Login

अवास्तव अपेक्षा - १

लग्न ठरवताना मुलींची त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात. खरं की खोटं ?
आज अनुराधाच्या घरी किटी पार्टी होती . घडयाळात सहाचे ठोके पडले , तसे एक - एक जणी यायला सुरवात झाली. बऱ्याच वर्षांपासून एकाच सोसायटीमध्ये राहिल्यामुळे त्या सगळ्यांचं खूप छान जमायचं. या सगळ्यांची गप्पा गॅग अख्या 'रहेजा इनक्लेव्ह' मध्ये प्रसिध्द होती. गप्पा गँग (GAPPA GANG) म्हणजेच G - गिरीजा, A - अपर्णा, P - प्रांजली, P - पद्मजा, A - अनुराधा, G - गौरी, A - अर्चना, N - निशा आणि G - गौतमी .
गिरीजा आणि पद्मजा दोघी गृहिणी होत्या , अपर्णा कुकिंगचे क्लासेस घ्यायची , प्रांजली बॅकेत अधिकारी होती, अनुराधात प्राध्यापिका होती , गौरी आणि निशा दोघींचा पार्टनरशीपमध्ये छोटासा बिझनेस होता , अर्चना आणि गौतमी गव्हर्नमेंट ऑफिसर होत्या. थोडक्यात सांगायचं तर, सगळ्याच जणींचे कुटुंब सधन आणि सुखवस्तू होते. 'आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो' , या उद्देशाने ही गप्पा गँग समाजसेवेतही अग्रेसर होती . दर महिन्याला जमणारी किटी ही पूर्णपणे समाजपयोगी कामांसाठी खर्च केला जायची . आजसुद्धा जमा झालेल्या किटीचे काय करायचे याची चर्चा रंगली होती.
बोलता बोलता निशाचे लक्ष टेबलवर ठेवलेल्या पत्रिकेवर गेले. " काय गं अनु , ही पत्रिका कोणाची ? " निशाने विचारले. "अरे देवा! आपल्या गप्पांच्या ओघात मी ती तुम्हाला दाखवयचीच विसरले बघ ," अनुराधा खुर्चीवरून उठत बोलली. "उगीच नाही आपल्या ग्रुपचं नाव गप्पा गँग ठेवलं ," गिरीजा हसतच म्हणाली. " हो ना! आपलं असंच असतं . गप्पांच्या नादात आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचा विसरच पडतो," पद्मजाने तिची री ओढली. तोपर्यंत अनुराधा पत्रिका आणि पेढे घेऊन आली. " हे घ्या पेढे आणि ही बघा पत्रिका ! आमच्या सुशांतचं लग्न ठरलं बरं का!" सुशांत म्हणजे अनुराधाचा सख्खा पुतण्या, तिच्या धाकट्या दिरांचा मुलगा. " अरे वाsss , अभिनंदन तुमच्या सर्वांचं! खास करुन सुशांतच! " , निशा पत्रिका हातात घेत म्हणाली. " ए अनु, आता पार्टी पाहीजे बरं का ! तुझ्या एकुलत्या एका पुतण्याचं लग्न ठरलं आहे," गौरी तोंडात पेढे कोंबत म्हणाली. " काय गं गौरे , तुला ज्यात- त्यात पार्टी कसली पाहिजे असते गं ! कारण काहीही असो ही पार्टी मागायला तयारच असते ," गौरीच्या पाठीत धपाटा घालत अर्चना म्हणाली. " अगं अर्चू, तुला तर माहितीच आहे, माझा मुलगा सिंगापूरला असतो आणि त्याचे बाबा सतत फिरतीवर असतात. त्यामुळे बऱ्याचदा घरात मी एकटीच असते. मग एकटीपुरतं जेवण करायचा कंटाळा येतो . त्यामुळे पार्टी असली की कसं , चार लोकंही भेटतात आणि आयतं जेवणही मिळतं " गौरी थोडीशी इमोशनल होत म्हणाली. अर्चना पुढे काही तोच तिचं लक्ष प्रांजलीकडे जाणाऱ्या अनुराधाकडे गेलं. " अरे देवा, आता नक्कीच काहीतरी होणार" , अर्चना मनातल्या मनात म्हणाली.

खर तर अनुराधा आणि प्रांजली म्हणजे अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी.गप्पा गँगच्या आधीपासूनच त्या एकमेकींच्या खास मैत्रिणी होत्या. दोघींची मैत्री कॉलेजपासूनची होती. अगदी एकमेकींच्या लग्नात करवली म्हणून मिरवल्या होत्या . त्यामुळे दोघींच्या फॅमिलाचाही चांगलाच घरोबा होता. पण ३-४ महिन्यांपूर्वीच्या त्या घटनेमुळे दोघी एकमेकींशी फारश्या बोलायच्या नाहीत. आत्ताही प्रांजलीच्या हातात पेढे ठेवत अनुराधा ठसक्यात म्हणाली," आमच्या सुशांतच लग्न ठरलं बरं का गं ! हे घे पेढे ! भावजी येतीलच पत्रिका द्यायला पण मी आत्ताच तुला आमंत्रण देते , लग्नाला सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे हं . " " अभिनंदन ! आम्ही नक्की येऊ लग्नाला ! काही मदत लागली तर हक्काने सांग ", प्रांजली म्हणाली. " तसं तर आम्ही इव्हेंट प्लॅनरच बुक केलाय , त्यामुळे आम्हालाही फारशी कामं नसतील. पण तू म्हणतेच आहेस तर सांगेन तुला काहीतरी! " अनुराधा तुसडेपणाने म्हणाली. प्रांजली पेढा खाता खाता सूचक हसली . " बाकी आमच्या होणाऱ्या सूनबाई मात्र एक नंबर आहेत. अगदी आमची अपेक्षा होती तशीच ", अनुराधा अपेक्षा या शब्दावर जोर देत म्हणाली. आता मात्र प्रांजलीचा संयम सुटला. ती म्हणाली ,

काय म्हणाली असेल प्रांजली ? ३-४ महिन्यांपूर्वी काय घडलं असेल ? अनुराधाच्या होणाऱ्या सुनेकडून कोणत्या अपेक्षा आहेत ?
जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग
0

🎭 Series Post

View all