेवांची वाट पाहत उभी होते.तेवढयात साधारण वय वर्षें 47/48 वयाचा इसम पण अती कष्टामुळे जवळपास वयाची साठी उलटलेली आहे असा भासणारा एका मुलीसोबत हॉटेल बाहेर आला. उन्हात रापुन काळा झालेला वर्ण, गालाची खोपट झालेली, डोळे खोल गेलेले आणि भेदरलेले, अंगात नेहरू शर्ट आणि विजार असा पेहराव आणि हातात नायलॉन ची पिशवी! शहरात शिक्षणासाठी राहणारी त्या सद्गृहस्थाची मुलगी आपल्या वडिलांकडे हॉटेल मध्ये जाण्याबद्दल हट्ट करत होती. आपल्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या "बापूला" तिला हॉटेल मधील तिला आवडलेला पदार्थ खाऊ घालायचा होता.
लेकीने खूप शिकावे, मोठे व्हावे हे बापूने आपल्या लाडक्या राधी साठी पाहिलेले स्वप्न! आणि त्यासाठीच बापूने राधीला शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर ला शिक्षणासाठी ठेवले होते.
राधी लहानपणापासून हुशार आणि होतकरू मुलगी. शाळेत नेहमी पहिला क्रमांक असायचा. परिस्थिती बिकट असताना राधा हुशारी आणि मेहनत यांच्या जोरावर सर्व गोष्टीत अव्वल असायची याचे तिच्या शिक्षकांना कौतुक असायचे. ते नेहमी राधा च्या बापूला तिला पुढे शिकविण्याबद्दल आग्रही असायचे. त्यामुळे बापूनेही राधीला शिक्षणासाठी लातूरला ठेवले होते.
आणि आज काही महिन्यानंतर बापू राधीला भेटायला गावाकडून आला होता. लाडक्या राधीला तिच्या बापूला तिचं नवं जग दाखवायचं होतं. म्हणूनच ती बापूला हॉटेल मध्ये जण्याविषयी आग्रह करत होती.
बापुसाठी हॉटेल हि संकल्पनाच नवीन होती. आणि इकडे जाऊन काहीतरी \"वेगळे चमचे, काटे\" यांनी पदार्थ खायचे असतात. ते सगळं आपल्याला जमेल का? आपल्याला लोक काय म्हणतील या विचाराने बापू धास्तावाला होता. राधीकडे पाहून थोडा धीर येई पण ती आपणच जन्माला घातलेली पोर! तिला काय समजणार? या विचारांनी परत बापूचा धीर खचत होता
लाडकी राधी मात्र हट्ट सोडायला तयार नव्हती. ती परोपरीने बापूला सांगत होती, "काही होत नाही बापू, मी जाऊन आले न माझ्या मैत्रिणीसोबत. फक्त आपल्याकडे बिल देण्यासाठी पैसे पाहिजे." बापू पुन्हा पुन्हा चार पाऊले पुढे जाऊन मागे येत होता. हॉटेल मधील लोकांच्या नजरा न्याहाळत होता. जवळपास अर्ध्या तासानंतर राधीने हात धरून बापूला हॉटेल मध्ये नेले.
फॅमिली सेक्टर मध्ये बसल्यानंतर आधी बापूने दोन ग्लास पाणी ढसाढसा पिले. आता बापूची नजर थोडी स्थिरावली होती. राधीने वेटरला \"दोन मसाला डोसा\" ची ऑर्डर दिली.
डोसा समोर आला, पण परत बापूची पंचायत! त्यासोबत "काटे चमचे" पण आले होते. आता काय करायचं? हा यक्षप्रश्न बापुसमोर उभा राहिला होता. राधीने जाणले. तिने चमचे बाजूला सारले आणि म्हणाली," बापू, आपण घरी जेवतो तसंच खायचं, चमचा नकोच." साध्या बटाटा भाजी आणि गुंडाळलेल्या पोळीसाठी हा थाटबाट पाहून बापू गांगरून गेला होता.
राधीने बापुसाठी डोसा हाताने खायला सुरुवात केली. ते बघून बापूनेही डोसाच्या एक तुकडा तोंडात घातला आणि त्याची चव घेण्यात बापू स्वतः ला हरवून गेला. राधी हळूच बापूकडे बघत होती. बघता बघता तिचे डोळे पाणावले. जग जिंकल्याचा आनंद तिला मिळाला होता. डोळ्यातलं पाणी रुमालाने टिपताना तिला भूतकाळ आठवत होता , \"आपण फक्त बापूने दिलेल्या स्वातंत्रामुळे हे सगळं अनुभवू शकलो. बापूच्या कष्टातुन मिळालेल्या पैशातून शिक्षण घेतो आहोत. हे शहातातलं जग आज बापूच्या पाठींब्यामुळे पाहू शकतो आहोत\"
राधीला प्रत्येक वेळी नवीन गोष्ट पाहताना , अनुभवताना बापूची आठवण येत असे. बापूने कधी सिनेमा पहिला असेन का? कधी नाटक पाहिलं असेन का? या विचारांनी राधीला गलबलून येत असे, पण आज तिचं स्वर्वस्व , तिचा बापू तिच्या सोबत होता आणि तिला आवडलेला "डोसा" चवीने खात होता. राधीला हे पाहून भरून येत होते. एव्हाना डोसा खाऊन झाला होता. एका वेगळ्याच समाधानाने राधीचे पोट भरले होते.
बिल दिल्यानंतर बापू राधीला म्हणाला, "राधे, डोसा लई मस्त होता बघ. पुढच्या खेपेला गावाकडं येताना माझ्यासाठी अन तुझ्या माई साठी रुमालात बांधून आन बरं का हेव डोसा.."
राधीच्या डोळ्यात साक्षात परमेश्वर भेटल्याचा आनंद दिसत होता. डोळ्यातून डोकावणाऱ्या आनंदाश्रूंना रुमालाने अलगद टिपून घेतले होते.
बाप लेकीच्या प्रेमाचा, मायेचा, एकमेकांसाठी काहीतरी करण्याचा हा प्रसंग पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या गेल्या आणि हा प्रसंग कायम मनात घर करून राहिला.
गितांजली सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा