आम्हाला तेव्हा वाटलं, अनुचा संघर्ष संपला. हो, संघर्षच होता तो. कारण तिच्या दुखण्यावर विश्वास ठेवणारे लोक फार कमी होते. अगदी डॉक्टर्स म्हणत, असं २४ तास कोणाचं दुखत नाही. तिला पेन-किलर्स नी पण बरं वाटायचं नाही. आपोआप दुखण्याची तीव्रता कमी-जास्त व्हायची. बरेच जण म्हणायचे, तिच्या चेहऱ्यावरून तर वाटत नाही. पण त्यात तिचा काय दोष? उलट मला तर तिच्या सहनशीलतेचं कौतुक वाटायचं. तेव्हा आम्हाला कळलं की तिसरीत असल्यापासून तिचं पोट दुखायचं. तेव्हाही बेरियम टेस्ट पासून सगळ्या चाचण्या केल्या; पण काही निदान झालं नाही आणि आता त्यात भर म्हणून ही डोकेदुखी. पण आम्ही एवढ्या जवळच्या मैत्रिणी असून सुद्धा आम्हाला तिच्या पोट दुखी बद्दल माहिती नव्हती. ती म्हणायची, त्याचा माझ्या ईफिशियन्सी वर परिणाम व्हायचा नाही, त्यामुळे मला त्याचं काही वाटलं नाही. किती तो समजूतदारपणा! जेव्हा दहावीच्या रिझल्टच्या वेळी ती डोकं दुखत नाही म्हणाली, तेव्हा खूप बरं वाटलं. आमच्या शाळेची सर्वात लोकप्रिय विद्यार्थिनी होती ती आणि दहावीच्या अपयशाने त्यात काही फरक पडला नाही. खरंतर ते अपयश नव्हतंच. त्यावेळी तिला एका हितचिंतकाने पत्र लिहिलं होतं. त्यातील दोन ओळी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतात, "यशाची मोजपट्टी ही व्यक्तिगणिक भिन्न असते. परिस्थितीची प्रतिकूलता त्या मोजपट्टी ची उंची ठरवत असते". अनुचा हा खरा सत्कार होता. त्यावेळी लोक शाळेतील बोर्डावर नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करायचं सोडून अनुप्रीताचं नाव कसं नाही, म्हणून आश्चर्य व्यक्त करत होते.
तिने आमच्या शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेला प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही दिवस ती खूष वाटत होती. आम्ही फ्रेंडशिप डे ला भेटलो सुद्धा होतो. नंतर भेटी गाठी कमी झाल्या, तरी आम्ही फोनवरून संपर्कात होतो पण काही दिवसातच तिचा त्रास परत सुरु झाला. यावेळी तिला मानसिक ताण पण खूप होता. तिच्या ज्या वर्गशिक्षिका होत्या, त्यांनी तिला मॉरल सपोर्ट देण्याऐवजी अगदी पहिल्या दिवसापासून बोलायला सुरुवात केली," तू सायन्सला प्रवेश कशाला घेतलास? तुला गणित विषयात करिअर करायचं होतं, तर ते आर्ट्स ला जाऊन पण करता येतं. तुझी प्रॅक्टिकल्स बुडाली तर मी परत शिकवणार नाही." अनुने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर नंतर तिची जी सर्वात जवळची मैत्रीण होती, ती तिच्याशी तुटक वागायला लागली आणि मग अनु फारच एकटी पडली. अनुचा स्वभाव खूप हळवा होता. तिला आपल्या माणसाचा दुरावा, अबोला सहन व्हायचा नाही. ह्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आमचा वर्गमित्र मंगेश. हिचा फार जीव त्याच्यावर. आणि त्याचा स्वभाव,थोडा काय, जरा जास्तच विचित्र होता. तो मध्ये मध्ये हिच्याशी बोलणं बंद करायचा आणि मग अनु एकदम कासावीस होऊन जायची. नववी पासून तर तो बोलायचाच नाही आणि कारणही नव्हतं काही, निदान आम्हाला तरी माहीत नव्हतं. म्हणजे अनु एवढी आजारी पडूनही त्याने साधी तिची विचारपूसही केली नाही. ज्युनिअर कॉलेजलाही एकाच वर्गात आले. पण तेव्हाही बोलायला तयार नाही मग अनुने स्पष्टच विचारलं, मी आजारी असूनही तुला माझी साधी विचारपूस करावीशी वाटत नाही? तर ह्याने काय उत्तर द्यावं! माझ्या विचारण्याने तू बरी होणार आहेस का.. मला नाही वाटत, असं आपण आपल्या शत्रूही वागू शकतो. तिला सगळीकडूनच एकटेपणा जाणवत होता आणि तिचा तर एवढा लाघवी स्वभाव! शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी तिला खूप त्रास होत होता. ऍलोपॅथिक डॉक्टर्स करून काही होईना, म्हणून तिला योगाच्या क्लासला घातलं, तर बरं वाटण्याऐवजी अजूनच थकवा यायचा आणि मग अजूनच दुःखायच, तरी तिने नेटाने सहा महिने चालू ठेवलं पण आता उपयोग होत नाही; उलट त्रासच जास्त म्हणून तिथे जाणं बंंद केलं, तोपर्यंत बारावीचं वर्ष सुरु झालं होतं. आम्ही सगळे आपापले क्लासेस, अभ्यास यात व्यस्त झालो होतो आणि ती मात्र दुखण्याशी झगडत होती. असं काय झालं होतं तिला.. जे इतक्या वेदना देत होतं. डॉक्टर म्हणत होते की कोणत्याही आजारात माणसाला २४ तास वेदना होत नाहीत, ती पण इतकी वर्षे सलग.
बारावीच्या रिझल्ट च्या दिवशी मी तिला फोन केला तर तिला डिस्टिंक्शन मिळाले होते आणि त्या दरम्यान ती ठाण्याला शिफ्ट झाली. माझंहीकॉलेज तिथेच होतं. त्यामुळे आम्ही परत भेेटू शकणार होतो. कॉलेज सुरू होण्याआधी मी तिच्या नवीन घरी भेटायला गेले होते. अनु मला बघून खूप खुश झाली. तिने गेल्या दोन वर्षात भोगलेला त्रास, वेदना, एकटेपणा सगळं सांगितलं. आता नवीन डॉक्टरांना दाखवायचं नाही, असं ठरवलं होतं. ती म्हणाली, बारावीची परीक्षा देण्याइतकीही माझी अवस्था नव्हती. सप्टेंबर महिन्यात मी सहज जुन्या प्रश्नपत्रिका चाळत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ठराविक धडे तयार करून मला 77% मिळू शकतात आणि मला कुठून तरी बळ मिळालं. फिजिक्स आणि गणित यांंवर भर दिला मी. प्रीलिम्सला तर माझा विशेष असा अभ्यास झाला नव्हता. मी दोन-तीन धडे व्यवस्थित तयार करून जायचे आणि दहा पंधरा मार्कांचा (चाळीस पैकी) पेपर लिहून यायचे. कोणालाच वाटलं नव्हतं की मी 75 टक्के मिळवू शकेन. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला. ठरवेल ते साध्य करून दाखवण्याचं सामर्थ्य तिच्याकडे होते. महत्त्वाचं म्हणजे प्रिसिजन होतं. अंदाज पण अगदी अचूक. गणितात रस असल्याने तिने बी. एस्सी. ला प्रवेश घेतला. आमचं कॅम्पस एकच होतं. मी कॉमर्स ला, ती सायन्स ला. पहिल्या वर्षाला माझं कॉलेज सकाळी होतं आणि तिच दुपारचं. बरं होतं ते. तसही ज्युनिअर कॉलेजला सकाळी लवकर उठून आणि मग चार मजले सोडूनच तिथे डोकं अक्षरशः फुटायचं. इथे पहिल्या मजल्यावर वर्ग होता. एक दिवस मी कॉलेजमधून बाहेर निघत होते आणि ती गेटमधून आत शिरत होती. तिने छान गुलाबी कॅप्री आणि पांढरा स्लीवलेस टॉप घातला होता. नाजूक गुलाबी रंगाची नक्षीकाम असलेला. त्यामध्ये इतकी गोड दिसत होती पण चेहरा अगदी उतरला होता. विचारलं तर म्हणाली, डोकं दुखतंय. तिला काहीतरी बोलायचंय असं वाटत होतं; पण लेक्चर आहे मग जावं लागेल; म्हणून ती गेली. मला तर एकदम काळजात धस्स झालं! हे सगळं कधी थांबणार! अनुुप्रीताला तिचं पूर्वीचं आयुष्य परत मिळणारच नाही का?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा