ती आमच्या शाळेत होती. अनुप्रीता नाव तिचं. हास्याचा खळखळता झरा जणू ती. आमच्या वर्गात कायम पहिला क्रमांक असायचा. आमच्या शाळेत चौथी आणि सातवी ची स्कॉलरशिप मिळवणारी पहिली विद्यार्थिनी. आम्हा वर्ग मित्रांना तिचा खूप अभिमान असायचा; अजूनही आहे. अनु माझी जवळची मैत्रीण होती. आम्ही सगळ्या मैत्रिणी तिला अनु म्हणायचो. एवढं हुशार असूनही तिला कधी गर्व नव्हता. आमच्यात छान मिळून-मिसळून राहायची. आम्ही तर लाफिंग पार्टनर होतो. बोलण्यापेक्षा आमच्यात हसणं जास्त असायचं. आम्ही कधी कधी अनुला म्हणायचो, "अनु, इतर हुशार मुली बघ कशा असतात, एकदम गंभीर; नाहीतर तू, कोणाला तुझ्या वागण्यावरून वाटणार पण नाही की तू इतकी हुशार आहेस". त्यावर म्हणायची, "मी तशी असते तर तुमची मैत्रीण असते का!" तिच्या स्वभावात खूप निरागसता होती आणि तितकीच वैचारिक प्रगल्भता पण. खूप ठाम मते होती तिची आणि ती धडाडीने मांडायची. सहावीत आमच्या ज्या वर्गशिक्षिका होत्या त्या फार अध्यात्मिक प्रवचन द्यायच्या. तुम्ही जे कराल तेच परत मिळतं वगैरे खूप काही सांगायच्या. त्या वयात आम्हाला ते पटायचं पण अनु म्हणायची, असं काही नसतं चांगल्याचं चांगलं वाईटाचं वाईट असं होतं का नेहमी! त्यावर खूप सारी समर्पक उदाहरणे पण तयार असायची तिच्याकडे. तिचं म्हणणं मग जी लोकं दुखी आहेत, त्या सगळ्यांनी वाईट कर्म केली आहेत, असं म्हणणं आहे का तुमचं? माणसाने कुठे जन्माला यावं हेही त्याच्या हातात नसतं. तिथून त्याचा संघर्ष सुरु होतो. तिच्या आवडी निवडी पण वेगळ्या. तिला जुनी गाणी आवडायची. जुनी म्हणजे फार दुर्मिळ. आम्ही कधी ऐकली पण नव्हती. दिलीप कुमार वर तर विशेष प्रेम. त्यावर भरभरून बोलायची ती. तिने त्यांच्यावर लेखही लिहिला होता, जो आमच्या बाईंनी तिच्या सातवीच्या स्कॉलरशिपच्या सत्कारात वाचून दाखवला होता. तिचे केस हा पण एक आकर्षणाचा विषय होता. साधारण सर्व मुली वेण्या घालत. आम्हा काही मुलींचा बॉबकट असायचा. पण या मॅडमचा मशरूम कट. आम्ही पाहून पाठवून गणवेशात पण केसांवरून तिला लगेच ओळखायचं आणि ती आमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान वाटायची. तिच्या वागण्या बोलण्यात खूप प्रांजळपणा होता.
आयुष्यात सगळं आपण विचार करतो, तसं होत नसतं. नववीच्या अगदी सुरुवातीलाच तिचं डोकं दुखायला लागलं. बऱ्याचदा ती बेंचवर डोकं ठेवून झोपायची. मग मान पाठ दुखायला लागली. शाळेतून लवकर निघून जायची बऱ्याचदा. तिच्या आईवडिलांनी खूप डॉक्टर्स बघितले तिच्यासाठी. पण तिला काही गुण येत नव्हता. तरी नववीला ९३ टक्के मिळवले पठ्ठीने. तिचं हसणं कमी झालं होतं पण तरी चेहऱ्यावर तेज कायम होतं. दहावीला तर तिची अवस्था खूपच वाईट झाली. तिला बोर्डाची परीक्षा देणं पण कठीण झालं. आमच्या हक्काच्या मेरीट रंकरला ६६% मिळाले; पण त्यातही तिने जेवढं लिहिलं, त्यात पूर्ण मार्क्स मिळाले होते. शेवटी शेवटी तिची तब्येत थोडी सुधारली तर संस्कृत मध्ये ९४ गुण. आमच्या शाळेत पूर्ण संस्कृत नव्हतं; पण आपण आपला अभ्यास करून परीक्षा देऊ शकत होतो. तिने सगळा स्वतः अभ्यास केला. शाळेत यायला जमायचं नाही, तर शिकवणी कुठून लावणार! हां आणि त्या वर्षीही एनटीएस परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर तिची निवड झाली होती. दहावीच्या रिझल्टच्या दिवशी कुठेही दुःख नाही चेहऱ्यावर. तेव्हा म्हणाली, आता माझं डोकं दुखत नाही मग मी बारावीला येईन मेरिटमध्ये. एवढ्या तेवढ्याने खचून जाणारी थोडीच होती ती!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा