अनु आता एका नामांकित कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. अनुला खरंतर आय. ए.एस. अधिकारी व्हायचं होतं. पण तिच्या दुखण्यामुळे तिला त्याचा अभ्यास करणं शक्य झालं नाही. ती म्हणते, माझं फक्त डोकं दुखत नाही. खरंतर पूर्ण अंग दुखत असतं. मी झोपताना पण दुखत असतं.. झोपेतून जाग येते तेव्हा पण.. आपण थोडं डोकं दुखलं तरी चिडचिड करतो.. काम होत नाही. आणि ती तर हे गेली १८ वर्षं सहन करतेय. त्यात तिला आवाजाचा, प्रकाशाचा भयंकर त्रास होतो. तिला एवढी गाण्यांची आवड असून ती गाणी ऐकू शकत नाही. पण त्याचं ही ती दुःख करत बसत नाही.. ती म्हणते, मी ऐकलेली गाणी माझ्यात इतकी भिनली आहेत की न ऐकता ही मी त्याची अनुभूती घेऊ शकते. वाचनाची इतकी आवड पण कॉलेजचं काम सांभाळून वाचायच तर स्ट्रेस ने अजून त्रास होतो. मग ती पण इच्छा मारायची. तिच्या वेदना फक्त संवेदनशील लोकांनाच कळतात, बाकीच्यांना वाटतं, एवढं तर सगळं करते, कसलं दुखणं तिला. आता आमच्या शाळेत एवढी आवडती होती ती. पण फक्त आमचा मित्र पंकज म्हणायचा, आपण अनुप्रीता ला भेटायला जाऊ. बाकी कोणी प्रतिसाद दिला नाही. मग तो एकटाच गेला भेटायला. अनु यावर म्हणते, अग मधुबाला आजारी पडल्यावर तिला ही कोणी विचारलं नाही. तिलाही एकटेपणा भोगावा लागला, तर मी कोण आहे! ह्या सगळ्या कलाकारांवर तिचं खूप प्रेम. ती म्हणते, ते माझं कुटुंब आहे. तसही तिच्या सो कॉल्ड जवळच्या लोकांनी तिला कधी समजून घेतलं नाही. म्हणते, माझी मावस भावंडं, त्यांच्या आठवणी, माझ्यासाठी सगळ्यात दुःखद आहेत. का, अनुशी लोक असे वागत असतील. तिच्या आवडीनिवडी खरंतर अभिरुची, वैचारिक पातळी सामान्य लोकांना झेपत नाही. पण यातून व्यक्तिगत पातळीवर तिचा तिरस्कार का करतात! अनुला वंचित लोकांसाठी खूप सहानुभूती. म्हणे, त्यांना अनुकूल वातावरण मिळालं असतं, तर ते ही पुढे गेले असते. आपल्याला ते मिळालं, त्यांना मिळालं नाही म्हणून काय आपण त्यांच्यापेक्षा मोठे होत नाही. उलट ती जमेल तितकी मदत करते त्यांना. एकदा आम्ही ट्रेन मधून जात होतो, तर २० रुपयांची वस्तू तिने ५० रुपये देऊन विकत घेतली. बाजूची मुलगी म्हणते, ह्यात तीन वस्तू आल्या असत्या. हिचं म्हणणं, मॉल मध्ये तुम्ही भरपूर पैसे देऊन वस्तू घेता. वर, त्याचा तुम्हाला अभिमान मग गरिबांना थोडे जास्त पैसे दिले तर काय बिघडलं! ते आपल्या समाजाचा घटकच आहेत ना. म्हणे, माणूस मरताना कितीतरी पैसा ठेवून मरतो..मग तो पैसा मी आज कोणाच्या तरी गरजेसाठी दिला तर काय बिघडलं. भले ही, मी त्याचं आयुष्य उभं करू शकणार नाही कायमचं, पण त्याची त्या क्षणी ची गरज भागवली तरी खूप आहे. हॉटेल मध्ये गेलं की ही टेबल पुसणाऱ्य मुलांना ५०-१०० रुपये देणार. निदान आपल्या कष्टाची कोणीतरी जाणीव ठेवत, ही जाणीव किती सुखद असते. आणि एवढं करून लोक तिला म्हणतात, तुला तुझे प्रॉब्लेम्स मोठे वाटतात, आजूबाजूला बघ, म्हणे. ती गमतीत म्हणते, आजूबाजूला बघून तर जाणवतं, आपला प्रोब्लेम खूपच मोठा आहे. हे लोक तर माझ्या वेदनेची कल्पनाही नाही करू शकत. आणि देवाचीच योजना असावी की ह्या लोकांनी मला सहानुभूती दाखवू नये, कारण ते ज्याची कल्पनाही करू शकत नाही, ते मी सहन करतेय. आणि उलट तरीही त्यांना माझ्या पोझिशनच हेवा वाटतो. म्हणजे मी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश त्यांच्यासाठी स्वप्न आहे. काही सुजाण लोक म्हणतात, तू बरी असतीस, तर कुठच्या कुठे गेली असतीस, तर त्यावर हिचं उत्तर असतं..कदाचित इथेच असते, पण जे मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागल्या, ते सहज मिळवलं असतं. किती तो विनय!
अनुला साडी ची भारी आवड! ती काहीही विशेष नसताना पण कॉलेजला साडी नेसून जाते. इथे आम्हाला ओढणी सावरायचा त्रास होतो आणि ह्या मॅडम साडी नेसून अगदी सहज वावरतात. तिचं सगळं वेगळंच आहे. जे लोकांना कठीण वाटतं, ते तिला अगदी सहज वाटतं. ती म्हणते, जो लॉजिकली विचार करू शकतो त्याला गणित येतं. ह्या गणिताने किती जणांना शिक्षणाची भीती बसली, पण अनु म्हणते, गणित आहे, म्हणून मी ह्या परिस्थितीत करिअर करू शकले. तिला आय. ए.एस. ची परीक्षा देण्याची खूप इच्छा होती. ती देवाला म्हणायची, तू मला अधिकारी बनवू नकोस.पण निदान मुलाखती पर्यंत पोहोचता येऊ देत. तिच्या मते, अंतिम ध्येयपेक्षा तोपर्यंतचा प्रवास महत्वाचं. तोच तिला साजरा नाही करता आला. सतत मन मारून जगायचं. हे खाल्लं की त्रास होतो. रात्री जेवल्यावर टीव्ही बघितला की त्रास होतो. रात्री जेवल्यावर वाचायचं पण नाही.. मग दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तरी.. ती म्हणते, माझ्या जीवाची नुसती घालमेल व्हायची, कारण रात्री अभ्यास केला तर दुसऱ्या दिवशी पेपर लिहू शकणार नाही. तरी तिने नेट, गेट अशा स्पर्धा परीक्षांमध्ये पण उत्तुंग यश मिळवलं. पण नंतर तिला आठ तास जॉब करणं शक्य होत नव्हते. मग त्याचं पण फ्रस्ट्रेशन. तरी ती आपलं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत राहायची. तिच्या या आजारपणात शारीरिक त्रासापेक्षा तिची अवहेलना खूप होत होती. बी. एसी. च्या प्रथम वर्षी तिला इतकं यश मिळालं की तिच्या उप प्राचार्या म्हणाल्या, आम्हाला बघायचं होतं, एवढे गुण मिळवणारी मुलगी आहे तरी कोण? कितीतरी वर्षांनी तिला तिच्या योग्यतेची वागणूक मिळाली होती. पण दुसऱ्या वर्षी कॉलेज सकाळचं होतं. १५ दिवसांत तिच्या लक्षात आलं की सकाळी लवकर उठलं की तिचं दिवसभर खूप डोकं दुखत राहतं.तिला वाटलं तिचे प्राध्यापक तिला समजून घेतील. गणित विभागातून काही त्रास नव्हता. पण जे संख्याशास्त्र चे प्राध्यापक आधी तिच्यावर एवढा जीव ओवाळून टाकत होते, त्यांचं म्हणणं, असा कसा त्रास होतो. तू दुपारी झोपत जा. आता एवढं सोपं असतं तर अनुने कशाला अपेक्षा केली असती ह्यांच्याकडून समजून घेण्याची. मग ती कधी लेक्चर ला नाही गेली आणि प्रॅक्टिकल ला गेली तर मग हे बरं जमतं, म्हणून टोमणे. नंतर तर तिला ते ही जमत नाही, मग ही आता तेवढं ही करत नाही, म्हणून कुरकूर. बरं, ती काय कॉलेज बुडवून मजा करत होती का! एक दिवस जाऊन पण एवढी तब्येत बिघडायची की आठवडा भर पुरायच दुखणं. आणि गणिताचे लेक्चर्स थोडे उशिरा असायचे, तर तू ते अटेंड करतेस, आणि स्टॅटिस्टिक्सचे नाही. आता स्पर्धा थोडीच होती ही. तरी पहिल्या सत्राला हिने ९५% मिळवले. तरी दुसऱ्या सत्राला ह्यांनी इतका मनःस्ताप दिला की तिला अभ्यास पण करायला जमेना. आणि मग ती 82% वर आली.. रिझल्टची हुरहूर होतीच. तिला 88% मिळालेले आणि एका गुणाने पहिला नंबर गेला. बरं, ह्यात अजून वाईट म्हणजे, तिला काही गणिताचे ट्यूटोरियल स्टेशन्स ना जाता आलं नाही, म्हणून तिथे 5 मार्क्स गेले होते. म्हणजे ती खरं तर पहिलीच आली होती. पण आपली चूक नसताना हे तिच्या वाट्याचा सन्मान तिला मिळाला नाही आणि त्याही पेक्षा या सगळ्याचं कोणालाच गांभीर्य कळत नाही आणि माझ्या बाबतीत असंच होत राहणार, ह्या भावनेने ती खचून गेली. पहिल्या वर्षाच्या निकालाच्या वेळी तिचं तोंड भरून कौतुक करणाऱ्या प्राचार्यांनी तिची दखल ही घेतली नाही, आणि हे सगळं का, तर मला जमत नसताना ही मी लेक्चर्स ना जावं या अट्टाहासापायी. ती म्हणायची, नियम समाजाच्या सुव्यवस्थेसाठी असतात आणि त्या नियमाचा कोणाला त्रास होत असेल तर त्याचा काय उपयोग! तशीही अनु सगळ्याला अपवाद. कोणतीही चांगली गोष्ट लगेच आत्मसात करण्याची वृत्ती होती तिच्यात. एकदा सिग्नलला एक लहान मुलगा गजरे विकत होता. रात्रीचे नऊ वाजले होते; म्हणून तिने त्याच्याकडून सगळे गजरे विकत घेतले आणि म्हणे, ही कल्पना मला एका सिरीयलच्या नायकावरून सुचली. तिचं नेहमी म्हणणं असतं, देणाऱ्याच्या भूमिकेत असणं खूप सुखद असतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा